कुमुदिनीचे शास्त्रीय नाव आहे Nympoides व तिचे कूळ आहे Menyanthaceae. या पाण-वनस्पतीचा खरे तर लोटस आयन वॉटर लीलीशी कसलाही संबंध नाही. कुमुदिनीची छोटुकली फुले आपल्यास मोहून टकतील. कुमुदिनीच्या पुढील दोन जाती भारतात उपलब्ध आहेत. Nymphoides hydrophylla आणि Nymphoides indicum. दोनही जातींना आपण कुमुदिनी असेच म्हणतो. या दोन्हीमधील Nymphoides indicum जातीची फुले जास्त आकर्षक असतात; कारण हिच्या पाकळ्यांच्या कडांवर बारीक झालरीसारखे तंतू असतात. हिच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा मध्य भाग पिवळ्या रंगाने उठून दिसतो. Nymphoides hydrophylla या वनस्पतीची फुलेही पांढरी शुभ्र असतात; मात्र त्यांच्या पाकळ्यांवर ना झालर असते, ना त्यांचा मध्य भाग पिवळ्या रंगाने सुशोभित असतो.
वरीलपकी कुमुदिनीची कुठलीही जात आपण छोटय़ा टबमध्ये करू शकतो. साधारणपणे ३० सेंमी व्यासाचा आयन १५ सेंमी खोल टब लागवडीसाठी पुरेसा असतो. टबच्या तळावर साधारण १० सेंमी जाड बागकामच्या मातीचा थर द्यावा. त्यानंतर टबमध्ये पाणी भरून घ्यावे. टबमधील पाण्यात कुमुदिनीचे रोप तरंगत ठेवावे. तरंगत्या रोपाची मुळे टबच्या तळातील मातीत आपोआप शिरतात. मातीमुळे पाणी जरी आधी गढूळ दिसले तरी साधारणपणे २-३ दिवसांत माती खाली बसून पाणी परत स्वच्छ दिसू लागते. टब जिथे जास्तीत जास्त ऊन मिळेल असल्या जागी ठेवावा. एका रोपापासून पुढे अनेक रोपे तयार होऊन टब संपूर्णपणे नव्या रोपांनी भरून जातो. एक मात्र जरूर लक्षात ठेवावे; टबमध्ये रोपांची फारच गर्द वाढ झाल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊन, फुले कमी प्रमाणात उगवू लागतात. त्यामुळे रोपांची खूप दाटी होण्याआधीच, जास्तीच्या रोपांना टबमधून काढून घ्यावे. त्या रोपांची लागवड दुसऱ्या टबमध्ये करता येईल किंवा ती इतर बागकामप्रेमींना भेट म्हणून देता येतील.
कुमुदिनीची आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे, त्यांची अभिवृद्धी फक्त एका पानापासूनही करता येते. एखादे पान मूळ झाडापासून कापून घ्यावे. त्याच्या देठाची लांबी साधारण ४ ते ५ सेंमी असावी. हे पान नुसतेच पाण्यावर तरंगत ठेवले तरीही प्रथम त्यास मुळे फुटुन, कालांतराने त्यापासून नवे रोप उगवते. कुमुदिनीत बहुतेक रोग व किडींना प्रतिकार करण्याची क्षमता असते. परंतु तिचा मोठा शत्रू म्हणजे पाण-गोगलगाई. या गोगलगाई दिसताच त्या वेचून मारून टाकाव्यात. पाण्यात डासांची वाढ रोखण्यासाठी टबमध्ये गप्पी मासे सोडावेत.
नंदन कलबाग – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा