करिअरची निवड ही सामान्य माणसासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट कारण तिथून तुमच्या आयुष्याला वेगळं वळण लागतं.  त्यासाठी ज्योतिषशास्त्र कसं मार्गदर्शक ठरतं?
एकविसाव्या शतकात आपल्या पाल्याने कुठले शिक्षण घ्यावे हे ठरविताना अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टच्या माध्यमातून त्याचा कल बघितला जातो. परंतु त्याचा कल हा त्याच्या सभोवतालची परिस्थिती, त्याच्याबरोबरचे मित्र आणि मिळालेल्या मार्काची गणिते यांच्या प्रभावाने ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांला काय योग्य आहे, हे करिअरच्या दृष्टिकोनातून सांगणे आवश्यक ठरते. त्यासाठी ज्योतिषशास्त्र निश्चित मार्गदर्शन करू शकते.
शिक्षण योग
मूल दोन-सव्वादोन वर्षांचे झाले की त्याला अथवा तिला शाळेत घातले जाते. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला आपल्या संततीने उत्तम शिक्षण घ्यावे, विद्यावान व्हावे, उत्तम नोकरी अथवा व्यवसाय करून अर्थप्राप्ती करावी अशी इच्छा असते, त्यासाठी आई-वडील कायमच प्रयत्नशील असतात. मुलांनी शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. एकविसाव्या शतकात शिक्षण योग बघताना, शाखा निवड करताना ज्योतिषाकडे सल्ला मागायला कोणी आले तर ज्योतिषाची भूमिका व जबाबदारी मोठी असते. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांचे लाखो रुपये खर्च होत असतात, मुलांचा वेळ आणि मेहनत पणाला लावली जाते. चुकीची शाखा निवड झाल्यास अथवा निवडलेल्या शाखेत त्या विद्यार्थ्यांला गती नसल्यास त्याचे खूप नुकसान होत असते. म्हणून ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून शाखानिवडीचे मार्गदर्शन करताना ज्योतिषांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. काळानुसार बदललेली शिक्षण पद्धती, नवीन निर्माण झालेल्या अथवा बदललेल्या शिक्षण शाखा, त्याचे ज्ञान याची माहिती ज्योतिषाला असणे गरजेचे असते.

कोणताही विद्यार्थी काही प्रमाणात शिक्षकांकडून, काही प्रमाणात स्वत:च्या बुद्धिमत्तेला अनुसरून, काही प्रमाणात आपल्या सहयोगी विद्यार्थ्यांकडून तर उरलेले सगळे आपल्या आयुष्याकडून शिकत असतो.
ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून शिक्षणाची व ज्ञानाची व्याख्या करायची ठरवल्यास ती अशा प्रकारे करता येईल. ‘कोणत्याही विषयाचा अंगीभूत गुणांचा विकास होणे म्हणजे शिक्षण’. ‘कोणताही विषय जाणून घेऊन, त्या जाणण्याचे प्रकटीकरण होणे, त्या विषयाच्या अस्तित्वाची जाणीव होणे म्हणजे ज्ञान.’ दहावी/ बारावीच्या टप्प्यावर अथवा गॅ्रज्युएट झाल्यानंतरच्या टप्प्यावर शाखा निवड करताना त्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्याच्याच माध्यमातून पुढे अर्थार्जन आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे, कारण विद्यार्थी शिक्षण एका शाखेचे घेतात आणि पुढे अर्थार्जन करताना त्यांचे माध्यम बदलते. अशा गोष्टींची कारणे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळवता येतात- कारण कुंडलीत शिक्षण शाखा ठरवणारे आणि अर्थार्जन ठरवणारे ग्रह भिन्न असतील तर असा बदल होऊ शकतो. तसेच दशांमध्ये मोठा बदल असेल तर असा बदल होऊ शकतो, म्हणून शाखा निवड करताना शिक्षण आणि अर्थार्जन यांचा समन्वय साधणे गरजेचे असते.  
कुंडलीच्या माध्यमातून शिक्षणाचा विचार करताना,
१)     शाखा निवड (दहावी/ बारावीनंतर).
२)     शाखा निवड – उच्च शिक्षणासाठी.
३)     पदवी शिक्षणातील यश – अपयश.
४)     परीक्षेचा अंदाज/ मार्काचा आढावा.
५)     विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज.
६)     व्यवसायाभिमुख शिक्षण.
या सर्व गोष्टींचा विचार करता येतो. परंतु हे सर्व प्रश्न वेगवेगळे हाताळावे/ अभ्यासावे लागतात.
शिक्षण – अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून बारा भावांचा विचार :
जन्म-लग्नकुंडलीवरून शाखा निवड करताना पुढील पद्धतीने विचार केला जातो.
१) पंचम स्थान : पंचम स्थान हे दैव त्रिकोणातील स्थान आहे. या स्थानावरून बुद्धी, विद्या, प्रज्ञा याचा विचार केला जातो. प्रत्येक जण आपली विशिष्ट अशी बुद्धी घेऊन येतो, त्याचप्रमाणे आपला बुद्धीचा कल, आवड, कलागुण या गोष्टी बदलता येत नाहीत. या स्थानावरून विविध कलागुणांचा, कल्पनाशक्तीचा विचार होतो. या गोष्टी उत्स्फूर्त म्हणजे अंतर्भूत असतात. आपल्याकडे असलेल्या बुद्धीचा वापर करून आपण शिक्षण घेत असतो आणि याच शिक्षणातून पुढे अर्थार्जन करायचे असते, नोकरी करायची असते, म्हणून पदवीची गरज असते. म्हणून पदवीचा विचार करताना, शाखा निवड करताना पंचम स्थान हे मुख्य स्थान होते. पंचमावरून पदवीचा, पोट भरवणाऱ्या विद्येचा विचार होतो. त्याचप्रमाणे शिक्षणातील सहजता, अडथळे, अपयश यांचा विचार होतो. यासाठी पंचमातील ग्रह, पंचमेश, पंचमेशाची स्थिती यांचा विचार होतो.
२) चतुर्थ स्थान : चतुर्थ स्थान हे प्रमुख विद्येचे स्थान आहे. जातक मातेच्या पोटात असताना गर्भावर झालेले संस्कार, आईने केलेले संस्कार, घरातून मिळालेले ज्ञान यांचा विचार चतुर्थ स्थानावरून होतो. अनेक वर्षांपूर्वी मुले १०-१२ वर्षांची होईपर्यंत त्यांना घरातून ज्ञान मिळायचे, घरातून विद्या मिळायची, त्यानंतर मुले घरापासून लांब गुरुगृही जायची आणि अध्ययन करत असत. कालानुसार संकल्पना बदलतात, म्हणून चतुर्थ स्थानावरून आपण आता प्राथमिक शिक्षणाचा म्हणजे दहावी/ बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा विचार करतो. बारावीनंतरच खरी शिक्षणाची दिशा ठरत असते आणि पदवी शिक्षण सुरू होते. दहावी/ बारावीपर्यंतच्या शिक्षणात पाठांतराचा भाग जास्त असतो, घोकमपट्टी जास्त असते. त्याचप्रमाणे हे दशमाच्या समोरचे स्थान आहे, म्हणजेच कर्माला प्रतिसाद देणारे स्थान आहे, म्हणून चतुर्थावरून व्यवसायाभिमुख शिक्षणाचा/ टेक्निकल कोर्सेसचा विचार केला जातो. चतुर्थाचे शिक्षण हे डिप्लोमा, कोर्सेस/ सर्टिफिकेशन या स्वरूपात असते. त्याचप्रमाणे षष्ठाचे लाभ स्थान आहे, म्हणून नोकरीतील लाभ मिळवण्यासाठी जे कोर्सेस अथवा सर्टिफिकेशन घेतले जाते त्याचाही विचार चतुर्थावरूनच होतो. त्याचप्रमाणे हे पंचमाचे व्ययस्थान आहे, म्हणजे पदवी शिक्षणातील यशापयश चतुर्थावरून बघितले जाते.
३) नवम स्थान : पंचमाचे पंचम स्थान, म्हणजे शिक्षणाची पूर्तता, उच्चशिक्षण नवम स्थानावरून बघितले जाते. पदवी घेतल्यानंतर ज्याप्रमाणे अर्थार्जनासाठी त्याचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे उच्चशिक्षणाचा संबंधदेखील नोकरी/ व्यवसायाला पूरक ठरतो. नवम स्थान हे दैव स्थान आहे, भाग्य स्थान आहे. दैवाची साथ असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीतील खरे अथवा अपेक्षित यश मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे उच्चशिक्षण पूर्ण होण्यासाठी दैवाची साथ असणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी परदेशगमन करताना नवम स्थान प्रमुख होते. उच्चशिक्षणाच्या टप्प्यावरदेखील शाखा निवडण्याचा, आपल्या आवडणाऱ्या क्षेत्रातील शिक्षण घेण्याची जातकाला एक संधी उच्चशिक्षणाच्या माध्यमातून मिळत असते.
४) लग्न स्थान : लग्न स्थान हे पंचमाचे भाग्य स्थान आहे, तर नवमाचे पंचम स्थान आहे. लग्न स्थानावरून जातकाची महत्त्वाकांक्षा, जीवनशक्ती, आशावाद, ध्येये/ स्वप्ने यांचा बोध होत असतो. हे स्थान पंचमाला आणि नवमाला पूरक ठरणारे स्थान आहे. जातकाच्या महत्त्वाकांक्षा, ध्येये, आशावाद हा त्याच्या बुद्धीशी निगडित, इच्छाशक्तीशी निगडित असतो आणि दैवाची साथ घेऊन जातक ती पूर्ण करत असतो, म्हणून शिक्षण पूर्ण होताना पंचमाच्या भाग्याची म्हणजे दैवाची साथ गरजेची असते.्र शाखा निवड करताना, शिक्षण पूर्ण होण्यासाठी, पुढे शिक्षण – व्यवसायातील आणि नोकरीतील प्रगतीसाठी जातकाच्या महत्त्वाकांक्षा, ध्येये महत्त्वाची होतात.

शाखा निवड :
दहावी-बारावीच्या टप्प्यावर अथवा उच्चशिक्षणाच्या टप्प्यावर शाखा निवड करताना पुढील गोष्टी विचारात घेणे गरजेचे असते.
१) शिक्षण शाखा ठरविताना ५, ४, ९, १ हे प्रमुख भाव होतात म्हणून या स्थानातील ग्रह कोणत्या भावांचे स्वामी आहेत, या भावांचे शुभाशुभत्व, वरील भावांचे स्वामी कोणत्या स्थानात आहेत, त्यांची स्थिती, योगपरत्वे या भावेशांचा संबंध बघणे गरजेचे असते.
२) शाखा निवड करताना प्रथम चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान या दोन्ही स्थानांपैकी कोणत्या स्थानाची बलवत्ता आहे हे तपासावे लागते.
३) चतुर्थ अथवा पंचम स्थानाची बलवत्ता दोन गोष्टींसाठी उपयोगी ठरते. चतुर्थ स्थानाची बलवत्ता असल्यास जातक आपले प्राथमिक शिक्षण अतिशय यशस्वीरीत्या पूर्ण करतो. तसेच तो शिक्षण घेताना चतुर्थ स्थानाशी निगडित शिक्षण, कोर्सेस, डिप्लोमा यांसारखे शिक्षण तो घेऊ शकतो. पंचम स्थानाची बलवत्ता असेल, शुभ स्थितीत असेल तर जातक बुद्धिमान असतो, शिक्षण पूर्ण होते आणि तो पदवीचा (पदवी शिक्षणाचा) मार्ग निवडू शकतो.
४) शाखा निवड करताना शिक्षणाच्या स्थानाचे स्वामी आणि अर्थार्जनाचे स्वामी यांचा परस्पर संबंध ठरवून, शाखा अर्थार्जनाच्या भावांचा परस्पर संबंध असता (हा संबंध योग, दृष्टी, नक्षत्रपरत्वे पूरक ठरतो.) शाखा ठरविणे सोपे जाते.
५) शाखा ठरविताना प्रत्येक लग्नाचे, शिक्षणाचे आणि अर्थार्जनाचे स्वामी विचारात घेऊन आणि त्यांचा परस्पर दृष्टी/ योग/ नक्षत्रपरत्वे संबंध पाहून शाखा निवडावी लागते. अग्नितत्त्वाच्या आणि वायुतत्त्वाच्या लग्नांचा विचार करताना त्यांचे शिक्षणाचे आणि अर्थार्जनाचे स्वामी वेगळे ग्रह येतात. या लग्नात अर्थार्जन आणि उद्योग त्रिकोणाचे स्वामी हे एकच ग्रह येतात. अशा वेळी दोन गोष्टींची शक्यता वर्तवता येते.
अ) या लोकांचे शिक्षण एका विशिष्ट ग्रहांच्या माध्यमातून होते आणि अर्थार्जन वेगळ्या ग्रहांच्या माध्यमातून होते. म्हणजे या लग्नाचे जातक शिक्षण वेगळे घेतात आणि त्यांचे अर्थार्जनाचे माध्यम वेगळे असते. पदवीचा अर्थार्जनाशी संबंध नसतो.
ब) दुसरा पर्याय म्हणजे या लोकांचे अर्थार्जन ज्या ग्रहांच्या माध्यमातून होणारे असते, त्याच ग्रहांच्या माध्यमातून शाखा निवड केली जाते.
क) किंवा उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर यांचा ट्रॅक बदलला जातो. उदा. इंजिनीअिरग/ टेक्निकलचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी टेक्निकल साइड सोडून एम.बी.ए.चा ट्रॅक निवडतात. पृथ्वी तत्त्वाच्या आणि जलतत्त्वाच्या लग्नांचा विचार करता या लग्नांचे शिक्षण आणि अर्थार्जनाचे ग्रह एकच असतात. त्यामुळे या व्यक्ती घेतलेल्या शिक्षणाच्या माध्यमातूनच अर्थार्जन करतात.
शिक्षणाचे भाव : पंचम, चतुर्थ, नवम, लग्न.
अर्थार्जनाचे भाव : द्वितीय, षष्ठ, दशम, सप्तम.
साहाय्यकारी भाव : तृतीय, एकादश.
तृतीय आणि एकादश, सप्तम हे तिन्ही भाव इच्छादर्शक म्हणजे कामना वाढवणारे भाव आहेत. यालाच आपण काम त्रिकोण अथवा उद्योग त्रिकोण म्हणतो. हे तिन्ही भाव दैव त्रिकोणाला (१/५/९) आणि अर्थ त्रिकोणाला (२/६/१०) साहाय्यकारी ठरत असतात.
 शिक्षण अर्थार्जनाचे ग्रह
६) प्रत्येक लग्नाचे शिक्षण/ अर्थार्जन/ साहाय्यकारी ग्रह विचारात घेऊन म्हणजे त्यांचा परस्पर संबंध पाहून, योगांचा विचार करून शाखा निवडली जाते. वरील गोष्टींना म्हणजे कुंडलीतील योगांना पुष्टी देतात, निर्णय घेताना साहाय्यकारी ठरतात, त्या जातकाच्या शिक्षण काळात चालू असलेल्या दशा आणि करिअरच्या काळातील दशा यांचाही विचार करणे गरजेचे असते.
७) शिक्षण देताना प्रत्येक जातकाला आपण दोन/ तीन पर्याय द्यावे लागतात अथवा देता येतात. शास्त्राच्या माध्यमातून ग्रहांच्या कारकत्वांचा विचार करता प्रत्येक ग्रहाच्या विविध गुणांचा (०४ं’्र३्री२) विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे शाखा निवड ही एका ग्रहाच्या माध्यमातून ठरविता येत नाही. यात दोन-तीन ग्रहांचा समुच्चय असतो, म्हणजे हे ग्रह परस्परांच्या साहाय्याने फलित देत असतात. उदा. शुक्र-कला, सृजनशीलता, जीवशास्त्र, शरीरातील रस धातू इ. मंगळ-कृती गणित, जोम, उत्साह, तांत्रिक ज्ञान इ. शुक्र व मंगळाचा दृष्टी संबंध कला क्षेत्र, इंजिनीअरिंग यात सॉफ्टवेअर, शरीरशास्त्र यासाठी उपयोगी ठरेल.
८) शिक्षणाच्या भावांचे स्वामी कोणत्या राशीत आहेत आणि कोणत्या भावात आहेत यांचाही विचार करणे महत्त्वाचे असते. ग्रह, भाव आणि राशीच्या माध्यमातून परिणाम करत असतात. ग्रह कोणत्या तत्त्वाच्या राशीत पडला आहे, याचा विचार केल्यास त्या तत्त्वाच्या माध्यमातून आपली कारकत्वे म्हणजेच गुण/ अवगुण प्रगट करत असतो.
अ) चर तत्त्व : चाकोरीपेक्षा वेगळे करण्याची इच्छा, संशोधक वृत्ती, सतत बदल अपेक्षित असतात, परिस्थितीला भेदून पुढे जाण्याची, आव्हाने स्वीकारण्याची वृत्ती असते, उद्योगाची आवड, उत्पादक वृत्ती.
ब) स्थिर तत्त्व – चिकाटी, सोशिकता, प्रतिकार शक्ती, चालक/ वाहक, परंतु ‘मी’पणा जास्त, इतरांचे वर्चस्व जास्त सहन होऊ शकत नाही, म्हणून मालक/ लीडर होण्याची वृत्ती, जीवनात बदल हे विचार करून अथवा विलंबाने घेतले जातात, आहे त्या परिस्थितीत राहण्याची सवय (चांगला/ वाईट दोन्ही परिणाम), सातत्य, चर तत्त्वाने योजना आखाव्यात आणि त्याची अंमलबजावणी स्थिर तत्त्वाने करावी.
क) द्विस्वभाव तत्त्व : चर आणि स्थिर या दोन्ही मधला पर्याय म्हणून दोन्ही तत्त्वांचे गुणधर्म आढळतात व काही गोष्टींचा अभावदेखील आढळून येतो. धरसोड वृत्ती, रिस्क कमी घेतली जाते, घेतल्यास आवाक्याच्या बाहेर घेण्याची वृत्ती, अनेक गोष्टी करण्याची इच्छा, क्षमता असते. परंतु त्या मानाने प्रयत्न करण्याची, कष्ट घेण्याची वृत्ती नसते.
प्रत्येक राशीला पंचमहाभुतांच्या तत्त्वांचा आधार आहे. त्यामुळे राशींमध्ये हे गुणधर्म दिसून येतात.
अग्नितत्त्व : मेष, सिंह, धनू. अग्नीतत्त्वाकडे तेज, कार्यक्षमता, कर्तव्यकठोरता आहे. ठरवलेले कार्य पूर्ण करण्याची क्षमता आहे. ज्या क्षेत्रात अधिकार, मान-सन्मान आहेत, स्वत:चे अस्तित्व टिकून राहील, आपल्या कार्यप्रणालीचे कौतुक होईल अशा क्षेत्रात काम करायला आवडते. बुद्धीशी निगडित क्षेत्रात, टेक्निकल, शौर्य क्षेत्रात अग्नितत्त्व दिसून येते.
पृथ्वीतत्त्व : वृषभ, कन्या, मकर. पृथ्वीतत्त्वाकडे उत्तम सौंदर्यदृष्टी आहे. सोशिकता, स्थिरता आहे. निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे लपवून ठेवणे, हातचे राखून ठेवण्याची वृत्ती आहे. त्यामुळे या तत्त्वाचा वापर व्यापार, कलाक्षेत्र, निर्मिती क्षेत्रात, अर्थक्षेत्रात दिसून येतो.
वायुतत्त्व : मिथुन, तूळ, कुंभ. वायुतत्त्व बौद्धिक गुणांचे आहे. तरीदेखील चंचलता, अस्थिरता, अनेक गोष्टी सामावून घेण्याची क्षमता आहे. मनस्वीतता आहे, त्यामुळे बौद्धिक क्षेत्रात, कल्पनाशक्तीचा वापर ज्या क्षेत्रात आहे अशा ठिकाणी वायुतत्त्व उपयोगी पडते. परंतु सातत्य, स्थैर्य टिकून राहात नाही.
जलतत्त्व : कर्क, वृश्चिक, मीन. जलतत्त्व प्रवाही आहे, या तत्त्वाकडे समर्पणाची भावना असते. ठरवलेले कार्य पूर्ण करण्याची वृत्ती असते. पाणी प्रवाही असले तरी बांधून ठेवण्याचे काम तेच करते. त्यामुळे ज्या क्षेत्रात झोकून देऊन काम केले जाते, परिणामांचा विचार केला जात नाही अशा क्षेत्रात म्हणजे रिसर्च, आव्हाने असणाऱ्या क्षेत्रात याचा संबंध येतो. अग्नी आणि जलतत्त्वाच्या राशी शिक्षणासाठी म्हणजे शिक्षणाचे स्वामी या राशीत असता त्यांचा शुभ परिणाम दिसून येतो. पृथ्वी आणि वायुतत्त्वाच्या राशी शिक्षणापेक्षा व्यापाराला अथवा अर्थकारणाला पूरक होतात.
 ९) करिअर ठरवताना शिक्षणाच्या भावाचे स्वामी हे महत्त्वाचे होतात. शाखा ठरविताना तो ग्रह कोणत्या राशीत/ कोणत्या भावात/ कोणत्या तत्त्वात पडलेला आहे, याचा विचार करावा. तो ग्रह उच्च/ नीच/ शत्रू/ स्वगृही याचा विचार शाखा ठरविताना योग्य ठरत नाही. उदा. शनी मेष राशीत निचीचा होतो. सिंह/ वृश्चिक/ कर्क राशीत शत्रू राशीत असतो. शनी शाखा ठरविण्यास महत्त्वाचा असेल तर तो कोणत्या क्षेत्री आहे, यानुसार शिक्षण होताना, पूर्ण करताना परिणाम देईल. परंतु राशींच्या तत्त्वानुसार, त्याच्या स्थानानुसार शाखा ठरविण्यास पूरक होईल. मेष/ सिंह शनी-टेक्निकल, मेडिकल शिक्षणाला पूरक होईल. वृश्चिक/ कर्क-कॉमर्स, बायो, संशोधन, फार्मा यांसारख्या क्षेत्राला पूरक होईल.
१०) शिक्षणाच्या अथवा अर्थार्जनाच्या स्थानात राहू, केतू, हर्षल, नेपच्यून असता त्यांचाही विचार करणे गरजेचे असते. हे ग्रह रवी ते शनी यापैकी कोणाच्या युतीत आहेत अथवा कोणत्या ग्रहांशी शुभाशुभ योग करत आहेत, ते कोणत्या नक्षत्रात आहेत हे पाहणे गरजेचे असते.
११) ग्रह, राशींच्या तत्त्वानुसार, स्थानानुसार, दृष्टी अथवा परस्पर संबंधांनुसार ज्याप्रमाणे परिणाम करतात त्याप्रमाणे ते कोणत्या नक्षत्रात आहेत हे बघणे गरजेचे असते. ग्रह नक्षत्रपरत्वे फलित देताना ते नक्षत्राच्या गुणधर्मानुसार परिणाम घडवितात, त्याचप्रमाणे तो ग्रह ज्या नक्षत्रात आहे तो ग्रह कोणत्या भावाचा स्वामी आहे, त्या भावाच्या कारकत्वानुसार काम करतात. उदा. पंचमेश षष्ठेशाच्या नक्षत्रात आहे. पंचमेश बुध षष्ठेश चंद्राच्या श्रवण नक्षत्रात. चतुर्थेश शुक्र स्वत:च्या/ भाग्येश शुक्राच्या पूर्वाषाढा नक्षत्रात. एखादा ग्रह राहू-केतूच्या नक्षत्रात असता, राहू-केतू ज्या स्थानात आहेत, त्या भावाच्या कारकत्वानुसार परिणाम देतात.
१२) रवी ते शनी आणि राहू-केतू हे सत्तावीस नक्षत्रांचे स्वामी होतात. प्रत्येक ग्रहाच्या मालकीची तीन नक्षत्रे येतात. परंतु या प्रत्येक नक्षत्रात रवी ते शनी या सात ग्रहांचे गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे ही नक्षत्रे ग्रहांच्या गुणधर्मानुसारदेखील काम करत असतात.
रवी    -रोहिणी, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा. चंद्र – पुनर्वसू, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका.
मंगळ    -भरणी, पूर्वा, मघा, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा.
बुध    -कृत्तिका, विशाखा.
गुरू    -अश्विनी पुष्य, हस्त.
शुक्र    -मृग, चित्रा, अनुराधा, रेवती.
शनी    -आर्द्रा, आश्लेषा, ज्येष्ठा, मूळ.
(कुंडली पाहा)
शिक्षणाच्या स्थानाचे स्वामी रवी, चंद्र, गुरू, मंगळ (५/ ४/ ९/ १).
शाखा ठरविताना :
पंचमात मंगळ, हर्षल, प्लुटो – मंगळ लग्नेश व अष्टमेश – जातकाची बुद्धिमत्ता उत्तम, अष्टमेश पंचमात शिक्षणात अडचणी परंतु प्रोफेशन शिक्षणातून करता येणार. मंगळ व हर्षल केतूच्या मघा नक्षत्रात, केतू नवम स्थानात बुद्धिमत्ता, शिक्षणाला पूरक, प्लुटो धनेश व सप्तमेश शुक्राच्या पूर्वा नक्षत्रात. मंगळाचा बुध/ शुक्राशी नवपंचम. पंचमेश रवी, द्वितीयात वृषभ राशीत (इथे तो शत्रू राशीत आहे असा विचार करावयाचा नाही.) रवी द्वितीयात म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून अर्थार्जन. रवी पृथ्वीतत्त्वात/ स्थिर राशीत – रवी चतुर्थेश चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात-शिक्षणाला पूरक-भौतिकशास्त्र, कला, अ‍ॅग्रीकल्चर, भाषा, स्थापत्य, आयुर्वेद, मॉडेिलग पूरक. चतुर्थेश चंद्र षष्ठात, कन्या राशीत, पृथ्वीतत्त्वात, द्विस्वभाव राशीत आहे. चंद्र पंचमेश रवीच्या उत्तरा नक्षत्रात आहे. पंचमेश/ चतुर्थेश/ दशमेश-लाभेश (रवी-चंद्र-शनी नवपंचम योग) उत्तरा नक्षत्र विद्याव्यासंगी, शेतकी अभ्यास, संशोधन, वकील यासाठी पूरक. भाग्येश गुरू, व्यय स्थानात, मीन राशीत, जलतत्त्वात, द्विस्वभाव राशीत आहे. षष्ठ आणि व्ययस्थाने वैद्यकशास्त्र, फार्मा, वकिली, सरकारी नोकरी इ.साठी पूरक. गुरू रेवती नक्षत्रात आहे. रेवती नक्षत्र शेती अभ्यास, वाणिज्य शाखा, कला क्षेत्र, वनस्पतीशास्त्र यासाठी पूरक आहे.
(जातक आयुर्वेदिक डॉक्टर/ वैद्य आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा