आयुष्य म्हणजे काय ते थोडक्यात सांगा असा प्रश्न मला परवा कुणी तरी विचारला. त्याच्या या एका प्रश्नाने मला निरुत्तर केले होते. आयुष्य म्हणजे काय याचे सडेतोड उत्तर मी त्याला देऊ शकलो नाही म्हणून मलाच कसे तरी झाले. खरेच आपल्यापैकी कुणी तरी आयुष्य म्हणजे काय याचे एका वाक्यात पटेल असे उत्तर देऊ शकेल का? नाही, मला नाही वाटत. आयुष्याची व्याख्या अशी एका वाक्यात करता येईल इतके ते सरळ असते का खरेच. राजा असो वा रंक, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाच्या आयुष्याला चढ-उतार हे असतातच. ‘आयुष्यात चढ-उतार असणे फार गरजेचे आहे, ईसीजी स्क्रीनवरील सरळ रेषासुद्धा तुमचे आयुष्य संपल्याचे दर्शवते.’ असे प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा यांनी म्हटले आहे. ‘हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती वहां डूबी जहाँ पानी कम था’ अशी परिस्थिती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी नक्कीच येऊन गेलेली असते.
आयुष्यातल्या चढ-उतारांना अडचणी म्हणणारे लोक मी बरेच पाहिलेत. कित्येकदा त्यांना सांगावेसे वाटले- ‘बाबांनो अडचणीला अडचण न म्हणता संधी म्हणा, मग बघा आयुष्य किती सुंदर होईल.’ पण त्यावर मलाच उलट ‘ए बाबा रणछोडदास पुरे तुझे तत्त्वज्ञान’ अशी शेरेबाजीही ऐकायला मिळाली. पण या माझ्या तत्त्वज्ञानात फायदा जसा माझा तसा समोरच्याचाही हे कुणी समजून घेतले नाही. त्यामुळेच मी म्हणू शकतो की ‘हो माझ्या आयुष्यात चढ-उतार भरपूर आले, आणि ते आले म्हणूनच आयुष्याला खंबीरपणे तोंड देण्याची, कुठल्याही समस्येकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत मला मिळाली.’ माझ्या प्रत्येक समस्येला, माझ्या समोर उभ्या ठाकलेल्या प्रत्येक अडचणीला मनापासून धन्यवाद की ज्यामुळेच माझ्या आयुष्याला खरा अर्थ मिळाला, जगण्याची आसक्ती आणि बळ मिळाले. माझ्या पुढय़ात अडचणी निर्माण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद ज्यामुळे मला आयुष्यातील कठीण प्रसंगांना थोपवून धरण्याची हिंमत मिळाली. अडचणी नसत्या तर आयुष्य कसे जगायचे हे मला शिकता आलेच नसते.
माझ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात मी काय केले, काय मिळवले? काय गमावले असे प्रश्न मलाही पडत होते. मी जे केले ते अगदी मनापासून केले, मला जे मिळाले ते माझे नशीब म्हणून मला मिळाले आणि जे मला मिळाले नाही ते माझे कधी नव्हतेच याची जाणीव मला झाली. आयुष्याच्या या सिंहावलोकनातून मला बरेच चांगले-वाईट धडे मिळाले. जिंकण्याची वृत्ती माझ्यात नेहमीच होती, आहे आणि ती सदैव राहील. पण म्हणून काय मला अपयश आले नाही असे नाही. अपयश, अपमान, दु:ख, शारीरिक व्याधी इत्यादी अनेक गोष्टी मीही अनुभवल्या आहेत, पण त्यातूनही मी खंबीरपणे आणि हिमतीने सहीसलामत बाहेर पडलो. या माझ्या हिमतीचे, खंबीरपणाचे सगळे श्रेय मी एकटय़ा मलाच देत नाही. जेव्हाही माझ्यावर संकट आले, असे वाटले बस आता संपले सगळे, त्या त्या वेळी माझ्या नातलगांकडून, मित्र-परिवाराकडून मला मदत मिळत गेली. वेळोवेळी मदतीचा हात, शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडत राहिली. ‘हरू नकोस आम्ही आहोत पाठीशी’ असा भक्कम आधार देणारी देवमाणसं मला मिळत गेली. माझ्या यशाचे श्रेय जितके मला आहे तितकेच या देवमाणसांनाही आहे. यापुढेही मला जेव्हा जेव्हा गरज पडेल, मी संकटात सापडेन तेव्हा तेव्हा मला मदत करायला देव कुठल्या ना कुठल्या रूपात धावून येईलच. आयुष्यमान भव! असे आशीर्वाद मला तो देत राहीलच. मी त्याला साद घातल्यावर त्याचे प्रत्युत्तर येणार नाही असे होणे शक्यच नाही. माझ्या त्याच्यावरच्या विश्वासाला तो तडा जाऊ देणार नाही.
पंचवीस वर्षांच्या या माझ्या छोटय़ाशा आयुष्यात मला आयुष्य म्हणजे काय याचे उत्तर थोडय़ा प्रमाणात तरी का होईना पण मिळाले आहे. आयुष्य म्हणजे समोर आलेल्या अडचणींचा पाढा वाचणे नसून मिळालेल्या संधीचा सुयोग्य वापर आहे. आयुष्य म्हणजे निखळ आनंदाचा कायम वाहणारा झरा आहे, नितळ, स्वच्छ अशा पाण्याची सतत वाहणारी नदी आहे. आयुष्य म्हणजे कधीही न संपणारा सुखद स्मृतींचा साठा आहे. विस्तीर्ण दऱ्याखोऱ्यांतून भरारत सुटणारा वारा आहे. हृदयरूपी शेतातले प्रेमरूपी फळ म्हणजे आयुष्य. संकटात सापडलेल्या व्यक्तीला नि:स्वार्थ मनाने केलेली मदत म्हणजे आयुष्य. रडणाऱ्याच्या चेहऱ्यावर निखळ हसू फुलवणे म्हणजे आयुष्य, आयुष्याचे असे अनेक अर्थ होतात, होऊ शकतात. फक्त ते आपल्याला प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगले जगता आले पाहिजे. मदतीचा हात जेथून मिळेल तिथे धन्यवादाचा नमस्कारही करता आला पाहिजे. आयुष्याचा खरा अर्थ शोधताना सगळ्यांना सोबत घेऊन चालता आले पाहिजे. फक्त सुख उपभोगण्याचीच नाही तर प्रसंगी दु:ख सहन करण्याची हिंमतही असली पाहिजे. तेव्हाच कुठे आपले आयुष्य दीर्घायुष्य होऊ शकेल आणि आपल्याला विश्वासाने म्हणता येईल
..आयुष्यमान भव!
औषेय शरद कुळकर्णी response.lokprabha@expressindia.com