क्रिकेट, टेनिस, फूटबॉल, बॅडमिंटन, हॉकी.. आपल्याकडच्या तरुणाईच्या आवडत्या क्रीडाप्रकारांपैकी क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धा या वर्षांच्या सुरुवातीलाच होणार आहेत. त्याशिवाय हॉकी, कबड्डी, बॅडमिंटन लीगची लगबग आहेच.
नवे वर्ष नव्या आशा आणि नवी स्वप्ने घेऊन येते. २०१४ या सरलेल्या वर्षांत भारतात विविध खेळांच्या लीगचे वातावरण बहरल्याचे प्रत्ययास आले. खेळांचा राजा असे बिरुद मिरवणाऱ्या फुटबॉलमधील जगज्जेतेपदाला जर्मनीने गवसणी घातली. २०१५ या वर्षांत सर्वाचा आवडता खेळ म्हटल्या जाणाऱ्या क्रिकेटचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये निश्चित होईल. भारतातील पावसाळी दिवसांत जसे जगभरात फुटबॉलचे वातावरण असते, तसेच प्रो-कबड्डी लीग आणि इंडियन बॅडमिंटन लीग होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचप्रमाणे या वर्षी कबड्डीचा विश्वचषकसुद्धा होणार आहे.
जगज्जेतेपदाचे स्वप्न
२०११मध्ये भारतीय उपखंडात झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत महेंद्रसिंगच्या नेतृत्वाखाली भारताने जगज्जेतेपदाचे स्वप्न साकारले होते. त्या ऐतिहासिक घटनेला येत्या २ एप्रिलला चार वष्रे होत आहेत. या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतासह १४ राष्ट्रे सज्ज झाली आहेत. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत होणाऱ्या या विश्वचषक स्पध्रेत १४ ठिकाणी होणाऱ्या ४९ सामन्यांनंतर विश्वविजेता निश्चित होईल. या स्पध्रेतील संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून, राऊंड रॉबिन लीगची प्राथमिक फेरी आणि नंतर बाद फेरी होईल. भारताच्या ‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज या प्रमुख संघांचा समावेश आहे. यंदाच्या विश्वचषकाचे वैशिष्टय़ म्हणजे १९९२पासून विश्वचषक स्पध्रेत आपला ठसा उमटवणारा सचिन तेंडुलकर निवृत्तीमुळे यंदा मैदानावर दिसणार नाही. परंतु क्रिकेट या खेळाला दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल यंदा तो सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाचा सदिच्छादूत म्हणून वावरणार आहे.
२०१५चा प्रारंभ भारतीय संघ पर्थमध्ये चौथ्या कसोटी सामन्याने करणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघ तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा खेळणार आहे. यात श्रीलंका हा तिसरा संघ खेळणार आहे. मग विश्वचषकानंतर इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. याचप्रमाणे ८ जुलैपासून अॅशेस मालिका इंग्लंडच्या भूमीवर रंगणार आहे.
हॉकी वर्ल्ड लीग भारतात
मागील वर्षी भारतात थॉमस आणि उबेर चषक जागतिक बॅडमिंटन स्पर्धा झाली. या स्पध्रेचे यजमानपद भारताने जबाबदारीने पेलले. यंदा ५ ते १३ डिसेंबर या कालावधीत पुरुषांच्या एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग फायनलचे यजमानपद भारत सांभाळणार आहे. याचप्रमाणे बॅडमिंटनच्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा या वर्षीसुद्धा होणार आहे. २० ते २५ जानेवारी या कालावधीत लखनौला इंडिया ओपन ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धा होणार आहे, तर २४ ते २९ मार्च या दरम्यान इंडिया सुपर सीरिज स्पर्धा नवी दिल्लीला होणार आहे. कबड्डी या खेळाची बहुप्रतीक्षित विश्वचषक स्पर्धासुद्धा या वर्षी होणार आहे. फक्त त्याच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.
भारतात यंदाही लीगचा बहर
२०१४ या वर्षांचा आढावा घेतल्यास भारतात विविध खेळांच्या लीग स्पर्धाचा बहर दिसला. प्रो-कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) या अनुक्रमे कबड्डी आणि फुटबॉलच्या लीग स्पर्धानी भारतीय जनमानसाचा वेध घेतला. या यशामुळे भारताच्या क्रीडाक्षेत्राची मानसिकता क्रिकेटकडून अन्य खेळांकडेही गांभीर्याने पाहात आहे, ही गोष्ट अधोरेखित झाली. २०१५मध्ये प्रो-कबड्डी लीग आणि आयएसएलचा दुसरा अध्याय रंगणार आहे. या वर्षीय इंडियन बॅडमिंटन लीग आणि हॉकी लीगचा थरारसुद्धा क्रीडारसिकांना अनुभवता येईल. याशिवाय भारताच्या क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवणारी इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा ८ एप्रिल ते २४ मे या कालावधीत होणार आहे. याचप्रमाणे महाराष्ट्रात कबड्डीची महाकबड्डी प्रीमियर लीग स्पर्धा होणार असून, त्यात पुरुष आणि महिला गटांमध्ये प्रत्येकी आठ संघांमधून १६० खेळाडू खेळणार आहेत.
जगज्जेतेपदाचे आव्हान
क्रिकेटप्रमाणे महिलांसाठीची फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कॅनडामध्ये ६ जून ते ५ जुलै या कालावधीत होणार आहे. तसेच पुरुष गटाच्या १७ आणि २० वर्षांखालील वयोगटाच्या फिफा विश्वचषक स्पर्धाही यंदा होणार आहेत. जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा इंग्लंडमध्ये १३ ते १९ जुलै या दरम्यान होणार आहे. जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा डेन्मार्क येथे २६ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत, विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अमेरिकेत ७ ते १३ सप्टेंबर या कालावधीत तर विश्वचषक रग्बी स्पर्धा इंग्लंडमध्ये १८ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. कतार येथे विश्व अजिंक्यपद हौशी बॉक्सिंग स्पर्धा ५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
ग्रँड स्लॅम टेनिसला १९ जानेवारीला
टेनिसच्या विश्वात ग्रँड स्लॅम स्पर्धाना आगळे महत्त्व असते. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन अशा चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे हे टेनिसपटूंसाठी आव्हानात्मक असते. हंगामाचा प्रारंभ करणारी ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा मेलबर्न येथे १९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. मातीच्या कोर्टवर होणारी फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा २४ मे ते ७ जून दरम्यान, तर ग्रास कोर्टवरील विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा २९ जून ते १२ जुलै दरम्यान होणार आहे. त्यानंतर हंगामाचा शेवट ३१ ऑगस्ट ते १३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेने होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा