कव्हर स्टोरी
आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा या वेळच्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत त्या फक्त इंटरनेट या एकाच गोष्टीमुळे. आपल्याला हवं ते म्हणण्यासाठी आजच्या तरुणाईनं या माध्यमाचा अचूक वापर करत राजकारणावर आपली टिप्पणी करायला सुरुवात केली आहे. विडंबन करणारे कार्यक्रम, व्हिडीओ इंटरनेटवर सध्या लाखो हिट्स मिळवताहेत.. नेटिझन्सच्या व्हच्र्युअल आखाडय़ाचा फेरफटका-
निवडणुका म्हटलं की माहौल एकदम हॅपनिंग होतो. पक्षांचे जाहीरनामे, लक्ष वेधून घेणाऱ्या घोषणा, उमेदवारांची निवड, तिकीट मिळालेल्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा उत्साह, नाराज मंडळींचे टँट्रम, रोड शो, फ्लेक्स असा सगळा ड्रामा घडत असतो. या माहौलला झणझणीत फोडणी देण्याचे काम नवमाध्यम अर्थात ऑनलाइन मीडियाने केलं आहे. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? प्रत्येक उमेदवाराने, पक्षाने आपली, पक्षाची माहिती देणारे प्रोफाइल्स, पेजेस तयार केलीत. मतदारांना ‘आप’लंसं करण्यासाठी कोणी फेसबुकचा आधार घेतोय तर कुणी ‘अॅप’आणतंय. हे सगळं क्लिशे म्हणजे नेहमीचं झालं हो! मतदारांना भुरळ घालण्यासाठी मी किती काम केलं- ‘आमचा पक्ष कसा छान- आमची धोरणं किती महान’ या आशयाचा बक्कळ डेटा मीडिया सेल जनरेट करतंय. पण याच इंटरनेटच्या दुसऱ्या फांदीवर राजकारण्यांचा, त्यांचा वक्तव्यांचा, त्यांच्या ध्येयधोरणांचा यथेच्छ समाचार घेणारे कार्यक्रम जोमाने सुरू आहेत. या मुक्त व्यासपीठावर वेगाने पॉप्युलर होणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे राजकारण्यांना, त्यांच्या पक्षांना परवडणारे नाही. म्हणूनच लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने डॉट कॉम विश्वातल्या प्रहसनांचा वेध घ्यायलाच हवा.
निवडणुका जवळ आल्या की वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या, वेबसाइट्स सगळ्यांना पक्षीय रंग येतो. रकानेच्या रकाने, स्लॉटच्या स्लॉट पाहावं तिकडे राजकारणाशी संबंधित मजकुराची रेलचेल असते. काही मजकूर गोडवे गाणारा, काही बोचरी टीका करणारा तर काही उलटय़ा त्रिकोणातला तटस्थ बातमी म्हणून हजर असतो. वृत्तपत्रं-वृत्तवाहिन्या किंवा साप्ताहिकं यांना स्वातंत्र्य वगैरे असलं तरी मर्यादा असतेच-शब्दांची, वाक्यांची, मांडणीची. शिष्टाचाराचे कोंदण सोडणे नियमबाह्य़ ठरू शकते आणि नेमकं इथेच प्रसारमाध्यम कुटुंबातलं सगळ्यात तरुण आणि अल्लड असं इंटरनेट बाजी मारतं. इंटरनेटवर जागा अमर्याद असते. त्यामुळे तिथं जागेअभावी काही हातचं राखून ठेवण्याची गरज नसते. व्यक्त होण्याला चौकटीची मर्यादा नसते. वृत्तपत्रीय परिभाषेत किंवा चॅनेलीय सेटअपमध्ये मर्यादा पडतील अस वाटणाऱ्या, एकांगी वाटू शकणाऱ्या गोष्टी इंटरनेटवर सहज खपून जातात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वृत्तपत्रं-वृत्तवाहिन्या यांचं एक धोरण ठरलेले असतं आणि आपण पॅसिव्ह रीडर किंवा व्ह्य़ूअर असतो. इंटरनेटवर गोष्टी स्वान्तसुखाय मांडता येतात. तिसरा मुद्दा थोडा तांत्रिक, मात्र सर्वात चपखल असा- आतापर्यंत परीक्षेच्या रिझल्टपासून जॉब अॅप्लिकेशनपर्यंत सगळ्यांसाठी नेटकॅफेच्या पायऱ्या झिजवणारे आपण आता खिशातल्या स्मार्टफोनद्वारे नेट खिशात घेऊन फिरतो. नेट अॅक्सेस सहज-सुलभ झालाय. त्यामुळे इंटरनेटवर चालणारी चंमतग नुकताच कॉलेजला जाऊ जाणाऱ्या मुलगा ते संसारी माणूस तसेच आयुष्याच्या संध्याकाळी नातवांमध्ये रमलेले आजोबा कोणीही अनुभवू शकतात. त्यामुळे इंटरनेटला असा व्यापक टार्गेट ऑडियन्स आहे.
तर अशा मुक्तछंदी इंटरनेटचा अचूक उपयोग करून घेत शब्दच्छल प्रहसनरूपी कार्यक्रम बहरलेत. सुमीत राघवन सूत्रसंचालित ‘जय हिंद’ हा असाच एक उपक्रम. नुकतंच या कार्यक्रमाने अडीचशे भागांचा टप्पा ओलांडला. काही वर्षांपूर्वी शेखर सुमनच्या मूव्हर्स अॅण्ड शेकर्सचं एक्सटेन्शन म्हणजे ही उपहासात्मक मैफल. यात फक्त राजकारणी नव्हे तर समाजातील विविध स्तरांत घडणाऱ्या घटनांवर मार्मिक भाष्य असते. गुरसिमरन खंबा आणि तन्मय भट या स्टॅण्डअप कॉमेडियन जोडगोळीचा कार्यक्रमाला लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत. हे कार्यक्रम फक्त इंटरनेटवर पॉडकास्ट (प्रसारित) होतात. प्रसारमाध्यमांतील विविध आस्थापनांमध्ये पूर्वी काम करणाऱ्या माध्यमकर्मीनी एकत्र येत ‘न्यूजलॉन्ड्री’ सुरू केलेय. राजकारण्यांसह समाजातल्या चिवित्र गोष्टींची पुरेपूर धुलाई यात पाहायला आणि वाचायला मिळते. ताज्या घडामोडींना कल्पनाविलासाचा टच देत निर्माण झालेले ‘फेकिंग न्यूज’ आता एका मोठय़ा माध्यमसमूहाचा अधिकृत भाग झाले आहे. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं-आणखीही खूप आहेत-काही तर्कट अशी, काही बोगस अशी-
लोकांना बॉलीवूड स्टार आवडतात, क्रिकेटपटूंची स्टाइल आवडते पण राजकारणी आवडत नाहीत. हा फंडा प्रमाण मानून अनेक लुक अलाइक राजकारणी आपल्याला इकडे भेटतात. शर्ट-पँट, कानाला मफलर, चष्मा आणि वाक्यावाक्याला खोकणारे दिल्लीचे माजी (खरंतर आजी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या या स्टाइलमुळे लोकांमध्ये भन्नाट लोकप्रिय आहेत. ‘ज्या दिवशी केजरीवालांचा खोकला थांबेल, त्या दिवशी एक प्रसिद्ध कफ सिरप कंपनी त्यांना ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून घोषित करणार’ अशा शाब्दिक पेरण्या आपल्याला रिझवतात. राजकारण्यांना गाठून ‘नेशन वॉन्ट्स टू नो..’ म्हणणारा एक प्रसिद्ध अँकर, एकापेक्षा अंतरंगी वक्तव्यांनी अडचणी वाढवणारे दिग्गी राजा, आटपाटनगरीचे सुरम्य चित्र रंगवणारे राहुल गांधी, पंतप्रधान झालो आहे अशा थाटात भाषण करणारे नरेंद्र मोदी, कामापेक्षा आपल्या लटक्या रागासाठी ओळखल्या जाणाऱ्या ममतादीदी, ‘जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक रहेगा बिहार में लालू’ अशा स्पाइसी स्लोगनवाले लालूप्रसाद यादव हे आणि असे बरेच नेते आणि त्यांच्या बोलण्याची, वावरण्याची टर उडवणारे कार्यक्रम भलतेच हिट आहेत. प्रसिद्ध आणि स्वत:चा ब्रॅण्ड असणाऱ्या व्यक्तींच्या बोलण्याचं विडंबन होतं. एक प्रकारे असे कार्यक्रम तयार होणं या मंडळींचं यश आहे, कारण जनसंपर्काच्या तत्त्वानुसार निगेटिव्ह पब्लिसिटी वर्क्स असं म्हणतात- खिल्ली असो, टर असो प्रसिद्धी तर मिळतेय त्यामुळे राजकारण्यांना फारशी तोशीस न घेता स्पेस मिळतेय यात ते आनंदी आहेत. राजकारणी फक्त बोलतात, काम करत नाहीत, पैसे खातात, घोटाळे करतात अशा बहुविध कारणांसाठी राजकारण्यांना झोडपावं, असं प्रत्येकाला वाटतं परंतु शिवाजी शेजारच्या घरात जन्मावा या नात्याने जाहीर टीका करायला कुणी धजत नाही. मात्र इंटरनेटमुळे टीकेचं कवाड सर्वासाठी खुलं झालं आहे. मनोरंजनाबरोबर नेत्यांबद्दलचा राग नेटिझन्सच्या लाइक्समधून, शेअर करण्यातून व्यक्त होतोय. देशातल्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीवरचं प्रहसन हिट होतं, त्याला तुफान रिस्पॉन्स मिळतो, सर्दी-खोकला पसरावा तसो तो व्हिडीओ शेअर होतो त्या वेळी खरंच राजकारण्यांचं चुकतंय ही गोष्टही अधोरेखित होते आहे. हे सगळं व्हच्र्युअल, प्रत्यक्ष ‘राजकारण अलग चीज है’ असा टेंभा मिरवणं राजकारण्यांना कदाचित महागात पडू शकतं. स्मार्टफोनमध्ये नेटचं पॅकेज अॅक्टिवेट केलं की बऱ्याच गोष्टी पदरात पडतात. यूटय़ूबवर, फेसबुकवर, व्हॉट्स अॅप, टेलिग्रामवर सक्रिय असणारे नेटकरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पिकनिकऐवजी मतदान केंद्रावर हजर झाले तरच प्रहसन मालिकांना भरभरून प्रतिसाद देण्याला काही अर्थ असेल. दोन मिनिटांचं काम असलेलं मतदानसुद्धा करायचं नाही आणि पुढची पाच र्वष नेत्यांना शिव्यांची लाखोली वाहायची, हा ट्रेण्ड खोडून काढण्याची मोठी जबाबदारी नेटिझन्सवर आहे. इंटरनेटच्या अतिविस्तारानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. विडंबनात्मक कार्यक्रमाद्वारे केली जाणारी मार्मिक टिप्पणी मतदारराजाला प्रत्यक्षात मतदान करायला प्रवृत्त करू शकली तर ते या कार्यक्रमांचं यश असेल. उपहास पाहण्यातला आनंद लुटायचा की स्वत:चं हसं करून घ्यायचं की आपली जबाबदारी निभावत सुजाण नागरिक व्हायचं यापैकी सुयोग्य पर्याय नेटिझन्सला निवडावा लागेल.
निवडणुकांना फोडणी ऑनलाइनची!
<span style="color: #ff0000;">कव्हर स्टोरी</span><br />आजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा या वेळच्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत त्या फक्त इंटरनेट या एकाच गोष्टीमुळे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-03-2014 at 01:03 IST
TOPICSइंटरनेटInternetऑनलाइनOnlineकव्हरस्टोरीCoverstoryनिवडणूक २०२४Electionलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionसोशल मीडियाSocial Media
+ 2 More
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election on social media