चहाशिवाय खारी म्हणजे थंडी नसलेला ख्रिसमस. चहा नसेल तर खारीला मजा नाही. गरम गरम चहामध्ये फुगलेल्या खारीचा तुकडा बुडवायचा अन् हळूच तोंडात खारी कोंबायची.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुणाला वाटेल खारी हा काही लेखनाचा विषय होऊ शकत नाही. कालपर्यंत मलाही तसं वाटत होतं. पण ‘प्रेमाची गोष्ट’ बघत असताना चित्रपटाचा नायक अतुल कुलकर्णी चहामध्ये ‘खारी’ बुडवून खाताना बघितला अन् ‘खारी’मध्ये मला लिखाणाचा विषय सापडला.
लहानपणापासून आपल्या सर्वाची खारीबरोबर दोस्ती आहे. त्यातल्या त्यात जीरा खारी आपल्याला लय भारी वाटते. पूर्वीपासून गावात येणारे पाववाले खारी घेऊन यायचे. नंतर तांब्या-पितळेच्या वस्तूंच्या बदल्यात बेकरी पदार्थ देणारे विक्रेते खारी घेऊन दारोदारी येऊ लागले. आता नाक्यावरील दुकानावर पिशवीबंद केलेल्या लोकल अन् नामांकित कंपनींच्या ‘खारी’ मिळतात.
तेव्हाच्या काळात बहुतेक लोकांची ऐपत पाव घेण्याइतपत असायची. त्यामुळे रोज खारी खाण्याचे भाग्य थोडय़ाच श्रीमंत लोकांना मिळायचं. घरी कुणी आजारी असल्यास किंवा पाहुणे मंडळी आल्यास खारी आणली जायची, पण तिचा मान ग्लुकोजच्या बिस्कीटांनंतरच. शाळेत असताना काही धडय़ांमध्ये अमुकने ‘खारीचा वाटा उचलला’ असा उल्लेख असायचा तेव्हा वाटायचं या साल्या माणसाने सर्वात जास्त खारी खाल्ली असणार, नंतर कधीतरी कळलं की तो खारीचा वाटा वेगळा.. आज त्या गोष्टी आठवल्या की स्वत:चे हसू येते.
चहाशिवाय खारी म्हणजे थंडी नसलेला ख्रिसमस. चहा नसेल तर खारीला बिलकुल मजा नाही. गरम गरम चहामध्ये फुगलेल्या खारीचा तुकडा बुडवायचा अन् हळूच तोंडात खारी कोंबायची. नरम अन् गरम झालेली वेगवेगळ्या पापुद्रय़ाची खारी जिभेवर चाखतानाची मजाच अवर्णनीय! कधी कधी चहात बुडवलेली खारी धोका द्यायची. अर्धी हातात तर अर्धी चहात बुडी मारायची. चहा गरम असल्याने बोट घालून बुडलेली खारी काढायला त्रास व्हायचा अन् मग चहा थंड होईपर्यंत वाट पाहावी लागायची. जीरा खारी बुडवून खात असताना खारीवरील जीरा सुटून चहाच्या पृष्ठभागावर तरंगत राहायचा, ज्यामुळे चहाचं सौंदर्य विद्रूप व्हायचं. शेवटी चहा थोडा थंड झाल्यावर पीत असताना तळाशी राहिलेली व नरम झालेली खारी तोंडात यायची अन् हरवलेलं कोकरू सापडल्याचा आनंद व्हायचा. काही वेळेला चहा संपूनही काही नरम खारी तळाला राहायची, जी नंतर बोटाने कपामधून खरवडून काढली जायची.
बालपण मागे सरून आता मोठे झालो असलो तरीही खारीची दोस्ती सुटली नाही. दुनिया बदलली तशी खारीनेही आपलं रूप अन् चव बदलली. सध्याची मस्का, जीरा, तिखट अशी चव तर रूपामध्ये बो टायसारखी ट्विस्ट केलेली किंवा साखर पेरलेली घोडय़ाच्या नालेच्या आकाराची खारी आता घरी यायला लागली. आजारी माणसाला खारी अन् लेमनची बाटली दिल्याने त्याच्या प्रकृतीमध्ये काय सुधारणा घडते हे मला अजून न सुटलेले कोडे आहे. खारीवर हे एक ललित लिहून आपल्या समाजावतीने तिला धन्यवाद देण्यात मी ‘खारीचा वाटा’ उचलला यात मला आनंद वाटतो.

मराठीतील सर्व ब्लॉगर्स कॉर्नर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khari biscuit