आपण सुंदर आहोत आणि आपल्यापेक्षा सुंदर दुसरं कोणीही नाही, हा हिंदी सिनेमाच्या नटांना असणारा इगो मराठीत नाही.. तो सुंदर इगो ‘हॅप्पी जर्नी’ हा सिनेमा देतो. त्याविषयी सिनेमा दिग्दर्शकाच्याच शब्दात..
आपण मराठी माणसं सकस कथानकांचा आणि वास्तववादी कथेचा अनुभव घ्यावा, म्हणून मराठी चित्रपट बघतो. आपण कधी मराठी चित्रपटांतील पात्रांच्या कपडय़ांमुळे, त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटने प्रभावित होतो का? आपण त्यांची फॅशन कॉपी करतो का, आजूबाजूच्या तरुण प्रेक्षकाला हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थीच मिळेल.
याचं कारण मराठी चित्रपटाच्या कथेत, तिच्या मांडणीत आणि प्रदर्शनात कधीही एक गोष्ट नसते, जी हिंदी चित्रपटात भरपूर असते आणि त्यामुळे कितीही वाईटसाइट कथा असल्या तरी आपण हिंदी चित्रपट आवर्जून जाऊन पाहतो. ती गोष्ट आहे ‘एक सुंदर इगो’. मराठीत त्याला जवळजवळ पर्यायी शब्द नाही. आपण संपन्न आहोत, आपण सुंदर आहोत आणि आपल्यापेक्षा सुंदर दुसरं कोणीही नाही, ही भावना!
‘हॅपी जर्नी’ बनवताना जानकी, निरंजन, अजिंक्य आणि अॅलिस या माझ्या चारही पात्रांना मला तो इगो द्यायचा होता. आज चित्रपट पाहून बाहेर पडताना अनेक प्रेक्षक या फिल्ममधील कपडय़ांना, वस्तूंना आणि त्याच्या परिकथेप्रमाणे केलेल्या आकर्षक मांडणीला दाद देतात, त्या वेळी मला माझा हा प्रयत्न पूर्ण यशस्वी झाला आहे, असं वाटतं.
चित्रपट तुम्हाला केवळ कथा सांगत नाही, तर तो तुम्हाला तुम्ही जगत नसलेलं किंवा जगू शकत नसलेलं आयुष्य काही काळ जगायची संधी देतो. ‘हॅपी जर्नी’ चित्रपटातले बहीणभाऊ एका अमेरिकन पद्धतीच्या होम कॅरॅव्हॅनमध्ये प्रवास करतात. होम कॅरॅव्हॅन एक अशी गाडी असते, ज्यात गाडीमध्ये संपूर्ण घर असतं. त्यात फ्रिज असतो, स्वयंपाकाची सोय असते, कपडय़ांचं कपाट असतं. मला हे चाकावरचं घर उभं करायला फार मजा आली.
त्याचप्रमाणे, दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही केली ती म्हणजे चित्रपटातल्या पात्रांचे कपडे. ‘हॅपी जर्नी’तल्या कॉस्च्युम्ससारखे कपडे घालणं हे प्रत्येक तरुण मुलामुलीचं स्वप्न असेल, अशी प्रतिक्रिया मला हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका तरुण डिझायनरने दिली.
अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सिद्धार्थ मेनन आणि पल्लवी सुभाष यांनी ‘हॅपी जर्नी’मध्ये साकारायच्या ग्लॅमरस भूमिकांची तयारी करताना खूप मेहनत घेतली. आखून दिलेला व्यायाम, आमचा कॉस्च्युम डिझायनर अमित दिवेकरसोबत केलेली अमर्याद सेशन्स, पोश्चर आणि बॉडी लँग्वेजेसची वर्कशॉप्स अशा अनेक गोष्टी.
लाइफस्टाइल म्हटलं की, या सगळ्या गोष्टी त्याच्या भाग होतात. तुम्हाला स्वत:ला श्रीमंती व महागडे कपडे घालायला शरीर कमवावं लागतं, उंची अॅक्सेसरीज वापरताना, त्या कशा धरायच्या, कॅरी कशा करायच्या, याचं भान लागतं.
आमचा प्रॉडक्शन डिझायनर तेजस मोडकने चित्रपटातल्या रंगांच्या बाबत, घराच्या रचनेबाबत, होम कॅरॅव्हॅनच्या आतल्या डिझाइनबाबत फार काटेकोर मेहनत घेतली आहे.
‘हॅपी जर्नी’ हा मराठी भाषेतला लाइफस्टाइल आणि फॅशन समर्थपणे पेलणारा पहिला मराठी चित्रपट झाला आहे. या चित्रपटातील कपडय़ांची, लुकची आणि अॅक्सेसरीजची आपणही कॉपी करावी, असं आपल्या सर्व तरुण प्रेक्षकांना नक्की वाटेल.
‘हॅपी जर्नी’मधलं हे लाइफस्टाइलचं स्टेटमेंट हे या चित्रपटावर उगाचच, बाहेरून लादलेलं नाही, किंवा हिंदी चित्रपटाची नक्कल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्नही नाही. या चित्रपटाच्या कथेची ती गरज आहे.
एक बहीण आपल्या मोठय़ा भावाच्या आयुष्यात जे सुंदर बदल घडवते, त्या बदलांची ही परिकथा आहे. हा चित्रपट वास्तववादी असला तरी तो तरल आणि स्वप्नवत आहे. त्याच्यात भडकपणा नाही. आम्हाला कोणालाही न पेलवणारं आम्ही काहीही केलेलं नाही आणि मुख्य म्हणजे अमित दिवेकर आणि तेजस मोडक या माझ्या दोन्ही डिझायनर्सनी कोणालाही यात कॉपी केलेलं नाही. फॅशन, ग्लॅमर, मेकअपचा सेन्स या गोष्टी मराठमोळ्या मनाला अप्राप्य, महागडय़ा वाटतात. बुद्धिवादी, गंभीर प्रेक्षकाला त्या कचकडय़ाच्या वाटतात. या दोन्ही भावनांना ‘हॅपी जर्नी’ बघताना संपूर्ण छेद मिळेल आणि आपल्यापैकी प्रत्येकाला चांगलं दिसावंसं, चांगलं राहावं, असं वाटेल.
अतुल कुलकर्णीने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात या फिल्मनंतर केवढा बदल घडवला. आज अतुलकडे जगातल्या अद्ययावत कपडय़ांचं, शूजचं, गॉगल्सचं, परफ्यूम्सचं मोठं कलेक्शन तयार झालं आहे. तो घराबाहेर पडताना त्याच्या गेटअपविषयी खूप काटेकोर राहतो. तीच गोष्ट प्रिया बापटची. प्रियाने आपला व्यक्तिगत फॅशन सेन्स पूर्ण बदलवून टाकला आहे.
आपल्या मराठी कलाकारांच्या दृष्टिकोनात हा लाइफस्टाइलविषयी झालेला बदल ही आपल्या इंडस्ट्रीसाठी आणि प्रेक्षकांसाठीही ऊर्जा देणारी गोष्ट आहे. मराठी नटांनी अजून किती र्वष पोट सुटलेलं, दाढीचे खुंट वाढलेले, खादीचे चुरगळलेले कपडे घातलेले, नऊवारी साडय़ा, फेटे या वेशात राहायचं? आपल्या तरुण प्रेक्षकांची पिढी या नटांना का स्वीकारेल?
‘हॅपी जर्नी’ बघताना एका तरल, मोहक आणि अतिशय आधुनिक लाइफस्टाइलचा अनुभव मराठी प्रेक्षकाला येणार आहे. आणि हा ट्रेण्ड जर मराठी चित्रपटांमध्ये आला तर ती फारच उत्साहवर्धक गोष्ट असणार आहे.