ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या आव्हानात्मक लढतीत उत्तम खेळी करून विराट कोहलीने स्वत:ची नवी ओळख प्रस्थापित केली आहे. सातत्य, आत्मविश्वास, एकाग्रता अशा गुणांमुळे विराट सर्वोत्तम ठरत आहे.
आयुष्यातील सर्वात कठीण कालखंडातून जातानाच माणसाची खरी ओळख पटते. तर सर्वात आव्हानात्मक प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळतानाच खेळाडूचा दर्जा खऱ्या अर्थाने सिद्ध होतो. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास विराट कोहलीचे देता येईल. सध्या चालू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सर्वात आव्हानात्मक लढतीनंतर विराटकडे पाहण्याचा क्रिकेटजगताचा दृष्टिकोनच बदलला आहे. जणू सचिनचा वारसदार गवसल्याचाच आनंद भारतीय क्रिकेटला होत आहे. तशी काही वर्षांपूर्वीच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ही ग्वाही दिली होती. सचिनचे जागतिक क्रिकेटमधील विश्वविक्रम एखादा भारतीयच मोडेल आणि तो विराटच असेल, अशा प्रकारे भविष्यवाणी गावसकर यांनी केली होती. ती आता खरी ठरू लागली आहे.सचिनच्या निवृत्तीनंतर दुसऱ्या सचिनचा शोध क्रिकेटरसिक घेत होते. हा शोध संपला असल्याची खात्री सचिनच्या निवृत्तीनंतर जवळपास सव्वा दोन वर्षांनी मिळते आहे. याला आणखीही काही कारणे आहेत. महेंद्रसिंग धोनीने गेल्याच वर्षी कसोटी क्रिकेटला अलविदा केला आणि तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. धोनीच्या या उत्तरार्धाच्या काळात धोनी धावांचे इमले रचणारा फलंदाज म्हणून कधीच प्रकाशात आला नाही. युवराज सिंगचा फॉर्म आता त्याला साथ देत नाही. पूर्वीचा आणि आताचा युवराज यातील जमीन-अस्मानाचे अंतर दिसून येत आहे. सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा ही मंडळी अधूनमधून खेळी साकारतात, पण विराटसारखे सातत्य आणि कोणत्याही क्रिकेट प्रकारातील विजयाचा आत्मविश्वास ओघानेच या मंडळींमध्ये जाणवतो. त्यामुळे विराटला तशी विशेष स्पर्धाही नाही. जाहिरातीत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय क्रिकेटपटू हा मानसुद्धा आता विराटकडे जातो. या शर्यतीत त्याने धोनीलाही सहज मागे टाकले आहे.
विराटचे सध्याचे दिवस हे त्याच्या गेल्या दहा वर्षांतील मेहनतीचे फळ आहे. एका रात्रीत हे मुळीच घडलेले नाही. ही कथा आहे २००६-०७ची. एका १८ वर्षांच्या तरुणाची. पहाटे ४ वाजता त्याचे वडील वारले. दु:खाचा पहाड त्याच्यावर कोसळला. पण त्याच्या डोक्यात मैदानात कसे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडायचे, यात गुंतले होते. एक प्रकारची दुही मनात माजली होती. त्याने त्याच केविलवाण्या मन:स्थितीत आपले प्रशिक्षक राज कुमार शर्मा यांना फोन केला. ते त्यावेळी ऑस्ट्रेलियात होते. त्याने रडतरडतच शर्मा यांना सांगितले.. ‘‘माझे वडील आता या जगात राहिले नाहीत..! .. पण मी क्रिझवर ४० धावांवर खेळतोय.. मी खेळायला जाऊ की घरी..?’’ या युवकाचा प्रश्न तसा साधा होता.. पण भावनिक अडचणीचा. काय सांगावे त्याला. अखेर शर्मा धीराने त्याला म्हणाले, ‘‘तुला जे योग्य वाटेल ते कर!’’
पण समोरील युवकाचा निर्धार पक्का होता.. त्याने स्वत:च सांगितले..‘मुझे खेलना चाहिये!’ त्याची खेळावरील अतीव निष्ठा पाहून प्रशिक्षक भारावले आणि त्यांनी त्याला प्रोत्साहन दिले.. ‘हीच वेळ आहे, तुझे सामथ्र्य दाखविण्याची. जा आणि खेळ!’ फिरोझशाह कोटला मैदानावर दिल्ली विरुद्ध कर्नाटक हा रणजी सामना ऐन रंगात आला होता. दिल्ली फॉलोऑनच्या गडद छायेत होता, पण विराटची इच्छा त्याचा मार्ग बनली. तो मैदानावर उतरला आणि त्याने ९० धावांची उपयुक्त खेळी केली. याशिवाय पुनीत बिश्तसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. बिश्तने शतक झळकावले. विराट आणि पुनीतच्या पराक्रमामुळे कर्नाटकच्या हातातोंडाशी आलेला घास निसटला होता.. ही लढत दिल्लीने अनिर्णित राखली.
मग त्वरेने विराट घरी परतला. आजारपणामुळे अवघ्या ५४व्या वर्षी निरोप घेणाऱ्या आपल्या वडिलांवर त्याने भाऊ विकाससोबत अंत्यसंस्कार केले, पण मनाने तो अद्याप मैदानावर होता. चुकीच्या पद्धतीने यष्टीपाठी झेलबाद दिल्याचे त्याचे मन मान्यच करायला तयार नव्हते. वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपल्यावर त्यांनी पुन्हा प्रशिक्षक शर्मा यांना दूरध्वनी केला आणि धाय मोकलून रडू लागला. आता वडील गेल्याचे दु:ख विराटला तीव्रतेने जाणवत असावे. पण त्यांचा अंदाज साफ चुकला. आपल्याला कसे चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले याची कर्मकहाणी तो सांगू लागला.
वडील जाणे हा आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग. मनाने खंबीर माणसेही यावेळी खचून जातात, पण हा खचला नाही. तर आपली क्रिकेटवरील निस्सीम भक्ती आणि बांधीलकी जपत आपल्याकडे करुणा भाकतोय, याचे शर्मा यांना कौतुक वाटले. त्यांनी मनोमनी विराटला ‘हॅटस् ऑफ’ केले.
विराटचे वडील प्रेम कोहली यांना आपल्या मुलांनी क्रिकेटपटू व्हावे असेच स्वप्न पाहिले होते. मे १९९७मध्ये प्रशिक्षक राज कुमार शर्मा यांनी दिल्लीच्या पश्चिम विहार भागात नवी अकादमी काढली. आपला मुलगा ५ वर्षीय विकास आणि ८ वर्षीय विराट यांना या अकादमीत टाकले. काही महिन्यांनी जेव्हा शर्मा वडिलांना भेटले तेव्हा ते म्हणाले, तुमचा छोटा मुलगा विकास छान खेळतो. पण काही महिन्यांतच विकासने अकादमीला अलविदा केला. पण विराटचा खेळ मात्र नजर लागण्यागत बहरत गेला.. तो आजमितीपर्यंत. त्याने मजल दरमजल करीत रणजी.. नंतर भारतीय युवा संघात स्थान मिळवले. विराटच्याच नेतृत्वाखाली भारताने २००८मध्ये युवा विश्वचषकाला गवसणी घातली.. त्यानंतर अब्जावधी क्रिकेटरसिकांच्या आशा-आकांक्षांचे ओझे असलेल्या भारतीय संघात विराटने आपले स्थान निर्माण केले.
आता कसोटी क्रिकेटमध्ये धोनीकडून नेतृत्व कोहलीकडे चालत आले आहे. तो समर्थपणे सांभाळतही आहे, याची साक्ष भारताच्या कामगिरीतून मिळत आहे. आता एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारातही कोहलीकडे भारताचा भावी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या खेळीनंतर वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, ‘‘गेल्या २० वर्षांत कोहलीप्रमाणे जगातील सर्वोत्तम ‘फिनिशर’ घडला नाही.’’ कारण धावांचा पाठलाग करताना जी जिद्द आणि आत्मविश्वास लागतो, तो कोहलीकडे निसर्गत: आहे. दडपणाखाली कोहली तेजाने तळपतो. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याची ५३.५५ अशी धावसरासरी आहे. २०१४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य आणि अंतिम सामन्यातही त्याची कामगिरी उत्तम दर्जाची होती. वर्षांच्या सुरुवातीला भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ३-० अशा फरकाने ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. या यशातही कोहलीची भूमिका महत्त्वाची होती. अगदी महिन्याभरापूर्वी आशिया चषक क्रिकेट स्पध्रेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे तीन फलंदाज लवकर तंबूत परतल्यावर कोहलीने झुंजार खेळीसह भारताला तारले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या खात्यावर ५१.५च्या सरासरीने सात हजारांहून अधिक धावा आणि २५ शतके जमा आहेत. त्याचा हा उंचावणारा आलेख पाहता एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनचे विक्रम मोडणे, त्याला अजिबात कठीण जाणार नाही. २०११च्या विश्वचषकाची वानखेडे स्टेडियमवरील अंतिम फेरीसुद्धा उदाहरणादाखल घेता येईल. सचिन, सेहवागसारखे धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यावर कोहली आणि गौतम गंभीर यांनी महत्त्वाची भागीदारी रचली होती. २०१३च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही कोहलीची खेळीच महत्त्वपूर्ण ठरली होती.
विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची भारताची कामगिरी पाहिल्यास अकराही सामने आपण जिंकले आहेत. तर १९९२ ते २०११ या १९ वर्षांच्या कालखंडात सचिनला तीनदा सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत, परंतु २०१२ ते २०१६ या फक्त पाच वर्षांत कोहलीकडे तीन सामनावीर पुरस्कार आहेत.
विक्रम आणि विजय या दोन्ही पातळ्यांवर कोहली सिद्ध होत आहे. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकाराला तो तितक्याच तडफेने न्याय देत आहे. मायदेशात असो वा परदेशात त्याचा खेळ हा बहरतच जातो आहे. वयाचेच सांगायचे तर त्याने अजून २८ वर्षांचा आकडाही गाठलेला नाही. त्यामुळेच त्याच्याकडे आशेने पाहिले जात आहे. सचिन युगाच्या अस्तानंतर विराट युगाला प्रारंभ झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
response.lokprabha@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2016 रोजी प्रकाशित
विराट युगाचा प्रारंभ
आव्हानात्मक लढतीत उत्तम खेळी करून विराट कोहलीने स्वत:ची नवी ओळख प्रस्थापित केली आहे.
Written by प्रशांत केणी
Updated:

First published on: 28-03-2016 at 01:16 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and his consistent performance