‘‘मोठय़ा आपत्ती किंवा घोडचुकांमुळे नव्हे तर लहानशा वाटणाऱ्या बाबींचा सातत्याने विनाश करण्यामुळेच माणसाच्या आनंदाला ग्रहण लागते.’’
अलीकडेच प्रकाशित झालेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्यांच्या अधिवासाचा, परिसंस्थेचा अहवाल वाचताना अर्नेस्ट डिम्नेट या फ्रेंच अभ्यासकाच्या या अवतरणाची आठवण झाली. माणसाने माणसासमोर काय वाढून ठेवले आहे याची कल्पना हा अहवाल वाचताना सहज येते. ग्रामीण भागातील वाचकांना कदाचित असे वाटेल की, हा अहवाल मुंबई परिसरातील बिबळ्यांचा आहे, त्याचा आपल्याशी काय संबंध? पण असे वाटून घेऊ नका. हा अहवाल ग्रामीण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर समस्त भारतदेशासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे. बिबळ्याने माणसावर हल्ला करण्याच्या घटना या काही केवळ महाराष्ट्रातच घडत नाहीत तर देशभरात असे प्रकार घडत आहेत. हा अहवाल महत्त्वाचा आहे, कारण तो या सर्व घटना-घटितांमागची महत्त्वाची कारणमीमांसा करतो. संपूर्ण भारतासाठी लागू असलेल्या त्या कारणाचे मूळ हे वाढत्या शहरीकरणाशी आणि बिबळ्यांच्या अधिवासासंदर्भात आपल्या मनात असलेल्या गैरसमजाशी जोडलेले आहे. गैरसमजाचा हा भाग दूर करण्यात आपल्याला यश आले तर बिबळ्या आणि मनुष्यप्राणी दोघांसाठीही ते अधिक चांगले असणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हा शास्त्रीय अहवाल हे त्यासाठीचे योग्य निमित्त आहे.
खरे तर बिबळ्यांच्या हल्ल्यांमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न आजवर अनेकदा झाला आहे. त्यात हे लक्षात आले की, त्याने आजवर केलेले हल्ले हे केवळ बैठय़ा अवस्थेतील माणसावर (प्रामुख्याने प्रातर्विधीला बसलेल्या व्यक्ती) किंवा लहान मुलांवर झाले आहेत. मुळात हल्ले का होतात त्याची कारणमीमांसा स्पष्ट होत नव्हती. तो हिंस्र अर्थात रानटी प्राणी आहे, त्यामुळेच हल्ले होत असणार हे माणसाचे त्यामागचे गृहीतक होते.
त्याला सर्वप्रथम छेद देण्याचे काम यशस्वीरीत्या केले ते जीवशास्त्राच्या डॉ. विद्या अत्रेयीने. तिने जुन्नर परिसरात आणि त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केलेल्या बिबळ्यांच्या अभ्यासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघडकीस आल्या. सर्वात पहिली म्हणजे बिबळ्या हा माणसाला घाबरणारा तरीही त्याच्या सर्वाधिक जवळ राहणारा प्राणी आहे. आपल्याला वाटते की, तो जंगली प्राणी असल्याने तो जंगलात राहत lp08असणार, परंतु प्रत्यक्षात मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये झपाटय़ाने होत असलेले शहरीकरण; बिबळ्याचा अधिवास आणि त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलण्याचे काम करते आहे. माणसाला घाबरणारा प्राणी असला तरी तो त्याच्या जवळच राहतो, कारण त्याचे सहजभक्ष्य असलेला कुत्रा, इतर पाळीव प्राणी किंवा डुक्कर आदी मनुष्यवस्तीच्या जवळ किंवा भरवस्तीतच असतात. बिबळ्या हा जंगलात राहणारा प्राणी असला तरी गेल्या अनेक वर्षांत त्यालाही लक्षात आले आहे की, जंगलातील सांबर, हरण, चितळामागे धावून भक्ष्यासाठी जिवाचे रान करण्यापेक्षा कुत्र्या-मांजराची किंवा डुकराची शिकार सहजसाध्य आहे. आपणही सोप्या गोष्टींनाच तर प्राधान्य देतो. विद्याच्या अभ्यासानुसार, जुन्नरमध्ये शेतात लपलेल्या बिबळ्याने तिथे काम करणाऱ्या शेतमजुरांवर कधीच हल्ला केला नाही किंवा मुंबईच्या मार्गावर असलेल्या ‘आजोबा’नेही माळशेजपासूनचा प्रवास मनुष्यवस्तीच्या जवळून करताना कधीच माणसावर कुठेही हल्ला केला नाही. मग माणसांवर होणाऱ्या हल्ल्याचे काय? त्याचाही उलगडा याच अभ्यासात झाला आणि लक्षात आले की, माणूस बैठय़ा अवस्थेत असतो तेव्हा एखादा भक्ष्य असलेला लहान प्राणीच असावा, असे बिबळ्याला वाटते किंवा लहान मुलेही लहान भक्ष्याप्रमाणे वाटतात आणि तो गैरसमजातून झालेला हल्ला असतो. विद्याने केलेल्या अहवालाच्या वेळेस तर आरे कॉलनीच्या एका भागात तब्बल सातशेहून अधिक कुत्रे आढळले होते.. मग या भागात जिथे सहजभक्ष्य मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे तिथे बिबळ्या सापडणारच ना!
lp07जुन्नरसारख्या ग्रामीण भागात झालेल्या अभ्यासातही हेच लक्षात आले की, भक्ष्य पकडणे सोपे जावे यासाठी बिबळे जंगलात फार कमी राहतात आणि प्रामुख्याने ते दिवसा असतात ते बागायती शेतीमध्ये लपून. पण तिथे शेतात एकही हल्ला नाही झाला. विद्याच्या आधीही राष्ट्रीय उद्यानात एडगावकर-चेलम यांनी १९९८ साली, भाले, तिवारी व आपटे यांनीही काही छोटेखानी अभ्यास अहवाल सादर केले होते, पण आधुनिक शास्त्रीय पद्धती आणि काटेकोर निकष वापरून तयार केलेल्या अहवालाची त्रुटी मात्र होतीच. मूळचा मुंबईकर असलेल्या निकित सुर्वे याने त्याच्या नव्या शास्त्रीय अभ्यासामध्ये ही त्रुटी दूर करण्याचे काम केले. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या निकितला लहानपणापासून प्राण्यांची आवड होती. लहानपणी प्राणी दिसला की निकित रडणे थांबवायचा, अशी आठवण त्याची आई सांगते. लहानपणी किडे, मुंग्या-प्राणी यांचे आकर्षण असलेला निकित वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्राकडे न वळता तर नवल! त्याने सुरुवातीस स्वयंसेवक म्हणून विद्यासोबत राष्ट्रीय उद्यानातच काम केले. डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेमध्ये एम. एसस्सी. करताना त्याने संशोधनासाठी बिबळ्यांच्या अधिवासाच्या या प्रकल्पाची निवड केली. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ तो या प्रकल्पावर काम करीत होता. बिबळ्यांच्या अभ्यासासोबत झालेल्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये एरवी तापदायक वाटणारा हा बिबळ्या वनरक्षकांना व कर्मचाऱ्यांना ‘आपला’ वाटू लागला हा निकितच्या दृष्टीने महत्त्वाचा बदल होता. पूर्णपणे शास्त्रीय निकष लावून शास्त्रीय साधनांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले, त्यामुळे आता इतरत्र कुठेही झालेल्या शास्त्रीय सर्वेक्षण व अभ्यासाशी राष्ट्रीय उद्यानातील या अहवालाची तुलना करता येऊ शकेल. शास्त्रीय परिमाणे आली की, तुलना सोपी होते व ती अवाजवी ठरत नाही.
निकितच्या या शास्त्रीय अहवालावर बरीच टिप्पणी झाली पण एका महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे सर्वाचेच दुर्लक्ष झाले. कुत्रा हेच राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्याचे महत्त्वाचे खाद्य असल्याच्या मुद्दय़ावर सर्वानीच लक्ष केंद्रित केले. कारण त्यात बातमीमूल्य होते, पण हा अहवाल असे सांगतो की, कुत्रा हेच महत्त्वाचे खाद्य असण्यामध्ये २०१२ सालापासून आतापर्यंत घट झाली आहे. पूर्वी कुत्र्याचेच प्रमाण सर्वाधिक होते. आता मात्र राष्ट्रीय उद्यानातील सांबर, चितळ यांची संख्या वाढल्याने बिबळ्याच्या विष्ठेमध्ये त्यांचे सापडणारे प्रमाणही वाढले आहे. हा तोच कालखंड आहे की, ज्यामध्ये बिबळ्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पूर्ण घट झालेली दिसते. म्हणजे गेल्या चार वर्षांत एकावरही बिबटय़ाच्या हल्ल्यात प्राण गमावण्याची वेळ आलेली नाही. जंगलामध्ये मुबलक खाद्य उपलब्ध असणे या मुद्दय़ाने यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. मनुष्य व प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षितच राहिला. बातमीमूल्याच्याच बाबतीत बोलायचे तर मनुष्यहानी टाळणाऱ्या किंवा कमी करण्याच्या मुद्दय़ाला बातमीमूल्यातही सर्वात वरचेच स्थान असायला हवे, पण त्याचे भान माध्यमांना आहे कुठे? माणसाला कुत्रा चावला तर त्याची बातमी होत नाही, मात्र माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी ठरते, असेच माध्यमशास्त्रांच्या वर्गात शिकवले जात असेल; तर मग बिबळ्याचे जंगलातील भक्ष्य वाढले आहे, यापेक्षाही अधिक लक्ष कुत्र्याकडे जाणे तेवढेच स्वाभाविक ठरते!
01vinayak-signature
विनायक परब