सलील आणि संदीप यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम पाहिला. घरी येताना कार्यक्रम मनात गुंजत होता. तेव्हा अचानक
‘येतात उन्हे दाराशी,
हरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा,
तव गंधावाचून जातो.’
या ओळींनी लक्ष वेधून घेतलं. पुन्हा पुन्हा या ओळी मनात घोळवताना विचार केला की खरंच आपल्या दाराशी उन्हे येतात? शन्नांचं वाक्य आहे.. ते म्हणतात, ‘‘मध्यरात्र काळोख कुशीत घेते आणि पहाट या काळोखाचं ओझं हळूहळू आपल्या पाठीवरून उतरवते.’’ पण हे ओझं उतारायच्या आतच आपण घराबाहेर पडलेलो असतो. उन्हं ट्रेनच्या नाहीतर ऑफिसच्या नाहीतर क्लासरूमच्या खिडकीतूनच बहुतेक वेळेला अनुभवतो आणि परफ्युम्स, बॉडी स्प्रे यांचाच गंध आपल्याला हवाहवासा वाटतो. प्रत्येक गोष्टीचा संबंध पैशाशी जोडलाय आपण. आपल्याला पैशाची ओढ लागली आहे. तेव्हा पटकन मला वाटलं माणसाची माणसाबद्दलची एकमेकांसाठीची ओढ हरवलीये का? आणि ही ओढ नसते तेव्हा वाटतं घरात माणसं राहतात की यंत्रं? उन्हं घरात येण्यासाठी घरात खिडक्या नकोत? त्या उघडायला घरात माणसं नकोत? ज्या घरामध्ये ओढच नाही त्या घरात कसला गंध येणं अपेक्षित आहे? ब्रॅण्ड न्यू टॅबचा? की नुकत्याच एटीएममधून काढलेल्या करकरीत नोटांचा?
माणसांनी एकत्र राहण्याची पद्धत फार जुनी आहे. अगदी ऋग्वेद काळापासून. त्या काळी माणूस टोळीनं राहात होता. त्याला नाती माहितीच नव्हती. पुढे सामाजिक कारणांनी म्हणा किंवा वैज्ञानिक कारणांनी म्हणा कुटुंबव्यवस्थेची सुरुवात झाली. एकत्र कुटुंबपद्धती रुजू झाली. पुढे हीच पद्धत खर्चीक आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे या आणि अशा अनेक कारणांमुळे विभक्त कुटुंब पद्धती आली. आणि आता कुटुंब हे माणसांनी बनतं आणि याच कुटुंबाला जोडून ठेवणारी एकमेकांमधली आपुलकी, ओढ आपण विसरलो तर नाही ना? एलसीडीच्या समोरच्या भिंतीवर गळ्यात गळे घातलेला फोटो किती कौतुकाने लटकवलेला असतो नाही? पण रविवारीसुद्धा आपल्याला त्या फोटोकडे बघायला वेळ नाही. नात्यातली ती ओढ त्या फोटोपुरतीच मर्यादित होती का? अवधूत गुप्ते एका गाण्यात म्हणतात, ‘‘च्युइंगम चघळताना त्यातली साखर निघून जाते आणि आपण फक्त ते चघळत राहतो. तसंच नात्यांच्या बाबतीत तर होत नसेल? पण खरंच ही ओढ अशी संपणारी, सरणारी गोष्ट आहे?’’
साधारणत: सद्य परिस्थितीत पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशाकडे जायचा ओढा वाढलाय आणि म्हणूनच आपल्या माणसांची, आपल्या मातीची ओढ आटत चालली आहे की काय असं वाटत. इंटरनेट, ब्लूटूथशी आपण किती सहज कनेक्ट होतो, पण आपल्यातल्या कनेक्शनचं काय? आपल्या मोबाइलमध्ये ८ जीबी, १६ जीबीचं मेमरी कार्ड किती कौतुकाने घालतो, पण आपल्याकडे एकमेकांसोबत शेअर करण्यासारखी कितीतरी जीबीची मेमरी आहे, पण दुर्दैवाने त्यात स्वार्थ नावाचा व्हायरस शिरलाय आणि त्याने नात्यातली सगळी ओढं शोषून घेतलीये. उरलाय तो फक्त कोरडेपणा.
ही ओढ खरं तर आईच्या पोटात असल्यापासूनच असते. पहिल्यांदा ती आईबद्दल निर्माण होते. पण मग जन्माला आल्यानंतर आई मांडीवर झोपण्याऐवजी पाळण्यात झोपवते, खांद्यावरून फिरवण्याऐवजी बाबा गाडीमधून फिरवते. दुसऱ्याच्या हातात आपल्या बाळाला दिलं तर त्याला संसर्ग होईल म्हणून एकटंच ठेवते. इथूनच एकटेपणाची सुरुवात होते. घरातले आजी, आजोबा आऊटडेटेड वाटायला लागतात, बाबा पकावू वाटायला लागतात आणि आई लेक्चर देणारी वाटायला लागते. मोठं होऊन पैसा कळायला लागतो आणि आपल्याच नकळत आपणही याचीच कास धरतो आणि मग कुणा एकाला ‘घराला घरपण देणारी माणसं’ अशी जाहिरात करावी लागते आणि ती आपल्याला भावते, कारण आपल्याच नकळत आपण घरातलं घरपण विसरत चाललोय. आई, आजी, आजोबा, बाबा यांची ‘कुशी’ नाहीशी तर होणार नाही ना? आजच्या या धकाधकीच्या जीवनात जपणाऱ्या हृदयावर ‘ओढ’ नावाचं मलम हवंय, घरातल्या भिंतींमध्ये प्रेमाचा ओलावा हवाय, घरातला कोपरा आणि कोपरा इंटीरियर डेकोरेटरच्या सांगण्यावरून वापरण्यापेक्षा आपल्याला आपला असा हक्काचा एक कोपरा हवाय. जेव्हा ही ‘ओढ’ घरात नसते ना तेव्हा माणूस एकमेकांपेक्षा यंत्राशी कनेक्ट होतो. गंध येण्यासाठी घरात एअर फ्रेशनर मारावा लागतो, वाढदिवसाचे रिमांइंडर्स लावावे लागतात. त्यापेक्षा आपल्या २४ तासांतला थोडासा वेळ आपण आपल्या माणसांसाठी काढला तर? त्यांच्याशी संवाद साधला तर? आपल्यासोबत घडणाऱ्या काही गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या तर? आपल्याला व्हॉटस् अपवर आलेला एखादा मॅसेज, जोक त्यांच्यासोबत शेर केला तर? विवेकानंद म्हणतात ‘शिक्षणाने माणूस आणि पर्यायाने समाज घडला पाहिजे. पण समाजाची सुरुवातच मुळी आपल्या घरापासून, कुटूंबापासून होते. आपण शिकतो ते आपलं करिअर घडवण्यासाठी, स्वत:ला घडवण्यासाठी नाहीच. डोळ्यांची झापड आपण आपल्याला हवी त्या दिशेला फिरवतो, पण डोळ्यांपासून ती दूर करत नाही. आपल्या माणसांचा आदर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तो एकदा केला ना की मग अत्याचारही होणार नाहीत. ओढ ही सगळ्यात पहिली आणि मूलभूत गोष्ट आहे. ती एकदा आपल्या माणसांबद्दल वाटायला लागली की आपोआपच समाजाबद्दल आणि मग देशाबद्दल वाटायला लागेल. पण आजच्या या ग्रँड आणि ब्रँडच्या जमान्यात स्वत:चा ब्रँड बनवण्याऐवजी स्वत:ला ग्रँड बनवणं जास्त गरजेचं आहे.
ओढ ही खरं तर कशाचीही असू शकते. ज्ञानाची, माणसाची, व्यसनाची; पण आपल्याला ओढ आहे ती फक्त पैशाची. ती ही असावी, पण त्याला काहीतरी मर्यादा असावी. मला वाटतं आपल्या सगळ्या सकारात्मक गोष्टीची ओढ लागली पाहिजे आणि याच सकारात्मक ओढीचा प्रत्येक घरात गंध असला पाहिजे. एका कवींनी म्हटलंय.
नको सूर्य चंद्र वर जाया,
नको जगाची सफर कराया,
नेई विमान मज त्या ठाया,
जेथ माय मम वास करी. कवीलासुद्धा घराची त्यांच्या आईची ओढ लागली आहे. आपल्याही मनात अशीच ओढ दडलेली आहे, पण त्यातला ओलावा आपण जपला पाहिजे इतकंच. शेवटी एवढंच म्हणेन,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नसतेस घरी तू जेव्हा..
कळलेच नाही
एकमेकांपासून तुटलो केव्हा
डोळ्यांतला अश्रू हातावर
ओघळला जेव्हा
काहीतरी सापडल्यासारखं
वाटलं तेव्हा
वाटलं हाच तो ओलावा
नात्यांमध्ये आणावा
एशियन पेण्ट्सच्या
कलरसोबत
थोडा हासुद्धा भरावा
दुधात साखर विरघळावी
तसा एकमेकांत विरघळून जावे
भांडता भांडता कधीतरी
सहजच एकमेकांचे व्हावे..

नसतेस घरी तू जेव्हा..
कळलेच नाही
एकमेकांपासून तुटलो केव्हा
डोळ्यांतला अश्रू हातावर
ओघळला जेव्हा
काहीतरी सापडल्यासारखं
वाटलं तेव्हा
वाटलं हाच तो ओलावा
नात्यांमध्ये आणावा
एशियन पेण्ट्सच्या
कलरसोबत
थोडा हासुद्धा भरावा
दुधात साखर विरघळावी
तसा एकमेकांत विरघळून जावे
भांडता भांडता कधीतरी
सहजच एकमेकांचे व्हावे..