भारताच्या पुरुष व महिला या दोन्ही हॉकी संघांनी नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले. अलीकडे पुन्हा भारतीय संघ चांगली कामगिरी करू लागला आहे. ही भावी यशाची नांदीच आहे.
हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे असे आपण नेहमी म्हणत असलो तरी गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये संघटनात्मक स्तरावरील मतभेद व विकास करण्याबाबत असलेला निरुत्साह यामुळे या खेळात आपला नावलौकिक रसतळाला गेला होता. मध्यंतरी ऑलिम्पिकची पात्रता करण्यातही भारताला अपयश आले होते. हॉकी हा राष्ट्रीय खेळ असलेल्या भारत देशासाठी ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट होती. टक्केटोणपे खाल्ल्यानंतर माणूस जागा होतो असे म्हटले जाते. या धक्क्यातून सावरणे हे संघटकांसाठी आव्हानच होते. हॉकी इंडियाकडे या खेळाची सूत्रे आल्यानंतर त्यांनी या खेळासाठी सकारात्मक पावले उचलली. भांडणे करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत त्यांनी भारतीय संघ बांधणीसाठी खेळाचा प्रसार सर्वदूर करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. वारंवार प्रशिक्षक बदलत राहिला तर खेळाडू व प्रशिक्षक यांच्यातील सुसंवाद संपतो. हे लक्षात घेऊन त्यांना रोलँट ओल्टमन्स यांच्याकडे उच्च कामगिरी संचालकपदाची जबाबदारी सोपविली. जरी प्रशिक्षकापदामध्ये बदल झाला तरी त्यांची नियुक्ती कायम ठेवीत त्यांनी एक प्रकारे हॉकीत स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हॉकीत पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी भारताला खूप मोठी मजल गाठावी लागणार आहे.
आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतील पुरुष गटात भारताने अजिंक्यपद मिळविताना पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पध्र्यावर दोन वेळा मात केली. या स्पर्धेत भारताने अव्वल यश मिळविले असले तरी संघातील अनेक उणिवा स्पष्टपणे दिसून आल्या. आघाडी घेतल्यानंतर ती टिकविणे महत्त्वाचे असते. याबाबत भारतीय खेळाडूंना खूप प्रगती करावी लागणार आहे. सामना गळ्यापर्यंत आणण्याबाबत आपले खेळाडू ख्यातनाम आहेत. चेंडूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ड्रिबलिंगच्या कौशल्यामध्ये आपले खेळाडू कमी पडतात. शेवटची पाच-सहा मिनिटे बाकी असताना व केवळ एका गोलची आघाडी असताना खेळाची सूत्रे आपल्याकडे कशी राहतील यावर सराव शिबिरात भर दिला पाहिजे. त्याकरिता खेळाडूंमधील सांघिक समन्वयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्याबाबत केवळ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून न राहता किमान चार खेळाडूंनी हे कौशल्य आत्मसात करण्यावर प्राधान्य दिले पाहिजे. रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघात पी.आर. श्रीजेश हा केवळ एकच गोलरक्षक होता. त्यातच त्याच्याकडे कर्णधारपदाचीही जबाबदारी होती. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत किमान दोन गोलरक्षकांचा समावेश करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत श्रीजेश हा जखमी झाल्यानंतर आकाश चिकटे हा पर्यायी गोलरक्षक होता म्हणूनच भारताला विजेतेपद मिळविता आले. अगदी दुसरा गोलरक्षक न्यायचा नसेल तर किमान तसे कौशल्य असलेला खेळाडू संघात असणे आवश्यक आहे.
महिला गटात तब्बल ३६ वर्षांनी भारतीय संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. या कामगिरीवर मोहोर म्हणून की काय भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत विजेतेपद मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळविणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. साखळी गटात चीनचा अपवाद वगळता अन्य सर्व संघांवर त्यांनी मात केली होती. साखळी गटात चीनकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाची परतफेड त्यांनी अंतिम सामन्यात केली. या सामन्यात त्यांनी चीन संघाला हरविले व प्रथमच या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. महिला हॉकी संघासाठी ही आश्वासक पायरी आहे. हॉकीत भारतीय स्त्रीशक्तीचा नारा त्यांनी सिद्ध केला. सहकारी खेळाडू व प्रशिक्षक यांच्यावर विश्वास दाखविला, सांघिक कौशल्य दाखविले व शेवटपर्यंत जिद्द दाखविली तर अव्वल यशाला गवसणी घालता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
खेळाडूंनी आश्वासक वाटचाल सुरू केली आहे, आता संघटकांनी या खेळास पुन्हा सर्वोच्च स्थान कसे मिळवून देता येईल यावर भर दिला पाहिजे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंदर बात्रा हे लवकरच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी आरूढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपल्या देशास अनेक जागतिक स्पर्धाचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. खेळाच्या विकासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूपच चांगल्या योजना अमलात आणल्या गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय महासंघाची सूत्रे त्यांच्याकडे आली तर आपोआपच जगातील हॉकीची सूत्रेही भारताकडे राहणार आहेत. हे ओळखूनच हॉकी इंडियाचे प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अन्य संघटनांनी मतभेद दूर ठेवीत एकत्र येण्याची गरज आहे. एक खेळ एक संघटना हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवीत त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. भारतीय हॉकी महासंघाने गेल्या सहा-सात वर्षांमध्ये खेळाच्या विकासाकरिता फारसे प्रयत्न केलेले नाहीत. संघटना ही केवळ स्वत:ची खुर्ची टिकविण्यासाठी नसते. खेळाडू आहेत म्हणून संघटनेस महत्त्व असते. हॉकीची लोकप्रियता वाढावी यासाठी हॉकी इंडियाने अलीकडेच फाइव्ह-अ-साइड स्पर्धा सुरू केली आहे. त्याचा फायदा खेळाडूंप्रमाणेच हा खेळ प्रेक्षकांभिमुख होण्यासाठी झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशा स्वरूपाची स्पर्धा सुरू करण्याचा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा उद्देश आहे. त्याचीच एक पायरी म्हणून भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी किमान दोन वेळा अशा स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पुण्यात नाइन-अ-साइड स्पर्धेचेही आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा जरी स्थानिक स्वरूपाची असली तरी त्याप्रमाणे राज्य व राष्ट्रीय स्तरावरही आयोजित करण्याचा हॉकी इंडियाचा प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक स्पर्धा आयोजित केल्या गेल्या तर आपोआपच खेळाची लोकप्रियता वाढेल व खेळाडूही या खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित होतील. मध्यंतरी पुण्यात एका शाळेनेच शालेय स्तरावर विविध गटांच्या अखिल भारतीय स्तरावर निमंत्रित स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धाना शाळांप्रमाणेच प्रायोजकांचाही चांगला प्रतिसाद लाभला होता. तसे प्रयत्न अन्य ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आदिवासी भागात या खेळासाठी भरपूर प्रमाणात नैपुण्य उपलब्ध आहे. त्यांच्याकडील हे नैपुण्य ओळखून या खेळाडूंचा विकास करीत त्यांना मुख्य प्रवाहात कसे आणले जाईल यासाठी संघटकांनी प्रयत्न केला पाहिजे. पुण्या-मुंबईतील काही हौशी संघटक वैयक्तिक आर्थिक जबाबदारीवर या खेळाडूंच्या विकासाकरिता सतत प्रयत्न करीत असतात. तसे प्रयत्न संघटना स्तरावर होण्याची आवश्यकता आहे. हॉकीच्या विकासाकरिता पुष्कळ गोष्टी करता येतील. मात्र संघटना स्तरावर इच्छाशक्ती व नि:स्वार्थी वृत्ती दाखवीत प्रयत्नांची आवश्यकता आहे. तरच हॉकीत पुन्हा जागतिक स्तरावर भारत हुकमत गाजवू शकेल.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com