रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या सुशीलकुमारच्या वाटा आता बंद झाल्या आहेत. आता तो कुस्ती महामंडळावर कितीही आगपाखड करत असला तरी या परिस्थितीला इतर कुणीही नाही, तर तो स्वत: जबाबदार आहे.

ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी तो खूप परिश्रम घेत असतो. रिओ येथे यंदा ऑगस्टमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगिरांची निवड करताना जो काही तमाशा झाला, तो पाहता मैदानाबाहेरच आखाडा रंगला असेच म्हणावे लागेल.

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीसाठी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील पदक विजेते खेळाडू त्या त्या गटात आपल्या देशासाठी प्रवेशिका निश्चित करीत असतात. त्या प्रवेशिकेद्वारे कोणत्या खेळाडूला पाठवायचे याचा सर्वस्वी अधिकार त्या देशाच्या राष्ट्रीय कुस्ती महासंघास देण्यात आलेला असतो. कुस्तीगिरांची पूर्वीची कामगिरी, सध्याची कामगिरी, शारीरिक तंदुरुस्ती आदी विविध निकषांच्या आधारे कुस्ती महासंघ आपल्या देशाच्या संघांमधील खेळाडूंची निवड करतो.

फ्रीस्टाईलमधील ७४ किलो गटाचा अपवाद वगळता अन्य कोणत्याच गटातील खेळाडूंची निवड करताना वाद निर्माण झाला नाही. ७४ किलो गटाबाबत नरसिंग यादव व सुशीलकुमार यांच्यापैकी कोणाला पाठवायचे याबाबत वाद निर्माण झाले. त्याबाबत सुशीलकुमारने न्यायालयात धाव घेतल्यामुळे या प्रकरणास आणखीनच वेगळी कलाटणी मिळाली. त्याने पंतप्रधान, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडेही दाद मागितली. मात्र खेळाडूची निवड करण्याचा अधिकार फक्त कुस्ती महासंघास असल्यामुळे शासकीय स्तरावर कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही असे सुशीलकुमारला स्पष्ट सांगण्यात आले. न्यायालयाने सुशीलच्या अर्जाबाबत योग्य तो निर्णय घेण्याचा आदेश कुस्ती महासंघास दिला. मात्र सुशील याने आपल्या अर्जात ‘न्यायालयाने महासंघास चाचणी घेण्याचा आदेश द्यावा’ असे म्हटले होते. मात्र न्यायालयानेदेखील चाचणी घेण्याचा अधिकार हा महासंघास असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याच्या सुशीलच्या आशा धूसर झाल्या.

सुशील व नरसिंग हे दोघेही श्रेष्ठ मल्ल आहेत. सुशील याने २००८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले. लागोपाठ दोन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळविणारा पहिला खेळाडू होण्याची कामगिरी करीत त्याने इतिहास घडविला. ही दोन्ही पदके त्याने ६६ किलो वजनी गटात मिळविली होती. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या पदकाचा अपवाद वगळता सुशील याने एकाही महत्त्वपूर्ण स्पर्धेत भाग घेतलेला नाही. अनेक स्पर्धामध्ये त्याने शारीरिक तंदुरुस्तीच्या कारणास्तव माघार घेतली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्लांचा दर्जा आशियाई क्रीडा स्पर्धेपेक्षाही कनिष्ठ दर्जाचा असतो. सुशील हा या सुवर्णपदकाचा आधार घेत ऑलिम्पिकसाठी आपला हक्क सांगत आहे. तसेच पूर्वी मिळविलेल्या दोन पदकांच्या कामगिरीचाही तो आधार घेत आहे. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये सुशीलला सतत तंदुरुस्तीच्या समस्यांनी ग्रासले आहे. त्याने भारतात आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रो कुस्ती स्पर्धेतही भाग घेतला नव्हता. ऑलिम्पिकइतकी प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेस स्थान आहे. मात्र या स्पर्धेतही सुशीलने भाग घेतला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी नरसिंग याला ७४ किलो गटात भाग घेण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत नरसिंग याने कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेत पदक मिळविणारा तो एकमेव भारतीय मल्ल होता. भारताच्या अन्य मल्लांनी तेथे सपशेल निराशा केली होती. नरसिंग याने कांस्यपदक मिळवत भारतास ऑलिम्पिकसाठी प्रवेशिका निश्चित केली.

आपल्यामुळेच नरसिंगला जागतिक स्पर्धेची संधी मिळाली अन्यथा त्याला हे पदक मिळाले नसते असा कांगावा सुशीलकडून केला जात आहे. मात्र नरसिंगने सतत ७४ किलो गटातच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. महाराष्ट्र केसरीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही त्याने वर्चस्व गाजविले आहे. या स्पर्धेत त्याने आपल्यापेक्षा अनेक बलाढय़ मल्लांना चारीमुंडय़ा चीत केले आहे. तो अतिशय चपळ व हुशार मल्ल आहे. त्याने अनेक कुस्त्यांमध्ये अतिशय बुद्धिमत्ता दाखवत बलाढय़ मल्लांना अस्मान दाखविले आहे. त्याची ही कामगिरी लक्षात घेऊन व सुशीलच्या तंदुरुस्तीबाबतच्या समस्या लक्षात घेऊनच कुस्ती महासंघाने ७४ किलो गटाच्या प्रवेशिकेसाठी नरसिंग याला प्राधान्य देण्याचे ठरविले असावे.

सुशीलने यापूर्वीच खिलाडूवृत्ती दाखवायला पाहिजे होती, म्हणजे मैदानाबाहेरची खडाखडी टळली असती. मेरी कोम या सुपरमॉम बॉक्सरने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी आपला वजनी गट बदलला. त्या गटात खडतर आव्हान असतानाही तिने जिद्दीने मेहनत केली. आपल्या अपत्यांपासून हजारो मैल दूर राहून तिने अखंड परिश्रम केले व लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. सुशीलने मेरी कोम हिचा आदर्श घ्यायला पाहिजे होता. आपल्या वजनी गटात तुल्यबळ व ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे हे लक्षात घेऊन त्याने वेळीच वजनी गट बदलणे आवश्यक होते. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर ऑलिम्पिकसाठी जवळ जवळ दोन वर्षांचा कालावधी होता. या कालावधीत बदलत्या वजनी गटाचा सराव करणे, त्या दृष्टीने वजन कमी किंवा वाढविणे त्याला सहज शक्य होते. मात्र स्वार्थी वृत्तीनेच तो वागला आहे.

आपल्या कुस्ती क्षेत्रात अनेक मल्ल व त्यांचे प्रशिक्षक अप्पलपोटी वृत्तीने वागत असतात. योगेश्वर दत्त या मल्लानेही अनेक वेळा तंदुरुस्तीबाबत देशाची फसवणूक केली आहे. जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवश्यक असणारी तंदुरुस्ती त्याच्याकडे नव्हती. मात्र त्याने आपण तंदुरुस्त असल्याचा दावा करीत जागतिक स्पर्धेत भाग घेतला व त्याद्वारे अमेरिकेची सहल आपल्या पदरात पाडून घेतली. प्रत्यक्षात अमेरिकेत गेल्यानंतर त्याने तंदुरुस्तीच्या कारणास्तव स्पर्धेतून ऐनवेळी माघार घेतली. साहजिकच तेथे देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. खरं तर त्याच वेळी योगेश्वर याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करायला पाहिजे होती. स्पर्धेसाठी त्याच्यावर केलेला खर्च त्याच्याकडून वसूल करण्याचीही आवश्यकता होती. मात्र विस्तवास जाणूनबुजून कोणी हात लावत नाही. त्यामुळे योगेश्वर याच्यावर कारवाई झाली नाही.

गीता व विनेश फोगट, महाराष्ट्राचा राहुल आवारे यांनी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेबाबत बेशिस्तपणा दाखविला. फोगट भगिनींनी पात्रता स्पर्धेतील कांस्यपदकाच्या लढतीमधून ऐनवेळी माघार घेतली. राहुल यानेही स्पर्धेसाठी महासंघाने तिकिटे काढली असताना पात्रता स्पर्धेत भाग घेतला नाही. या सर्वावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय महासंघाने घेतला. मात्र त्यानंतर नुसती ताकीद देत त्यांना माफ करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. राष्ट्रीय शिबिराला दांडी मारणे, महासंघाने केलेल्या नियमावलींचे पालन न करणे आदी अनेक बेशिस्तीचे वर्तन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्लांकडून केले जात आहे. महासंघ आपल्यावर कोणतीही कारवाई करीत नाही हे या मल्लांना व त्यांच्या प्रशिक्षकांना माहीत असल्यामुळे सर्रासपणे बेशिस्त वर्तन करीत मल्ल प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र महासंघाचे पदाधिकारीच अनेक वेळा या खेळाडूंना पाठीशी घालताना दिसतात. त्यामुळेच कुस्ती क्षेत्राची प्रतिमा ढासळत आहे.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader