बदलता महाराष्ट्र
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’च्या वतीने शिक्षण या क्षेत्रातील ‘बदलता महाराष्ट्र’ या दोन दिवसीय ज्ञानयज्ञात शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, वैज्ञानिक, संशोधक, कार्यकर्ते, शिक्षक, पालक सहभागी झाले आणि हाती आली ती बदलत्या महाराष्ट्राला ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेणारी नवी बाराखडी.
‘आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवांतून माणूस शिकतच असतो. पण मग त्यासाठी शाळेत जाण्याची गरजच काय?’ शालेय गणवेशातील दोन मुले एकमेकांशी तावातावाने भांडत होती. हा साधारणपणे १९६०-१९७०च्या दशकात घडलेला किस्सा आहे. यातील एक जण साहजिकच शाळेत जाण्याच्या विरोधात होता. तर दुसरा शिकल्याने अंगी शहाणपण येते, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. परोपरीने सांगूनही त्या पहिल्याला शाळेत जाणे काही पटत नव्हते. बराच काळ हा वाद-विवाद पाहत असलेले रस्त्यावरून जाणारे आजोबा मग पुढे आले आणि त्याने समोरच्या भाजीवाल्या बाईकडे पाहून पहिल्याला सांगितले की, ही आजीसुद्धा शहाणी आहे. ती शाळेत गेलेली नाही पण व्यवहार मात्र करू शकते. पण ती शाळेत गेली असती तर तिच्या आयुष्यात खूप बदल झाला असता. म्हणजे काय तर विचार सगळेच करतात. पण ज्यांचे शिक्षण होते, त्यांच्याच विचारांना चालना मिळते. बाकीच्यांचे विचार हे केवळ विचारच राहतात अनेकदा हा फरक आहे. शिक्षणामुळे त्या विचारांचे परिवर्तन पुढे कशात आणि कसे करायचे ते कळते.. त्या वेळेस म्हणजे ६०-७०च्या दशकातील त्या विद्यार्थ्यांला ते उत्तर पटले. पण हाच किस्सा आजच्या जमान्यात म्हणजेच २०१३ मध्ये घडला असता तर? तर कदाचित तेच आजोबा त्या विद्यार्थ्यांला म्हणाले असते की, होय बाळा, मलाही असेच वाटते आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन शिकून बाहेर पडल्यानंतर तर नोकरीही मिळत नाही, मग शिक्षणाचा काय फायदा? विद्यार्थ्यांने विचारले असते, इंटरनेटवर सर्व माहिती असताना शाळेत जाऊन आणखी वेगळे काय शिकणार? या आजोबा आणि विद्यार्थी नातवाच्या मनातील गोंधळ तर आज सर्वत्र समाजात पाहायला मिळतो आहे. शिक्षण क्षेत्राच्या भविष्याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न, शंका असे बरेच काही आहे. अनेक क्षेत्रांतील भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रश्नांच्या मुळाशी शिक्षणच असल्याची जाणीवही अनेकांना आहे. पण करायचे नेमके काय, या प्रश्नाला उत्तर नाही अशीच अवस्था होती. हाच पेच सोडविण्यासाठी लोकसत्ता आणि सारस्वत बँकेने पुढाकार घेऊन शिक्षण या विषयावरील ‘बदलता महाराष्ट्र’ या दोन दिवसीय परिसंवादांचा घाट घातला. शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, दूरदृष्टी असलेले वैज्ञानिक, संशोधक, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, शिक्षक, पालक, शैक्षणिक क्षेत्रातील कर्तृत्ववान मंडळी आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेली मंडळी या ज्ञानयज्ञात सहभागी झाली आणि हाती आली ती बदलत्या महाराष्ट्राला ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेणारी नवी बाराखडी.
ज्ञानरचनावाद, नावीन्य, कौशल्य, सर्जनशीलता, व्यावसायिकता, इनोव्हेशन, नॉलेज इकॉनॉमी, एक्सलन्स, इन्क्लुजन, प्रशिक्षण, ज्ञानक्रांती आणि मनसोक्त निकेतन ही ती नवी बाराखडी आहे. या परिसंवादात सहभागी प्रत्येक तज्ज्ञ व्यक्तीने याच बारा संकल्पनांवर भर दिला. ज्ञानरचनावाद ही २१ व्या शतकात गुणवत्तेच्या दिशेने नेणारी पहिली पायरी आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेला याचा पाया लाभला तर तो पक्का असेलच पण त्यावर उभा राहणारा रचनेचा डोलाराही तेवढाच भक्कम आणि नावीन्यपूर्ण असा असेल. कोणतीही मानसिक- शारीरिक क्षमता असलेले प्रत्येक मूल शिकू शकते, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाच्या कृतीमागे विचार असतो, प्रत्येक मुलाला व्यक्तिमत्त्व असते, त्यामुळे त्याचा आदर करावा आणि ज्ञान रचले जाऊ शकते पण ते कधीही कोणाला हस्तांतरित करता येत नाही, या गृहीतकांवर हा ज्ञानरचनावाद बेतलेला आहे. इनोव्हेशन, सर्जनशीलता, नॉलेज इकॉनॉमी म्हणजेच ज्ञानाधारित अर्थव्यवस्था, एक्सलन्स यांच्या दिशेने हा प्रवास होत ज्ञानक्रांतीचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर ज्ञानरचनावादाला पर्याय नाही. म्हणूनच देशाचा नवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा ज्ञानरचनावादावर बेतलेला आहे. पण ज्यांच्या माध्यमातून हा आराखडा राबवला जाणार आहे, त्या शिक्षकांना त्याची फारशी कल्पना नाही. ज्यांना आहे, त्यातील बहुसंख्यांनी नियम आहे म्हणून तो केवळ ‘डाऊनलोड’ करून घेतला आहे, असे वास्तवही या परिसंवादात उघड झाले. गरज आहे ती हा वाद आत्मसात करण्याची. मग बाराखडीतील शब्द, अक्षरे कष्टपूर्वक लक्षात ठेवावी लागणार नाहीत. तीही सहज आत्मसात होतील. उद्दिष्ट स्पष्ट झाले की, मार्ग आपोआप सापडतो तशीच या क्षेत्राची अवस्था असेल.
महाराष्ट्राला तर याची सर्वाधिक गरज आहे, याची जाणीव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली. ते म्हणाले की, आपल्याकडे खनिजांची पुंजी नाही, त्यामुळे केवळ बौद्धिक बळावरच आपण मोठे होऊ शकतो. त्यासाठी शिक्षणाला तरणोपाय नाही. पण मुख्यमंत्री आणि वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर या दोघांनीही त्याच वेळेस याचीही जाणीव करून दिली की, केवळ शिक्षण घेऊन भागणार नाही तर त्यात व्यवसायशिक्षण आणि व्यावसायिकतेचा समावेश असला पाहिजे. अन्यथा बेरोजगारांची संख्याच केवळ वाढलेली असेल. व्यवसायशिक्षण हातांना काम मिळवून देईल आणि व्यावसायिकता (प्रोफेशनॅलिझम) आपल्याला गुणवत्तेपर्यंत पोहोचण्यास आणि आपल्या क्षेत्रात अग्रेसर राहण्यास मदत करेल. दोघांनाही एका महत्त्वाच्या बाबीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले ती म्हणजे इनोव्हेशनची आपल्याकडे असलेली महत्त्वपूर्ण त्रुटी. संगणक आणि मोबाइल या साऱ्यांसह सर्व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना लागणाऱ्या आयसीचे डिझाइन करणारी जगातील सवरेत्कृष्ट मंडळी ही भारतीय तंत्रज्ञ आहेत. पण हा आयसी मात्र भारतात तयार होत नाही. तो तयार करण्याची क्षमता गेल्या अनेक वर्षांमध्येही भारतीयांकडे आलेली नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे आपल्याला आयसी मिळणारच नाहीत तर आपली देशाची संवाद-यंत्रणा कोलमडेल आणि बिकट अवस्था निर्माण होईल. जी अवस्था इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची तीच अवस्था आण्विक क्षेत्रातही आहे. औष्णिक अणुभट्टीच्या जागतिक प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर तेवढय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी लागणाऱ्या यंत्रणांचे उत्पादन करण्याची क्षमता भारतीयांमध्ये नव्हती. हे टाळायचे असेल तर भविष्यात इनोव्हेशनकडे लक्ष द्यावे लागेल आणि मोठय़ा क्षमतेच्या कामांना हात घालावा लागेल. इनोव्हेशनची जननी ही शिक्षणाच्या नावीन्यपूर्णतेमध्ये आणि सर्जनशीलतेमध्ये दडलेली आहे.
विद्यार्थी इनोव्हेटिव्ह आणि सर्जनशील होण्यासाठी शिक्षकांना तसे वातावरण निर्माण करावे लागेल. मात्र सध्याचे शिक्षक हे तर त्यांच्या कामाचे नियमित ठरावीक तास, शाळाबाह्य़ सरकारी आणि संस्थांची कामे यात अडकलेले आहेत. ते स्वत: याकडे केवळ एक नोकरी म्हणून पाहतात, मग त्यांना वेळ मिळणार कुठून? आणि मग शिक्षकांकडून मिळणार नाही ते मुलांकडे येणार तरी कसे, असे मुद्दे इतर दोन परिसंवादांमध्ये पुढे आले. यात शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना बोलते करून त्या माध्यमातून शिक्षण होणे ज्ञानरचनावादामध्ये अपेक्षित आहे. त्यासाठीची वातावरणनिर्मिती हेच शिक्षकांचे प्रमुख काम आहे. त्यासाठी क्रमिक पुस्तकाच्या बाहेर जावे लागणार आहे, याची गरज व्यक्त झाल्यानंतर त्याच्या पुढच्याच परिसंवादामध्ये अभ्यासक्रमाच्या किंवा क्रमिक पुस्तकाच्या बाहेर जायचे म्हणजे नेमके काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर मिळाले. कारण त्यात सहभागी झालेली मंडळी ही प्रत्यक्षात त्यांच्या शाळांमधून हेच तर प्रयोग करीत होती. त्यात रेणू दांडेकर, गिरीश प्रभुणे, रमेश पानसे यांचा समावेश होता. आपल्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील त्या वंचित मुलांसाठी त्यांच्या आजूबाजूचे वातावरण पाहून पूर्णपणे वेगळा अनोखा अभ्यासक्रम कसा विकसित केला, ते त्यांनी सांगितले. रेणू दांडेकर म्हणाल्या, काय करावे, ते शासन सांगतेच. पण आपण केलेल्या अधिकच्या कोणत्याही प्रयोगाला ते कधीच नाही म्हणत नाहीत किंवा शासनाने सांगितले आहे त्यापेक्षा अधिक काही करू नका, असेही कधी सांगितलेले नसते. पण अनेकदा आपल्या म्हणजे शिक्षकांच्याच मनात अधिकचे काही नसते! सध्या समाजाला अनेक प्रकारच्या भयाने ग्रासले आहे. त्या भयमुक्तीची उत्तरे आपण इतरत्र शोधतो आहोत. ती खरे तर या शिक्षणामध्येच दडलेली आहे. चांगला नागरिक तयार करणे हे शिक्षणाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. नेमकी हीच रूपरेखा सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी त्यांच्या प्रास्ताविकपर भाषणात स्पष्ट केली होती. चांगल्या समाजाचा क्रियाशील घटक घडवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
हे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कुणा एकाचे नाही तर संपूर्ण देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे त्यात विविध जाती, धर्म, पंथ यांमधील विद्यार्थ्यांचा समावेश असेल त्यामुळे ते सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह किंवा इन्क्लुजन असलेले असे असावे लागेल. ते भान शिक्षकांना आणि त्याची रचना करणाऱ्यांना ठेवावे लागेल. हे सारे नियत पद्धतीने करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे लागेल. शिक्षक-प्रशिक्षक हा सर्वाधिक महत्त्वाचा असा भाग असणार आहे. त्यामुळे या बाराखडीचा समावेश शिक्षक अभ्यासक्रमामध्ये किंवा शिक्षकांच्या प्रशिक्षणक्रमात करावा लागेल. आताचे शिक्षक हे इनोव्हेटिव्ह नसतील किंवा त्यांच्या नियत उद्दिष्टांप्रत पोहोचत नसतील, तर तो संपूर्ण दोष शिक्षक-प्रशिक्षकांचाच आहे, असे मत स्वत: उत्तम शिक्षक-प्रशिक्षक असलेल्या सुमन करंदीकर यांनी व्यक्त केला. शिक्षकाने व्रत म्हणून या क्षेत्रात प्रवेश नाही केला तरी चालेल पण त्याने उत्तम व्यावसायिक म्हणजेच प्रोफेशनल मात्र असलेच पाहिजे.. त्या म्हणतात.
पूर्वी केवळ एकाच विषयाचे ज्ञान घेऊन त्यात पारंगत होणे भागले असेल पण आताच्या जमान्यात ज्ञानक्रांतीतील त्या सर्वोत्तमापर्यंत पोहोचायचे तर आंतरशाखीय अभ्यासाला पर्याय नाही. पहिल्या दिवसाच्या समारोपात डॉ. अनिल काकोडकर म्हणाले की, इंजिनीअरला रसायनशास्त्र माहीत नसते आणि रसायन वैज्ञानिकाला इंजिनीअिरग, हे आपले दुर्दैव आहे, तेव्हा ते नेमके हेच सांगण्याचा प्रयत्न करतच होते. अखेरीस त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर उत्तम इंजिनीअरला तयार करावयाचे यंत्र तंत्रज्ञ असलेल्या कारागिराला समजावून सांगावे लागते. ते त्याला करता आले तर त्याच्या डिझाइनचा उपयोग होतो अन्यथा ते इंजिनीअिरग डिझाइन केवळ कागदावरच राहते. नव्या ज्ञानरचनावादामध्ये हा संवाद तर पहिल्या पायरीवरच आहे. म्हणूनच तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलते करणे अपेक्षित आहे. तसे झाले तर आपले लक्ष भूतकाळातील शांतिनिकेतनांकडे न राहता भविष्यातील मनसोक्त निकेतनांकडे असेल! तिथेच आपल्या भविष्याची नांदी असणार, याची खात्री या बदलत्या महाराष्ट्राने दिली!
बदलत्या महाराष्ट्राची नवी बाराखडी!
<span style="color: #ff0000;">बदलता महाराष्ट्र</span><br />‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’च्या वतीने शिक्षण या क्षेत्रातील ‘बदलता महाराष्ट्र’ या दोन दिवसीय ज्ञानयज्ञात शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, वैज्ञानिक, संशोधक, कार्यकर्ते, शिक्षक, पालक...
First published on: 09-08-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta event badalta maharashtra education segment