39-lp-novac-andi-mareयंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉजर फेडररला हरवत नोवाक जोकोविचने तर सेरेना विल्यम्सला हरवत अँजेलिक कर्बर हिने स्पर्धा जिंकली. एकीकडे फेडररची कारकीर्द उताराला लागली आहे तर अँजेलिकची उदयाला येते आहे.

ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत लक्षणीय कामगिरी करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मुळातच या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविणे ही आव्हानात्मक व अवघड कामगिरी समजली जाते. नोवाक जोकोव्हिच याने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धाजिंकून उल्लेखनीय यश मिळविले. जर्मनीच्या अँजेलिक कर्बर हिने ही स्पर्धा जिंकली आणि कारकीर्दीतील पहिले ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपद पटकाविले.

जोकोव्हिचने ही स्पर्धाजिंकून रॉय इमर्सन यांच्या सहा विजेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी केली. कर्बरने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या फेरीत तिने बलाढय़ खेळाडू सेरेना विल्यम्सवर मात केली. त्यामुळेच पहिलेच ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद तिच्यासाठी संस्मरणीय यश ठरणार आहे. भारताची सानिया मिर्झाने मार्टिना हिंगिसच्या साथीने येथे महिलांच्या दुहेरीचे विजेतेपद मिळविताना सलग ३६ सामने जिंकण्याचा पराक्रम केला. माजी विजेत्या रॉजर फेडररने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील तीनशे सामने जिंकण्याची किमया केली. दुर्दैवाने उपांत्य फेरीत जोकोव्हिचपुढे त्याची डाळ शिजली नाही. अर्थात प्रौढ खेळाडू असूनही उपांत्य फेरीपर्यंतची झेपही कौतुकास्पद आहे. अनेकांच्या आश्चर्यकारक कामगिरीनंतरदेखील मॅचफिक्सिंगच्या आरोपांमुळे या स्पर्धेस गालबोट लागले गेले.

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ही प्रत्येक वर्षांच्या प्रारंभीची स्पर्धा असते. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धाच्या मोसमास या स्पर्धेने सुरुवात होते. अमेरिकन ओपन स्पर्धेनंतर चार महिन्यांच्या कालावधीनंतर ही स्पर्धा होत असते. त्यामुळे अव्वल दर्जाच्या प्रत्येक खेळाडूला या मधल्या काळात भरपूर विश्रांती घेता येते तसेच आपली शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता याची चाचपणी करता येते. काही दुखापत झाली असेल किंवा स्नायूंच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर हा चार महिन्यांचा कालावधी त्याला उपचाराकरिता उपयोगी होतो.

माजी जगज्जेता खेळाडू राफेल नदाल याला गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक वेळा दुखापती व तंदुरुस्तीच्या समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे अनेक वेळा ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये त्याला अपेक्षेइतके यश मिळालेले नाही. यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील पहिल्याच फेरीत त्याला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. पाच सेट्सच्या झुंजार लढतीनंतर फर्नाडो वेर्दास्को याने नदाल याचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत २००९ मध्ये त्याला उपांत्य फेरीत नदाल याच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाची परतफेड त्याने सनसनाटी कामगिरीने केली. फर्नान्डो याच्यासारखेच धक्कादायक यश मिलोस राओनिक याने मिळविले. पीट सॅम्प्रास या माजी जगज्जेत्या खेळाडूला आपला आदर्श मानणाऱ्या राओनिक याने माजी विजेत्या स्टानिस्लास वॉवरिन्क याला घरचा रस्ता दाखविला.

फेडररच्या कामगिरीत अपेक्षेइतके सातत्य राहिलेले नाही. प्रत्येक वर्षी तीन-चार एटीपी स्पर्धामध्ये तो विजेतेपद मिळवीत असला तरी ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत तो अव्वल कामगिरी करू शकत नाही हे दिसून आले आहे. परतीच्या फटक्यांची नजाकतता त्याच्याकडे असली तरीही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील उपांत्य किंवा अंतिम फेरीत विजय मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चतुरस्र व चापल्यतेबाबत त्याच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येत आहेत. कारकीर्दीत त्याने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत सतरा विजेतेपदे मिळविली आहेत. ही कामगिरी त्याच्याकडे असलेली हुकूमत सिद्ध करणारी आहे. टेनिसद्वारे पैसा मिळविण्याच्या हेतूपेक्षा खेळाचा निखळ आनंद मिळविण्यावरच त्याचा भर असतो. ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत त्याने ग्रिगोर दिमीत्रोव्ह याच्यावर मात केली आणि ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामधील आपला तीनशेवा विजय नोंदविला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. फेडरर व जोकोव्हिच यांच्यातील झुंज नेहमीच चाहत्यांसाठी पर्वणी असते. गेल्या चार वर्षांमध्ये फेडररला जोकोव्हिच भारी ठरला आहे. फेडरर सारख्या महान प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत करण्यासाठी कोणते तंत्र आवश्यक आहे हे जोकोव्हिचने ओळखले आहे. जोकोव्हिचच्या अष्टपैलू व वेगवान खेळापुढे फेडररच्या खेळातील मर्यादा सातत्याने स्पष्ट होत आहेत. जोकोव्हिचविरुद्धच्या उपांत्य लढतीत फेडरर हा केवळ एकच सेटजिंकू शकला. परतीचे फटके, बेसलाइन व्हॉलीज, नेटजवळून प्लेसिंग याबाबत जोकोव्हिच सरस ठरला.

अंतिम फेरीत जोकोव्हिचपुढे अ‍ॅण्डी मरेचे आव्हान होते. मरेने येथे अंतिम फेरीपर्यंत मजल गाठली हीच खूप मोठी कामगिरी आहे. कारण त्याची पत्नी गरोदर होती व तिला अपत्य त्याच सुमारास अपेक्षित होते. त्यातच त्याचे सासरे त्याचा सामना पाहण्यासाठी आले असताना स्टेडियममध्ये पडले. त्यांना मोठी दुखापत झाली. त्याचेही दडपण मरेवर होते. ही बाब लक्षात घेता मरेने मिळविलेले उपविजेतेपद ही त्याच्यासाठी व त्याच्या चाहत्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे. मरेला या स्पर्धेत पाचव्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम फेरीत सर्वोत्तम खेळ करण्यात त्याला येथे अपयश आले आहे. महिलांमध्ये अँजेलिक कर्बरचे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे. सेरेनासारख्या दिग्गज खेळाडूवर मात करणे ही काही सोपी गोष्ट नाही. सेरेना ताकदवान खेळाडू असून वेगवान फटके व सव्‍‌र्हिस करण्याबाबत ख्यातनाम आहे. काही वेळा सेरेनाला स्वत:च्या खेळावर व मानसिक तंदुरुस्तीवर नियंत्रण ठेवता येत नाही. अँजेलिकने नेमका हाच मुद्दा पकडून तिला पराभूत केले. अर्थात तिला त्यासाठी संघर्ष करावा लागला. सेरेनाच्या खेळातील चुकांचा फायदा कसा घ्यायचा याचा तिने भरपूर अभ्यास केला होता. त्याप्रमाणे तिने आपल्या सव्‍‌र्हिस व परतीचे फटक्यांच्या व्यूहरचनेत बदल केला. अचूक सव्‍‌र्हिस करीत सेरेनाला वेगवान फटके मारता येणार नाही याची काळजी तिने घेतली. त्यामुळेच ही स्वप्नवत कामगिरी करता आली.

सानिया व मार्टिना यांच्या खेळातील सातत्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. महिलांच्या दुहेरीत अनेक युवा खेळाडू पुढे येत असताना या अनुभवी जोडीने आपल्या खेळातील समन्वय व सातत्य टिकविले आहे. एकमेकींच्या चुका प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या नजरेत येणार नाही, त्यांना फारशी संधी मिळणार नाही यावर त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे आणि अजूनही घेत आहेत. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये सर्वोच्च यश मिळविण्यासाठी जी शारीरिक तंदुरुस्ती व क्षमता लागते त्याबाबत  सानिया व मार्टिना यांनी अन्य खेळाडूंपुढे आदर्श ठेवला आहे.

सानियाचा अपवाद वगळता भारताच्या अन्य खेळाडूंनी सपशेल निराशा केली. खरं तर भारतात भरपूर प्रमाणात स्पर्धा होत असतात. या स्पर्धामध्ये  परदेशी खेळाडूही मोठय़ा संख्येने भाग घेत असतात. युकी भांब्री, सोमदेव देववर्मन, साकेत मायनेनी यांच्यासारख्या युवा खेळाडूंनी सानिया, लिअ‍ॅण्डर पेस, महेश भूपती यांच्यासारखी जिद्द ठेवली पाहिजे. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या भारतीय खेळाडूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. त्याचा फायदा घेत ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धामध्ये भारताची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी युवा खेळाडूंनी घेतली पाहिजे.
मिलिंद ढमढेरे
response.lokprabha@expressindia.com