दिवाळी २०१४
चित्रपटसृष्टीत काम करायचं म्हणजे तुम्हाला सुंदर दिसायलाच हवं. याला पर्याय नाहीच. ते कोणा सोम्या-गोम्याचं काम निश्चितच नाही. तुम्ही सुंदर असलात तरी दहा थरांचा मेकअप लावून कॅमेरासमोर उभं राहायचं. तो चढवायला तितका वेळ आणि उतरवायलाही. आता काळ्याचं गोरं करता येतं मेकअपने, पण चेहऱ्यावरच्या एखाद्या अवयवात जरा काही अडचण असेल तर? सोपंय. ऑपरेशन करून टाकायचं. चेहऱ्याच्या आकारानुसार नाक वेगळं वाटलं तर ऑपरेशन, स्क्रीनवर ओठ विचित्र दिसतायत, त्याला आकार देऊ या. सुरकुत्या लपवायच्यात? बोटॉक्स सर्जरी करा. इंडस्ट्रीचं हे सध्याचं फॅड. इंडस्ट्रीतल्या सुंदऱ्या आणि कुल डय़ुड हिरो आजकाल चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरीचे प्रयोग करतायत.
माधुरी दीक्षितचं नाव घेतलं की तिचं स्मितहास्य आठवतं. पण, हे हसणं मूळचं नाही बरं. तिने चक्क आपल्या हास्यावरच काम केलंय. हो, अशी स्माइलही डिझाईन करता येते हे हिच्यामुळेच तर लोकांना कळू लागलं की. स्माइलवरून आठवलं. ओठांची सर्जरी केलेल्या हिरोइन्स इंडस्ट्रीत खोऱ्याने सापडतील. याचं एकदम ताजं उदाहरण म्हणजे अनुष्का शर्मा. बऱ्याच काळानंतर तिचं दर्शन झालं ते थेट ‘कॉफी विथ करन’ या कार्यक्रमात. मग काय, चर्चा तर होणारच. तिच्या ओठांची. अशी चर्चा आहे की आगामी ‘बॉम्बे वेलवेट’ या सिनेमासाठी तिने ओठांची सर्जरी केली आहे. ती मात्र याला नकार देतेय. म्हणजे सिनेमासाठी बदल केला हे खरंय म्हणे. पण, सर्जरी वगैरे.. नो वेज.. असं म्हणतेय ती. असा बदल दिसण्यासाठी ओठांचं काहीतरी टूल असतं म्हणे ते वापरतेय असा तिचा दावा आहे. पर ये पब्लिक सबकुछ जानती है..
ओठांची सर्जरी करणाऱ्या या नटींमध्ये कंगना रानावत, कतरिना कैफ या आघाडीच्या हिरॉइन्सचाही नंबर लागतो. आता यात कतरिनाला आघाडीची म्हणावं का हा खरं तर प्रश्नच आहे. तर, या दोघी इंडस्ट्रीत आल्या तेव्हा यांचं फार काही बरं चाललं नव्हतं. आपल्या चेहऱ्याच्या मानाने नाक जरा मोठं आहे असं वाटल्यामुळे कतरिनाने नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली. नंतर ओठांवरही सर्जरी केली. ओठांच्या शस्त्रक्रियेबाबत मात्र ती नकार देते. ‘फॅशन’, ‘क्वीन’ या सिनेमांमुळे मॅडम जरा दोन पावलं पुढे आहेत. ती इंडस्ट्रीत आली तेव्हा तिचे ओठ बारीक होते. पण, कालांतराने तिचं इंडस्ट्रीतलं काम वाढत गेलं. तिच्यातला बदल जाणवत गेला. मोठा बदल जाणवला तो तिच्या ओठांमध्ये. त्यामुळे तिनेही सर्जरी केल्याचं म्हटलं जातं.
ओठांनंतर क्रमांक लागतो तो नाकाचा. आपल्याकडच्या हिरॉइन्सना नाक हा प्रतिष्ठेचा प्रश्न वाटतो. प्रियंका चोप्राने मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यावर आधी नाकाची सर्जरी केली होती. त्यामुळे आधीची प्रियंका आणि नंतरची यात फरक जाणवतो. सौंदर्य टिकवण्यासाठी मी कोणत्याही शस्त्रक्रियेचा आधार घेत नाही, असं ती म्हणत असली तरी फोटोत दिसणारा बदल दुर्लक्षित करण्याइतका प्रेक्षक मूर्ख नक्कीच नाहीत, हे हिला आता कोण सांगणार? प्रीती झिंटाही हिच्याच वर्गात बसणारी. ‘दिल से’, ‘सोल्जर’ या सिनेमांनंतरची प्रीती अठवा. तिच्या नाकामध्ये बदल जाणवेल. नाकाच्या सर्जरीबद्दल तिने कधीच होकार किंवा नकार दिला नाही. शिल्पा शेट्टीच्या फिगरचं रहस्य सर्वश्रुत आहे. तिचं आणखी एक रहस्य प्रेक्षकांना कळलंय. तिच्या नाकाच्या सर्जरीबाबतचं. ‘धडकन’ या सिनेमाच्या शूटच्या वेळी दिग्दर्शकाने तिला या सर्जरीबाबत सुचवलं. तिनेही ते मान्य केलं. या सिनेमानंतरचे तिचे फोटो निरखून बघितले तर तिचं नाक टोकदार झालेलं दिसेल. याशिवाय रानी मुखर्जी, श्रीदेवी, जूही चावला या नायिकांनीही नकटं, मोठं, पसरट नाक चेहऱ्याला विशेषत: इंडस्ट्रीला शोभेल असं करून घेतलं. काजोल इंडस्ट्रीत आली तेव्हा तिच्या अभिनयाचं कौतुक खूप झालं. याच वेळी तिच्या सावळ्या रंगावर टीकाही झाली. त्यामुळे याही मॅडम वळल्या गोरं व्हायला. गोरं होण्यासाठीचे रीतसर उपचार तिने घेतले, असं म्हटलं जातं. सध्याची हॉट बेब, दीपिका पदुकोणही यातलीच. तिचाही रंग सावळाच. पण, बॉस.. नंबर वन होण्यासाठी सबकुछ करने को तयार..! म्हणून हीसुद्धा गोरी झालीच की.
नायिकांच्या ‘दिसण्या’इतकीच किंमत आपल्या हिरोंच्या दिसण्यालाही आहे. एक गेला सर्जरी करायला की दुसरा तयार. नंबर वन होण्याच्या चढाओढीत कोण किती शस्त्रक्रिया करतंय याचीच एकदा स्पर्धा लावली पाहिजे. हिरोंमध्ये जास्त प्रमाण आहे, बोटॉक्स आणि हेअर व्यूविंगचं. यात खान ब्रदर्सचा नंबर पहिला. सलमान खान, आमिर खान, सैफ अली खान, शाहरुख खान सगळ्यांनी बोटॉक्स सर्जरी करून घेतली आहे. बोटॉक्स म्हणजे वयोमानानुसार येणाऱ्या सुरकुत्या लपवण्यासाठी केली जाणारी सर्जरी. आता वय झाल्यावर सुरकुत्या या येणारच. हे यांना कोण समजवणार? आमिरने ‘थ्री इडियट्स’ सिनेमात कॉलेजमधला तरुण दिसण्यासाठी ही सर्जरी केली होती. बाकीच्यांना आजही ‘अजुनी यौवनात मी’ असं म्हणायची हौस असावी. वयोमानानुसार सुरकुत्यांप्रमाणेच केसही पांढरे होणार, गळणार. म्हणून हेअर व्यूविंगची सुरुवात झाली. गोविंदा यात पुढे. त्याचा म्हणे भविष्य, ज्योतिषी यावर खूप विश्वास आहे. त्यामुळे त्यानुसार तो सगळ्या गोष्टी करतो. याच्यानंतर शाहरुख, सलमाननेही हेअर व्यूविंग केलं होतं.
थोडक्यात, ‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’ हे म्हणतात ते काही खोटं नाहीच..!

Story img Loader