घरी करतात ते जेवायला मुलं नाखूश असतात. पण तेच, तसंच जेवण शिबिरात मात्र मिटक्या मारत खातात. त्याला कारणीभूत ठरते दोस्तांबरोबरची पंगत. मुलांच्या विश्वातलं आणखी वास्तव काय आहे?

पालकांसोबत पिअरप्रेशरबद्दल झालेल्या चर्चेनंतर सैरभैर झालेलं माझं मन मुलांबरोबर केलेल्या चर्चेतून त्यांनी दाखवलेल्या पिअरप्रेशरच्या संवेदनशील आणि विधायकरीत्या कृतिशील बाजूमुळे खूप निवांत झालं. तरीदेखील या उमलत्या, उभरत्या वयाच्या किशोरांच्या वाटय़ाला येणारी त्यांच्या सहाध्यायांकडून केली जाणारी हिंसा मनाला सतावत राहिली. मनात इतर विचारांना ती थारा देईना, म्हणून मी मग अगदी ठरवून त्या चिंतेचाच पाठलाग करत राहिले. उलटसुलट विचारांची पाठशिवणी संपायला दोनचार दिवस लागले, पण मग बरंचसं आशावादी चित्र समोर येत गेलं. त्याविषयी थोडंसं लिहावंसं वाटतंय.
गेले दोन-तीन महिने सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी माजली होती. प्रत्येक पक्ष आश्वासनांचं एकेक आकर्षक पॅकेज तुमच्या-आमच्यासमोर मांडून त्याआड स्वत:चा भ्रष्टाचारानं, व्यक्तिगत स्वार्थानं लडबडलेला चेहरा सफाईदारपणे लपवायचा प्रयत्न करत होता. कुणी हा लोकशाहीतील निवडणुकीचा प्रचार चालला आहे, हेच पार विसरून आपल्या पक्षात लोकशाही चालणार नाही, असं बिनदिक्कत विधान करत होते, तर कुणी आपण स्वत: सामान्य जनतेच्या लूटमारीवरच पोसलेलो आहोत, हे ध्यानातच न आल्यानं आम आदमीकडेच आपलं आजवर लक्ष होतं असं भासवण्याच्या प्रयत्नात होते. गेली चाळीस, पन्नास वर्षे जाणतेपणी लोकशाही अनुभवलेल्या माझ्यासारख्यांना ‘आम्ही न भुलतो वरल्या अंगा, आतील गाभा हाच खरा’ हे उमगलेलं असल्यानं मतदान तर केलंच पाहिजे, पण ते कुणाला करायचं याच विचारानं व्यथित व्हायला होत होतं. स्वत:च्या आतल्या गाभ्याकडे पाह्य़चं धैर्य हरवून बसलेल्या या नेत्यांहाती भविष्य सोपवणारं मतदान करताना माझ्या हातापेक्षा मनाचाच थरकाप उडाला होता. माझ्यासारख्यांचं ठीक आहे. हत्ती गेलाय अन् शेपूट राह्य़लंय. पण ही निवडणूक म्हणजे माझ्या सर्व लेकरांचं आणि त्यांच्या गोजिरवाण्या बाळांचं पुढल्या पाच वर्षांतल्या भवितव्याचं भविष्य. ज्यांच्या हाती मतदान करून मी ते सोपवणार आहे, ते सारे पुरते विधिनिषेधशून्य. संसदेत जाणं म्हणजे स्वत:चं कर्तव्य निभावण्याची जोखीम पत्करणं, हे त्यांच्या गावीही नाही. आजची मुलं हेच खरंतर आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ. त्यांची जडणघडण उत्तम व्हावी, ही या निवडून येणाऱ्या व्यक्तींचीच नैतिक जबाबदारी. पण नैतिकतेची वाट त्यांना झेपणारी नाही.
आजघडीला माझ्या बालबुद्धीला समजलेलं हे सार्वत्रिक वास्तव असलं, तरीही त्यापलीकडलं एक खूप सुंदर आपल्यातील समविचारी व्यक्तींचा कस लावणारं आणि साध्य करायला अवघड वाटत असलं, तरी अगदीच अशक्य नसलेलं असंही एक वास्तव आहे. अशी खात्री या मुलांनी मला दिली.
मुलांशी झालेल्या चर्चेतून मला आशेचे किरण घराघरांत पसरताना दिसले. या सर्व किशोरवयीन मुलांनी शिबीर हवं म्हणून हट्ट केला. त्यात पुढाकार माझ्याच नातवाचा होता. मी त्याला म्हटलं, ‘‘अरे, तू तर इथंच, आमच्या घरीच असतोस. तरी तुला कशाला हवंय शिबीर? मला शारीरिकदृष्टय़ा ते आता झेपेलसं वाटत नाही.’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘हे माझं घर आहेच. पण मी इतर मुलांसोबत, त्यांच्या आईबाबांसोबत इथं शिबिरात जे शिकत गेलो, तो भाग मला घरात शिकता कसा येणार?’’ त्याचा मुद्दा मला पटला. एका समविचारी समाजाची गरज या किशोरवयात किती गरजेची आहे, हेच त्यानं जणू मला अधोरेखित करून सांगितलं. मग या मुलांसाठी शिबीर आणि त्यांच्या आईबाबांसाठी पालकसभा सुरू झाल्या. सतत इथं येत राह्य़चं, म्हणून पालक मुलांइतकेच खूश झाले. एक बाबा म्हणाला, ‘‘हे छान झालं आजी. मुलं लहान होती तेव्हा उद्भवले नव्हते, तेवढे प्रश्न आता हरघडी उद्भवताहेत. आता त्यांची उत्तरं आम्ही तुमच्या मदतीनं शोधू. आणि आजी, आता लाडही आवडत नाहीत त्यांना आम्ही केलेले. तुम्हाला बरोबर कळतं. माझा मुलगा म्हणाला, ‘‘आजीला सांग पालकसभेत थोडं तुम्हाला शिकवायला. बाबा ६ी ल्ली ि२स्र्ूंी. एकटय़ा आजीलाच नक्की ठाऊक आहे, आम्ही काय म्हणतोय ते.’’ ‘‘आता आजी, तुम्ही काय वेगळं वागता ते समजतच नाही हो आम्हाला. काही गोष्टी तर तुम्ही केलेल्याच आम्ही केल्या, तरी यांचा सहभाग शून्य.’’ मग मी त्याला समजावलं, ‘‘अरे, हे आपल्या शिबिरातल्या जेवणातल्या वरणभातासारखंच झालंय. मुलं लहान होती, इथं वरणभात मिटक्या मारत खात होती. तेव्हा तुझ्या बायकोनं एक दिवस मला वरणाची रेसिपी विचारली होती. मी तिला सांगितलं होतं, ‘‘वरण तू करतेस तसंच करते मीही. गंमत असते ती दोस्तांसोबतच्या पंक्तीची.’’ पुढे पुढे तर तुम्ही आईबाबापण मुलांना देते तसा मी स्वत: कालवलेला वरण तूपभात तुम्हालाही हवा, म्हणायला लागलात. मी वेगळं असं काहीच करत नाही. मी फक्त ज्याला जसं हवं तसं, आणि जेवढं हवं तेवढंच, निरपेक्ष प्रेम द्यायचा प्रयत्न करते.’’
‘‘आता आलं लक्षात. आम्हीपण प्रेम करतो खूप, पण ते निरपेक्ष ठेवणं जमत नाही आम्हाला.’’
पहिल्या पालकसभेत हाच मुद्दा चर्चिला गेला. सुरुवातीला थोडी मुलांच्या बदललेल्या स्वभावाबद्दल, अबोलपणाबद्दल, कपडय़ांबद्दल नाराजी प्रकट झाली. पण मी त्याकडे थोडा कानाडोळा करत त्यांना म्हटलं, ‘‘हा सगळा बदल किती छान आहे नं? तुम्ही तो नीट पाहा. माझ्या नजरेनं या मुलांकडे पाह्य़चा प्रयत्न करा. बाळ बोबडं बोलू लागलं तेव्हा आपल्या कानाला गोड लागतं, कारण स्पष्ट शब्दोच्चार करण्याचं ते पहिलं पाऊल असतं. पुढे आपलं बाळ छान बोलायला लागणार, गाणी गाऊ लागणार हे आपल्याला ठाऊक असतं, म्हणूनच आपल्याला तो बोबडं बोलण्याचा प्रयत्नही अगदी ‘प्रत्यक्षाहुनी प्रयत्न सुंदर’ हा अनुभव देतो. या आपल्या मुलांच्या पुढील तारुण्यातल्या कर्तृत्वाची ही चिमणपावलं आहेत. हा किशोरवयाचा टप्पा अगदी तात्पुरता आहे. वरवर बेपर्वा, उथळ वाटणारं त्यांचं वर्तन का तसं आहे, ते सांगू? ती स्वत:च्या नजरेनं आता जगाकडे पाहू जाताहेत. त्यांना जरा निवांतपणा द्या. पाहू द्या, पारखू द्या हे जग त्यांना. तुमची आश्वासक सोबतसंगत इथं खूप मोलाची असणार आहे त्यांच्यासाठी त्यांना स्वीकारा. त्यांची आवडनिवड आज तुमच्या आवडीनिवडीशी जुळणारच नाही. तुमचं किशोरवय आठवा. अमिताभ, राजेश खन्नाचं अनुकरण तुम्ही केलेत, आज आमिर खान त्यांचा हीरो आहे. कुठला का होईना, पण हीरो असणं हेच किती छान आहे.!’’ मी त्यांना समजावलं.
‘‘शिबिरात हुंदडत
मौजमजा करत मुलं मोठी झाली,
किशोरवयात आली,
धीटपणे जगाकडे पाहू लागली.
शहाण्यासारखी वागू लागली.
पण..
तुम्हाला त्यांचं बेधडक, आत्ममग्नपणच आताशी
चिंतित करू लागलंय.
घाबरू नका.
विश्वास ठेवा माझ्यावर
आणि त्यांच्या ठायीच्या सत्प्रवृत्तींवरही.
ही आपली बाळं सारी
दोस्तांसमवेत निघाली आहेत
उद्याच्या उज्ज्वल पहाटेकडे.
त्यांचा थोडासा वरवर बेपर्वा वाटणारा
पोरकटपणा सोडून द्या.
तो तसला पोरकटपणा म्हणजेसुद्धा मोठं होणं असतं,
तो एका वेगळ्या पातळीवरून घेतलेला आत्मशोध असतो.
पाहा बरं आता माझ्या नजरेनं त्यांच्याकडे.
डोळ्यांतून स्वप्नं उतूं जाताहेत त्यांच्या,
पण किशोरवयाच्या या धुंदीतही
त्यांची नजर वळली आहे आत,
अगदी आत, आत!
तिथं त्यांना गवसताहेत
त्यांच्याच मनाचे
नवनवीन कंगोरे,
तरल, सृजनशील कंगोरे,
त्यांची हळुवार निगराणी करताहेत ती.
ती कोपरान् कोपरा स्वच्छ करताहेत,
त्यातूनच त्यांना सापडणार आहे
ईश्वरानं त्यांना खास
त्यांचंच म्हणून भेट दिलेलं
एक अद्वितीय माणूसपण!
हे सारं ऐकल्यावर साऱ्यांचेच चेहरे उजळले. मी पुढे यांना सांगितलं, ‘‘आपण सारे लोकशाही ही सुसंस्कृत पद्धतच आज सर्वश्रेष्ठ आहे असं मानतो. लोकशाही हाच विकासाचा अगदी एकमेव मार्ग आहे, अशी खात्री आपल्याला वाटते. लोकशाही म्हणजे लोकांचं, लोकांसाठी चाललं, चालवलेलं राज्य हे जसं खरं, तसंच ती एक लोकांनी स्वत: चालवलेली व्यवस्थाही असते, हे आहे नं तुम्हाला मान्य. मग आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या उत्तम जडणघडणीसाठी, ती कणखर, सर्जनशील आणि प्रेमळ बनण्यासाठी आपण सारे मिळून आपल्यापुरती आपल्यातून एक छोटीशी पर्यायी लोकशाही व्यवस्था बनवूया. आपलं हे शिबीर त्यासाठीच तर आहे. इथं नियमावली आहे, पण ती कठोर नाही. काटेकोर मात्र आहे. सरकार जशी वेळप्रसंगी मित्रराष्ट्रांची मदत घेतं, तशी आपणही इथल्या इतर पालकांची मदत घेऊ या. एकमेकांना आपण सजगतेनं, सहृदयतेनं मदत करू या.’’ ‘‘आजी पण ते जमेल आम्हाला? आम्ही तर हरघडी त्रस्त होतो, चिडचिड होते आमची उगीचच.’’ एक आई म्हणाली.
या वयातलं मुलांचं साधं साधं वागणंही तुम्हाला बिथरवतं, कारण तुम्ही ‘बदल’ नाकारता आहात. ती आता लहान मुलं उरलेली नाहीत. आता ती एक ‘स्वतंत्र व्यक्ती’ बनताहेत,’’ मी म्हटलं.
‘‘मग त्यांना स्वैर सोडायचं का?’’ एकानं विचारलं.
मी म्हटलं, ‘‘असं टोकाचं नाही बोलायचं आपण. आपण गांधीजींच्या समन्वयाच्या वाटेनं जायचंय. मुलांचं वागणं कितीही खटकलं, तरी त्यांच्या आपल्यातला संवाद तुटता नये, याबाबत तुम्ही दक्ष राहा. आपापलं घर हीच जगातली सर्वात सुरक्षित जागा आहे, अशी त्यांची जी ठाम धारणा आहे, तिला धक्का लागू देऊ नका.’’
‘‘म्हणजे कसे वागू आम्ही?’’ एक प्रश्न सर्वाच्याच चेहऱ्यावर उमटला. मी म्हटलं, ‘‘वेगळं काहीच वागायचं नाही आता. आज ही अशी छान, शहाणी बाळं तुमच्याच संगोपनातून साकारली आहेत नं? तुम्ही सारे खूप छान पालक आहात. या मुलांना एक उबदार घरकुल देण्यासाठी तुम्ही आजवर कमी का कष्ट केलेत? तुम्ही किती कष्टपूर्वक तुमच्यातलं पतीपत्नीचं नातं पैलूदार, प्रेमळ आणि निरभ्र बनवलं आहे! मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडता पाडता तुम्ही स्वत:लाही पैलूदार आणि सुसंस्कृत बनवलं आहे. मी तुमच्या घरी येतजात नसले, तरीदेखील तुमच्या घरी कसं वातावरण असतं, ते पक्कं ठाऊक आहे मला. ही गांधीजींनी सांगितलेली वाट नं, खूप सोप्पी आहे. गांधीजींनी आधी स्वत:ला घडवलं. ते घडवता घडवता एकीकडे ते समाजाला जागं करत होते. त्या वाटचालीत त्यांना अनेकदा स्वत:ला तपासावं लागलं. वेळी आंदोलन थांबवावंही लागलं. त्याची कारणमीमांसा करताना त्यांना वारंवार स्वत:कडे तटस्थपणे पाहावं लागलं. या साऱ्या गोष्टी करताना गांधीजी एक गोष्ट मात्र सातत्यानं प्रयत्नपूर्वक करत राहिले. ते अवतीभवतीच्या प्रत्येकावर निरपेक्ष प्रेम करत राहिले. त्यांनी कधीही संवाद तुटू दिला नाही. त्या प्रयत्नांत त्यांचं प्रेम अधिकाधिक शिस्तशीर बनत गेलं. ते क्षमाशील बनत गेले. ज्या इंग्रजांविरुद्ध त्यांना लढा द्यायचा होता, त्यांच्यातल्या सुसंस्कृतपणावर त्यांनी विश्वास ठेवला. या सर्व प्रयत्नांतून त्यांनी सामान्य मोहनदासातून एक महात्मा घडवला. तुमच्यासमोर तर शत्रुपक्षच नाही. आपल्या लेकरांतून त्यांनी स्वत:ला महात्मा बनवा अशी प्रेरणा जागी करायचं, एवढंच काम आपल्याला आज करायचं आहे. ती जागी करण्यासाठी आपण स्वत: आधी सत्प्रवृत्त असावं लागतं, ते तर तुम्ही सारे बनलाच आहात. आज या किशोरांकडे पाहताना अवतीभवती फोफावलेल्या भ्रष्टाचाराचं, दहशतवादाचं सावटही तुमच्या त्यांच्यामधल्या नात्यावर तुम्ही पडू देऊ नका. तुम्ही आहात तसेच खूप छान आहात. सक्षम आहात. मुलांमधल्या ‘सत्’वर विश्वास ठेवा, तसाच आणि तेवढाच विश्वास स्वत:तील सच्छीलतेवरही ठेवा. आपण सारे एकाच वाटेनं निघालो आहोत. या वाटेवर खूप छान माणसं भेटतात. निरपेक्ष मदतीचे अदृश्य हात आपलं अगदी बोट धरून आपल्याला चालवतात. मला इतकी वर्षें हाच अनुभव सातत्यानं येतोय. चला, आज पुरे इतकंच.’’
मी बोलायची थांबताच एक आई म्हणाली, ‘‘आजी, आपण आजची मीटिंग गाण्यानंच संपवूया,’’ माझ्या परवानगीची वाट न पाहता ती गाऊ लागली.
‘‘हम होंगे कामयाब, होंगे कामयाब,
हम होंगे कामयाब, एक दिन,
हो, हो, मनमे है विश्वास,
पूरा है विश्वास,
हम होंगे कामयाब एक दिन!
क्षणार्धात आम्ही सारे तिच्या सुरात सूर मिळवून गाऊ लागलो.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा