समाजमाध्यमे आणि मोबाइल विश्वामध्ये वेगवेगळ्या अॅप्सचा ट्रेण्ड येतो. काही काळासाठी तो सुरू राहतो, मात्र नंतर अचानक त्यांचा वापर थंडावतो. चिंगारी, फौजी, मित्रो, चॅटबॉक्स यांसारखी अनेक अॅप्स चर्चेत आल्याचं आपण पाहिलं आहे, मात्र काही कारणांनी या अॅप्सना सातत्य राखता आलेले नाही. अलीकडेच मायक्रोब्लॉग ऑफ इंडिया या नावाने चर्चेत असलेल्या कू अॅपला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरला भारतीय पर्याय म्हणून कूकडे पाहिले जात आहे. हे अॅप आपले अस्तित्व टिकवणार की काही काळासाठी ट्रेण्डमध्ये आलेल्या इतर अॅप्ससारखाच कूचा ही प्रवास असणार हे बघणे रंजक आहे.
भारतीय भाषांमध्ये लोकांनी व्यक्त व्हावे, आपली मते स्पष्टपणे मांडावीत या विचारांनी कू या अॅपची सुरुवात झाली. अल्पावधीतच या अॅपचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अप्रम्या राधाकृष्णा आणि मयंक बिदावत्क यांनी मार्च २०२०मध्ये हे अॅप डेव्हलप केले. ट्विटरला पर्याय म्हणून अनेकांनी त्याचे कौतुकसुद्धा केले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, क्रिकेटपटू अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ यांसह अनेकांनी या अॅपचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
भारत सरकारच्या विविध विभागांकडूनसुद्धा आत्मनिर्भर योजनेअंतर्गत भारतीय अॅप म्हणून कूचा प्रसार केला जात आहे. आपल्या भाषेत मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी एक भारतीय पर्याय म्हणून कू अॅपचे प्रमोशन केले जात आहे. निती आयोगाच्या आत्मनिर्भर चॅलेंजअंतर्गत या अॅपला समाजमाध्यम विभागात सर्वोत्कृष्ट भारतीय अॅपचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे. कूचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातही केला होता.
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांतील अधिकारी आणि विभागसुद्धा आता या अॅपवर नियमित अपडेट्स शेअर करताना दिसतात. त्यामुळे अॅपला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. गमतीचा भाग म्हणजे ट्विटरशी स्पर्धा होत असताना अनेक उच्चपदस्थ व्यक्ती आणि अधिकारी ट्विटरच्याच माध्यमातून या अॅपची प्रसिद्धी करत आहेत.
सरकार आणि ट्विटरमधील विसंवाद पथ्यावर
भारतामध्ये सध्या सुरू असलेल्या शेतकरी मोर्चावरून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये विसंवादाचे सूर दिसून येत आहेत. केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या काही ट्वीट्सवर तसेच काही खात्यांवर र्निबध लादण्याचे आदेश ट्विटरला दिले होते. मात्र ट्विटरने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातूनच या वादाची सुरुवात झाली.
शेतकरी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात खटके उडत आहेत. सरकारने ट्विटरला जवळपास १२०० खाती बंद करायला सांगितली, त्यानंतर ट्विटरने काही खाती बंद करून परत सुरू केली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची खाती ब्लॉक करायला ट्विटरने नकार दिला. विचारस्वातंत्र्याच्या मुद्दय़ाचा आदर करून आक्षेपार्ह मजकूर वगळता खाते ब्लॉक करण्याबद्दल ट्विटरकडून नापसंती दर्शवण्यात आली होती. यानंतर ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. चर्चा झाली. मात्र त्यांमध्ये तोडगा निघू शकलेला नाही. एकीकडे हे चित्र असताना कू अॅपचा प्रसार केंद्र सरकारकडून आणि विविध मंत्र्यांकडून केला जात आहे. त्याचा निश्चितच फायदा कूला होत आहे. एकंदर ट्विटरसोबत चाललेल्या वादामुळे विविध विभाग आणि केंद्रातील मंडळी हळूहळू कूकडे वळत असल्याचे बोलले जात आहे. असे असल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा अॅपला नक्की होईल. गेल्या आठवडय़ात ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या काळामध्ये जवळपास ९ लाख नवीन युजर्स या अॅपशी जोडले गेले आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत १० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असल्याचे अलीकडेच एका मुलाखतीमध्ये संस्थापक मयंक बिद्वतका यांनी जाहीर केले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर युजर्स या अॅपकडे वळत असताना त्या क्षमतेचे तंत्रज्ञान आणि सुविधा तयार करण्याचे आव्हान या टीमसमोर असणार आहे. ट्विटरला पर्याय म्हणून हे अॅप उत्तम आहे, मात्र साधारण कल बघता ट्विटर, फेसबुक यांसारख्या माध्यमांचा वापर सोडून इतर पर्याय स्वीकारणारे अनेक लोक कालांतराने परत जुन्या माध्यमांकडे परत जातात. त्यामुळे या माध्यमांशी स्पर्धा करत असताना कू अॅपला आपले स्वतंत्र अस्तित्व आणि वैविध्य निर्माण करावे लागेल. तरच या स्पर्धेत कू अॅपचा निभाव लागेल हे निश्चित!
ट्रेण्ड काय सांगतो
आपल्याकडे ‘मेक इन इंडिया’ या टॅगखाली अनेक अॅप्सची निर्मिती करण्यात आली. मध्यंतरी चिनी अॅप्सवर बंदी आणल्यानंतर चिंगारी, शेअर चॅट, चॅट अप, एक्स्प्रेस, मोजो यांसारख्या वेगवेगळ्या अॅप्सचा वापर वाढला होता. टॉप १० ट्रेण्डिंगमध्येही या अॅप्सचा समावेश होता. मात्र कालांतराने या अॅप्सच्या युजर्सच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. केवळ भारतीय आहे म्हणून अॅप्सशी युजर्स जोडले जातीलच असे नाही. या सर्व अॅप्सना त्यांच्याकडे असणारे युजर्स टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असल्याचे ट्रेण्डनुसार दिसून येते. युजर बेस मिळवणे ही यशाची पहिली पायरी मानली जाते त्यामध्ये कूला यश आले असले तरीही हे सातत्य राखणे अवघड आहे.
चिनी गुंतवणूक
भारतीय अॅप म्हणून गवगवा होत असला, तरी यात चिनी गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतीयांच्या माहितीच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावरून इंटरनेटवर अनेकांनी या अॅपला ट्रोलसुद्धा केले आहे. याबद्दलचे मीम्स मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत होते. याबद्दल कंपनीद्वारे स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आले.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अप्रम्या राधाकृष्णा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कू अॅपमध्ये चिनी कंपनीची छोटी गुंतवणूक असल्याचे सांगितले. ‘शुनवेई कॅपिटल’ या चिनी कंपनीची काही प्रमाणात गुंतवणूक या अॅपमध्ये आहे, पण त्यांचा हिस्सा खरेदी करता येऊ शकतो. त्यामुळे ते लवकरच यातून बाहेर पडतील, असेही राधाकृष्णा यांनी स्पष्ट केलं. ‘शुनवेई कॅपिटलने सुरुवातीला आमच्या व्होकल या अन्य स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली होती, पण आता आम्ही कूकडे लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे शेनवाई लवकरच बाहेर पडेल,’ असे राधाकृष्णा म्हणाले. शुनवेई कॅपिटलशिवाय कूमध्ये तोनेऊ कॅपिटल (माजी इन्फोसिस बोर्ड मेंबर मोहनदास पै यांची कंपनी), कलारी कॅपिटल आणि ब्लम व्हेंचर्स यांची गुंतवणूक आहे. भारतीय गुंतवणुकदार या अॅपकडे यावेत असा प्रयत्न असल्याचे कंपनीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
कू अॅपसमोरील आव्हाने
ट्विटरशी स्पर्धा करून भारतीयांना एक पर्याय उपलब्ध करून देत असताना कू अॅपसमोर अनेक आव्हाने असणार आहेत. एकीकडे युजर्सची संख्या वाढत असताना युजर्स टिकवण्याचे आणि सातत्याने नवीन युजर्स वाढविण्याचे आव्हान अॅपच्या निर्मात्यांसमोर असणार आहे.
सध्या सात भारतीय भाषांचा पर्याय अॅपमध्ये उपलब्ध असताना आणखी भाषा उपलब्ध करून देण्याची मागणी युजर्सद्वारे होऊ शकते. एकीकडे विस्तारण्याची योजना सुरू असताना युजर्सच्या माहितीचे संकलन करणे आणि संपूर्ण माहिती सुरक्षित ठेवणे हे निर्मात्यांसमोर सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे.
अलीकडेच कू अॅपमधून युजर्सची वैयक्तिक माहिती सर्वासमोर येत असल्याचा आरोप केला जात आहे. रॉबर्ट बाप्टिस्ट नावाच्या हॅकरने अॅपच्या युजर्सचा इमेल आयडी, फोन नंबर, जन्मतारीख ही वैयक्तिक माहिती लीक होत असल्याचा आरोप केला आहे. निर्मात्यांनी आणि कंपनीने सर्व आरोपांचे खंडन केले असले तरीही वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान अॅपच्या निर्मात्यांसमोर असणार आहे.
फक्त भारतीय अॅप ही छबी बाजूला सारून त्यातील फीचर्सच्या माध्यमातून युजर्सना आपल्याकडे वळवण्याचे आणि हे युजर्स टिकवून ठेवण्याचे आव्हान अॅपच्या निर्मात्यांसमोर असणार आहे. कू प्रमाणेच टूटर या अॅपची प्रचंड चर्चा झाली होती, त्याची रंगसंगतीसुद्धा ट्विटरसारखीच होती, मात्र कालांतराने युजर्सने त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे सातत्य टिकवण्याचे सर्वात मोठे आव्हान अॅपसमोर असेल.
– response.lokprabha@expressindia.com