माझं वय साठीच्या पलीकडे, त्यावर कुरघोडी करणारं माझं वजन सत्तरच्या पलीकडे आणि कायमचा चिकटलेला स्पॉन्डिओलिसिस या तीन जिवलगांना सांभाळत साधी टेकडी चढणंही जिथं मला अशक्य होतं तिथं गिरनार पर्वताच्या दहा हजार पायऱ्या चढणं म्हणजे पेरूच्या झाडाला आंबे लागण्याइतकं असंभवनीय होतं. परंतु मी अलीकडेच गिरनारची अवघड यात्रा ‘याची देही याची डोळा’ सफळ संपूर्ण करून आले.
या स्वप्नवत मोहिमेची हकिगत अशी.. जाण्याआधी चार-पाच महिने जेव्हा अप्पांनी आम्हा साईभक्तांच्या साईदरबार ग्रुपमध्ये गिरनारचे ३ डोंगर चढून गुरुशिखरावरील दत्तगुरूंच्या स्वयंभू पादुकांच्या दर्शनाला जाण्याचा संकल्प जाहीर केला तेव्हा तिथल्या वातावरणातून एक विद्युत लहर सळसळत गेली आणि उपस्थित सर्वानीच या खडतर यात्रेसाठी तात्काळ आपली नावं नोंदवली. मीही हो म्हटलं, पण भीतभीतच.
गिरनार यात्रेसाठी सज्ज झालेल्या एकूण चाळीस जणांपैकी अकरा ज्येष्ठ नागरिक तर बाकीची जवान मंडळी. या तरुणांनी जाण्यायेण्याची तिकिटं, तिकडची व्यवस्था यासंबंधीची कामं वाटून घेतली तर आम्ही बुजुर्ग आपआपला फिटनेस वाढवण्याच्या मागे लागलो.
मॉर्निग वॉकचा वेळ मी अध्र्या तासावरून पाऊण तासावर नेला. शिवाय परतताना लिफ्टकडे काणाडोळा करत घराचे ५ मजले हाश-हुश करत (कसेबसे) चढू लागले. चढण्याचा थोडा अधिक सराव व्हावा म्हणून आधी चौलच्या दत्तमंदिराची टेकडी आणि काही दिवसांनी शिवनेरीचा किल्ला चढून आले. शिवनेरीच्या चढाईनंतर पायात आठ दिवस ठाण मांडून बसलेले गोळे पुढच्या धोक्याची घंटा वाजवत होते. त्यातच सलग १३३ पौर्णिमा (तोपर्यंत) गिरनार चढून आलेल्या दत्तभक्त प्रमोद केणे यांचं अनुभवकथन ऐकल्यावर आणि या अनुभवांवर आधारलेलं त्यांचं काळीज गोठवणारं पुस्तक वाचल्यावर माझे पायच लटपटायला लागले.
१४ फेब्रुवारी २०१४ हा आमच्या प्रस्थानाचा दिवस. प्रथम सौराष्ट्र मेलने सोमनाथला जाऊन त्या सांबशिवाचे आशीर्वाद घेतले आणि जुनागढला आलो. जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. आमचा मुक्काम गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या गावातील धर्मशाळा कम लग्नाचा हॉल अशा जागी होता. पहाटे पाचला निघायचं ठरलं होतं. त्यानुसार हुडहुडत्या थंडीत चारला उठलो आणि आंघोळीसाठी नळ सोडला तर काय? नळाला बर्फासारखं थंडगार पाणी. पाणी गरम करून मिळेल का हे विचारण्यासाठी तिथे चिटपाखरूही नव्हतं. मनाचा हिय्या करून कसेबसे चार तांबे अंगावर घेतले. म्हटलं, चला, इथूनच परीक्षेला सुरुवात झाली.
सगळ्यांचं सगळं आटपून चढायला सुरुवात केली तेव्हा सकाळचे सहा वाजले होते. तरीपण पुरतं उजाडलं नव्हतं. हवेत चांगलाच गारठा होता. नंतर ओझं होईल हे माहीत असूनही स्वेटरशिवाय बाहेर पडणं अशक्य होतं. बोलण्यात शक्ती वाया घालवायची नाही.. कोणालाही एकटं सोडायचं नाही. पण पुढे जाणं अशक्य झालं तर आपलं आपलं माघारी फिरायचं, दुसऱ्याला लटकवायचं नाही, मनातल्या मनात दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करत चालायचं.. अशा सूचनांचं पालन करत आमचं मार्गक्रमण सुरू झालं.
इथे चढायला आणि उतरायला डोल्या मिळतात. त्यासाठी वजनावर पैसे घेतात. (उतरताना दीडपट) जाडजूड माणसांना घेऊन जाणाऱ्या डोलीवाल्यांना बघताना अपल्याच पोटात गोळा येतो. वाटतं, ‘हे खरे घामाचे पैसे!’
मॅरेथॉन स्पर्धा सुरू होताना असते तशीच गर्दी सुरुवातीला होती. त्यानंतर कळलं की यातला बराचसा ओघ ३८०० व्या पायऱ्यांवरील नेमिनाथांच्या जैन मंदिरापर्यंत असतो. तसंच झालं! या मंदिरातील काळ्या पाषाणातील नेमिनाथांची मूर्ती बघत राहावं अशी आहे. या टप्प्यावर आम्ही पाणी पिऊन घेतलं. पाच मिनिटं विसावलोही. वाटेत बसण्यासाठी वेगळी व्यवस्था नाही. पायऱ्यांच्या कडेने उभ्या असलेल्या मोठय़ा दगडांवर जरासं बूड टेकायचं एवढंच. बाटलीबंद पाण्याची व चहाकॉफी सरबताची छोटी छोटी दुकानं वाटेवर आहेत, पण भाव अर्थातच दामदुप्पट. शिवाय चढताना पोट हलकं ठेवायचं असल्याने तिकडे दुर्लक्ष केलेलंच बरं.
आपण किती पायऱ्या चढून आलो याचा अंदाज यावा म्हणून पायऱ्यांवर मधूनमधून आकडे टाकलेत. दोन तास नॉनस्टॉप चढल्यावर ४८००व्या पायरीचा थांबा लागला. या ठिकाणी अंबाजीचं जागृत स्थान आहे. ५१ शक्तिपीठातील हे एक शक्तिपीठ. या अंबामातेचे आशीर्वाद पुढील प्रवासासाठी बळ देतात असा भक्तांचा विश्वास. त्याशिवाय वाटेत आणखीही काही देवळं, गुफा आणि रस्त्याच्या कडेने शेंदूर फासून ठेवलेल्या मूर्ती दिसतात. या सगळ्यांना ‘घालीन लोटांगण करत आमचा कदमताल सुरू होता. परतीच्या वाटेला लागलेले काही यात्रेकरू, साधूसंन्यासी मधूनमधून भेटत होते. अशी भेट झाल्यावर एकमेकांना ‘जय गिरनारी’ म्हणण्याची पद्धत आहे.
हळूहळू सूर्य वर चढत होता. पण गार वाऱ्याची सोबत असल्याने उन्हाचा चटका तितकासा जाणवत नव्हता. बरोबरीने चालणारे आपआपल्या वेगानुसार मागे-पुढे झाले होते.
दुसऱ्या डोंगराच्या माथ्याशी गोरखनाथांचं मंदिर व धुनी आहे. या ठिकाणी पोहोचल्यावर तिसऱ्या डोंगराच्या टोकावरचं ‘गुरुशिखर’ म्हणजेच अंतिम ध्येय दिसते. त्याच वेळी दुसऱ्या डोंगराच्या (ज्याच्या टोकावर आपण उभं आहोत) खाली खोलवर सरसरत गेलेल्या पायऱ्या आणि तिसऱ्या डोंगराची तितकीच सरळ चढण दिसते. हे दृश्य पाहताना अजून एवढा पल्ला आपल्याला गाठायचाय या कल्पनेने अक्षरश: गरगरतं. अशा वेळी इकडे-तिकडे न पाहता फक्त पायाखालच्या पायरीकडे बघायचं आणि पुढे पुढे चालायचं एवढंच लक्षात ठेवायचं.
गुरुशिखर गाठण्यासाठी शेवटच्या २०० पायऱ्या उरल्या होत्या तेव्हा मात्र पाय थरथरायला लागले होते. हा अखेरचा टप्पा एखाद्या कडय़ासारखा सरळसोट आहे. पायऱ्याही उंचच उंच आहेत. हा चढ चढण्यापूर्वी मी मिनीटभर थांबले, शिखराकडे नजर टाकली आणि मनातल्या मनात त्या गुरुरायाला साद घातली. प्रत्येक पायरीवर थांबत, दीर्घ श्वास घेत जेव्हा गुरुशिखरावरील छोटय़ाशा मंदिरात माझं पाऊल पडलं तेव्हाचा आनंद काय वर्णावा? त्यानंतर जेमतेम २५ माणसं बसू शकतील अशा त्या छोटय़ाशा मंदिरात आम्ही ४० जण दाटीवाटीने बसलो. तेही थोडाथोडका वेळ नव्हे तर तब्बल दोन तास साक्षात दत्तगुरूंनी ज्या ठिकाणी साडेबारा हजार वर्षे तप केलं त्या तपोभूमीत स्वयंभू दत्तपादुकांसमोर आम्हाला पूजा, सत्संग, जप करायला मिळाला.
परतताना लगेचच डावीकडे २०० पायऱ्या खाली उतरून गेल्यावर ‘दत्तधुनी’ हे ठिकाण लागतं. इथे दर सोमवारी स. ७ ते ९ या वेळात सर्व सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो. अगदी आजही हा चमत्कार पाहण्यासाठी भक्त आदल्या रात्री तिथे येऊन झोपतात. या ठिकाणी भक्तांसाठी २४ तास प्रसादाची व्यवस्था आहे. अर्थात विनामूल्य. त्या प्रसादाची चव या जन्मी विसरणं अशक्य. मूगडाळखिचडी, छोले व गोड शिरा असे तीनच पदार्थ पण ‘अमृताते पैजा जिंके’ अशी चव. तिथच कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असं मानतात. त्या कुंडातील पाणी अत्यंत मधुर व निर्मळ, अगदी पीतच राहावं असं. तिथल्या प्रसादाने व त्या गंगोदकाने आमचा सगळा थकवा शोषून घेतला.