गेल्या दोन-तीन महिन्यांपासून देशात गाजत असलेली निवडणूक अखेर संपली. ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो निकालसुद्धा लागला. याआधी कितीतरी निवडणुका अनुभवल्या असल्या तरी या वेळचा अनुभव जरा वेगळाच होता. सज्ञान होऊन आठ-दहा वर्षे झाली, दोन-तीन वेळा मतदानसुद्धा करून झालं पण या वेळचा मतदानाचा उत्साह जबरदस्त होता. जणू काही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही माझ्या एका मतानेच हादरणार होती. तसा निवडणुकीशी आमचा संबंध फार जुना आहे. म्हणजे अगदी मतदानाचा हक्क मिळायचा होता तेव्हापासून!! मग ती निवडणूक नगरपालिकेची असो की लोकसभेची. कोणत्या तरी एका निवडणुकीच्या वेळी गल्लीतल्या आम्हा सगळ्या मुलांमध्ये प्रचारपत्रकं गोळा करण्याची स्पर्धा लागली होती. म्हणजे अक्षरश: भोंगा लावून प्रचार करत फिरणाऱ्या ऑटो किंवा टांग्याच्या मागे धावत जाऊन आम्ही पत्रकं गोळा करायचो. अर्थात त्या वेळी पक्ष कोणता, उमेदवार कोणता याचा विचार आम्ही करत नव्हतो. पंजा, कमळ, धनुष्यबाण, नांगर, शिलाई मशीन, टीव्ही, दगड, माती-धोंडे.. इ. सगळ्या निवडणूक चिन्हांची पत्रकं आम्ही जमवली होती. (‘साहेब, त्या वेळी घडय़ाळ अस्तित्वात यायचं होतं म्हणून ते आणू शकलो नाही. कृपया आमच्या गावातील धरणांवर याचा राग काढू नका!! ’ आणि हो! त्या वेळी ‘झाडू’ चा जन्मदेखील व्हायचा होता हेदेखील सांगायला हवं नाहीतर आम्ही सगळे अंबानीचे एजंट आहोत असे आरोप ‘सामान्य माणूस’ करेल. त्या काळात रेल्वे इंजिनसुद्धा रस्त्यावरील टोलनाक्यावरून न धावता रुळावरूनच धावायचं म्हणून तेसुद्धा घरी आणू शकलो नाही!! )
त्या वेळी मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान केलं जायचं. मतमोजणीला २-३ दिवस लागायचे. मतपत्रिका वापरून मतदान करण्याची माझी फार इच्छा होती. पण आम्ही एकविसाव्या शतकातले मतदार असल्यामुळे हे शक्य झालं नाही. आम्हाला मतदानाचा हक्क मिळाला तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक’ मतदानाचं युग सुरू झालं होतं. तसा आधुनिकीकरणाला किंवा संगणक युगाला माझा विरोध नाहीये. पण तरी कोणतीही गोष्ट इलेक्ट्रॉनिक झाली ना की मला जरा भीतीच वाटते. या वेळी मतदानाच्या दिवशी तर मला फार टेन्शन आलं होतं. नेमकी आपल्याच वेळी ती व्होटिंग मशीन बंद पडली किंवा खराब झाली तर काय? असा प्रश्न हजार वेळा माझ्या मनात येऊन गेला. पण माझी ही शंका लगेच दूर झाली. आजकाल व्होटिंग मशीन व्यवस्थित काम करते आहे की नाही हे बघायला उमेदवार स्वत: मतदान कक्षात येऊन जातात म्हणे. इतकंच काय तर आपल्या पक्षाचं चिन्ह पाचपन्नास वेळा दाबून ते खात्रीसुद्धा करून घेतात. मग माझी काळजी दूर झाली!!!
गेल्या महिन्याभरात देशभरात प्रचाराचा नुसता धुरळा उडत होता. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या नेत्यांची भाषणं ऐकून दमायला झालं होतं पण यातला नेमका कोण खरा हे कळत नव्हतं. एका नेत्याला तर देशातील महिलांची इतकी काळजी वाटत होती की त्याच्या प्रत्येक भाषणात, ‘महिला सक्षम झाल्याच पाहिजे’ हाच मुद्दा वारंवार येत होता. म्हणजे त्याला देशातील वीजप्रश्न, पाणीप्रश्न, अर्थव्यवस्था, जातीयवाद वगैरे काहीही प्रश्न विचारले तरी, ‘महिला सक्षम झाल्याशिवाय हा देश सुधारणार नाही’ असंच उत्तर यायचं. आता महिला सक्षम करणार म्हणजे काय प्रत्येकीच्या हातात बंदूक देणार का? असा प्रश्न मला पडला. (खरंच असं झालं तर घरातल्या मोलकरणीलासुद्धा, ‘मावशी, उद्या जरा लवकर याल का? असं विचारताना आधी चिलखत घालावं लागेल). कदाचित त्या नेत्याने लहानपणापासूनच त्याच्या घरी आजी, आई, बहीण यांचाच हुकूम चालतो असं बघितलं असेल. त्यामुळे देशातील सगळ्या पुरुषांचा रोल फक्त स्वत:च्या कुटुंबांना ‘आडनाव’ देण्यापुरताच मर्यादित असावा असं त्याला वाटत होतं. पण एका गोष्टीत मात्र या नेत्याचं खूप आश्चर्य वाटायचं. स्वत: अज्ञान निरागसतेच्या नावाखाली लपवायचा प्रयत्न करताना बाकी सगळ्या जगातसुद्धा अज्ञान पसरलं आहे, अशी त्याची ठाम समजूत होती. त्याला बघितलं की ‘दीवार’ सिनेमातला एक प्रसंग आठवतो. नोकरीच्या शोधात असलेला रवी (शशी कपूर) आपल्या मैत्रिणीच्या पोलीस कमिशनर असलेल्या वडिलांना भेटायला जातो.
ते विचारतात, ‘रवी बेटा, आजकल क्या करते हो?’
स्वत:च्या बेरोजगारीची लाज वाटून रवी म्हणतो, ‘जी क्या बताऊ , मैं आजकल कुछ नही करता.’
यावर पोलीस कमिशनर म्हणतात, ‘अरे कुछ नही करते तो पुलिस में भरती हो जाओ!!!!’
तसंच काहीसं या नेत्याचं झालं असावं. ‘कुछ नही करते तो राजनीती में आ जाओ. हमारे देश को प्रधानमंत्री की बहोत जरुरत हैं !!! ’
दुसरीकडे एका नेत्यांने देशभर सभा घेण्याचा सपाटा लावला होता. ते सतत काहीतरी ‘मॉडेल’ दाखवायचे. त्यांनी स्वत:च्या निवडणूक चिन्ह बरोबरच चहाचा इतका प्रचार केला की ते निवडून आल्यावर बहुतेक चहाला ‘राष्ट्रीय पेय’ म्हणून जाहीर करतील. ते बघून करन जोहरसुद्धा आपल्या ‘कॉफी विथ करन’ कार्यक्रमाचं नाव बदलून ‘चहा विथ करन’ करणार असल्याचं ऐकलं होतं. राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचा प्रचार करण्यासाठी या नेत्याला पक्षातील इतर कोणत्याही नेत्याची गरज नाही असं जाणवत होतं. या नेत्याला बघून ‘दीवार’मधला दुसरा प्रसंग आठवतो.
एका अशक्यप्राय कामाची रणनीती आखताना विजयचा (अमिताभ बच्चन) बॉस त्याला म्हणतो, ‘विजय, तुम्हारा वहा अकेले जाना ठीक नही. क्या तुम्हे लगता हैं के ये काम तुम अकेले कर सकते हो?’.
त्यावर विजय म्हणतो, ‘नही…मैं जानता हू के ये काम मैं अकेले कर सकता हू !!! ’.
या पक्षाची प्रचार नीती ठरवताना असंच काहीसं संभाषण झालं असावं!!
हे सगळं सुरू असताना एक सामान्य माणूससुद्धा या वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. या सामान्य माणसाची कथा काय वर्णावी महाराजा!! त्याला तर देश बदलण्याची इतकी घाई झाली होती की विचारू नका.’ ‘चट मंगनी पट ब्याह’!! एवढय़ावरच तो थांबला नाही तर, लग्न झाल्यावर काही दिवसांतच म्हणजे संसार कसा करायचा हे कळायच्या आधीच बायकोशी ‘तात्त्विक’ कारणांमुळे घटस्फोट!! मग लगेच दुसऱ्या लग्नाची तयारी.. दुसऱ्या लग्नानंतर तीन-चार वर्षांतच दहा-बारा पोरांचा बाप होण्याची स्वप्न!! मग त्या पोरांना शिक्षण फुकट!! वीज फुकट!! पाणी फुकट!! अशी त्याची योजना होती. पण कोणतीही योजना घोषित करताना कुठेतरी कोपऱ्यात ‘कण्डिशन्स अप्लाय’ असं लिहायला तो विसरायचा नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचा तर हा नेता जर खेळायला आला तर पुढीलप्रमाणे नियम असतील.
१. मी सामान्य माणूस असल्याने मलाच पहिली बॅटिंग मिळाली पाहिजे.
२. माझ्या बॅटने चेंडूला नुसता स्पर्श जरी केला तरी सहा रन देण्यात यावे आणि स्पर्श न झाल्यास गोलंदाजावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात यावा.
३. मी सामान्य माणूस असल्याने प्रायोजकांनी माझ्यावर कोणताही दबाव टाकू नये आणि याआधीच्या सामन्यात कमावलेल्या पैशांचा हिशेब द्यावा.
४. अम्पायरने सगळे निर्णय मला विचारून घ्यावेत, अन्यथा तो प्रायोजकांचा एजंट असल्याचे मी जाहीर करेन.
५. मीसुद्धा प्रेक्षकांसारखाच सामान्य माणूस असल्याने माझा संघ हरल्यास प्रेक्षकांनी माझ्यासोबत पीचवरच ‘धरणे’ द्यायला बसावे.
काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा जोरात प्रचार सुरू होता. निवडणुकीच्या घोडदौडीत एक महिला नेता आपला हत्ती पुढे दामटवत होती. आता फक्त हत्तीवरून साखर वाटायचीच बाकी राहिली होती. मला तर स्वप्नात तिरंग्यात अशोक चक्रऐवजी हत्ती दिसायला लागला होता. एका राज्यातल्या राजकारणात ‘चिकन सूप आणि वडा’ असा नवीन पदार्थ तयार झाला होता. प्रादेशिक पक्षांची एक गोष्ट अनाकलनीय असते. दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये जरा काही झालं की यांना डायरेक्ट पंतप्रधानपदाची स्वप्न पडू लागतात आणि अशी मोठी स्वप्न बघितली की रेल्वे किंवा कृषी मंत्रिपद तरी मिळूनच जाते!!
असो. तर निवडणुकीची आणि प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. नवीन सरकार आमच्या मनासारखं असेल की नाही हा मुद्दा आता गौण आहे. एकशे वीस कोटी सामान्य जनता सरकारकडे आशेने बघते आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे एक आव्हानच आहे. मुळात सामान्य माणसाच्या अपेक्षा फार कमी असतात. पण वर्षांनुवर्षे त्या कोणीच पूर्ण न केल्याने आता त्या डोंगराएवढय़ा वाटतायेत. थोडा विचार केला तर सामान्य माणसाच्या अपेक्षा पुढील दोन ओळींत सांगता येतील आणि थोडा प्रयत्न केला तर त्या पूर्णदेखील करता येतील!!
थोडा हैं थोडे की जरुरत हैं
जिंदगी फिर भी यहा खुबसुरत हैं!!

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…
Datta Meghe in Vidarbha politics is out of election for first time
विदर्भाच्या राजकारणातील ‘भीष्माचार्य’ प्रथमच निवडणूक चक्राबाहेर
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
Konkan has been left behind due to electing the wrong people till date says Raj Thackeray
चुकीची माणसं आजपर्यंत निवडून दिल्याने कोकण मागे पडले – राज ठाकरे
Surganas backward image will change says Dhananjay Munde
सुरगाण्याची अतिमागास प्रतिमा बदलणार, धनंजय मुंडे यांचे आश्वासन
maharashtra assembly election 2024 amol kolhe allegations bjp for online cash payment to voters
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप