आपल्या देशात क्रीडा संस्कृती नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. पण आपल्याला अशी संस्कृती उभी करायचीच गरज वाटत नाही, हे निकोलाई स्नेसारेव्ह या अॅथलेट प्रशिक्षकाच्या तडकाफडकी राजीनाम्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
रिओ ऑलिम्पिकच्या तोंडावर भारतीय क्रीडा क्षेत्राला एकामागून एक धक्के पचवावे लागत आहेत. ललिता बाबर आणि ओ. पी. जैशा या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणारे रशियाचे प्रशिक्षक निकोलाई स्नेसारेव्ह यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन या खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीत विघ्न निर्माण केले आहे. पण, हे विघ्न निकोलाई यांच्यामुळे आहे की भारतीय क्रीडा संस्कृतीमुळे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. निकोलाई यांच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा परदेशी प्रशिक्षकांचा मुद्दा चर्चेत आला आहे. खेळाडूंना अव्वल दर्जाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे निकोलाई यांनी हा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य की अयोग्य यावर भाष्य करताना भाारतीय अॅथलेटिक महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी निकोलाई यांना अव्वल सुविधांबाबत विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
विदेशी प्रशिक्षक भारतात पैसे कमावण्यासाठी येतात आणि अनपेक्षित कारण सांगून रफादफाही होतात.. अशी मते प्रत्येक वेळी व्यक्त केली जातात आणि निश्चितच निकोलाई यांच्या निर्णयानंतरही हेच होणार.. अजून किती दिवस आपण एकमेकांवर दोषारोप करून आपली चूक लपविण्याचा प्रयत्न करणार आहोत, हे देवच जाणे. मात्र, निकोलाईसारखे अनेक प्रशिक्षक ज्यांना जागतिक बाजारात सोन्याचा भाव आहे, अशा प्रशिक्षकांना आपल्याकडून मिळत असलेली वागणूक ही लाजीरवाणी आहे. मुळात परदेशी प्रशिक्षकावर हुकमत देशी पदाधिकाऱ्यांचीच असल्यामुळे हे वाद होत आहेत.
प्रशिक्षक आयात केल्या, पण सुविधांचं काय?
देशाची अशी इभ्रत वेशीला टांगण्यात हॉकी इंडिया आघाडीवर आहे. जागतिक स्तरावरील अव्वल प्रशिक्षकांना हेरायचे आणि त्यांना मोठमोठय़ा रकमेची आमिषं दाखवून भारतात आणायचे, हा उद्योग गेली कित्येक वष्रे हॉकी इंडियाकडून सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील. पण, मुळात भारतीयांचा विदेशी प्रशिक्षकाची आवश्यकता काय? भारतात अव्वल दर्जाचे प्रशिक्षक नाहीत का? हे प्रश्न या निमित्ताने वारंवार समोर येतात. जगाच्या पाठीवर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास, आपण कोसो दूर आहे असेच म्हणावे लागेल. कारण, तुलनेने आपल्याहून लहान आणि विकसनशील देश पदकतालिकेत भारताला मागे टाकत आहेत.
निकोलाई यांच्या ना‘राजीनाम्या’मुळे अपुऱ्या पायाभूत सुविधांचा मुद्दा पुन्हा आपल्यासमोर आला आहे. आर्थिक महासत्ता बनण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असलेल्या आपल्या या भारत देशात क्रीडा संस्कृतीला नेहमीच कमी प्राधान्य दिले जाते. मूठभर राजकीय नेते, ज्यांना क्रीडा क्षेत्रातील जाण नाही, असे लोक सत्तेत बसून क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी चर्चामसलत करतात. याहून अधिक हास्यास्पद बाब असूच शकत नाही. चर्चा करण्यात पटाईत असणारे हे लोक प्रत्यक्ष खेळाडूंच्या विकासाचा किती गांभीर्याने विचार करतात, हे जाणून घ्यायला हवे. शंभरपैकी २०-२१ जणच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देत असतील बाकी हवेतील बाता. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूने पदक पटकावल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षांव करून चर्चेत राहणारी हे लोक, प्रत्यक्ष खेळाडू घडविण्यासाठी मागे असतात. निकोलाई यांच्या नाराजीतून ते दिसलेच. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) मैदानांच्या दुरवस्थेवर निकोलाई यांनी बोट ठेवले. आजही खेळाडू रस्त्यावर धावण्याचा सराव करत आहेत, त्यांना इंडोअर अकादमी नाही, या ना आदी मूलभूत सुविधाच नसतील तर खेळाडूने कितीही परिश्रम केल्यास आंतरराष्ट्रीय खेळाडूंना तोडीस तोड कामगिरी करूच शकत नाही. ललिता बाबर आणि ओ. पी. जैशा यांनी निकोलाई यांच्याच मागदर्शनाखाली जागतिक अॅथलेटिक्स स्पध्रेत राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. ललिताने तर ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला. मात्र, अशाच अपुऱ्या सुविधा राहिल्यास जैशा व ललिता ऑलिम्पिकमध्ये रित्या हाती परततील, असे ठाम मत निकोलाई यांनी व्यक्त केले. त्यात तथ्यही आहे.. जगाच्या पाठीवर आपण बरेच मागे आहोत. इतर देशांमध्ये खेळाडू घडविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा बसविल्या जातात. खेळाडूंच्या आहारापासून ते त्यांच्या दिवसांचा कार्यक्रमाची सुनियोजित आखणी केली जाते. तसे भारतातही होते, परंतु परदेशाच्या तुलनेत ती तुटपुंजी असते. साइची काही मोजकी केंद्रे वगळल्यास इतर केंद्रांमधील क्रीडा साहित्यांची अवस्था पाहवतही नाही आणि हाच मुद्दा निकोलाई यांनी उपस्थित केला.
प्रशिक्षकाच्या स्वातंत्र्याचं काय?
जागतिक दर्जाच्या प्रशिक्षकांना त्यांच्या परीने काम करण्याची मुभा संघटनेकडून मिळत नाही. भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक जोस ब्रासा यांनी प्रशिक्षक हा संघटनेच्या हातातील बाहुली असल्याचा आरोप केला. भारतीय प्रशिक्षकांची व खेळाडूंची सरावाची शैली आणि परदेशी प्रशिक्षकांची शैली यात तफावत ही असणारच. ते त्यांच्या पद्धतीने खेळाडूतील गुणवत्ता हेरून त्याच्यावर काम करत असतात. पण, संघटनेतील पदाधिकाऱ्यांना अनेकदा खेळाडूंनाच प्रशिक्षकांच्या शैलीत दोष असल्याचा साक्षात्कार होतो. हे कुणी उघड बोलत नसले तरी घडणाऱ्या घडामोडींतून ते जाणवते. याचे ज्वलंत उदाहरण द्यायचे झाल्यास पॉल व्हॅन अॅस आणि नरेंद्र बात्रा यांच्यात उडालेला खटका. जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरीच्या लढतीत बात्रा यांनी मैदानात येऊन खेळाडूंची कानउघाडणी केली. बात्रांची ही वागणूक अॅस यांना त्यांच्या कामातील हस्तक्षेप वाटल्यामुळे त्यांनी बात्रांना रोखले. त्या घटनेनंतर अॅस यांची हकालपट्टी झाली. मुळात मैदानावर खेळाडूंशी चर्चा करण्याचा किंवा कानउघाडणी करण्याचा अधिकार हा सर्वस्वी प्रशिक्षकाचा असताना बात्रा यांची ही वागणूक कुणीही खपवून घेतली नसती. तरीही अॅस यांचाच बळी गेला. जोपर्यंत परदेशातील प्रशिक्षकांना कामात स्वातंत्र्य देत नाही, तोपर्यंत असे वाद होतच राहणार. एकेकाळी हॉकी सुवर्णपदकाची लयलूट करणारा भारत आजच्या घडीला शेवटून पहिला येतोय, यामागे हेच कारण असेल. हॉकीतील दिग्गज ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार चंद यांनी या अपयशाचे अचूक विश्लेषण केले आहे. ‘‘बेल्जियमसारखा देश भारताला पराभूत करतो, हे पाहून दु:ख होते. बदलत्या काळानुसार हॉकीत बरेच बदल झाले आणि त्याचा फटका भारताला बसत गेला, असे मानणाऱ्यामधला मी नाही. काळानुसार आपल्यातही बदल अपेक्षित होता, परंतु आपण त्यात अपयशी ठरलो. या बदलात आपण आपली खरी ओळख पुसत गेलो आणि नवीन गोष्टीही पूर्णपणे आत्मसात केल्या नाहीत. यात इतर देशांनी गरुडझेप घेतली. त्यांनी भारतीयांकडून या खेळातील बारकावे शिकले आणि त्यात आपल्या तंत्राच्या माध्यमातून अधिक विकास साधला. पण, आपण हेच बारकावे विसरलो आणि नव्याच्या मागे पळालो,’’ असे अशोक कुमार यांनी सांगितले आहे.
प्रशिक्षकांना प्रशिक्षणाची गरज…
एक उत्तम खेळाडू घडविण्यासाठी उत्तम प्रशिक्षक असावा लागतो. १२० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात उत्तम विद्यार्थी आहेत, परंतु त्यांना शिकवण्यासाठी दर्जेदार शिक्षक नाहीत. त्यामुळे सध्या प्रशिक्षकांनाच प्रशिक्षणाची गरज आहे. विदेशी प्रशिक्षकांना आयात करून आपण वरिष्ठ स्तरावरील खेळाडूंना घडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवितो. तेच या प्रशिक्षकांना कनिष्ठ स्तरापासून काम करण्यास सांगितले, तर भारतात सर्वोत्तम खेळाडू घडतील. कनिष्ठ ते वरिष्ठ या प्रवासात खेळाडूने बरेच काही साध्य केले असते आणि एकदम वरिष्ठ स्तरावर त्याला त्याच्या शैलीत बदल करायला सांगणे हे चुकीचे ठरते. त्यामुळेच अनेकदा खेळाडू प्रशिक्षकांची तक्रार करतात. हेच बदल कनिष्ठ स्तरापासून त्यांना शिकवल्यास त्यांच्यातील गुणवत्तेला योग्य मार्ग मिळेल, हे नक्की.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com