नुकतीच पंधरावी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा बीजिंगमध्ये पार पडली. अपेक्षेप्रमाणेच या स्पर्धेत जमैका, केनिया, अमेरिका या देशांचे वर्चस्व दिसून आले. या संपूर्ण रोमांचकारी स्पर्धेत भारत मात्र कुठेही दिसला नाही.
चीनच्या बीजिंग शहरात १५वी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. अपेक्षेप्रमाणे जमैका, केनिया, अमेरिका या देशांचे वर्चस्व याही स्पध्रेत दिसले. केनियाने १६ (७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य) पदकांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ जमैकानेही उसेन बोल्टच्या करिश्माई कामगिरीच्या जोरावर आपल्या नावावर १२ (७ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य) पदके करून दुसरे, तर अमेरिकेने सर्वाधिक १८ (६ सुवर्ण, ६ रौप्य आणि ६ कांस्य) पदके जिंकून तिसरे स्थान पटकावले. चीनमध्ये ही स्पर्धा होत असल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर यजमान काही तरी करिश्मा करतील अशी असलेली अपेक्षा दिवसअखेर फोल ठरली. आशियाई स्पर्धामध्ये शेजारील देशांना भुईसपाट करणाऱ्या चीनने जागतिक स्तरावर एक सुवर्ण, सात रौप्य आणि एक कांस्य अशी नऊ पदकांची कमाई करून स्वत:ची इभ्रत वेशीला टांगण्यापासून वाचवले. २०७ देशांच्या शर्यतीत चीनचे ११वे स्थान ही कामगिरी कौतुकास्पद नसली तरी लाजिरवाणी अजिबात नाही. शंभर कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशांमध्ये क्रीडा गुणांना योग्य नैपुण्य मिळत असल्यामुळे त्यांना इथवर मजल मारण्यात यश मिळाले. पण, या सर्व शर्यतीत भारत कुठेच दिसला नाही आणि ही बाब एक भारतीयांना मान शरमेने खाली घालणारी आहे.
या यादीत जमैकाचा उसेन बोल्ट, ग्रेट ब्रिटनचा मो फराह, यांचे नाव आवर्जून घ्यायला हवे. उसेन बोल्ट जगातील सर्वात जलद धावणारा व्यक्ती.. ३०च्या उंबरठय़ावर असलेल्या या धावपटूने १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून पुन्हा एकदा ऐतिहासिक भरारी घेतली. जागतिक स्पध्रेत सलग चार वेळा २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर शर्यतीचे जेतेपद नावावर करणारा एकमेव खेळाडू.. दुखापतीमुळे एक वर्ष विश्रांती घेतल्यामुळे निवृत्तीचा खोचक सल्ला देणाऱ्यांना बोल्टने त्याच्या कामगिरीतूनच उत्तर दिले. एरवी टीकाकारांच्या तोंडाला तोंड न देणाऱ्या बोल्टने यंदा मात्र मैदानात आणि मैदानाबाहेर खूप सुनावले. आपल्या कामगिरीवर नेहमी असमाधानी असलेला बोल्ट सतत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी धडपडताना आपण पाहिला आहे. त्यामुळेच तो जगातील महान खेळाडू आहे. बोल्टला या वेळी आव्हान होते ते अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीन याचे. उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी गॅटलीनवर दोन वेळा निलंबनाची कारवाई करण्यात आली. ती शिक्षा पूर्ण करून गॅटलीन पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरला होता आणि बोल्टच्या विश्रांतीच्या काळात अनेक स्पर्धा गाजवल्याही. त्यामुळे जागतिक स्पध्रेत या दोघांमध्ये कडवा संघर्ष रंगणार आणि त्यात बोल्टचा पराभव अटळ होणार, असे चित्र रंगवले गेले. त्यावर बोल्टने प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीतून प्रतिक्रिया दिली. १०० मीटर शर्यतीत सेकंदाच्या शतांश भागाने म्हणजेच ०.०१ सेकंदाच्या फरकाने बोल्टला विजेतेपद मिळाले. हा धोक्याचा इशारा अचूकपणे हेरून बोल्टने २०० मीटर शर्यतीत एकहाती बाजी मारताना गॅटलीनच्या नावाची हवा काढून टाकली. ग्रेट ब्रिटनच्या मो फराह यानेही पाच हजार मीटर शर्यतीत हॅट्ट्रिक साजरी करून विक्रम प्रस्थापित केला. दहा हजार मीटर शर्यतीत त्याने सलग दोन वेळा जेतेपदाची माळ गळ्यात टाकली. या दोघांव्यतिरिक्त अमेरिकेची अॅलीसन फेलिक्स, अॅस्टन इथॉन, केनियाची व्हीव्हीयन जेप्केमोई चेरुइयॉट, इ इजेकीएल केम्बोई चेबोई, डेव्हिड रुडीशा, अॅस्बेल किप्रोप यांच्याही नावाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यांनीही आपापल्या क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारतीय लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या केनिया आणि जमैकासारख्या विकसनशील देशात असे खेळाडू घडतात कसे? त्यांचा प्रेरणास्रोत कोण आहे? जमैकाचा विचार केल्यास कॅरेबिन समुद्रातील एक आयलँड अशी भौगोलिक रचना असलेला देश. या देशातील वातावरणच अॅथलीट तयार करण्यासाठी पोषक आहे. तसेच केनियाच्या बाबतीतही आहे. या दोन्ही देशांमध्ये खेळाडूंना लहानपणापासूनच योग्य सराव देण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बालवयापासूनच त्यांच्यावर क्रीडा संस्कार केले जातात आणि त्याचा निकाल अशा स्पर्धामधून दिसून येतो. निसर्गाच्या देणगीमुळे हे खेळाडू ‘ट्रॅक’ प्रकाराकडे वळतात. सरावासाठी मूलभूत गरजा, योग्य प्रशिक्षण आणि क्रीडा संस्कृतीचे खोलवर रुतलेले बीज, यामुळेच हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करताना आपण पाहतो. जमैका आणि केनियाच्या बाबतीत एक मुद्दा साम्य आहे आणि तो म्हणजे आर्थिक चणचण. जागतिक स्पर्धामध्ये आपण चांगली कामगिरी केल्यावरच आपल्याला आर्थिक सहकार्य मिळेल, याची जाण खेळाडूंना आहे आणि त्यामुळेच विविध स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी ते जंग जंग पछाडताना दिसतात. त्यात यशस्वीही होतात, कारण खेळच त्यांच्या आर्थिक उदनिर्वाहाचा स्रोत आहे. अमेरिकेच्या बाबतीत आर्थिक चणचण हा प्रश्नच येत नाही. त्यांच्याकडे खेळाडूंना वाव देणारी आणि त्यांना घडविणारी एक स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत असल्यामुळे शालेय स्तरापासून खेळाडू घडतात. पण, जमैका आणि केनियाच्या तुलनेत अमेरिकेचे खेळाडू हे ‘फिल्ड’ प्रकारात म्हणजेच भालाफेक, गोळाफेक, उंचउडी, लांबउडी आदींमध्ये जास्त महारथ आहेत. एकूणच या तिन्ही देशांच्या क्रीडा संस्कृतीवर लक्ष दिल्यास शालेय स्तरापासूनच खेळाडू घडविण्याचा वसा ते जपत आले आहेत.
या तुलनेत भारत अजूनही मागासलेला आहे. गमतीचा भाग सांगायचा झाल्यास अमेरिकेचा अॅश्टन एआटोन हा डेकॅथलॉनपटू सिद्धार्थ थिंगालया, क्रिष्णा राणे, जोसेफ अब्राहम, कुमारवेल प्रेमकुमार, आरोकिया राजीव या आणि आदी अव्वल खेळाडूंवर एकटा भारी पडेल असा आहे. डेकॅथलॉनमध्ये १०० मीटर शर्यत, उंच उडी, गोळाफेक, लांब उडी, ४०० मीटर शर्यत, ११० मीटर हर्डल, थाळीफेक, पोल वॉल्ट, भालाफेक आणि १५०० मीटर शर्यत आदींचा समावेश असतो. या सर्व कसोटींवर खरा उतरत अॅश्टन याने जागतिक स्पध्रेत डेकॅथलॉनमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. सुपरह्य़ुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ९०४५ गुणांची कमाई करून हा विक्रम केला. अॅश्टन एकटा इतका प्रतिभावान होऊ शकतो, तर भारतीय मागे का, हा प्रश्न सतावणारा आहे. ललिता बाबरचा राष्ट्रीय विक्रम.. तीन हजार मीटर स्टिपलचेसच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली खेळाडू.. बाबरला नववे स्थान.. विकास गौडा, टिंटू लुका, इंदरजीत सिंग, ४ बाय १०० मीटर रिले संघाचे अपयश.. जैशाचा राष्ट्रीय विक्रम आणि सुधा सिंगचे ऑलिम्पिक तिकीट.. या जागतिक अॅथलेटिक्स स्पध्रेतील भारतीयांसाठीच्या ठळक बातम्या. पण, यात कुठेही भारताला पदक अशी शुभवार्ता ऐकायला मिळाली नाही. भारतीय खेळाडूंचे त्यासाठीचे प्रयत्न खुजे पडले, हे जागतिक स्पध्रेतून पुन्हा अधोरेखित झाले. भारतात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास जागतिक स्तरावर ते आपले नाव लौकिकास आणतील हा विश्वास गेली कित्येक वर्ष आजी-माजी खेळाडू विविध व्यासपीठांवरून व्यक्त करत आले आहेत. असो त्यांचा हा विश्वास चुकीचा ठरला असे म्हणता येणार नाही, परंतु तो किती तकलादू ठरतोय, हे जागतिक स्पध्रेतून पुन्हा अधोरेखित झाले. एकीकडे जमैका, केनिया मागासलेल्या देशांतून विक्रमादित्य तयार होत असताना भारत मागे का पडतो हा प्रश्न खरा सतावणारा आहे. ही बाब केवळ भारतापुरती मर्यादित नसून चीन, जपान हे आशियातील अव्वल देशही या स्पध्रेत हरवलेले दिसले.
चीनच्या बीजिंग शहरात पार पडलेल्या या जागतिक अॅथलेटिक्स स्पध्रेत २०६ देशांनी सहभाग घेतला होता, त्यात भारत १७ जणांचा चमू घेऊन दाखल झाला. या १७ पैकी किमान ७ जण तरी पदक निश्चित करतील अशी आपली भाबडी आशा, स्पध्रेअखेरीस फोल ठरली. सात सोडा, तर एक पदक मिळवतानाही भारतीय खेळाडूंची दमछाक झाली. आपल्या खेळाडूंनी प्रयत्नच केले नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, त्यांच्यापेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंची तयारी ही सर्वोत्तम आणि उच्च दर्जाची होती. भविष्यात भारतीयांना सर्वोत्तम कामगिरी करायची असल्यास शालेय स्तरापासून खेळाडू घडविण्यासाठी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. नाहीतर २००३ नंतर आतापर्यंत भारताला जागतिक स्पध्रेत केवळ एकाच पदकावर समाधान मानावे लागले आहे. २००३च्या फ्रान्समध्ये झालेल्या या स्पध्रेत अंजू बॉबी जॉर्ज यांनी लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भारताची पाटी ही रिकामीच आहे. त्यासाठी केनिया आणि जमैकाचीही कामगिरी काही फार चांगली नव्हती, परंतु त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपला दबदबा निर्माण केला. जे भारताला जमणे सहज शक्य होते, ते या देशांनी करून दाखवले. आपण मात्र नेहमीसारखे झोपेचे सोंग घेणेच पसंत केले आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com