विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
हल्ली बालदोस्तांचंही असंच झालंय. पळणारे पाय थांबलेत आणि हातात मोबाइल सदासर्वकाळ. हा मोबाइल तर नंतरही असणारच आयुष्यभर पाचवीला पुजलेला. पण आता हातात असलेला काळ गेला म्हणजेच ही वेळ निघून गेली की ती परत नाही येणार. फक्त खंत करत बसावं लागेल आणि आताची मोठी माणसं म्हणतात, ‘बालपणीचा काळ सुखाचा’, तसंही नाही म्हणता येणार.. म्हणून जरा मोबाइल हातातला बाजूला ठेवा आणि पाहा जग किती सुंदर आहे!
पावसानं निरोप घेतलाय आणि एरवी केवळ महाबळेश्वरलाच मुक्कामाला असलेल्या थंडीनं, चक्क मुंबई-पुणंही गाठलंय. सकाळच्या त्या गारव्यात फेरफटका मारण्यात, सायकल चालवण्यात एक वेगळीच मजा आहे. मऊ उबदार दुलईत पांघरुणातच गुरफटून घेत थंडीत झोपून राहण्यातही मजा आहेच, पण जास्त मजा त्या थंडीवर मात करत बाहेरचा निसर्ग अनुभवण्यात आहे. गावाकडं तर मस्त धुक्याची चादर आसमंतावर पांघरलेली दिसते. हाच तो काळ जेव्हा ट्रेकिंगला जाण्यात, डोंगरदऱ्यांत भटकण्यात जास्त मजा असते. कारण दमायला कमी होतं. हाच तो काळ जेव्हा आपण शरीर कमवायचं व्यायाम करून आणि नंतर येणाऱ्या उन्हाळ्यासाठी स्वत:ला तयार करायचं असतं.
आणि बरं का.. एरवी उन्हाळ्यात उन्हामुळे लोक हैराण होतात आणि शक्यतो घरातच बसतात. पण तुम्ही मात्र बाहेर पडा, तेव्हाही निसर्ग अनुभवा. ऋतुबदल अनुभवा. ऋतू बदलण्याची चाहूलही निसर्गातून अनुभवा.. उन्हाळा येणार म्हणून झाडं पाणी कमीत कमी वापरण्यासाठी स्वत: पानगळ करतात. त्या पानगळीतून दोन गोष्टी साध्य होतात. झाडं पाणी तर वाचवतातच, पण ती पानगळ जमिनीवर एक वाळलेल्या पानांचं आच्छादन तयार करते, त्यातून पृथ्वीच्या पोटातलं बाष्पीभवन होऊन वाफ होणारं पाणी वाचवायलाही मदत होते. जंगलात असाल किंवा गावांत, तर मग कधी तरी हळुवार ती वाळलेली पानं उचलून पाहा. त्याच्या खाली एक वेगळंच विश्व धावत असतं कीटकांचं. त्यांचीही बेगमी अनेकदा सुरू असते ती उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यासाठी! बघा, किती गंमत आहे, कुणी तयारी करतंय उन्हाळ्याची, तर कुणी पावसाची. एकानं पुढच्या ऋतूच्या केलेल्या तयारीतून कुणी तरी बेगमी करतं त्यानंतर येणाऱ्या पुढच्या ऋतूसाठी! निसर्गातून हे असं सगळं शिकायला मिळतं. त्यासाठी फक्त आपल्याला डोळे उघडे ठेवायला शिकायला हवं. म्हणजे डोळे तसे सगळ्यांचेच उघडे असतात, पण आपल्याला वेगळ्या गोष्टी दिसण्यासाठी, वेगळी नजर असावी लागते. तिच्यासाठी यंदाच्या उन्हाळ्यात किंवा त्याही आधी येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये एक प्रयोग करायला हरकत नाही. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये उन्हाची प्रत बदलत असते. कधी ते अगदी सकाळी उगवतीला नर्म मुलायम असतं, नंतर किंचित अधिक प्रकाशमान होतं. दुपारी तर भाजून काढतं. पुन्हा कलण्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला की, त्याचा रंग बदलत जातो आणि मावळतीला तर अनेकदा रंगांची उधळणच होते. ही उधळण अनुभवायची तर खरं तर पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते तेव्हा ऑक्टोबरमध्ये अनुभवावी. तर या उन्हाची न्यारी गंमत लक्षात येईल. उन्हाळ्यात उजळ रंगांच्या फुलांच्या पाकळ्यांमधून आरपार जाणारा प्रकाश पाहिलात की, वेगळीच मजा येईल. बालपणीचा हा काळ खूप मजेदार असतो, खूप कल्पना सुचत असतात. म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात.. ‘कधी वाऱ्यांतून, कधी ताऱ्यांतून झुळझुळतात तराणे.. गात पुढे मज जाणे.. माझे जीवनगाणे!’ तर हे असं जीवनगाणे आसुसून अनुभवा!