बालपणी शालेय जीवनात आपल्यापैकी अनेकांनी वाचलेली अशी एक कथा. कष्टकऱ्यांचे एक खूपच सुंदर असे गाव असते. सर्व जण खाऊनपिऊन सुखी असतात. या गावाचे एकच वैशिष्टय़ असते ते म्हणजे, या गावात कधीच कुणी रेंगाळत राहिलेला नजरेस पडायचा नाही. सकाळी सूर्योदय झाल्यापासून ते अगदी सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत गावातील प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या कामात गढलेला असायचा. कुणालाही इथेतिथे पाहायला सवड नव्हती. खरे तर त्या गावाचा परिसर अतिशय रमणीय आणि सुंदर असाच होता. नदी-नाले, ओढे, डोंगरांतून कोसळणारे धबधबे, नजरेचे पाते लवते न लवते तोच विजेच्या चपळाईने गवताळ भागातून धावणारी हरणे.. नानाविध रंगांची फुले आणि त्याभोवती रुंजी घालणारी फुलपाखरे, रंगीबेरंगी कमळे आणि त्याभोवती कूजन करणारे भ्रमर असे सारे काही चित्रमय वातावरण. एका बाजूला पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असलेला.. पण या साऱ्याकडे पाहायला सवड होती कुणाला? जो तो आपापल्या कामात गढलेला. गावासाठी म्हणून कुणी काही नियम केलेले नव्हते, पण गावकऱ्यांचेच स्वत:चे असे अलिखित नियम होते. या नियमांना कधीच कुणी बगल दिली नव्हती. सारे काही व्यवस्थित ठरल्याप्रमाणे सुरू होते. त्याच वेळेस एक महत्त्वाची घटना घडली, ती म्हणजे एक कलावंत या गावात पोहोचला..
गावात पोहोचल्या-पोहोचल्याच त्याला लक्षात आले की, हे सौंदर्यपूर्ण असे गाव आहे. इथली माणसेदेखील दिसायला देखणी आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेली आहेत. सर्व कामे ती उत्साहात करत आहेत. या गावातील कुणालाही उसंत म्हणून नाहीच. गावाच्या निसर्गसौंदर्याची मोहिनी पडलेल्या त्या कलावंताला भारावल्याप्रमाणेच झाले होते. त्याला असाच एकटाच काही काम नसलेल्या अवस्थेत निवांत भटकताना पाहून गावकरीच अचंबित झाले. हा असा रिकामटेकडा कोण, कुठून आला, असा प्रश्न त्यांना पडला. काही गावकऱ्यांनी त्याला सांगूनही पाहिले की, अरे, काही तरी काम कर. असाच वेडय़ासारखा काय फिरतोयस? पण त्याला तर तीच गावकरी मंडळी वेडी आहेत, असे वाटत होते. आजूबाजूला निसर्गाने भरभरून सौंदर्याची उधळण केलेली आणि ही मंडळी मात्र त्याचा आस्वाद न घेता केवळ कामात गर्क.
त्या कलावंताला मात्र राहावले नाही. एके ठिकाणी तो खाली बसला आणि त्याने निसर्गाकडे एकटक पाहण्यास सुरुवात केली. मध्येच एक गावकरी येऊन त्याला म्हणाला, अरे, असाच पाहात काय राहिलायस, काम कर. त्यावर तो म्हणाला, तेच पाहातो आहे. मनात मुरवतो आहे.. त्याच्या त्या मुद्रेकडे पाहात एका मुलीला वाटले, खरेच काही तरी वेगळे आहे. पाणी आणायचे सोडून ती त्याच्या त्या तल्लीनतेकडे पाहात राहिली. थोडय़ा वेळाने त्याने त्याच्या झोळीतून एक कॅनव्हास, रंग-ब्रश आदी साहित्य काढले आणि चित्रकामाला सुरुवात केली. पाहता पाहता त्याने समोरचा तो निसर्ग जसाच्या तसा कॅनव्हासवर उतरवला. ते सारे पाहणारी तरुणी अचंबित झाली आणि तिने मैत्रिणींना पाचारण केले. एक एक करत गाव लोटला आणि सारेच अचंबित झाले. खरे तर हे सारे गावकऱ्यांसाठीही थक्क करणारेच होते. हे असे काही तरी ते प्रथमच पाहात होते. कामाशिवाय इतर काही अशी सवय नव्हतीच त्या गावाला.
आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, पूर्ण गाव गोळा झाला आहे, याचे भान त्याला नव्हतेच. थोडय़ा वेळाने या पठ्ठय़ाने त्याच्या झोळीतून एक बासरी काढली आणि ती तो वाजवू लागला. सूर नावाची गोष्टही त्या गावासाठी तशी नवीनच होती. त्यांनी ते सूर प्रथमच ऐकले होते. काही तरी भान हरपणारे असे आहे एवढेच त्यांच्या लक्षात आले.. मग त्या बघ्यांतील एकाने त्या दिवशी त्याला आपल्या घरी आसरा दिला. त्या रात्री काही जण कुतूहलाने त्याला भेटायला गेले. मग त्याच्या प्रेमात पडलेल्यांची संख्या वाढतच गेली. हेदेखील आयुष्यच आहे. हादेखील आयुष्याचा अविभाज्य असा भागच आहे, असे वाटणाऱ्यांची गावकऱ्यांची संख्या वाढत गेली.. काम करताना आपल्याला एक ताण सतत जाणवायचा हे त्यांना नंतर या कलेच्या परिचयामुळे लक्षात आले. कारण कलेमुळे हलकेफुलके वाटू लागले तेव्हा ताण होता हे कळले होते..
कलेचे महत्त्व सांगणारी अशी ही गोष्ट लहानपणी ऐकलेली असते, पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण अधिकाधिक स्पर्धात्मक होत जातो आणि ताणतणावाला कवटाळतो. पैसे, सुबत्ता आणि प्रतिष्ठा या मागे पळताना दमछाक होते. कधी नैराश्य येते. सारे काही हरल्यासारखे वाटते. कधी आपला सामना असतो तो एखाद्या बलाढय़ाशी. सत्य आपल्याच बाजूला असले तरी आपण फारच लहान आहोत, याची जाणीव आतून हलवून टाकते. त्याच वेळेस दुर्दम्य आशावाद देणाऱ्या कवितेच्या ओळी कानी येतात..
तुझिया सामर्थ्यांने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही
या ओळींनी मग आपल्यातील दुर्दम्य आशावादाच्या निखाऱ्याला एक फुंकर मिळते आणि अंगार फुलून येतो. कला अशा प्रकारे आयुष्याला साथ देत असते. सुख-दु:खात तिचीच साथ असते. खास करून दु:खात असाल तर मग ते हलके करण्याचे काम ती आपसूकच करत असते. कधी दु:खावर फुंकर घालते, तर कधी सारे काही विसरून नवे आयुष्य सुरू करण्यासाठी प्रेरणा देते. ती सोबत असेल तरच उत्तम आयुष्य जगणे शक्य होते. अन्यथा आपण जगतो ते शरीरासाठी.
काही जण त्यावर असेही म्हणतात की, भाकरी आणि फूल यात भाकरीलाच सर्वाधिक महत्त्व आहे, कारण ती असेल तर तुम्ही आयुष्य जगू शकता, कारण शरीर जिवंत राहते. या देशामध्ये धड दोन वेळचे अन्न मिळत नाही, अशा अवस्थेत काय करायची आहे तुमची कला? संगीत, कविता, नाटक, गाणी, चित्र यांनी काय पोट भरणार आहे? पोट व्यवस्थित भरले तरच या साऱ्याला अर्थ आहे, पण हा पराकोटीचा युक्तिवाद झाला. आजूबाजूला पाहा म्हणजे लक्षात येईल की, समाजाला कलेची किती गरज आहे. आज समाजामध्ये बेकारीपासून ते चोरीमारी, खून- दरोडे आणि बलात्कार आदी समाजविघातक प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे कारण असे पुढे केले जाते की, हाताला काम नसेल तर डोके भुताचे घर होते. म्हणजेच नानाविध विघातक विचार मनात येतात. तरुणांच्या मनात असंतोष ठासून भरलेला आहे. त्याचाही चांगल्या पद्धतीने निचरा व्हावा लागतो. कलात्मक विचारांची साथ असेल तर मात्र या असंतोषाला मिळणारी वाट ही चांगली असू शकते. कुणी ती समस्या नाटकाच्या रूपाने मांडतो, तर कुणी गाण्यातून ती भावना व्यक्त करतो, पण त्याचे रूपांतर विकृतीत होत नाही. जर कलेची साथ नसेल तर मग समाजविघातक प्रवृत्ती डोक्यात घर करतात आणि त्याची समस्या अखेरीस समाजालाच भेडसावते आणि त्यांनाच सोडवावी लागते. म्हणूनच कलेची संस्कृती ही आवश्यक बाब आहे, पण आयुष्यात एवढा विचार करायला वेळ आहे कुणाला? सहज आठवून पाहा ताणतणावाचा पराकोटीचा क्षण.. मग लक्षात येईल की, आजूबाजूला काही तरी कलात्मक घडलेले होते. एखादी धून किंवा एखादे चित्र पाहिले, चांगला चित्रपट पाहिला किंवा नृत्य प्रकार पाहिला आणि मग हलके वाटले असेल. म्हणूनच भाकरीएवढेच महत्त्व त्या कलेला अर्थात फुलालाही आहे. भाकरी तुमची शरीराची गरज भागवेल आणि कला- संस्कृतीचे प्रतीक असलेले ते फूल तुमची सांस्कृतिक आणि चांगल्या सामाजिक वातावरणाची गरज भागवेल!
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा