आताशा पूर्वीसारखी निवडणूक निकालांची वाट पाहात बसावे लागत नाही. पूर्वी सकाळी सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरूच असायची. शिवाय त्यात नेमका स्टॅम्प मतपत्रिकेवर उमटला नसला किंवा चुकीच्या पद्धतीने घडी घातलेली असली तर त्यावरून वाद व्हायचे. अनेकदा फेरमतमोजणीही व्हायची आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी निकाल पाहायला मिळायचा; पण गेल्या काही वर्षांत भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात केली आणि चित्र पालटले. सुरुवातीस त्याला प्रखर विरोधही झाला; पण आता ही यंत्रणा पूर्णपणे स्वीकारली गेली आहे. त्यामुळे पहिल्या तासाभरातच वेगात निकाल हाती येण्यास सुरुवात होते. संपूर्ण देशभरातील निवडणूक निकालांचे चित्र अवघ्या पहिल्या दोन तासांमध्ये पुरते स्पष्ट होते. गेल्याच शुक्रवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. विविध वाहिन्यांनी देशाचे चित्र स्पष्ट करण्यासाठी त्या त्या पक्षांची प्रातिनिधिक रंगसंगती वापरली होती.. प्रथम भाजपच्या एका भगव्या ठिपक्याने सुरुवात झाली आणि मग एक एक करत हे भगवे ठिपके वाढत गेले. नंतर ते एवढे वाढले की, ते जोडले जात असल्याने भगव्या रंगाचे प्राबल्य भारताच्या नकाशावर वाढत चालले होते. सुरुवातीस दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान असे करत भगव्या रंगाचे प्राबल्य वाढत होते; पण त्यात धक्कादायक असे काहीच नव्हते, कारण ही सर्व भाजपशासित राज्ये होती. अपवाद होता तो केवळ दिल्लीचा; पण ‘आप’च्या कोलांटउडीनंतर तिथेही हे असेच अपेक्षित होते. नंतर हादरे बसले ते आसाम आणि बिहारमध्ये. इथले हादरे खूप मोठे होते. त्याचे पडसाद नंतर आणखी काही दिवस उमटत राहिले. त्याचीच परिणती म्हणून प्रथम आसाम आणि नंतर बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले. अर्थात एवढे सारे झाल्यानंतर त्याने काही परिस्थिती फारशी बदलणार नव्हती; पण मतदारांनी दिलेल्या निर्णयाच्या परिणामस्वरूप बदल किंवा सुधारणा दाखविल्याशिवाय पुढे जाणे म्हणजे मतदारांचा अपमान ठरला असता. शिवाय बिहारमधील पुढच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी किमान नैतिकता दाखविणे नितीशकुमारांना महत्त्वाचे वाटणे तसे साहजिक होते. त्याचे कारणही तसेच आहे. मतदार काँग्रेसला पुरता कंटाळलेला आहे, हे तर गेल्या दोन-तीन वर्षांत वेळोवेळी स्पष्ट झाले होते. दरम्यानच्या काळातील निवडणुकांमध्ये त्यावर शिक्कामोर्तबही झाले; पण काँग्रेसचा तोरा काही कमी झालेला नव्हता. युवराज राहुल गांधी यांना तर आगामी निवडणुकांच्या यशापासून आपण काही पावलेच दूर आहोत, असे वाटत होते. असे असले तरी काँग्रेसला मिळणाऱ्या जागा कमी असतील, अशा वेळेस सशक्त पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू होती. प्रगतीचा किंवा विकासाचा चेहरा म्हणून नितीशकुमार यांच्या नावाचा पर्याय पुढे आलेला होता; पण त्या चेहऱ्यावर बोळा फिरवण्याचे काम मतदारांनी केले! नितीशकुमार हे परिपक्व राजकारणी आहेत, असे मानले जाते. त्यांनी जनमताचा आदर, असे म्हणत पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि ते पायउतार झाले!
ज्या वेळेस बिहार आणि आसाममध्ये असे पानिपत सुरू होते त्या वेळेस महाराष्ट्रातील कथा काही वेगळी नव्हती; पण महाराष्ट्रातील या कथेसोबत एक इतिहासही रचला जात होता. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात.. कारण दुपापर्यंत टीव्ही स्क्रीनवरच्या त्या भगव्या ठिपक्याने अर्धा देश भगवा केला होता आणि महाराष्ट्राच्या इतिहासातही पहिल्यांदाच रंगबदलास सुरुवात झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या महाराष्ट्रातील जनतेचा समावेशही त्या कंटाळलेल्या जनतेमध्ये होता. बदलाची ती आस इथल्या मतदारांनीही दाखवून दिली आणि इतिहासात प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला! तोपर्यंत कर्नाटकातही रंगबदल झाला. अपवाद होता तो फक्त केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालचा; पण या सर्व ठिकाणीही एक अपवाद वगळता भाजपने खाते उघडले होते. त्यांच्यासाठी तर तोही दिग्विजयच होता!
या निवडणुकीत देशातील जुनी सत्तासमीकरणे संपुष्टात येत नवीन समीकरणे तयार झाली. म्हणून ही निवडणूक देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरू शकते. कलाटणी खरोखरच मिळणार का, या प्रश्नाचे उत्तर नरेंद्र मोदी यांच्याच हाती असणार आहे! आता विश्लेषकांनी आपापल्या परीने निकालांचे अन्वयार्थ लावण्यास सुरुवात केली आहे. काहींचे म्हणणे आहे की, या निवडणुकांनी जातपात, धर्म-पंथभेद आदी सारी समीकरणे मोडीत काढली आहेत, अन्यथा एवढे बहुमत मिळालेच नसते. तर काहींचे म्हणणे आहे की, हे सारे मतदान म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेले मतदान आहे. टूजी, कोळसा, राष्ट्रकुल हे घोटाळे काँग्रेसच्या गच्छंतीला कारणीभूत ठरले. या सर्वच मुद्दय़ांमध्ये तथ्य असले तरी यातील कोणताही एकच एक मुद्दा हा काँग्रेस आघाडीच्या या लज्जास्पद पराभवास कारणीभूत नाही, तर तो अनेकानेक बाबींचा एकत्रित परिपाक आहे, हे निश्चित; पण केवळ एवढय़ावरूनच आता भारतीय राजकारणातून जातपात हद्दपार झाली असा निष्कर्ष काढणे म्हणजे स्वत:चीच फसवणूक करून घेण्यासारखे ठरेल!
काँग्रेसविरोधातील झालेल्या भरघोस मतदानामागे असलेली मानसिकता समजून घेणे महत्त्वाचे ठरावे. पूर्वी एखादा पक्ष सत्तास्थानी आला आणि दीर्घकाळ कायम राहिला की, त्याला हलविणेही कर्मकठीण असायचे. मात्र आता काळ बदलला आहे आणि मतदारही हुशार झाला आहे, हे राजकीय पक्षांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवे. ‘मतदारांना गृहीत धरू नका’ असा इशारा जवळपास प्रत्येक राजकीय नेता आपापल्या विरोधकांना देत असतो; पण त्या वाक्याला आपण स्वत:ही किंवा आपला पक्षही अपवाद नाही, हे आता त्यांनी कायमस्वरूपी मनावर कोरून ठेवण्याची वेळ आली आहे, कारण पिढी बदलली आहे! या युवा पिढीचा एकाच जागी लक्ष केंद्रित करून राहण्याचा कालावधी कमी आहे, असे मानसशास्त्र सांगते. त्यामुळे तुम्ही बदलला नाहीत तर युवा पिढी नव्या पर्यायाकडे लगेचच वळणार, हे यापुढे सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवे.
या खेपेस निवडणुकीमध्ये तरुण मतदारांचा भरणा अधिक होता. या मतदारांची संख्या प्रत्यक्ष निवडणूक निकालांवर परिणाम घडविण्याची क्षमता राखते, फक्त त्यांनी मतदानाला खाली उतरणे आवश्यक होते, अशी परिस्थिती स्पष्ट करणारी कव्हरस्टोरीही ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केली होती. या नव्या नेतृत्वबदलामागे युवा पिढी नेमकी किती आहे, हे कळण्यासाठी तशी आकडेवारी उपलब्ध नाही, कारण किती तरुणांनी मतदान केले, याची वेगळी नोंद निवडणूक आयोग ठेवत नाही. त्यांच्याकडे स्त्री-पुरुष अशीच वर्गवारी उपलब्ध असते; पण एकूणच तरुण मंडळी प्रतिक्रिया कशी व्यक्त करतात हे पाहिले किंवा सोशल नेटवर्किंग साइट्सचा कानोसा घेतला तरी असे लक्षात येईल की, मत एकच असले तरी ते दोन प्रकारचे होते. त्याची थेट सकारात्मक किंवा नकारात्मक अशी वर्गवारी करता येत नाही. तसे करणे हेही पुन्हा एकदा स्वत:चीच फसगत करण्यासारखे असेल. एकाच वेळेस लोकांनी दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसला नाकारण्यासाठी देशभरात, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारण्यासाठी महाराष्ट्रात मतदान केले. त्याच वेळेस नवे काही तरी घडावे, अशी इच्छाही मतदारांच्या मनात होती. त्यामुळे समोर आलेल्या आणि काही नवीन आशा-आकांक्षा दाखवू शकणाऱ्या मोदी यांच्यासाठी मतदान केले. अन्यथा मुंबईमध्ये निवडून आलेले काही उमेदवार हे केवळ सेना-भाजपच्या पाठबळावर निवडून येणेही कठीण होते. लोकसभेला निवडून यावे, एवढे कर्तृत्व नव्हते. मोदी लाटेवर स्वार झाल्यानेच ते निवडून आले. ही लाट एवढी प्रभावी होती की, त्या ठिकाणी कोणत्याही नावाचे इतर कोणीही असते तरी ती व्यक्ती निवडून आली असती! ज्या वेळेस मोदी लाट असा शब्दप्रयोग केला जातो, त्याही वेळेस केवळ मोदींच्या बळावर असाच एकमेव अर्थ काढला जातो. मुळात मोदी लाटेला पाश्र्वभूमी तयार करून दिली ती, गेल्या काही वर्षांतील काँग्रेसी मुजोरीने, भ्रष्टाचाराने आणि वाढत्या महागाईने!
एरवी कोण पैसे खातो किंवा नाही याच्याशी सामान्यांना फारसे काही देणेघेणे नसते; पण महागाई टिपेला पोहोचली आणि तिचे चटके जाणवू लागले की, त्याचे जीवन अस्वस्थ होते आणि मग त्याने दिलेले फटके राजकारण्यांना सहन करावे लागतात. याही खेपेस तेच झाले. यात मोदी यांचे किंवा भाजपचे यश म्हणजे मोदींवर झालेल्या गोध्रा हत्याकांडाच्या आरोपानंतरही त्यांना यश आले. त्यासाठीची योग्य ती वातावरणनिर्मिती हे त्यामागचे खरे यश आहे.
या निकालांच्या संदर्भात आणखीही एक अन्वयार्थ लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे आघाडीच्या राजकारणालाही देश कंटाळला आहे. त्यामुळे पुन्हा आघाडय़ा आणि मग बिघाडय़ा, या समीकरणालाही देशातील मतदारांनी सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळेच आता भाजपची आणि पर्यायाने मोदींची जबाबदारी अधिक आहे. हा जनादेश गृहीत धरून त्यांनी खरोखरच ‘अच्छे दिन’ प्रत्यक्षात आणले तर जनाधार तुटलेल्या काँग्रेससाठी ही अंतिम वाटचालीची भैरवी असेल. मग सत्ता हा शब्दच त्यांना नंतरच्या १० वर्षांसाठी तरी विसरावा लागेल आणि मोदींनी सुशासनाचे आश्वासन पाळले नाही तर भविष्यात तीच अवस्था भाजपची असेल, इतकेच! कारण आता मतदार शहाणा झाला आहे, त्याला गृहीत धरू नका! ‘नो उल्लू बनािवग!’ हाच संदेश या निकालाने दिला आहे!
 

Story img Loader