वास्तुशास्त्रावर आज उपलब्ध असलेले अनेक प्राचीन ग्रंथ बघितले की लक्षात येतं की आपल्याकडे हे शास्त्र किती पूर्वीपासून विकसित झालेलं आहे. वास्तुशास्त्रावरील अशा ग्रंथांचा आढावा-
मानवी संस्कृतीचा विकास जसजसा होत गेला त्याचसोबत भाषाशास्त्र आणि कलागुणांचा आविष्कार घडत गेला, त्याचाच एक भाग म्हणून वास्तुकलेचा आविष्कार आकार घेऊ लागला आणि त्याचेच विकसित रूप आज आपण पाहत आहोत. या जडणघडणीत एक परंपरा निर्माण झाली आणि त्या परंपरेची शृंखला बनली. अशाच एका परंपरेचा उल्लेख मत्स्यपुराणात येतो तो असा..    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भृगुरत्रि र्वशिष्ठस्य विश्वकर्मा मयस्तथा
नारदो नग्नजिच्चव विशालाक्ष पुरंदरा:
ब्रह्मा कुमारो नन्दीश: शौनको गर्ग येव च
वासुदेव अनिरुद्ध तथा शुक्र बृहस्पति:
अष्टादशैते विख्याता वास्तु शास्त्रोपदेशक:
(मत्स्यपुराण अ.२५२)
या प्रारंभिक कडीतून वास्तुशास्त्राची जी साहित्यनिर्मिती झाली ती ‘आधी कळस मग पाया’ या उक्तीप्रमाणे प्रारंभिक साहित्य हे शिखर गाठणारे ठरले. ज्या काळात हे घडले तो काळच मानवी सांस्कृतिक जीवनाच्या विकासातील अग्रणी ठरला. वेद, पुराणे इ.मधून जे वास्तुशास्त्राचे दाखले मिळतात ते तर महत्त्वाचे आहेतच, शिवाय वास्तुशास्त्राला स्वतंत्रपणे वाहिलेली ग्रंथसंपदाही भरपूर आहे. भारतीय वास्तुशास्त्रावर हजारो पृष्ठांचे शेकडो ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. डॉ. प्रसन्नकुमार आचार्य यांनी इंग्रजीत भाषांतरित केलेला मानसार ग्रंथच तीन ते साडेतीन हजार पृष्ठांमध्ये आणि सात खंडांत विखुरलेला आहे!
ते ग्रंथ संस्कृत भाषेत असल्याने तिकडे आपल्यापकी कोणी वळत नाहीत. मात्र एक गोष्ट प्रत्येक भारतीयाने लक्षात घेतली पाहिजे की, या सर्व ग्रंथांचे भाषांतर इंग्रजीत जरूर झालेले आहे! याचा अर्थ भारतीयांपेक्षा विदेशी लोक या आपल्या सर्वच शास्त्रांचा व ज्ञानाचा सखोल अभ्यास करीत आहेत. नुसता अभ्यास नाही, तर त्यातील त्यांना कळलेल्या तत्त्वांचा वापर ते करीत आहेत. जे साहित्य त्या काळात जन्माला आले तसे दर्जेदार साहित्य पुन्हा जन्मास घालणारे त्या क्षमतेचे महापुरुष जन्माला आले नाहीत. त्यामुळे जी साहित्य-कलाकृती त्या काळात जन्मास आली तो काळ एकमेवाद्वितीय या श्रेणीत मोडणारा ठरला.
या ग्रंथांच्या महत्तेची उदाहरणे पाहूनही आपल्याला कल्पना येईल. वर उल्लेखिलेला मानसार हा ग्रंथ इसवी सन पूर्व या काळातला. या ग्रंथात सोळा सोळा मजल्यांचे आíकटेक्चरल प्लान उपलब्ध आहेत. मान म्हणजे परिमाण व सार म्हणजे विचार.  काय गरज होती त्यांना त्या काळात इतक्या मजल्यांचा विचार करण्याची? अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास करू जाता त्यांची विचारांची व बुद्धिमत्तेची झेप लक्षात येते. बरे हे सर्व ग्रंथ हजार वर्षांपूर्वीचे आहेत, तर त्यांचा आजच्या युगात उपयोग होतो का? तर हो! निश्चित होतो. गेल्या तीस-चाळीस वर्षांतील वास्तुशास्त्रावरील पुस्तकांबद्दल मी बोलत नाही. गरसमज झाले आहेत ते या अलीकडच्या ग्रंथांमुळेच. ज्याने त्याने आपापले वास्तुशास्त्र निर्माण केले. नुसते निर्माण केले नाही तर हेच खरे आहे असे मानण्याचा ते आग्रह धरू लागले. त्यामुळे सर्वसामान्यांना कोणाचे खरे मानायचे, हा प्रश्न पडू लागला. असा प्रश्न या मूळच्या ग्रंथांबाबत येत नाही हे वैशिष्टय़!
त्या अनेक ग्रंथांपकीच वास्तुशास्त्राचा परमश्रेष्ठ ठरलेला एकमेव ग्रंथ म्हणजे सूर्यसिद्धांतकार मयासुराने लिहिलेला ‘मयमतम’ होय. वास्तुशास्त्राबद्दल आणखीन माहिती देणारा या विषयाचा प्रमाण ग्रंथ ठरावा अशा श्रेणीतला हा ग्रंथ आहे. दुसरा प्रमाण ग्रंथ लिहिला गेला तो ‘विश्वकर्मा वास्तुशास्त्र’ आणि ‘अपराजित पृच्छ:’. या प्रमुख ग्रंथाला प्रमाणभूत मानून अनेक वास्तुग्रंथ नंतरच्या काळात लिहिले गेले. त्यापकी महत्त्वाचे म्हणजे समराङगण सूत्रधार, मानसारम, वास्तुविद्या, शिल्परत्न, राजवल्लभ, मनुष्यालय चंद्रिका.. कितीही नावे देता येतील. कलासक्तीचे समृद्ध दालन यात ओतलेले तर आहेच, त्याचबरोबर उच्च संस्कृतीची जपवणूक करणारी सूत्रे चाकोरीबद्ध पद्धतीने मांडली आहेत. गुड, बेटर, बेस्ट या श्रेणीची प्रत्यक्ष मांडणी वास्तुग्रंथात रुजलेली पाहावयास मिळते.
ज्या काळात ‘मयमतम’ ग्रंथ लिहिला गेला तो काळ अन्य देशांसाठी वास्तुसंकल्पना समजावून घेणेदेखील कठीण होते. आजही मयमतमद्वारे निर्देशित ‘नगररचना’ अनुसरणे जगाला किती आवश्यक आहे, हे ‘तो ग्रंथ’ वाचणाऱ्यांच्याच लक्षात येऊ शकेल. नगराला चारही बाजूने ‘परकोट वॉल’ बांधून मर्यादित ठेवल्याने लोकसंख्या वाढीचे भूत त्या ठरावीक मर्यादेच्या पलीकडे जाऊ देत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा आणि पुरवठय़ाच्या अन्य बाबी मर्यादेचे उल्लंघन करण्यास मज्जाव करते. त्यामुळे महत्तम मर्यादेच्या आत सर्व काही आलबेल असणे आणि त्यात कोणती झाडे असावीत वा नसावीत आणि ती कोणत्या दिशेला असावीत-नसावीत याचा विवेकपूर्ण विचार वास्तुशास्त्राद्वारे केला गेला आहे. समराङगण सूत्रधार (नगर निवेश) आणि वृक्षायुर्वेद हे दोन ग्रंथ या विषयाला समíपत आहेत.
वास्तुशास्त्राचा विवेकपूर्ण विचार करताना एकविसाव्या शतकातील विज्ञानयुगातील प्रतीकांचा विचार करणे तारतम्याचा वापर करून गुंता कसा सोडवता येतो हे खालील उदाहरणाच्या आधारे आपण पाहू.
पूर्वीच्या काळी, आतासारखे घरात अटॅच्ड बाथरूम-संडास नव्हते. त्यामुळे घरात बाथरूम-संडास कोठे असावेत याचा उल्लेख जुन्या ग्रंथात आढळत नाही. त्यामुळे संडासचे भांडे कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या दिशेला मुख करून बसवावे याबद्दल विचारणा केली जाते. त्याचा आयुर्वेद ग्रंथात उल्लेख आढळतो तो असा-
जगातल्या १८ देशांत नर्ऋत्येकडून ईशान्येकडे हवा वाहते. या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी भारतातील लोक सकाळच्या वेळी मोकळ्या मदानात हवेला पाठ करून (पूर्वेला किंवा उत्तरेला मुख करून) शौचास बसतात, त्यायोगे पूर्वाभिमुख अथवा उत्तराभिमुख करून ते बसत असत. कालांतराने मदानी भागाऐवजी घराच्या मागील अंगणात म्हणजे परसभागात ही जागा निवडल्यामुळे शौचास गेलेत हा शब्द ‘परसाकडे’ गेलेत या शब्दाने संबोधित करू लागले. परस म्हणजे मागचे अंगण. कालांतराने ही जागा अटॅच्ड बेडरूममध्ये स्थित्यंतर झाल्यामुळे आता बाहेरच्या हवेच्या दिशेचा जो संबंध जोडला गेला होता तो निकाली निघाला. तरी लोक विचारतात की घरातील स्वच्छतागृहाच्या भांडय़ाची दिशा कशी ठेवावी? त्यास उत्तर एकच देता येईल की आता अटॅच्ड बाथरूममध्ये भांडय़ाची दिशा कोणत्याही दिशेकडे ठेवता येते.
वास्तुशास्त्राचा उद्भव पृथ्वीच्या जन्मापासून जोडला गेला आहे. तत्तिरीय ब्राह्मण ग्रंथातील खालील संदर्भ पाहा-
पृथ्वीचे दोन गोलार्धात विभाजन केल्यास तिचा उत्तर गोलार्ध कृत्तिका नक्षत्रापासून प्रारंभ करून विशाखापर्यंत देवनक्षत्रांच्या प्रभावाखाली शुभ प्रभावात राहतो. याउलट, दक्षिण गोलार्ध अनुराधा नक्षत्रापासून भरणी नक्षत्रापर्यंत यम नक्षत्रांच्या प्रभावामुळे विपरीत प्रभावाखाली अशुभ प्रभावाच्या दडपणाखाली राहतो. याचा परिणाम वास्तुवरदेखील उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धात अडकलेल्या देवनक्षत्र आणि यमनक्षत्रांच्या प्रभावामुळे होतो. भवनाचा जो प्रभाग देव नक्षत्रांच्या प्रकाश किरणांमुळे प्रभावित होतो तो उत्तम अवस्थेला प्राप्त होतो. याउलट यम नक्षत्राच्या प्रभावाखाली राहणारा भाग विवंचनेत अडकून पडतो. उत्तर गोलार्धातील देशांची स्थिती दक्षिण गोलार्धातील देशांशी तुलना करून पाहिल्यास हे चित्र स्पष्ट उमजण्यास वेळ लागत नाही.