बुद्धिबळाच्या पटावर गेली अनेक वष्रे अधिराज्य गाजवणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला गेल्याच आठवडय़ात जिब्राल्टर आंतरराष्ट्रीय स्पध्रेत १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय मास्टरकडून पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षभरात आनंदच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास हाच का पाच वेळा विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात घालणारा आनंद, असा प्रश्न उभा राहत आहे.
चौसष्ट घरांच्या साम्राज्यात सर्वोच्च पदाचा मान पटकावण्यासाठी ३२ प्याद्यांमध्ये रंगणारे घमासान युद्ध. १६ सैनिक, २ वझीर, ४ हत्ती, ४ घोडे, ४ उंट आणि २ राजे या बलवान प्याद्यांचे अधिराज्य. बुद्धिबळाच्या या खेळात मात्र कोण कोणावर हावी होईल, याची शाश्वती अखेरच्या डावापर्यंत देणे अवघडच. बौद्धिक विद्वत्तेच्या बळावर पटावर हिंसाचाराचे डावपेच आखून विरोधकांच्या एक एक घरावर ताबा मिळवण्यासाठी होणारे दावे-प्रतिदावे. वर्चस्वाच्या या लढाईत सरतेशेवटी सरस ठरणाऱ्याला डोक्यावर उचलून घेतले जाते. पण या युद्धात अखेरच्या श्वासापर्यंत आणि कोणतीही अपेक्षा न करणारा सैनिक उपेक्षितच राहतो. रणभूमीच्या नियमानुसारच बुद्धिबळाच्या डावांची आखणी असते. शत्रूचा पहिला वार आपल्या छातीवर झेलण्यासाठी, राजनिष्ठा दाखवण्यासाठी सैनिक हे आघाडीवर असतात. हत्ती, घोडे, उंट आणि वझीर यांना विशेष ताकदीचे हक्क दिले असले तरी त्यांना सैनिकांची ढाल लागतेच. हा सैनिक आपली निष्ठा जपण्यासाठी प्राणाची पर्वा न करता शत्रूला निडरपणे सामोरे जातो. सुरुवातीला दोन घरे आणि नंतर एक एक घर पुढे सरकून तो शत्रूच्या गोटात घुसतो. गरज पडल्यास आडवे एक घर जाण्याचे अस्त्र त्याला देण्यात आले आहे. या उलट हत्ती सरळ किंवा आडवा कितीही घर, उंट तिरपा, घोडा अडीच घर आणि यांच्यातील सर्वोत्तम वझीर कसाही शत्रूवर प्रहार करू शकतो. या बाहुबली योद्धय़ांना प्रत्येक वेळी सैनिकाची गरजही पडते. प्रत्यक्ष रणांगणात आणि सारिपाटाच्या या खेळात सैनिकाचा हा कटपुतळीसारखाच उपयोग होतो. पण एक एक घर चालणारा हाच सैनिक शत्रूच्या गोटात शिरतो तेव्हा त्याला मिळणारी ताकद ही इतर प्याद्यांना लाजवणारी असते. हे सर्व सांगण्याचे कारण असे की, बुद्धिबळाच्या पटावर गेली अनेक वष्रे राज्य गाजवणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला गेल्याच आठवडय़ात जिब्राल्टर आंतरराष्ट्रीय स्पध्रेत १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय मास्टरकडून पराभव पत्करावा लागला. असे नाही की यापूर्वी एखाद्या विश्वविजेत्याला मिसुरडेही न फुटलेल्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला नाही, परंतु आनंदचा हा पराभव त्याचे वाढते वय अधोरेखित करणारा होता. गेल्या वर्षभरात आनंदच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास हाच का पाच वेळा विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात घालणारा आनंद असा प्रश्न डोक्यात येत आहे.
२०१४ च्या झुरीच बुद्धिबळ चॅलेंज स्पध्रेत क्लासिकल, रॅपिड आणि ब्लित्झ अशा तीन प्रकारांत आनंदची कसोटी लागली. सहा खेळाडूंच्या या स्पध्रेत आनंदला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. लेव्होन अॅरोनियन आणि हिकारू नाकामुरा यांच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला, तर फॅबियानो कॅरुयाना आणि मॅग्नस कार्लसन यांनी त्याला बरोबरीत रोखले. बोरीस गेल्फान्डविरुद्धचा एकमेव विजय आनंदच्या नावावर होता. त्यानंतर कॅन्डीडेट्स स्पध्रेतही अपयशाची मालिका कायम राहिली. २०१५मध्ये आनंदने जोमाने खेळ करण्याचा निर्धार केला आणि नॉर्वे, सिंक्युफिल्ड आणि लंडन बुद्धिबळ या ‘ग्रॅण्ड चेस टुअर’ स्पर्धासह बर्लिन, ग्रेंके, झुरिच, बिलबाओ आणि शामकिर या स्पर्धामध्येही सहभाग घेतला. ग्रेंके स्पर्धेतून आनंदने २०१५च्या सत्राची सुरुवात केली. आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पध्रेत आनंदला २.५ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या कामगिरीतून खचून न जाता आनंदने झुरिच स्पध्रेत दमदार खेळ केला. क्लासिकल प्रकारात लेव्होन अरॉनियन आणि हिकारू नाकामुराला नमवून त्याने बाजी मारली. ब्लित्झ प्रकारातही त्याचेच वर्चस्व राहिले. आनंद आणि नाकामुरा यांच्यात बरोबरी झाल्यामुळे जेतेपदाचा सामना खेळविण्यात आला आणि त्यात नाकामुराने आश्चर्यकारकरीत्या आनंदला नमवले. शामकिर स्पध्रेत अपराजित राहात त्याने दुसरे स्थान पटकावले. नॉर्वे स्पध्रेतही तोच निकाल. या दोन्ही स्पर्धामध्ये आनंदचे नाणे खणखणले. त्याने एकही पराभव न स्वीकारता ब्लित्झ आणि क्लासिकल प्रकारात वर्चस्व राखले. तसेच त्याने कारकीर्दीतील सर्वोच्च गुणसंख्याही गाठली. या स्पध्रेत त्याने विश्वविजेता मॅग्नस कार्लसन, मेक्सिमे व्हॅचिएर-लॅग्रेव्ह आणि जॉन लुडीव्हीग हॅमर यांच्यावर विजय मिळवले. पण त्याच्या खेळातील सातत्य पुढील स्पर्धामध्ये हरवले. सिंक्युफिल्ड स्पध्रेत नाकामुरा व अॅलेक्झांडर ग्रिस्चुक यांच्याकडून पहिल्या दोन फेरीतच आनंदला पराभव पत्करावा लागला आणि उर्वरित ७ फेऱ्यांमध्ये त्याला बरोबरीत समाधानी राहावे लागले. या दरम्यान मुंबईत दाखल झालेल्या आनंदने पुढील स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करण्याची ग्वाही दिली होती, तसेच काही नव्या डावपेचांवर काम करत असल्याचेही सांगितले होते. त्यामुळे ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका त्याच्या चाहत्यांनी घेतली होती. खेळातील तेच तेच डावपेच हे आपल्यासाठी घातक ठरत असल्याची जाण आनंदलाही झाली असावी. अभ्यासू, शांत, सतत नवीन काही शिकण्याची इच्छा असलेला प्रयोगशील खेळाडू म्हणून आजही आनंद ओळखला जातो. त्याच्यासोबत काम करणारी टीमही त्याला बरीच मदत करते आणि त्याच्या यशात त्यांचाही तितकाच वाटा आहे. पण वयोमानानुसार म्हणा की इतर खेळाडूंच्या कामगिरीत झपाटय़ाने होणारी प्रगती, आनंदसमोर दिवसेंदिवस आव्हान उभी करत होती. पण त्यातही आनंदची प्रयोगशीलता त्याला यशस्वी ठरवत होती. बर्लिन येथे झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लित्झ स्पध्रेत त्याची अनुभूती आली. त्याने रॅपिड प्रकारात १५ पैकी ९.५ तर ब्लित्झ प्रकारात २१ पैकी १३ गुणांची कमाई केली. मात्र, बिलबाओ मास्टर्समध्ये त्याला पहिल्या पाचातही स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे त्याचे सातत्य कमी होत होते. लंडन बुद्धिबळ स्पध्रेत त्याने व्हॅसेलिन टोपालोव्हला पराजित करून एका गुणाची कमाई केली, परंतु नाकामुरा, ग्रिस्चुक आणि लॅग्रेव्हे यांच्याकडून झालेला पराभव हा स्वीकारार्ह नव्हता. त्याला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. २०१६मध्ये त्याच्या कामगिरीचा आलेख चढ-उतारांचा राहिला आहे. या पराभवांमुळे आनंदचे महत्त्व किंचितही कमी होणार नाही.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघाचा भार आपल्या खांद्यावर वाहात होता, तशीच कामगिरी आनंदही सातत्याने करत आलाय. अगदी सर्वात तरुण ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकावल्यापासून ते आत्तापर्यंत तो तिरंगा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये डौलाने फडकवतोय. १९८८ मध्ये त्याने ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकावला आणि भारताचा तो पहिलाच ग्रॅण्डमास्टर होता. एकाच वेळी शंभर जणांशी खेळून त्यांना आपल्या मनाप्रमाणे खेळण्यास भाग पाडणारा आनंद सध्या हरवलेला दिसतोय किंवा बुद्धिबळ पटावरील शत्रू अधिक ताकदवान झाले आहेत. आनंदच्या डावपेचांचा चांगलाच अभ्यास करून ते त्याला सामोरे जात आहेत. एक एक घर चालणारे हे सैनिक विश्वविजेत्या आनंदवर हावी होत आहेत. त्यामुळे पटावरून ‘चेकमेट’ होण्यापूर्वी पुन्हा तो जुना आनंद पाहण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आणि तमाम भारतीयांना लागली आहे.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com