केरळ म्हणजे सौंदर्याचे नंदनवनच. मोठमोठे हिरवेगार डोंगर, त्यातून जाणाऱ्या नागमोडी वाटा, प्रसन्न हवा.. जगी सर्वसुखी असा कोण आहे, असाच प्रश्न असेल तर उत्तर एकच- केरळ फिरणारा माणूस!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगप्रसिद्ध सुफी संत पीर मोहमद जगभर फिरत असताना केरळच्या डोंगर प्रदेशात आले. तिथला निसर्ग, निस्सीम शांतता त्यांना इतकी भावली, की ते तिथेच स्थायिक झाले. ही जागा म्हणजे तीन हजार फूट उंचीवरचे चहाच्या मळ्यात लपलेले सदाबहार पीरमेड. तिथून ३५ किमीवर असलेले प्रसिद्ध स्थान म्हणजे ठेकाडी व पेरियार सरोवर व जंगल. या स्थानाचे नाव पीर मोहमद यांच्यावरून पडले. त्यांच्या नावाची मशीद एका उंच डोंगराच्या पायथ्याशी आहे.त्रावणकोर राजघराण्याचे पीर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते, त्यामुळे या जागी ते वारंवार भेटीला येत. उन्हाळ्यात राहण्याकरिता राजाने येथील एका डोंगराजवळ घनदाट झाडीत मोठा अद्ययावत सोयी असलेला राजवाडा बांधला.
एर्नाकुलम, कोट्टायम पीरमेड अशा १२० किमीच्या प्रवासभर सुरेख, गर्द झाडी, वळणाचे रस्ते, सुबक, टुमदार खेडी दिसतात. चढणीचा रस्ता लागला आणि आसमंतात हिरवेगार चहाचे मळे दिसू लागले. गारवा जाणवू लागला. केरळ टुरिझमचे दोन मजली अर्ध वर्तुळाकार हॉटेल घनदाट जंगलात लपलेले. १० ते १२ खोल्या, उत्तम रंगकाम, गोलाकार पांढऱ्या मार्बलचा पॅसेज, प्रत्येक रूमसमोर उघडी गच्ची, तिथे निस्सीम शांतता आणि सुखद थंडी होती. जेवणाचा मात्र सरकारी खाक्या. काही मिळणार नाही याचा प्रथम पाढा. लाल टोमॅटोची परतलेली भाजी, पोळ्या, केरळमधील जाडय़ा तांदळाचा भात असे जेवण समोर आले.
त्रावणकोर महाराजांच्या भग्नावस्थेतील राजवाडय़ाकडे जाणारा रस्ता अरुंद होता. या राजवाडय़ाचं नाव युलसीथरा. एके काळचं सागवान लाकडाचं फर्निचर, इटालियन टाईल्स, शेकोटीची जागा, यातलं आता काहीही शिल्लक नाही.
सात किमी अंतरावरचं ग्रांपी वा परूनथमपुरा म्हणजे निसर्ग सौंदर्याचं नंदनवन आहे. डोंगरांच्या रांगाच्या रांगा. मध्ये अस्ताव्यस्त पसरलेली दरी आणि एका बाजूच्या डोंगराचा चित्रविचित्र आकाराचा काळा दगड ज्याला इगल्स रॉक म्हणतात. अशा दगडांच्या रांगा पाहून थक्कच झालो. एकाचा आकार रवींद्रनाथांच्या दाढीधारी चेहऱ्यासारखा दिसतो म्हणून त्याला टागोर रिमेम्बर्ड स्पॉट म्हणतात. या शिळेच्या माथ्यापर्यंत जाण्यास उत्तम सिमेंटचा रस्ता, तर दुसऱ्या टोकापर्यंत पोहचण्यासाठी पसरट पायऱ्या असलेला सिमेंटचा ५०० ते ७०० फूट चढाचा रस्ता आहे. दोन्ही बाजूस प्रवासी सूर्यास्त बघण्यास जमलेले होते. आसमंतात पसरलेले हिरवेगार डोंगर, मधेच तांबडय़ा मातीच्या टेकडय़ा, बाजूने जाणारे लाल मातीचे रस्ते, आकाशात केशरी, सोनेरी, तांबडय़ा रंगाची उधळण, बोचणारे थंडगार वारे.. हे बघूनच डोळ्यांचं पारणं फिटलं.
पिरू हिल्स या जागी दोन उंच डोंगर असून त्याच्या पायथ्याशी पीर महम्मदचा दर्गा आहे. अनेक भाविक दुरवरून दर्शनाला येत असतात.
वॅगमॉन हे गावापासून २५ किमी अंतरावर आहे. वळणाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी छोटय़ा टेकडय़ांच्या उतारावर ओळीत पसरलेले हिरवेगार चहाचे मळे, त्यामधून नागमोडी जाणारे तांबडय़ा मातीचे रस्ते, लाल कौलांची टुमदार घरं, औषधालासुद्धा माणूस दिसत नव्हता. गावाच्या वेशीवर एका छोटय़ा दुकानात उत्तम, घरगुती चॉकलेट्स मिळाली. चहाच्या मळ्याचा प्रदेश संपला. आणि सर्व बाजूंनी लाल टेकडय़ाच टेकडय़ा दिसू लागल्या. वाहनतळावर प्रवासी गाडय़ा दिसत होत्या. तिकिटे काढून आम्ही एका चढणीच्या रस्त्याला लागलो आणि एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला. सर्व परिसरात लाल मातीच्या १०० ते १५० फूट उंच टेकडय़ांच्या रांगाच्या रांगा दिसत होत्या. मध्ये हिरवळ, तर टेकडय़ांवर सुकलेल्या पिवळ्या गवताचा पट्टा, त्यामधून वर चढण्याच्या पाऊ लवाटा, अनेक टेकडय़ा असल्याने प्रवासी विखुरलेले, ऊन-सावल्यांचा खेळ. थंडगार वाहणारा वारा, क्षितिजापर्यंत पसरलेल्या हिरव्यागार डोंगर रांगा, एका अनोख्या विश्वात मिळालेली स्वर्गीय शांतता वर्णनातीत होती. पावसाळ्यानंतर या टेकडय़ा हिरव्यागार होतात. त्यांच्या मधून जाणाऱ्या तांबडय़ा पाऊलवाटांचे दृश्य काय दिसत असेल. कुरीसुम्ला, मुरुंग्म्ला आणि थनग्ल अशा तीन पर्वतराजींचा हा प्रदेश म्हणजे निसर्गाचं वरदान आहे.
पीरमेडमधील सर्व प्रेक्षणीय जागा १० ते ५० किमी परिसरात पसरलेल्या, पण सर्व ठिकाणी जाण्यास उत्तम रस्त्यांचं जाळं आहे. पल्लीवक्कनू हे आठ किमी अंतरावरील खेडं. हिरव्यागार चहाच्या मळ्यात लपलेलं. अठराव्या शतकातील भव्य चर्चकरिता प्रसिद्ध. ८०० फूट उंच टेकडीवरचं चर्च हिरव्यागार परिसरात उठून दिसतं. वपर्यंत पोहचण्यासाठी सिमेंटच्या पसरट पायऱ्या, दोन्ही बाजूंनी हिरव्या पानाची शोभिवंत झाडं, शेवटच्या पायरीजवळ चुटुक तांबडय़ा रंगाच्या फुलांचे ताटवे, कडेला दोन बाजूस ख्रिसमस ट्रीसारखे दिसणारे उभे सरळसोट वृक्ष, याला लागून चर्चसमोरील भव्य चौथरा, आपण उभे राहिल्यावर पाठीमागील बाजूस चर्चची रेखीव इमारत, आणि समोर क्षितिजापर्यंत भिडलेले चहाचे मळे.. मंत्रमुग्ध करणारं वातावरण होतं. चर्चच्या आकर्षक कमानी, कोपऱ्यात येशूचा पुतळा, कन्फेशनचा कोनाडा, बसण्यास उत्तम खुच्र्या.. किरमिजी रंगाच्या दगडाच्या भिंती, आतून पांढरा रंग, सगळीकडे कमालीची स्वच्छता, निसर्गाचं वरदान आणि भव्य उदात्त कलाकृती यांचा अनोखा मेळ पाहून मन तृप्त झालं होतं.
एका छोटय़ा गावाजवळ मसाल्याच्या विविध पदार्थानी खचाखच भरलेलं मोठं दुकान होतं. मसाल्याच्या वासांचा घमघमाट पसरलेला. मुंबईपेक्षा सर्वच गोष्टी स्वस्त, आम्ही पिशव्या भरत होतो. पैशाचे पाकीट खाली होत होतं. दुकानाच्या मुख्य बाई महाचलाख, एकेका कपाटातून नवीन नवीन पदार्थ काढीत होत्या. त्यांचं वागणं हा उत्तम मार्केटिंगचा नमुना होता.
पांचालीमेडू हे बारा किमी अंतरावर असलेले ठिकाण. मध्ये पठार, सर्व बाजूंनी डोंगरांच्या रांगाच्या रांगा, घनदाट जंगलात मातीच्या रस्त्यावर एकमेव झोपडी. दार बंद असलेली, काही गुरं चरत होती, बाकी निर्मनुष्य परिसर. पांडव या जागी वास्तव्यास होते, अशी कथा आहे.
केरळचं नंदनवन
केरळातील बॅकवॉटर्स म्हणजे निसर्गाची अफाट किमया आहे. केरळातील या प्रदेशाची अमेरिकेच्या नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने भारतातील नंबर एकची स्वर्गभूमी म्हणून नोंद केलेली आहे. जगामधील काही स्थानांना पर्यटकांनी भेट द्यावीच, त्यामध्ये वेम्बेनाड लेक व काठावर वसलेलं छोटं गाव कुमारकोम यांचा समावेश आहे.
लेकची लांबी ९६ किमी व रुंदी १४ किमी असून ते जवळ जवळ २०३३ चौ.किमी परिसरात पसरलेलं आहे. लेकला मिळणाऱ्या मुख्य नद्या मीनाचील, पंबा, मनिम्ला आणि पेरियार या आहेत. दक्षिण बाजूस, अलापुझा बॅकवॉटर, उत्तरेला ते थेट कोचीनच्या समुद्राला मिळतं. केरळचा जवळजवळ ४० टक्के भाग या दोन लेकनी व्यापलेला आहे. या लेकचा ४०० चौ.किमी भाग समुद्राच्या पातळी इतका तर ७५० चौ.किमी परिसर समुद्र पातळीपेक्षा एक मीटर खोल आहे. यात अनेक छोटी बेटं व कालवे तयार झाले आहेत. काठावर उत्तम हॉटेल्स, अतिशय आलिशान हाऊसबोटी आहेत, मधुचंद्राला येणाऱ्या जोडप्यांकरिता हे स्थान जगप्रसिद्ध आहे.
एर्नाकुलम ते कोट्टायम हा दोन-तीन तासांचा प्रवास. तो चार पदरी रस्त्याने करताना पोटातील पाणीसुद्धा हलत नाही. कोट्टायमपासून कुमारकोम अर्धा तासाचा रस्ता, मधेच सरोवराच्या कडेने, कालवे ओलांडीत हिरव्यागार वनश्रीतून जाताना एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतं.
आमचे हॉटेल थरावडू हेरिटेज होम. १८७० मधील एका सुंदर बंगल्याचं या हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचा साज जुना आहे. प्रशस्त व्हरांडे, जुने शिसवी खांब, सर्व बाजूंनी उत्तम बगीचा, बाजूने वाहणारा कालवा, उकाडा घालविण्यास मस्त एसीची सोय.. मनाला समाधान देणारी जागा होती ती. लेक भटकंतीसाठी मोटर बोटींची सोय अगदी जवळच होती. दीड तासाला ५०० रुपये असा सौदा पटला. आम्ही चौघं, मोठी मोटार बोट. कुठंही पाय पसरून बसण्याचा आनंद औरच होता. एका लहान कालव्यातून बोटीचा प्रवास, दोन्ही बाजूंनी स्थिरावलेल्या हाऊसबोटी, मधेच प्रवाशांनी भरलेल्या बोटी चुकवत आमच्या बोटीने लेकमध्ये प्रवेश केला. लेकच्या अर्धवर्तुळातील काठाने नारळाची झाडं, त्यामध्ये ऐटबाज रीसॉर्ट्स, लेकच्या पश्चिम बाजूने पसरलेला अथांग समुद्र, लाटा कापत बोट पुढे चाललेली. आमची बोट अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा पाठलाग करत होती. डेकवर उभं राहून विलोभनीय दृश्य न्याहाळत होतो. निळे आकाश, पाणी आणि मावळता सूर्य हेच आमचे सोबती होते. आकाश सोनेरी पिंगट रंगांनी नाहून गेले, सोनेरी गोळा पाण्याला स्पर्श करीत होता. एक छोटी वल्हवणारी बोट सूर्याच्या कडांना छेद देत, सोनसळी रंगामुळे उठून दिसत होती. दूर दोन बोटी एकमेकांना टेकलेल्या, त्यावरील कोळी पाण्यातून वाळू काढून बोटीत ओतत होते. सूर्यास्ताचा सोहळा संपला होता. बोटीचा परतीचा संध्याछायेतील प्रवास कधी संपला ते कळलंच नाही.
बोट थेट कुमारमंगलम देवळाशी जाऊ न उभी राहिली. दूरवरून वाजंत्रीमधील पिपाणी व घंटांचा आवाज येत होता. पुरुष गाभाऱ्याच्या बाहेर उभे. स्त्रियांना आतपर्यंत प्रवेश होता. मल्याळम भाषेतील आरती कानाला गोड वाटत होती. विष्णूचा अवतार असलेलं हे देऊळ कुमारकोमचं पवित्र स्थान आहे. एक भाविक आम्हाला उत्साहाने माहिती देत होता. सर्व वातावरण मन प्रसन्न करणारं होतं.
भल्या पहाटे साडे पाच वाजता चार किमी अंतरावरील पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी मार्गस्थ झालो. गेटवर आमच्या आधी काही तुरळक पक्षीमित्र तिकिटे घेताना पाहून बरं वाटलं. गेटपासून चार किमी अंतराची दगड-मातीची पाऊलवाट घनदाट जंगलातून जात होती. नुकतंच झुंजूमुंजू होत होतं. सर्व बाजूंनी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. डोळे फाडफाडून पक्षी शोधत होतो. रस्त्याला चढ-उतार, मधेच अगदी कॅनालच्या बाजूने जात होता, दोन माणसं बसू शकतील अशा छोटय़ा होडक्यातून काही प्रवासी अभयारण्याची चक्कर मारत होते. गेटजवळ फोटो गॅलरीत पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक या सर्वाचे फोटो लाजवाब होते. फुलातील मध शोषून घेणारं फूलपाखरू, बेडकिणीच्या पाठीवर बसलेलं पिलू हे दोन्ही फोटो थक्क करणारे होते.
या नंदनवनाची शान वाढविणारं दुसरे स्थान आहे, बे आइसलँड ड्रिफ्टवूड म्युझियम. याचा इतिहास फारच मनोरंजक आहे. राजा पुनोज आणि त्यांचे पती चेरियन हे दोघे अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर गावात अनेक वर्षे नोकरी करत होते. तिथे चित्रविचित्र आकाराचे अती प्राचीन लाकडाचे ओंडके वाहात काठावर येऊ न पडत. असे काही ओंडके त्यांनी गोळा करून ठेवले होते. पुढे सुनामी वादळात लाकडाच्या व दगडाच्या विविध आकाराच्या हजारो वस्तू किनाऱ्यावर येऊन पडल्या. काही तर १५ ते २० फूट लांबीच्या, लोखंडी वस्तू होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड खजिना जमा झाला. नोकरी संपल्यावर मायदेशी परतताना त्यांनी ही सर्व जलसंपत्ती आपल्याबरोबर कुमारकोम येथील राहत्या घरी आणली. त्या काळात सरकारने या वस्तू आणण्यासाठी परवानगी दिली. आता मात्र असे आणण्यास बंदी आहे. बाईंनी या ओंडक्यांची साफसफाई केली. अतिशय मेहनत घेऊ न त्यातून पक्षी, सरपटणारे प्राणी, येशूची मूर्ती अशा अनेक वस्तू बनविल्या. पॉलिश करून तसंच रंग देऊ न कोरीव काम करत अशा तऱ्हेचं भारतातलं एकमेव म्युझियम त्यांनी उभारलं. केरळ सरकारने त्यांना जागा दिली. जगातील समुद्र संपत्तीच्या म्युझियममध्ये याची नोंद झाली. काही जागतिक तज्ज्ञांनी म्युझियमला भेट देऊन त्यांचं कौतुक केलं. अशा जवळजवळ ७५ जाणकारांच्या अभिप्रायांची नोंद इथे आहे. येशूच्या चेहऱ्यावरचे हावभाव, पक्ष्यांचे, तसंच साप, मगरीचे डोळे, अजगराचे वेटोळे घातलेले शरीर अशा वस्तू पाहून आपण थक्कच होतो. विशेष प्रकाशरचनेचा आधार घेत पुनोज बाई ठेकेबाज इंग्रजीत माहिती देत म्युझियम दाखवत होत्या. हे म्युझियम बघण्याची फी माफक आहे. त्याची माहिती नेटवर उपलब्ध आहे. [www.bayislandmuseum.com] पर्यटकांनी आवर्जून पाहावे असे हे ठिकाण आहे.
कोट्टायमहून कोचीनकडे छोटय़ा छोटय़ा गावांतून जाणारा वळणांचा रस्ता म्हणजे केरळच्या निसर्गाचा सौंदर्याचा अनमोल खजिना आहे.
कोचीन हे एक जुनं बंदराचं गाव, पण आता समुदद्रावरील पूल, टोलेजंग इमारती यामुळे जुने नवे असे दोन विभाग दिसतात. समुद्रकिनाऱ्यावरील १० ते १२ चायनिज फीशिंग नेट्स दूरवरून दिसत होत्या. ४०० ते ५०० वर्षांपासून या पद्धतीच्या नेटने मासे पकडले जातात. नेटमधून शेकडोंनी रुपेरी, काळे किरमिजी, अनेक प्रकारचे मासे काठावर ओतले जात होते. अनेक परदेशी व भारतीय पर्यटक मासे पकडण्याचा खेळ पाहात उभे होते, काही मासे टणाटण उडय़ा मारीत होते. टोपलीत भरलेल्या माशांची विक्रीची बोली जागेवरच होत होती. इतके स्वस्तात मिळणारे मासे पाहून आमचे मित्र हळहळत होते, पण मुंबईपर्यंत नेणार कसे? शेवटी काठावर असलेल्या एका हॉटेलमध्ये कोळंबीची उत्तम करी मिळाली. किनारा एखाद्या जत्रेसारखा माणसांनी व विविध विक्रेत्यांनी फुललेला. त्यातील तिखट-मीठ लावलेले अननसाचे तुकडे तोंडाला पाणी सोडणारे होते.
एर्नाकुलम गाव म्हणजे केळा वेफर्सचे आगर. तिथलं भलंमोठं दुकान हजारो वेफर्सच्या पाकिटांनी भरलेलं. दारात उभ्या असलेल्या मालकांनी मराठीत आमचं स्वागत केलं आणि आमची मनं जिंकली.
केरळमधील एर्नाकुलमपर्यंतचा रेल्वे प्रवास कुर्ला-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेसने म्हणजे रेल्वेप्रेमींना एक सुखद अनुभव, २२ तासांच्या प्रवासात कुठेही थांबा नसलेली ही गाडी. फक्त तांत्रिक थांबे, संपूर्ण प्रवास कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ असा किनारपट्टीच्या कडेने जातो. डोळ्यांचं पारणं फिटवणारा निसर्ग, जेवण-खाण्याची रेलचेल. सदाबहार केरळमध्ये या गाडीने प्रवास म्हणजे दुधात साखरच. त्याचा एकदा तरी अनुभव घ्यावाच.