अवैध गोलंदाजी शैली प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमल याने हरभजन सिंग आणि आर.आर.अश्विन यांच्या गोलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हरभजन आणि अश्विनच्या गोलंदाजीवर आक्षेप घेत हे दोघेही गोलंदाज फेकी गोलंदाजी करत असल्याचा आरोप सईद अजमल याने केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सईद अजमलची गोलंदाजी शैली अवैध ठरवत त्याच्यावर बंदी घातली होती. ती अजूनही कायम असल्याने तो अद्यापही संघाच्या बाहेर आहे. एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सईदने आयसीसीने घातलेल्या बंदीवर नाराजी व्यक्त करत हरभजन आणि अश्विन यांनाही गोलंदाजी शैलीवरून लक्ष्य केले.
हरभजनने टाकलेले प्रत्येक चेंडू चुकीच्या पद्धतीन फेकलेला असतो. त्याचा डावा खांदा १५ अंशांपेक्षा अधिक खाली झुकतो. अश्विनची गोलंदाजीही काहीशी अशीच आहे. सर्वांसाठी नियम समान असावेत, असे सांगत आयसीसी केवळ एकतर्फी निर्णय घेत असल्याचेही सईद यावेळी म्हणाला.