विनायक परब

@vinayakparab

vinayak.parab@expressindia.com

आपल्याकडे विविध प्रकारच्या कालगणना अस्तित्वात आहेत. त्यातील एक महत्त्वाची म्हणजे शालिवाहन शक. गुढीपाडवा म्हणजे शालिवाहन शकाचा वर्षांरंभ. शालिवाहनाने शकांचा पराभव केल्यानंतर सुरू झालेली कालगणना  असे समाज वर्षांनुवर्षे मानत आला आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या संशोधनानंतर असे लक्षात आले की, ही कालगणना शालिवाहन किंवा सातवाहनांनी नव्हे, तर त्यांना समकालीन असलेला कर्दमक क्षात्रप चष्टनाने सुरू केली. सातवाहनांनी नाहपन क्षात्रपांचा पराभव केल्यानंतर त्यांचे राज्य म्हणजे गुजरातचा परिसर कर्दमक क्षात्रपांनी ताब्यात घेतला आणि चष्टनाने ही कालगणना इ. सन ७८ साली सुरू केली. ही कालगणना त्यानंतर ३०० वर्षे  अनेक राजवंशांनी वापरली, त्याचे अनेकानेक पुरावे देशभरात सापडतात. कालगणनेमुळे इतिहास आणि कालखंड समजावून घेणे सोपे जाते. अशी ही कालगणना विविध क्षेत्रात, विविध पद्धतींनी वापरली जाते. भौगोलिक कालगणना दशकोटी आणि दशलक्ष वर्षांमध्ये मोजली जाते. प्रत्येक कालगणनेची स्वतची परिमाणेही ठरलेली आहेत. सध्या आपण मोजत असलेले तास, दिवस आणि वर्ष हीदेखील कालगणनाच होय. या कालगणनेला मात्र अगदी अलीकडे लागलेल्या एका शास्त्रीय शोधामुळे यशस्वी छेद जाऊन संशोधकांना ७० लाख वर्षांपूर्वीची एक वेगळीच कालगणना लक्षात आली आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पृथ्वीवर  कोणे एकेकाळी अस्तित्वात असलेली ही वेगळी कालगणना या निमित्ताने समजून घेणे सयुक्तिक ठरावे.

६५ लाख वर्षांपूर्वी मादागास्कर बेटांजवळून भारतीय भूखंड पुढे सरकत असताना झालेल्या महाज्वालामुखींच्या स्फोटांमुळे या भूतलावर असलेल्या डायनोसॉरचे राज्य संपुष्टात आले, ते अस्तंगत झाले. हे डायनोसॉर अस्तित्वात असतानाच समुद्राच्या तळाशी ७० लाख वर्षांपूर्वी मोलस्कचेही राज्य होते. आता ओमानच्या पर्वतरांगांमध्ये याच मोलस्कचे जीवाश्म सापडले असून त्यामुळे एक नवीन कालगणना संशोधकांच्या लक्षात आली आहे.

रुडिस्ट म्हणजे पुढच्या बाजूस दाते असलेली शिंपल्यात राहणारी प्रजाती. याच प्रजातीमध्ये मोलस्क हा दिसायला  गोगलगाईसारखा असणारा प्राणी. त्याच्या शिंपला किंवा त्या शंखाकाराच्या आतमध्ये त्यातील जीव राहातो. हा जीव असलेला भाग बाहेर येऊन त्याद्वारे खाणे-पिणे पार पाडले जाते. ७० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या या मोलस्कचे जीवाश्म ओमानच्या पर्वतरांगांमध्ये सापडले आणि एक वेगळीच कालगणना उलगडत गेली. या मोलस्कची वाढ वेगात व्हायची. दरदिवसागणिक एक वलय त्यांच्या रूपाकारात वाढत जायचे. त्याचे रासायनिक विश्लेषण करताना संशोधकांना लक्षात आले की, ७० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीला स्वतभोवती प्रदक्षिणा घालायला लागणाऱ्या कालावधीमुळे त्या वेळचा एक दिवस त्यामुळेच साडेतेवीस तासांचा होता. आजचे गणित हे ३६५ दिवस अधिक काही तास असा आहे. त्यातील अधिकचे तास गणितात बसविण्यासाठी आपल्याकडे लीप वर्षांची संकल्पना अस्तित्वात आली आहे. तर पारंपरिक भारतीय कालगणनेमध्ये अधिक महिना अस्तित्वात आला. आता या नव्या कालगणनेला प्राचीन पर्यावरणीय कालगणना असे नामाभिधान मिळाले आहे. प्रत्येक कालगणनेला स्वतचा एक अर्थ असतो. आता या नव्या कालगणनेमुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीबरोबरच चंद्र- पृथ्वी संबंधांवरही अधिक शास्त्रीय प्रकाश पडणे अपेक्षित आहे. या शास्त्रीय कालगणनेच्या साक्षीनेच यंदाचा गुढीपाडवा व नववर्ष साजरा करू या.

गुढीपाडवा आणि ‘लोकप्रभा’ वर्धापनदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!