संथ गाडी चाललीय म्हणून पोलिसांनी पकडल्याचा मी पहिल्यांदाच अनुभव घेत होतो. गाडी का संथ चाललीय, गाडीत काही अडचण आहे का, चालकाला काही मदत हवी आहे का, अशाही उद्देशाने पोलीस गाडी थांबवतात हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला.

कोणत्याही हॉलीवूडच्या अ‍ॅक्शन चित्रपटाला शोभेल असा प्रसंग. गाडी भरधाव चालली आहे आणि मागे पोलीस पाठलाग करतायत. हा चित्रपट युरोपीयन असेल तर, गुन्हेगारांचा थरकाप उडवणारा हा पाठलाग लंडन पोलीस, किंवा स्कॉटलंड पोलिसांचा. स्कॉटलंड पोलिसांची ख्याती तर जगभरात पोहोचलेली. चित्रपटातले ही अशी साहसी दृश्ये पाहताना अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहतात; प्रसंगी वीररसयुक्त मनोरंजनही होते. पण वास्तवात तेच स्कॉटलंड पोलीस जर प्रत्यक्षात तुमच्या मागावर असतील तर? तर मग त्या वीररसाची कशी पाचावर धारण बसते; अंगावर रोमांचाऐवजी थंडीतही कसा घाम फुटतो आणि ते वीररसयुक्त मनोरंजन न राहता, भीतीने तुमची छाती कशी धडधडते याचा प्रत्यक्ष अनुभव मी नुकताच घेतला. हो.. स्कॉटलंड पोलिसांनी आम्हाला पाठलाग करून पकडलं होतं.
मी नुकत्याच स्कॉटलंडमधल्या अ‍ॅबरडीन येथे झालेल्या ‘युरोपीयन मराठी स्नेहसंमेलना’ला गेलो होतो. संमेलन झाल्यानंतर मी तीन दिवस स्कॉटलंड फिरण्यासाठी राहिलो होतो. संमेलन संपल्या दिवशी संध्याकाळी एका सभासदाने, मी राहिलोच आहे म्हणून गप्पागोष्टीसांठी त्याच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. जेवण झाल्यानंतर मी अ‍ॅबरडीनच्या मराठी मंडळाचे कार्यवाह विश्वास िशदे यांच्या गाडीतून त्यांच्या घरी चाललो होतो. वेळ रात्रीची होती. संमेलनाच्या कामकाजामुळे अहोरात्र मेहनत घेणारे िशदे त्या पार्टीतच डुलक्या खात होते, एवढे ते दमले होते. त्यामुळे आम्ही गप्पा मारत निवांत चाललो होतो. मागच्या सीटवर माझा मुलगा बायकोच्या मांडीवर झोपला होता. थोडय़ा वेळाने मागून एक गाडी आमचा पाठलाग करते आहे असे जाणवले. आपल्याकडे मंत्र्यांच्या गाडीला जसा लाल दिवा असतो; तसा टपावरचा दिवा असलेल्या, त्या गाडीचे फ्लिकर होणारे लाइट सुरू झाले. ती स्कॉटलंड पोलिसांची गाडी होती. िशदेंना लक्षात आले, मागची गाडी आमच्याच गाडीचा पाठलाग करते आहे. मला कळलेच नाही, असं काय झालं की पोलिसांनी आमचा पाठलाग करावा? गाडी थांबवण्याआधी िशदेंनी विचारलं, ‘मागच्या सीटवर बसलेल्या माझ्या मुलाला मागे सीटबेल्ट लावला आहे ना?’ मुलगा झोपला असल्याने तो लावलेला नव्हता.
लहान मुलाला सीटबेल्ट लावणं युरोपात अनिवार्य आहे. बेल्ट लावला नसेल तर, चालकाला खूप दंड भरावा लागतो आणि त्याच्या लायसेन्सवर तीन पॉइंट्स जमा होतात. असे बारा पॉइंट्स झाले की, चालकाचे लायसेन्स जप्त होते. हे नियम मी अवाक होऊन ऐकत होतो. असे नियम असतात आणि ते पाळले जातात; अमलात येतात, रीतसर दंड भरला जातो, इथल्यासारखं पसे खाऊन सोडले जात नाही आणि अशा नियमांची दहशत लोकांवर आहे अशा विस्मयकारी बाबींचा विचार करत, गडबडीत बेल्ट लावला, पण तो लावेपर्यंत गाडी थोडी पुढे न्यावी लागली होती.
अ‍ॅबरडीनच्या रात्रीच्या नीरव शांततेत रस्त्याच्या कडेला िशदेंनी गाडी थांबवली. भीती आणि कुतूहल याव्यतिरिक्त माझ्या चेहऱ्यावर काहीही नव्हते. एवढय़ात कर्तव्यदक्ष पोलीस त्यांच्या गाडीतून उतरून आमच्या गाडीपाशी आले. त्यांनी गाडीचे स्टेअिरग फिरवून चेक केलं. िशदेंना पहिला प्रश्न विचारला, ‘किती प्यायला आहात?’ िशदे एक थेंबही प्यायले नव्हते. पिऊन गाडी चालवली तर फक्त आणि फक्त तुरुंगवास आहे तिकडे. कोणत्या तरी नटाला नुकतीच शिक्षा झाल्याचा दाखलाही मी गप्पांत कुणाकडून तरी ऐकला होता. वीस वर्षे त्याच्या लायसेन्सवर, पिऊन गाडी चालवल्याचा शिक्का राहतो आणि त्या व्यक्तीला तितकी वर्षे दुप्पटतिप्पट इन्श्युरन्स भरत राहावा लागतो म्हणे.
िशदे थेंबही प्यायलेले नव्हते. पोलिसाने त्यांना त्यांच्या गाडीत बसवले. मी न राहवून पोलिसांच्या गाडीकडे गेलो. मी काहीच करू शकत नसलो तरी नक्की काय झालेय हे कुतूहल मला स्वस्थ बसू देत नव्हते. िशदेंचे लायसेन्स पोलिसांनी गाडीतल्या कॉम्प्युटरवर चेक केले. गाडीत अत्याधुनिक यंत्रणा होती. काही तरी चर्चा झाली ती मला बाहेर ऐकू आली नाही. थोडय़ा वेळाने िशदे उतरले आणि आम्ही गाडीत येऊन बसलो. माझ्या चेहऱ्याकडे पाहूनच त्यांनी सगळे सांगायला सुरुवात केली.

तुम्ही लंडनला गेलात आणि टय़ूबमधून प्रवास करणार आहात आणि तुम्हाला काहीही माहिती नाहीय तर तुमचं काहीही अडत नाही. तुम्हाला लिहिता-वाचता येत असेल तर तुम्हाला मुळात कुणाला काही विचारायची गरजच पडत नाही.

आम्ही ज्या भागात गेलो होतो, तिथूनच थोडय़ा वेळाने पोलिसांनी आमचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. कारण तिकडे संपूर्ण राष्ट्रात विशिष्ट अंतरावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत. आणि ते अहोरात्र चालूही असतात. त्या कॅमेरावरून त्यांना आमच्या गाडीला क्षणार्धात गाठता आले. शंकेचे कारण काय तर गाडी अतिशय संथ चालली होती. संथ गाडी चाललीय म्हणून पोलिसांनी पकडल्याचा मी पहिल्यांदाच अनुभव घेत होतो. गाडी का संथ चाललीय? संथ वेग म्हणजे शंकास्पद काही तरी. गाडीत काही अडचण आहे का, चालकाला काही मदत हवी आहे का, अशाही उद्देशाने पोलीस गाडी थांबवतात हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. आम्हाला गाठेपर्यंत गाडीचा नंबर, गाडी कुणाच्या नावावर आहे, त्याची काही गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे का हे सगळे आम्हाला गाठेपर्यंत पोलिसांचे गाडीतल्या कॉम्प्युटरवरून चेक करून झाले होते. िशदे हा तिथला सभ्य उच्च मध्यमवर्गीय माणूस. आता तिथलाच नागरिक. वाहनाचा वेग शंकास्पद. मग गाडी संथ जात असेल तर त्याला मदतीची अपेक्षा आहे का, असेल तर पोलीस म्हणून लगेच हजर राहायला हवे. चालक मद्य पिऊन गाडी चालवत असेल तर पकडायला हवे. पण पिऊन चालवत नाहीय; ‘आपले हातचे सावज गेले’ अशी आपल्या पोलिसांसारखी हळहळ व्यक्त करून चालकाला नाइलाजाने सोडून न देता; चालकाला झोप आलीय का? त्याची तब्येत बरी आहे ना? गाडीत बिघाड तर नाही ना हे आस्थेने विचारणारा पोलीस बघून खरे तर माझी त्याक्षणी झोपच उडाली. त्या पोलिसाने गाडी कंडिशनमध्ये आहे ना, हेही पाहिले. िशदे म्हणाले, ‘प्रत्येक वेळी तुम्हाला पकडायलाच पोलीस येतात असे नाही. तुम्हाला मदतीची गरज आहे का हेही ते पाहत असतात.’
पोलिसांनी पकडेपर्यंतच्या मला वाटलेल्या भीतीचा मी विचार करत राहिलो. तो पोलीस आम्हाला मदत करायला आला होता, हे मला राहून राहून पटेना. कारण आपल्याकडे लहानपणापासूनच मुलांना भीती घालण्यासाठीच पोलीस डिपार्टमेंट निर्माण केलेय की काय अशी परिस्थिती. काहीही चुकीचे वागणे झाले तर पोलीस पकडतील आणि कडक शिक्षा करतील या भीतीतच कारण नसताना बालपण गेलेले असते. पण पोलीस खरे तर मदत करायला असतात. त्यांच्यामुळे आपण निर्धास्त राहू शकतो असा संस्कारच नाहीय आपल्यावर. त्याला पोलीस डिपार्टमेंटही तितकेच जबाबदार आहे यात वादच नाही.
दुसऱ्या देशांत जाऊन आलं की, विशेषत: पश्चिमेस जाऊन आलं की आपल्या देशाची लाज वाटायला लागते. प्रश्न नुसत्या पोलिसांचा नाहीच. लोकांचाही तितकाच आहे. असं शासन राबत असताना तिथला नागरिकही तितकाच जबाबदारीने वागताना मी पाहिला. तो नियमांचं काटेकोरपणे पालन करतो. कारण त्यालाच त्याचा जीवनव्यवहार शिस्तीत चालण्याची गरज आहे.
स्कॉटलंडहून मी आठ दिवस लंडनला राहिलो. लंडन काय चीज आहे हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही हेच खरं. शहर, शहराची रचना, व्यवस्था, वाहतूक या गोष्टींबद्दल वारंवार ऐकतो, वाचतो. डोळे दिपवणारी टय़ूब नावाची भुयारी लोकल वाहतूक ही खरंच थक्क करून सोडणारी आहे. पण त्याचबरोबरीने इतरही असंख्य छोटय़ा छोटय़ा गोष्टी खूप काही विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या.
रस्ते, वाहतूक, सिग्नल्स, ऑफिसेस, पर्यटन स्थळं, हॉटेल्स, रस्त्यांची नावं, दिशादर्शक चिन्हे, खुणा, पाटय़ा, जे जे म्हणून प्रशासनाअंतर्गत येतं त्याचा केंद्रिबदू आहे तो म्हणजे, ‘जे काही आहे ते सामान्य लोकांसाठी’.. कोणत्याही सामान्य माणसाचं कुठेही काहीही अडू नये, याची काळजी सगळीकडे घेतली जाते. सर्व ठिकाणी मूलभूत विचार केलेला जाणवतो तो सामान्य लोकांचा, त्यांच्या सोयीचा. तुम्ही लंडनला गेलात आणि तुम्ही टय़ूबमधून प्रवास करणार आहात आणि तुम्हाला काहीही माहिती नाहीय तर तुमचं काहीही अडत नाही. तुम्हाला लिहितावाचता येत असेल तर तुम्हाला मुळात कुणाला काही विचारायची गरजच पडत नाही. इतका लोकांचा विचार करून सगळं शहर डिझाइन केलेलं आहे. पण तरीही काही अडलंच तर तुम्हाला तिथला स्टेशनचा कोणीही अधिकारी क्षणार्धात तुमची अडचण दूर करतो. रेल्वे स्टेशनवर एकदा मला तिकीट काढताना माझे पसे जास्त खर्च होणार नाहीत असाच सल्ला मला त्या अधिकाऱ्याने दिला. खरंतर माझ्या खिशाला चाट लावून तो जास्त पसे उकळू शकत होता, पण तिथे लोकांचा विचार प्रामुख्याने होतो. आणि हे सर्व ठिकाणी मला आढळून आलं.

लोकसंपर्काअंतर्गत येणाऱ्या सर्वच ठिकाणी सामान्य नागरिकाला मिळणारं प्राधान्य पाहून मी चकित झालो. नाही तर आपल्याकडे सगळ्या व्यवस्थेत वंचित आहे तो सामान्य माणूस. शासन या शब्दाचे दोन अर्थ आपल्याकडे आहेत. व्यवस्था आणि शिक्षा.

‘लायन किंग’ या नाटकाचं तिकीट जाण्यापूर्वी मी इथूनच इंटरनेटवर बुक केलं होतं. तिथे माझ्याकडे इंटरनेटची सोय नव्हती, म्हणून मी तिकिटाचा मेल दाखवू शकलो नाही. पण त्या तिकीट खिडकीवरच्या मुलीने, मी तिकीट बुक केलं होतं का नाही हे पुरेसा वेळ घेऊन तपासलं. संबंधित एजंटना फोन केले. काय केलं की ते शोधता येईल हेही तिनंच सुचवलं आणि माझ्या मागे रांगेत लोक थांबले असतानाही, पुरेसा वेळ घेऊन, मला माझ्या तिकिटाचा नंबर मिळवून दिला. ‘तुमचं तुम्ही बघा’, ‘मेलची झेरॉक्स घेऊन या, ती कुठूनही आणा’, ‘आम्हाला काही माहीत नाही’, अशी कोणत्याही सरकारी छापाची उत्तरं मिळाली नाहीत. समोरचा नागरिक महत्त्वाचा आणि त्याची अडचण महत्त्वाची, असा वागणुकीतला भाव मला सर्वत्र अनुभवायला मिळाला.
एकदा तर व्हिक्टोरिया स्टेशनच्या बाहेर भर चौकात मी अभिनेता गिरीश कुलकर्णीला शोधत होतो. तो वेगळ्या दिशेला कुठेतरी उभा होता. आम्ही दोघं फोनवर, ‘समोर काय दिसतंय? बाजूला कुठलं दुकान आहे?’ असे प्रश्न विचारत एकमेकांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो. भर रस्त्यात मी फोनवर बोलत भिरभिरल्यासारखा शोधत होतो. एवढय़ात एक ब्रिटिश माणूस येऊन मला म्हणाला ‘काही मदत हवी आहे का?’
लंडनची सगळीच म्युझियम्स अभ्यास करण्यासारखी. त्यांनी किती आणि कसं सगळं जतन केलंय हे तिथं जाऊनंच पाहायला हवं. अगदी आपला कोहिनूरदेखील. पण काही वेळा असं वाटतं की, तो तिथल्या सुरक्षेत आहे म्हणून टिकलाय तरी. मी ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ला चक्कर मारली. पेंढा भरून ठेवलेल्या खऱ्या प्राण्यांच्या एका दालनात एक पाणगेंडाही होता. त्या गेंडय़ाच्या इतर माहितीबरोबरच त्याच्या शेजारी एक पाटी लिहिलेली होती. त्या पाणगेंडय़ाच्या नाकावरचं िशग नकली असल्याची. ‘खरं िशग शिकाऱ्याने पळवलं म्हणून आम्ही हे नकली िशग जोडलेलं आहे. हे खरं नाही.’
ही अशी स्पष्टता आपल्याला कधी जमेल?
डायनासोरच्या असंख्य प्रजातींचा प्रचंड अभ्यास एका दालनात मांडून ठेवलेला आहे. त्यात बाकी माहितीबरोबरच हा प्राणी नष्ट झाल्याची अनेक कारणे लिहिलेली आहेत. अनेक कारणं परस्पर विरोधीदेखील आहेत. काही अटकळी आहेत. एकमेकांना छेद देणारे अनेक तर्क आहेत. निरनिराळ्या संशोधकांची मांडणी आहे. काही ठिकाणी तर असं स्पष्ट लिहिलेलं आहे की, अमुक बाबींचा अजून शोध लागलेला नाही; अमुक अमुक निष्कर्षांमध्ये एकवाक्यता नाही. या संशोधकाचे असं म्हणणं आहे तर दुसऱ्याचं असं आहे. अशी मतमतांतरंही नमूद केलेली आहेत. कोणाचं खरं हे ठरेपर्यंत कुणालाही दूषणं नाहीत आणि कोणाला खोटं पाडण्याचा उद्देश नाही. डार्वनिच्या संकल्पनेला विरोध करणाऱ्या शास्त्रज्ञाचाही पुतळा त्याच दालनात आपल्याला दिसतो. ही स्पष्टता आणि वैचारिक सामंजस्य अनेक ठिकाणी अनेक माहितींबाबत दिसून आलं.
माझ्या उगाच शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद डोक्यात घुमत राहिला. एकतर आपण काहीच जतन करत नाही आणि वर मतमतांतरांमध्ये एकमेकांच्या जिवावर उठतो. शासनाची सुट्टी वेगळी, एखादा पक्ष त्यांना वाटणाऱ्या दिवसाला जन्मदिन साजरा करणार. महाराजांची मक्तेदारी घेतलेली दलं, ब्रिगेड्स त्यांचंच म्हणणं कसं खरं आहे यासाठी धाकदपटशा दाखवणार. नक्की माहीत नसलेल्या गोष्टींसाठी सामान्यांचा जीव घेणार. आपलंच म्हणणं खरं ठरवणार. मतमतांतरांना विरोध नाही; पण दुसऱ्याच्या मताचा एवढा दुस्वास का? मग निदान वैज्ञानिक एकवाक्यता तरी आणावी?
संप काही आपल्याकडेच होतात असं नाही. मी निघण्याच्या आदल्या दिवशी लंडनमध्येही भुयारी रेल्वेचा संप होता. तिथल्या शरद रावांनी पुकारलेला. कामगारांचं म्हणणं शासनाला पोहोचवण्यामध्ये सामान्य लोकांचा बळी तिथे दिला गेला नाही.
लोकांना अजिबात अडचण होणार नाही असं त्या संपाचं नियोजन केलं होतं. आपल्याकडे मुंबईत रेल्वेच्या जशा मध्य, पश्चिम, हार्बर अशा तीनच लाइन्स आहेत, तशा लंडनमध्ये अष्टदिशांना धावणाऱ्या पंधरा-वीस लाइन्स आहेत. त्यातल्या कोणत्या लाइन्स बंद असतील आणि लोकांना पर्यायी कोणत्या लाइन्स वापरता येणार आहेत याचा चार्ट स्टेशनवर, रेडिओवर, इंटरनेटवर, शक्य तितक्या ठिकाणी मिळत होता. मी रात्री घरी जाण्यासाठी निघालो तेव्हा निर्धारित वेळेच्या आधी लोकल गेली होती; पण त्या स्टेशन मास्तरने माझ्या ईप्सित ठिकाणी जाण्यासाठी मी कुठून कुठली बस पकडली पाहिजे हे स्वत: आस्थेनं सांगितलं. आणि तो लोकल चुकलेल्या सगळ्यांनाच हे सांगण्यासाठी उभा होता. त्या सांगण्यामध्ये कटकट, उपकार, छळ असा कोणताही स्वर नव्हता की आवेश नव्हता. शासन म्हणून समोरच्याची अडचण कशी दूर होईल हा भाव होता.
लोकसंपर्काअंतर्गत येणाऱ्या सर्वच ठिकाणी सामान्य नागरिकाला मिळणारं प्राधान्य पाहून मी खरंच चकित झालो. नाही तर आपल्याकडे सगळ्या व्यवस्थेत वंचित आहे तो सामान्य माणूस.
शासन हे लोकांसाठी असतं, असावं; हीच खरं तर सामान्य लोकांची अपेक्षा असते आणि तेच शासन लोकांनी लोकांसाठी निर्माण केलं असेल तर खऱ्या अर्थानं लोकशाही. पण शासन या शब्दाचे दोन अर्थ आपल्याकडे रूढ आहेत. एक व्यवस्था आणि दुसरा अर्थ शिक्षा. आपल्याकडे सरकारने लोकासांठी राबवलेलं शासन हे बव्हंशी शिक्षा या अर्थाशीच जवळ जाणारं आहे. तुम्ही अडचणीत आहात हे लक्षात आल्यावर स्वत:हून मदत करायला पोलीस आलेत, असं स्वप्नपण आपल्याकडे पडू शकत नाही. जीव चालला असतानादेखील ज्यांनी मदत करायला पाहिजे किंवा जीव वाचवणं हेच ज्यांचं कर्तव्य आहे, त्यांच्याकडून आपण ही अपेक्षासुद्धा करू शकत नाही आहोत. निवडणुका झाल्यात. लोकशाहीचं नवं सरकार येईल, पण ते खरंच लोकांसाठी असेल का?

Story img Loader