उन्हाळय़ाची सुट्टी लागली रे लागली की आताच्या मुलांना वेध लागतात ते एखाद्या शिबिराचे! पण अगदी जेमतेम २५-३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही.. बघा तुम्हालाही आठवतोय का तुमच्या मामाचा गाव!

प्रवासाचे आकर्षण मला अगदी लहानपणापासून आहे. त्यातूनही कोकणचा प्रवास म्हटले की अजूनही मन कसे आनंदाने भरून येते. तिथल्या आठवणींचा जणू एक चलत् चित्रपटच डोळय़ांसमोरून सरकायला लागतो. मग मन कधी भूतकाळात उडी मारतं आणि मी लहानपणचा ‘गोटय़ा’ होतो ते समजतसुद्धा नाही.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…

दिवाळी किंवा उन्हाळा, कुठलीही सुट्टी असो, ती सुरू होण्याआधीच मला कोकणाची स्वप्ने पडायला लागायची. मग माझा एकच धोशा सुरू व्हायचा. ‘‘आई मी सुट्टीत कोकणातल्या आजी-आजोबांकडे जाणार, चंद्यामामाकडे जाणार!’’ पुढचे कार्यक्रम स्वत:शी ठरवता ठरवता त्या सुखद विचारांची एक मोठी साखळी तयार व्हायची. त्या तंद्रीतच कधी परीक्षा संपते आणि आपण धूम ठोकतो असं होऊन जायचं.
आमची कोकणची वरात निघायची ती वाटेत सुमीमावशीकडे मुक्काम करूनच! मग मी आमचा अंत्यादादा आणि निर्मला, निमी म्हणजे मावसभावंड असे आम्ही पुढे कूच करायचो. आम्ही तीन ‘नग’ आणि आमची बोचकी, ज्यात मुख्यत: माझी गाण्याची वही, काचेच्या रंगीत गोटय़ा (म्हणूनच बहुधा मला ‘गोटय़ा’ म्हणत असावेत) अंत्यादादाची गलोल (हे खास ‘शस्त्र’ चिंचा किंवा कैऱ्या पाडण्याकरता) निमीने माझ्यासाठी खास आणलेले भाजके चिंचोके अशाच काहीबाही गमतीजमतीच जास्त असायच्या. आमची वरात एस.टी.तून गावच्या तिठय़ावर उतरली की समोर चंद्यामामा दिसायचा. मग आमचं हे ‘खाटलं’ आजोळच्या ‘एक्क्या’तून (कोकणातली बैलगाडी) पुढच्या प्रवासाला निघायचं!
कोकणच्या त्या खडबडीत, लाल मातीच्या रस्त्यावरून त्या एक्क्याच्या प्रवासाची मौज काही औरच! वनश्रीने नटलेला परिसर, त्यामधून डोलणाऱ्या त्या नारळी-पोफळीच्या बागा, त्यात शाकारलेली ती झावळाची लहान खोपटी!!वाटायचं हा रस्ता प्रवास कधी संपूच नये. मग आमचा म्हादू गाडीवानही अगदी रंगात येऊन, कोकणी हेल काढून ‘ढवळय़ा पवळय़ा’चं गाणं गायचा! इकडे चंद्यामामा आणि अंत्यादादाच्या गप्पा रंगलेल्या. ‘‘हं, काय मग अंतोबा, तुमचे ते शस्त्र आताही आहेच का संगतीला? पण आमच्या कोकणात नाही हो कसली शिकारबिकार करायचीस.’ अंत्यादादाची गलोल पिशवीतून बहुधा बाहेर डोकावत असणार म्हणून चंद्यामामाचा हा त्याला दम. अंत्यादादा म्हणतो, ‘‘मामा, शिकारबिकार काही नाही रे बाबा. पण फक्त ‘कैचि’साठी याचा उपयोग. आणि हे बोलण माझ्याकडे डोळे बघत, मिचकावत. ‘कैचि’ची गंमत मलाच ठाऊक म्हणून. आमची ती गंमतच आहे, कैरीतला ‘कै’ आणि चिंचेतला ‘चि’- कैचि.’’
आजोळच्या दारात आमचा एक्का खुळ्ळम् खुळ्ळम् करत पोहचतो ना पोहोचतो तोच ओसरीतल्या झोपाळय़ावर डुलणारे आजोबा माड शिंपणाऱ्या आजीला हाक मारीत म्हणायचे, ‘‘अगो, आली गो वानरसेना’’ आणि मग त्या माडासारखीच शांत, सोज्वळ आजी लगबगीने हात पुसून आम्हाला जवळ घेत म्हणायची, ‘‘आलात रे पाडसांनो, कधीची रे वाट बघतेय!’’ मग तिचा मायेचा हात आमच्या तोंडावर, डोक्यावर फिरत राहायचा. प्रवासाचा सगळा शिणवटा विसरायला लावणारा तो मऊसूद साईगत मायेचा स्पर्श पुन: पुन्हा हवासा वाटायचा. ‘‘चला रे आडावर सगळे आधी. उतरवा ती मारुतीची सोंग अन् बसा मग खुश्शाल गजाली करत आजीशी’’-इति आजोबा. कोकणच्या लाल मातीने भरलेली आमची तोंडं पाहून त्यांना आम्ही ‘मारुती’ वाटायचो बहुधा.
हुश्श्य करून टवटवीत चेहऱ्यांनी आम्ही आत शिरतोय न् शिरतोय तोच आजीने केळीच्या हिरव्यागार पानावर वाढलेला वाफेचा गरगटय़ा भात, त्यावर साजूक तूप, मस्त मेतकूट, वर लिंबाच्या लोणच्याची फोड आणि तोंडी लावायला पोह्यचा पापड! अहाहाऽ हा असा झकास कोकणी थाट बघूनच त्या खमंग वासांनी अशी मस्त भूक खवळायची की नंतर फक्त हातातोंडाचीच गाठ! तसा मी पहिल्यापासून जरा खादाडच. त्यात आमची आजी म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच. तो खास कोकणचा मेवा समोर आल्यावर तर विचारायलाच नको. जेवणं झाल्यावर चंद्यामामा आमच्या डोक्यावर टपला मारून म्हणतो, ‘‘चलो बच्चेकंपनी समुद्रावर चक्कर टाकून येऊ.’’ ‘‘रें, थकली कीं रें असतील वासरं माझी. एवढय़ा दूरच्या प्रवासातून येतांयत. निजतील हों जराशी’’- ही आमची आजी- पण हे ऐकायला आम्ही थांबतोय थोडेच? शर्यतीतल्या घोडय़ांसाखे निघालोसुद्धा आम्ही समुद्रावर!
सकाळी उठल्या उठल्या आमची घोषणा- ‘‘चंद्यामामा, चल ना पुन्हा समुद्रावर. मस्त पोहू या! वाळूत लोळू या!! काल तू आम्हाला खेळू पण दिलं नाहीस तिथं.’’ ‘‘शिंच्यांनो, सक्काळ होत्यें न् होत्यें तोच निघालात का हुंदडायला? ऐकलेस का गो?’’ इति आजोबा- मग पुढे त्याच चंद्यामामाला दम भरणं, आम्हाला जरा उपदेशाचा डोस पाजणं हे सगळं ओघाने आलंच. ‘रें रांडेच्यानो, रामप्रहरी काही श्लोक, काही स्तोत्रे वगैरे म्हणायला नाही रें शिकवली आयशीन् तुमच्या? आँ? त्या देवदेवकांची काही आठवण, सय? कां ठेवलंय सगळं बासनात गुंडाळून? काही नाही जायचं हो आत्ता डुंबायला समुद्रावर. अगों, ऐकलेस कां, चांगलं हंडा हंडा पाणी तापीव न् घाल न्हायला सगळय़ांना. चांगले खसखसून रिठे पण लाव हों!’’ आजोबांची ती वाणी म्हणजे ब्रह्मवाक्यच! कुणाची बिशाद त्यांना नाही म्हणायची? मग आजीचा मऊसूद हात न्हाणी होताना आमच्या केसातून फिरायचा. मस्त सुखद झिंग चढायची. ‘केव्हढे गो लांब केस होते निमे तुझे गुदस्ताला आली होतीस तेव्हा. आता मात्र आलेयस मारे भुंडय़ा केसाची मडमीण होऊन.’’ हे आजीचं वक्तव्य निमाच्या केसांच्या बॉबकटबद्दलचं! अन् हा प्रेमळ संवाद असाच चालू राहायचा.
तिथल्या वास्तव्यातलं ते आमचं समुद्रात डुंबणं, हुंदडणं, मध्येच एकमेकाला रट्टे घालणं, अंत्यादादाची ‘कैचि’ची शिकार, त्याची न् माझी काचेच्या गोटय़ांवरून होणारी हाणामारी. मग खुशीत येऊन, बट्टी करून एकमेकाला घातलेली कोडी, उखाणे, लावलेल्या सिनेमाच्या गाण्यांच्या भेंडय़ा काय न् काय, वेळ कसा भुर्रकन् उडून जायचा, कळायचंसुद्धा नाही.
एकदा माझी आणि निमीची गाण्यांच्या भेंडय़ावरून चांगलीच जुंपली. ती म्हणत होती ‘‘मला ‘प’चं गाणं येत नाही, नवीन अक्षर दे.’’ मी कसला देतोय दुसरं अक्षर! म्हटलं, ‘‘हरलीस तू निमीटले. आता स्वत:चं नाक धर आणि काढ दहा उठाबशा.’’ तर लागली रडायला आणि गेली थेट आजोबांकडे माझी तक्रार घेऊन. म्हणते कशी, ‘‘थांब, चोंबडय़ा, अश्शी आजोबांकडे जाते न् सांगतेच कशी हा मला निमीटली, खापीटली म्हणाला म्हणून.’’ नंतर आजोबांची गंमत बघा, रात्री जेवताना मला म्हणतात, ‘‘चल गोटय़ा, लाव रें भेंडय़ा माझेशी. हां, घे अक्षर ‘व’ नी म्हण बरं, कर सुरुवात.’’ मी आपला लगेच ‘‘वही तुम मिलोगी, जहाँ हम मिले थे’’ असंच काहीतरी होतं गाणं, केलं सुरू. तर आजोबा करवादले, ‘‘शिंच्या, कसली रे ही दळभद्री सिनेमातली गाणी गातोस. अरें, परब्रह्म अन्न की रे समोर घेऊन बसलास तर ‘व’ वरून ‘‘वदनी कवळ घेता नाही.. नाही का म्हणावेस?’’ -असे सुसंस्कार व्हावेत आमच्यावर ही त्यांची धडपड.
आजीच्या हातचं सांदण, खांडवी, पानगे, उकडीचे मोदक अशी एक से एक पक्वान्न, चंद्यामामाबरोबरची भटकंती, आजोबांनी सांगितलेल्या रामायण-महाभारतातल्या गोष्टी आणि त्याच बरोबरीने घोटवून घेतलेली रामरक्षा, परवचा, नारळी-पोफळीमधून ते बागडणं, नाचणं ही अशी सगळी शिदोरी घेऊन मग सुटी संपवून घरी परतायची वेळ यायची. मग आठवायची ती आमची शाळा, होमवर्क, बरेच दिवस न भेटलेले दोस्त, गुरुजन आणि मुख्य म्हणजे आई-बाबा! आजोळाहून कोकणातून परत निघताना, आजी-आजोबा, मामाचा निरोप घेताना पाय जडावले जायचे. आजीचे पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे, आजोबांचे उपरण्याने पुसले जाणारे डोळे! पण आमची रिती झालेली मनाची ‘बोचकी’ मात्र भरली जायची ती तिथल्या आठवणींनी! किती भरून घ्यावं न् किती नाही असं होऊन जायचं. कारण हीच शिदोरी पुढच्या सुट्टीपर्यंत पुरवायला लागायची ना!

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader