श्रद्धांजली
ज्येष्ठ पाश्र्वगायक मन्ना डे यांचं वयाच्या ९४व्या वर्षी बंगळुरू येथे नुकतंच निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असणाऱ्या या गायकाला कारकीर्दीच्या पूर्वार्धात मोहम्मद रफी यांच्याशी तर उत्तरार्धात किशोरकुमारशी स्पर्धा करावी लागली. रफी आणि किशोरप्रमाणे ते कधीही टॉपचे गायक होऊ शकले नाहीत, तरीही मिळालेल्या संधीचं सोनं करत, समाधानी वृत्ती बाळगत त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
प्रसंग क्रमांक १
अध्र्या चड्डीतले ऋषी कपूर आणि नितीन मुकेश ‘आरके’चा कोणता तरी चित्रपट बघतायत. पडद्यावर गाणं सुरू होतं.. नितीन म्हणतो, ‘बघ, माझे बाबा किती छान गातायत.’ त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला ऋषी म्हणतो, ‘छट रे, हा तर माझ्या बाबांचा आवाज आहे.’ दोघांमध्ये चांगलीच जुंपते, कोणीच मागे हटायला तयार नाही. अखेर त्यावरून त्यांच्यात पज लागते.. (ती पज अर्थातच नितीन मुकेश जिंकतो.)
प्रसंग क्रमांक २
‘शंकर-जयकिशन रजनी’ रंगात आली आहे. अनेक कलाकार, गायक त्यात सहभागी झालेत. एवढय़ात रंगमंचावर ‘आरके’चं आगमन होतं. गायकीचं चांगलं अंग असलेला तो ‘मेरा नाम जोकर’मधलं ‘ए भाय जरा देखके चलो’ हे गाणं अगदी मूडमध्ये येऊन गातो, नाचतो, धमाल करतो..
या दोन प्रसंगांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, तरीही मन्नादांचं दुर्दैव अधोरेखित करण्यासाठी हे प्रसंग पुरेसे बोलके आहेत. राज कपूरचा गातानाचा आवाज म्हणजे मुकेश हे समीकरण पहिल्यापासूनच ठरलेलं, त्यामुळे याची जाणीव नसलेल्या लहानग्या ऋषीची गफलत होणं स्वाभाविक, त्याला तेव्हा कदाचित धक्काही बसला असेल, मात्र आपल्याला खरा धक्का बसतो तो या दुसऱ्या प्रसंगात. या संगीत रजनीमध्ये राज कपूरने गायलेल्या गाण्याची झलक यू टय़ूबवर उपलब्ध आहे, हे गाणं तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की राजचा आवाज मन्नादांच्या आवाजाशी बऱ्यापकी मिळताजुळता आहे, हा आवाज मुकेशसारखा तर बिलकूल नाही. एवढंच कशाला, हे मूळ गाणं ऐकून पाहा. या गाण्यात मधेमधे ‘आरके’च्या आवाजात संवाद आहेत, हे संवाद आणि मन्नादांचं गाणं एवढं एकजीव झालं आहे, की फरकही कळू नये. एवढं सारं होतं तर मन्नादा ‘आरके’चा आवाज का होऊ शकले नाहीत, असा प्रश्न पडतो..
िहदी चित्रपटसृष्टीतल्या पाश्र्वगायकांचा विषय निघाला की रफी-किशोर-मुकेश हीच नावं पुढे येतात. त्यानंतर उल्लेख होतो, तो मन्नादा, तलत आणि हेमंतकुमार यांच्या नावांचा. यापकी रफी आणि किशोर यांच्या क्षमतेबद्दल शंकाच नाही. मात्र मुकेशला या त्रयीमध्ये स्थान मिळालं ते केवळ राज कपूरमुळे. ‘आग’ आणि ‘बरसात’मधील गाण्यांमुळे राजचा आवाज म्हणजे मुकेशच, असा शिक्का बसला तो कायमचाच. नायकासाठी विशिष्ट गायकाचा आवाज देण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली. दिलीपकुमारसाठी रफी आणि देव आनंदसाठी किशोरकुमार असं समीकरणही तेव्हा जुळलं होतं. (अर्थात, ‘काला पानी, काला बाजार, तेरे घरके सामने, हम दोनो’ असे काही चित्रपट पूर्णपणे रफीं यांना मिळाले ही गोष्ट वेगळी) साहजिकच, दिलीप-देव-राजप्रमाणे रफी-किशोर-मुकेश अशी त्रयी निर्माण झाली. या तीन गायकांच्या आधी मुंबईत आलेले मन्नादा या वेळी काय करत होते, हे पाहिलं तर ते मागे का पडले हे लक्षात येतं.
गाण्याच्या क्षेत्रातच काहीतरी करून दाखवायचं यावर ठाम असणाऱ्या प्रबोधचंद्रने म्हणजे मन्नादांनी वडिलांनी दिलेला वकील होण्याचा सल्ला अव्हेरला. काका के. सी. डे व उस्ताद डबीर खाँ यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत असताना कोलकात्यातील स्कॉटिश चर्च कॉलेजचं गॅदिरग तीन वष्रे त्यांनी गाजवलं. या गॅदिरगमध्ये होणाऱ्या संगीत स्पध्रेत सलग तीन र्वष ते सर्वोत्कृष्ट गायक ठरले. संगीतकार असणाऱ्या के. सी. डे यांनी मुंबई गाठण्याचा निर्णय घेतला. त्यांना सहाय्यक म्हणून कोणीतरी जवळची व्यक्ती हवी होती आणि त्यांनी निवड केली ती आपल्या लाडक्या पुतण्याची. मन्नादा काकांसोबत मुंबईत आले, ते वर्ष होतं १९४२. म्हणजे मोहम्मद रफीच्या दोन र्वष आधी ते मुंबईत दाखल झाले. मुकेशला पहिलं गाणं मिळण्यासाठी तेव्हा तीन र्वष बाकी होती आणि किशोरकुमार तर तेव्हा होता, केवळ १३ वर्षांचा, खांडव्यामध्ये दंगामस्ती करणारा व्रात्य मुलगा! या परिस्थितीत आघाडीचा पाश्र्वगायक म्हणून खरं तर मन्नादांनी पुढे यायला हवं होतं, मात्र तिथेच माशी िशकली. केवळ के. सी. डे नाही तर खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास आणि सचिनदेव बर्मन यांच्याकडे सहाय्यक संगीतकार या नात्याने मन्नादांनी काम सुरू केलं. बरं, शास्त्रीय गायकीची आसही स्वस्थ बसू देत नव्हती. मुंबईत त्यांनी उस्ताद अमन अली खाँ आणि उस्ताद अब्दुल रहेमान खाँ यांच्याकडे धडे गिरवणं सुरूच होतं. या गडबडीत पाश्र्वगायक म्हणून त्यांना गांभीर्याने कोण घेणार.. त्यांना गाणी मिळालीही, मात्र ती होती पौराणिक चित्रपटांतील. ‘रामराज्य’सारख्या चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाल्याने पौराणिक चित्रपटांतील गाणी गाणारा गायक, असा शिक्का त्यांच्यावर बसला. त्या वेळी ते केवळ २४-२५ वर्षांचे होते. १९४२मध्ये मुंबईत आलेल्या मन्नादांना चांगलं गाणं मिळण्यासाठी ८ वष्रे थांबावं लागलं. १९५०मध्ये आलेल्या ‘मशाल’ चित्रपटातील ‘उपर गगन विशाल’ या सचिनदांच्या गाण्यामुळे त्यांचं सर्वत्र नाव झालं. मन्नादांच्या स्वरांची ताकद सगळ्यांच्या लक्षात आली. मात्र तोपर्यंत रफी आणि मुकेश स्थिरस्थावर झाले होते. किशोरकुमारही अभिनय व गायन अशा दोन आघाडय़ांवर चमकत होता. पहिल्याच टप्प्यात निर्माण झालेली ही तफावत शेवटपर्यंत कायम राहिली.
नायक आणि गायक या जोडय़ा ज्याप्रमाणे जुळल्या होत्या, तोच प्रकार संगीतकार व गायकांच्या बाबतीतही होता. नौशादनी तलतला दूर सारून रफींना जवळ केलं होतं. मुकेशच्या डोक्यावर ‘आरके’चा वरदहस्त होताच. या परिस्थितीत मन्नादांना आवर्जून आमंत्रित केलं ते शंकर-जयकिशन यांनी. हा प्रवासही सहज घडला नाही. ‘एस-जें’नी त्यांना सुरुवातीला बोलावलं ते ‘आवारा’मधील ‘घर आया मेरा परदेसी’ या गाण्यासाठी. या गाण्यात आपल्याला सुरुवातीच्या दोन ओळींखेरीज काहीच नाही, हे लक्षात आल्यानंतर मन्नादा कमालीचे निराश व नाराज झाले. मात्र शंकर यांनी त्यांना समजावलं, ‘दोन ओळी का होईना, मात्र तुम्ही त्या राज कपूरसाठी गात आहात, हे लक्षात घ्या, भविष्यात याचा निश्चितच लाभ होईल..’ त्यानंतर ‘आरके’ची निर्मिती असलेल्या ‘बूट पॅलिश’ या चित्रपटातील गाण्यांसाठी ‘एस-जें’नी पुन्हा एकदा मन्नादांना पाचारण केलं, मात्र मन्नादा पुन्हा निराश झाले, कारण ती गाणी चरित्र अभिनेता डेव्हिड यांच्यावर चित्रित होणार होती. आपल्याला रफीप्रमाणे नायकांची गाणी मिळत नाहीत, या भावनेने त्यांना घेरलं. अर्थात ‘बूट पॅलिश’मधील त्यांची गाणी गाजली. यापकी ‘लपक छपक तू आ रे बदरवा’ हे विनोदी गाणं आणि ‘रात गयी जब दिन आता है’ या गाण्यांचं खुद्द राज कपूरने कौतुक केलं. यानंतर राज कपूरचा काही प्रमाणात अपवाद वगळता कोणत्याही नायकाचा आवाज होणं त्यांच्या नशिबात नव्हतं. मात्र तीही एक सोय होती, कारण मुकेशला झेपणार नाहीत अशीच गाणी मन्नादांना मिळाली. ‘प्यार हुआ इकरार हुआ है, दिलका हाल सूने दिलवाला, आजा सनम, ये रात भिगी भिगी, ए भाय जरा देखके चलो’ ही गाणी मुकेश गाऊ शकणार नाही, हे ‘आरके’ आणि ‘एस-जे’ दोघांनाही ठाऊक होतं. (‘एस-जे’ंनी ‘बसंत बहार आणि उजाला’ या चित्रपटांतील गाणीही मन्नादांना दिली!) रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘दिल ही तो है’ या चित्रपटातील गाणी राज कपूरमुळे मुकेशला मिळाली, मात्र ‘लागा चुनरीमें दाग’ ही पुढे लोकप्रिय झालेली भरवी गाण्यासाठी मन्नादांना पर्याय नव्हता.
जीवन चलनेका नाम…
<span style="color: #ff0000;">श्रद्धांजली</span><br />ज्येष्ठ पाश्र्वगायक मन्ना डे यांचं वयाच्या ९४व्या वर्षी बंगळुरू येथे नुकतंच निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असणाऱ्या या गायकाला कारकीर्दीच्या पूर्वार्धात मोहम्मद रफी यांच्याशी तर उत्तरार्धात किशोरकुमारशी स्पर्धा करावी लागली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-11-2013 at 01:01 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमन्ना डेManna DeyसंगीतMusicहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legendary singer manna dey