यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा ढिसाळ आयोजनामुळे चर्चेत राहिली. पावसामुळे काही सामने रद्द केले तर काही लांबणीवर गेले. काहींनी दुखापतीमुळे माघार घेतली. या स्पर्धेवर टाकलेली नजर.

फ्रेंच ओपन स्पर्धा म्हणजे ग्रँड स्लॅम विश्वातली जिंकायला सगळ्यात अवघड स्पर्धा. लाल मातीवर थंड वातावरणात जगभरातल्या अव्वल खेळाडूंना टक्कर देत जिंकणे आव्हानात्मकच. यंदाची स्पर्धा खेळापेक्षा ढिसाळ आयोजनामुळे चर्चेत राहिली. पावसाच्या व्यत्ययामुळे वेळापत्रक बिघडले. अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये कोर्टवर आच्छादनाची व्यवस्था असताना फ्रेंच ओपनमध्ये पावसामुळे सामने रद्द करावे लागले किंवा लांबणीवर टाकावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने जेतेपदासह कारकीर्दीत ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरण्याचा विक्रम नावावर केला. महिलांमध्ये गार्बिन मुगुरुझाने बलाढय़ सेरेनाला नमवण्याची किमया केली. भारतासाठी लिएण्डर पेसने जेतेपद पटकावत शान कायम राखली. परंतु दुखापतीमुळे असंख्य खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे स्पर्धेची चुरस कमी झाली. पुढच्या वर्षी यंदाच्या चुका सुधारत ही स्पर्धा होईल अशी अपेक्षा आहे.

जोकोव्हिचचे वर्तुळ पूर्ण

शैली आणि ताकद यापेक्षाही यंत्रवत सातत्य, घोटीव कौशल्यं आणि चिवटपणे झुंज देण्याची तयारी यांच्या बळावर नोव्हाक जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांची ग्रँड स्लॅम जेतेपदावरची मक्तेदारी मोडली. ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेच्या जेतेपदांवर जोकोव्हिचने अनेकदा नाव कोरले. मात्र रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर जेतेपदाने जोकोव्हिचला सातत्याने हुलकावणी दिली. कारकीर्दीत चारही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर नाव कोरण्याचा पराक्रम अगदी मोजक्या टेनिसपटूंच्या नावावर आहे. जोकोव्हिचने १२व्या प्रयत्नांत फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावत वर्तुळ पूर्ण केले. गेल्या वर्षी जोकोव्हिचने लाल मातीचा बादशाह असणाऱ्या नदालला नमवण्याची किमया केली होती. मात्र अंतिम लढतीत स्टॅनिसलॉस वॉवरिन्रकाने त्याचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. यंदा फेडरर आणि नदालच्या अनुपस्थितीत जोकोव्हिचने नेहमीच्या सफाईदार खेळाच्या जोरावर बाजी मारली. फेडरर आणि नदाल नसल्याने जोकोव्हिच विक्रम करणार अशी चर्चा होती. या चर्चानी बेफिकीर न होता जोकोव्हिचने प्रत्येक लढतीत खेळ सुधारत सरशी साधली. दम्यासारखा गंभीर आजार असतानाही त्यावर नेटाने मात करत जोकोव्हिचने घेतलेली भरारी स्तिमित करणारी आहे. फेडरर आणि नदालच्या ग्रँड स्लॅम झंझावातात जोकोव्हिचने १२ ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. स्वत:चे शरीर आणि त्याच्या उणिवा पूर्णपणे ओळखून त्यानुसार ठरवलेला आहार, त्याच्या वेळा, काटेकोर पथ्य, विशिष्ट व्यायाम, योगसाधना ही जोकोव्हिचच्या यशामागची खडतर तपश्चर्या आहे. अन्नावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. यासाठी जोकोव्हिच अनेकदा स्वत:चे जेवण स्वत: तयार करतो. जेवताना तो कोणत्याही गॅझेटच्या संपर्कात नसतो. संपूर्ण लक्ष जेवणाकडे असावे आणि शरीराला योग्य इंधन मिळावे यासाठी तो प्रयत्नशील असतो. अविरत जिंकण्यासाठी केवळ स्वत:च्या नव्हे तर प्रतिस्पध्र्याच्या खेळाचा सखोल अभ्यास करावा लागतो. प्रतिस्पध्र्याचे कच्चे दुवे हेरून त्यानुसार डावपेच आखणे हे जोकोव्हिचचे खास वैशिष्टय़. जिंकण्यासाठी स्वत:ची अशी जीवनशैली विकसित केल्यामुळेच जोकोव्हिच आजपर्यंत हे यश मिळवू शकला आहे. अमाप पैसा, जाहिरातींचे करार, प्रसिद्धी मिळत असतानाही जोकोव्हिचने आपला गमत्या, मिश्कील स्वभाव सोडलेला नाही. समकालीन खेळाडूंच्या हुबेहूब नकला तो आजही करतो. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत त्याने माजी खेळाडू गुस्ताव कुअर्टनची नक्कल करून दाखवली. सातत्याने जिंकू लागल्यावर येणारा शिष्टपणा, एकलकोंडं होण्याची जोकोव्हिचची वृत्ती नाही. बॉलबॉयपासून स्पर्धा संचालकांपर्यंत सगळ्यांना आपलंसं करणारा जोकोव्हिच सर्वसामान्यांचा जेता आहे. फेडररसारखी कलात्मकता त्याच्याकडे नाही, नदालसारखी अफाट ताकद नाही पण तरीही जोकोव्हिच ग्रँड स्लॅम जिंकतो आहे. जोकोव्हिच हे रसायन अनोखं असल्याची अनुभूती पुन्हा एकदा जगभरातल्या टेनिसरसिकांनी अनुभवली.

नवी विजेती

महिला टेनिसला सातत्याचा शाप आहे. सेरेना विल्यम्सचा अपवाद वगळता एकीलाही खेळात, जिंकण्यात, तंदुरुस्त राहण्यात सातत्य राखता आलेले नाही. नवी स्पर्धा, नवे फॅशन स्टेटमेंट, अ‍ॅक्सेसरीज ही महिला टेनिसची ओळख झाली आहे. मात्र यामध्ये दर्जेदार खेळ हरपला आहे. जेतेपद पटकावू शकतील अशा खेळाडूंना मानांकन दिले जाते. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये मानांकन मिळालेल्या महिला टेनिसपटू झटपट गाशा गुंडाळतात. एखाद्या सामन्यात अपवादात्मक चांगला खेळ करणारी महिला टेनिसपटू पुढच्याच सामन्यात एकही गुण न कमावता हरते. विल्यम्स भगिनींचा अपवाद सोडला तर प्रत्येक स्पर्धेत असंख्यजणी येतात. पण एकीलाही आपली छाप सोडता येत नाही. सेरेनाच्या झंझावातासमोर अनेकजणी निष्प्रभ ठरतात. यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने सेरेनाला नमवण्याची किमया केली. फ्रेंच ओपनमध्ये स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने जेतेपदावर नाव कोरले. लाल माती ही स्पेनच्या राफेल नदालच्या खास जिव्हाळ्याची. नदालच्या अनुपस्थितीत मुगुरुझाने महिला गटात का होईना स्पेनचा झेंडा अभिमानाने फडकावला. एकेक फेरीचा अडथळा पार करत अंतिम फेरीत दाखल झालेल्या गार्बिनसमोर सेरेनाचे खडतर आव्हान होते. मात्र उत्तम सव्‍‌र्हिस या टेनिसमधल्या मूलभूत कौशल्याच्या जोरावर गार्बिनने स्वप्नवत विजय साकारला. कमीत कमी चुका आणि दुखापतींमुळे सूर हरवलेल्या सेरेनाच्या स्वैर खेळाचा फायदा उचलत गार्बिनने २२व्या वर्षीच ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची किमया केली. ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतरही महिला टेनिसपटूंना सातत्याची गुरुकिल्ली मिळत नाही हे अ‍ॅना इव्हानोव्हिक, व्हिक्टोरिया अझारेन्का, पेट्रा क्विटोव्हा, अँजेलिक कर्बर या आणि असंख्य उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. वय गार्बिनच्या बाजूने आहे. सेरेना कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. मोठं होण्याची संधी गार्बिनकडे आहे.

दुखापतींनी मजा किरकिरी

जिंकण्याचा आनंद तेव्हाच असतो जेव्हा तुल्यबळ प्रतिस्पर्धीना चीतपट केलं जातं. फ्रेंच टेनिस स्पर्धा ग्रँड स्लॅम विश्वातली सगळ्यात कठीण स्पर्धा समजली जाते. जगातल्या अव्वल खेळाडूंना नमवत जेतेपदापर्यंत केलेली वाटचाल प्रत्येक टेनिसपटूला अभिमानास्पद असते. मात्र यंदा प्रमुख खेळाडूंनी दुखापतीच्या कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आणि निरस झाला. ३४ वर्षीही एखाद्या युवकाला साजेसा ऊर्जेने खेळणाऱ्या रॉजर फेडररचे चाहते जगभर पसरलेले आहेत. तब्बल १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या फेडररला गेल्या तीन वर्षांत मात्र या जेतेपदांनी हुलकावणी दिली आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत युवा खेळाडूंना निष्प्रभ करत फेडरर किमान उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठतोच. परंतु जेतेपदाने त्याला वंचित ठेवले आहे. यंदाच्या वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचच्या झंझावातासमोर तो निष्प्रभ ठरला. जिंकणं, जेतेपदं यापेक्षा खेळाचा निरलस आनंद लुटण्यासाठी खेळत असलेल्या फेडररला फ्रेंच खुल्या स्पर्धेद्वारे टीकाकारांना प्रत्युत्तर देण्याची संधी होती. मात्र गुडघ्यावर झालेली शस्त्रक्रिया तसेच पाठीचे दुखणे बळावल्यामुळे फेडररने अगदी शेवटच्या क्षणी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. खेळभावना जपणाऱ्या, कोर्टवर आणि कोर्टबाहेरही वर्तन कसे असावे याचा वस्तुपाठ देणाऱ्या फेडररचे ब्रँडमूल्य प्रचंड आहे. त्याचं असणंच अनेकांसाठी टेनिस पाहण्याचं निमित्त ठरतं. फेडररने फेसबुकच्या माध्यमातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आणि सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये निराशा उमटली. पॅरिसमधल्या रोलँड गॅरोस अर्थात फ्रेंच टेनिस स्पर्धा होते ती लाल माती राफेल नदालच्या खास जिव्हाळ्याची. या स्पर्धेची तब्बल दहा जेतेपदे नावावर असणारा नदाल लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांत नदालचा झंझावात ओसरला आहे. सातत्याने दुखापतींच्या गर्तेत अडकल्याने नदालच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. लाल माती व्यतिरिक्त होणाऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये तर त्याला सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. जोकोव्हिचच्या यंत्रवत सातत्याला टक्कर देण्याची ताकद नदालमध्ये आहे. यंदाच्या हंगामात तंदुरुस्त होऊन खेळणाऱ्या नदालने फ्रेंच स्पर्धेसाठीच्या रंगीत तालीमसदृश स्पर्धामध्ये दमदार कामगिरी केली. त्याची देहबोली जगभरातल्या चाहत्यांसाठी आश्वासक होती. उत्तम सूर गवसलेल्या नदालने फ्रेंच स्पर्धेत पहिल्या दोन फेऱ्या जिंकल्याही. नव्या तडफेने खेळणारा नदाल भारी पडू शकतो अशा चर्चा रंगत असताना मनगटाच्या दुखापतीमुळे नदालने माघार घेत असल्याची घोषणा केली. अनेकांसाठी आणि स्वत: नदालसाठी हा धक्काच होता. लाल मातीवर खेळायचं ते जिंकण्यासाठीच ही नदालची परंपरा. मात्र गेल्या वर्षी जोकोव्हिचने लाल मातीवर नदालचा अद्भुत पराक्रम थोपवत त्याला नमवले. यंदा सुरुवात चांगली झाली मात्र दुखापतींनी डोके वर काढल्याने नदाल बाहेर पडला. जोकोव्हिच, फेडरर आणि नदाल या त्रिकुटाने गेल्या दशकभरातल्या ग्रँड स्लॅम जेतेपदांवर मक्तेदारी राखली आहे. जेतेपदासाठी या तिघांमध्ये रंगणाऱ्या मॅरेथॉन लढती ग्रँड स्लॅमची ओळख ठरल्या होत्या. फेडरर आणि नदाल नसल्याने जोकोव्हिचसमोरचे आव्हान सोपे झाले. मात्र त्याच वेळी अव्वल दर्जाचं टेनिस पाहता न आल्याची खंत टेनिसरसिकांना राहील. या दोघांच्या बरोबरीने गेइल मॉनफिल्स तर महिलांमध्ये कॅरोलिन वोझ्नियाकी, बेलिंडा बेनकिक, फ्लॅव्हिआ पेनेट्टा यांनीही दुखापतीमुळे माघार घेतली.

नूतनीकरणाची आवश्यकता

अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या स्टेडियम्समध्ये आच्छादनाची व्यवस्था आहे. यामुळे पाऊस आला तरी सामने होऊ शकतात. यंदा पावसामुळे फ्रेंच ओपनच्या प्राथमिक फेरीचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले. अनेक लढती दोन दिवस चालल्या. ग्रँड स्लॅमसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये खेळाडू एक आड एक दिवस खेळतात. मोठय़ा लढतीपूर्वी विश्रांती मिळावी हा त्यामागचा हेतू असतो. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना फटका बसला. रोलँड गॅरोसच्या कोणत्याही कोर्टवर आच्छादन नसल्याने पाऊस पूर्ण थांबल्याशिवाय सामना सुरू करता येत नाही. पाऊस थांबल्यानंतर लगेचच सामने सुरू केल्यामुळे ओलसर, निसरडय़ा कोर्टवर खेळायला लागल्याची तक्रार टेनिसपटूंनी केली आहे. पुढच्या वर्षीपर्यंत कोर्ट्सवर आच्छादन बसवण्याची आग्रही मागणी खेळाडूंनी केली आहे.

झेब्रा प्रिंटची फॅशन जोरात

टेनिस आणि फॅशन यांचं जवळचं नातं आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिस विश्वाचा मानबिंदू. प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळाडूंद्वारे नवनवीन फॅशन स्टेटमेंट सादर होते. यामागे त्यांचे प्रायोजक कंपनी असते. टेनिससारखा दमवणारा खेळ खेळताना सैल, सुटसुटीत असे मात्र त्याच वेळी वेगळं असा काही देण्याचा डिझायनर्सचा प्रयत्न असतो. महिला टेनिसमध्ये सेरेना विल्यम्सचा अपवाद वगळता बाकी सगळा आनंदच आहे. दर्जेदार खेळाऐवजी दर्जेदार फॅशनकरता महिला टेनिसपटू ओळखल्या जातात. यंदा अदिदास कंपनी प्रायोजक असणाऱ्या महिला तसंच पुरुष टेनिसपटूंनी झेब्रा प्रिंटचे कपडे परिधान केले. शिष्टाचाराच्या कोंदणात झेब्रा प्रिंट योग्य मानले जात नाही. मात्र यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अनेक खेळाडूंनी ही स्टाइल स्टेटमेंट फॉलो केली. विम्बल्डन स्पर्धेत पोशाखाबाबतही आचारसंहिता पाळावी लागते. अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धाना तशी अट नाही. परंतु डोळ्याला खुपणाऱ्या आणि टेलिव्हिजन प्रक्षेपणातही विचित्र दिसणारी झेब्रा स्टाइल चर्चित ठरली. आम्ही खेळायला आणि सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी येतो. कपडे दुय्यम गोष्ट आहे, आमच्या खेळाची चर्चा व्हावी असे मत बहुतांशी झेब्रा स्टाइल अंगीकारणाऱ्या टेनिसपटूंनी सांगितले.

भारताचा ‘पेस’

भारतीय टेनिसची पताका अजूनही लिएण्डर पेस, सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा या अनुभवी खेळाडूंकडेच आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी हे तिघेही उत्सुक होते. मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतलेल्या सानियाला महिला दुहेरीत झटपट गाशा गुंडाळावा लागला. मात्र इव्हान डोडिगच्या साथीने खेळताना सानियाने मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. बोपण्णाचे मिश्र आणि पुरुष दुहेरी अशा दोन्ही प्रकारात आव्हान लवकर संपुष्टात आले. मात्र ४२व्या वर्षी तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा, तंदुरुस्ती आणि वैैयक्तिक आयुष्यातील कटू प्रसंग बाजूला सारत पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरीच्या जेतेपदावर कब्जा केला. युवा भारतीय खेळाडूंना ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी पात्र ठरणेही कठीण असताना पेस मात्र अपवाद ठरला आहे. जिंकण्याची, सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची त्याची भूक शमलेली नाही हे आणखी एका जेतेपदाने सिद्घ केले आहे.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader