आजची पिढी.. प्रेमात पडल्यावर दहा वेळा मिस कॉल देणारी, स्मायली पाठवणारी, दहा वेळा मिस यू म्हणणारी, ५० वेळा लव्ह यू म्हणणारी.. प्रेमाला आणि ब्रेकअपला दोन्हीलाही न घाबरणारी..
हे सगळं नव्हतं तेव्हा, त्या काळात प्रेम कसं केलं गेलं असेल..?
एक झलक
आजी टीव्ही बघत बसली होती.
पलीकडेच बसून प्रिया आणि मीता एकमेकींमध्येच खुसफुसत होत्या.
‘अगं, सहा मिस यू चे मेसेज आलेत त्याचे सकाळपासून..’ प्रिया मिताला सांगत होती. ते ऐकून डोळे विस्फारत मिता म्हणाली,
‘हो? वाटत नव्हतं गं असं काही असेल असं असेल म्हणून..’
‘हो ना.. आणि ना सारखे कसले कसले जोक्स, फॉरवर्डेड मेसेज, व्हॉट्सअपवरचे व्हिडीओ येताहेत सध्या त्याच्याकडून..’
किंचित लाजत प्रिया म्हणाली.
‘तू अजिबात रिप्लाय करू नकोस. कळलं ना.. मुलांचं काही सांगता येत नाही. असे दहा जणींना पाठवत असेल तो मेजेस’
‘तुला पाठवलेत?’ प्रियानं विचारलं..
‘त्याची काय टाप आहे, मला पाठवायची.. तू लगेच हुरळून जाशील हे माहीतेय म्हणून तुला पाठवत असेल..’ मिता.
‘नाही गं.. त्याचे डोळेच सांगतात..’ प्रिया.
‘डोळे कसले सांगतात.. मग थेट येऊन बोलत का नाही तो तुझ्याशी..? हे मेसेज कसले पाठवतो चोरी चोरी चुपके चुपके,’ मितानं विचारलं.
त्या दोघी बिनधास्त बोलत होत्या. त्यांना वाटत होतं, आजीचं सगळं लक्ष टीव्हीत आहे. पण आजी डोळ्यांनी टीव्ही बघत असली तरी तिचे कान मात्र या दोघींच्या कुजबुजीकडेच होते.
कुठल्या तरी मुलाचे मिस यू चे मेसेज आलेत आणि त्यामुळे आपली नात भिरभिरली आहे, हे तिच्या लक्षात आलं आणि तिच्या डोळ्यासमोरून झर्रकन ४० वर्षे सरकली..
०००
तिला आठवलं तिचं तरुणपण.. खांडेकर- फडक्यांच्या कादंबऱ्या वाचून मनात रुणझुणणारी ती प्रेमाची किणकिण. कुणीतरी आवडणं आणि त्या प्रेमाची कबुली देणं म्हणजेसुद्धा केवढं दिव्य! जात-धर्मच काय, शाखा एक असली तरी प्रेम करणं म्हणजे सुधारकी चाळे मानले जाण्याचा तो काळ. फारच कुणी आवडला किंवा आवडली तर जास्तीत जास्त मानलेला भाऊ किंवा बहीण मानण्याचा तो काळ. आजच्यासारखं धाडकन मोबाइलवरून मिस यूचा मेसेज एखादी स्मायली किंवा आपली भावना थेट व्यक्त करणारा धीट-धाडसी मेसेज पाठवणं कुणाच्या आसपासचे सात जन्म स्वप्नातही आलं नसेल, अशा काळात म्हणजे आपल्या तरुणपणी आजीनं प्रेम केलं होतं.
मुलींनी कॉलेजात शिकायला जाणंही फारसं सर्वमान्य नव्हतं असा काळ होता तो. त्यामुळे स्वप्नातला राजकुमार कॉलेजात भेटण्याची सोय नव्हती. तो तिला भेटला होता कुठल्या तरी ओळखीतल्या लग्नात. भेटला म्हणजे फक्त नजरानजर.. मनाला कळायच्या आत डोळे आपली भाषा बोलून मोकळे झाले होते. ती जेवायला बसल्याचं बघून त्यानं पंगतीत जिलब्या वाढायला घेतल्या. तिच्या आसपासच्या काकू मावश्यांना आग्रह करताना तिच्या पानात चार जिलब्या जास्त पडल्या होत्या. तो मठ्ठय़ाचा जग घेऊन आला तेव्हा ती शेजारी बसलेल्या मावशीला म्हणाली, ‘मावशी, उद्या संध्याकाळी सहा साडेसहाला तलावाजवळच्या गणपतीला जाऊ या का..?’
दुसऱ्या दिवशी त्याची स्वारी साडेपाच वाजल्यापासून गणपतीच्या देवळात हजर. कालच्या मावशीला बरोबर न नेण्याची खबरदारी तिनं घेतली खरी, पण शेजारची चिंगी बरोबर होती.
मग अशी बरेच दिवस नुसतीच नजरानजर सुरू राहिली. त्याला तिचं घर कळलं.. तिच्या घरातले लोक कोण ते समजले. पण बोलायचं कसं..? हळूहळू तिच्या वाडय़ासमोरच्या त्याच्या फेऱ्या वाढल्या. तिचीही नजर आपल्याला शोधायला भिरभिरत असते हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या अंगात दहा हत्तींचं बळ आलं.
एका दिवशी जाता जाता त्यानं खुणेनेच तिला ‘तू आज खूप छान दिसते आहेस’ हे सांगितलं तर ती लाजेने चूर झाली. पण त्याच क्षणी तिच्या पाठीतून एक थंडगार लाट गेली. कुणी बघितलं तर नसतील ना त्याच्या खाणाखुणा, या भीतीनं तिच्या छातीत धस्स झालं. आणि त्याबरोबर त्याला आपण आवडतो या जाणिवेने ती अंतर्बाह्य़ आनंदली.
आता तिचा सारखा वाडय़ाच्या सज्ज्यात येऊन तो दिसतोय का हे बघायचा चाळा सुरू झाला. आसपासच्या लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिला किती बहाणे करावे लागायचे. घरातली एखादी वस्तू सज्जात आणून ठेवायची, मग थोडय़ा वेळाने ती पुन्हा घरात घेऊन जायची. शेजारच्या छोटय़ा चिंगीला बोलवून तिच्याशी बळंबळंच सज्जात गप्पा मारत उभं राहायचं. सारखं सज्जात येऊन बाबांची, दादाची वाट बघायची. अस्वस्थ असली की ती वेणीचा पुढे असलेला शेपटा मागे फेकायची किंवा मागे असलेला पुढे ओढायची. घराबाहेर पडल्यानंतर तिचं लक्ष सारखं आजूबाजूला, आगेमागे तो आहे का याकडे जायला लागलं.
एकदा ती लायब्ररीत गेली तर तिच्या मागोमाग तो तिथे. तिला इतकं धडधडायला लागलं.. तेवढय़ात तो पुढे आला आणि हातातलं पुस्तक समोर करून म्हणाला, ‘हे पुस्तक वाचलंय का तुम्ही.. फार छान आहे..’ त्याच्या हातातून पुस्तक घेताना तिची नजर ग्रंथपाल, इतर लोक बघत नाहीत ना याकडेच होती. पुस्तकात तिच्यासाठी एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर तिचं नाव नव्हतं, त्याचंही नाव नव्हतं, त्याचं अक्षर तिला परिचित नव्हतं तरी तिला कळलं की ती चिठ्ठी तिच्यासाठीच आहे. चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘उद्या संध्याकाळी सहा वाजता पाच नंबरच्या गेटपाशी याल का..? मला बोलायचं आहे तुमच्याशी.’
तिचा दुसरा सगळा दिवस इतका अस्वस्थ हुरहुरीत गेला.. जावं का.. की न जावं..? त्याला काय बोलायचं असेल..? कुणीतरी आपल्याला त्याच्याशी बोलताना बघितलं तर..? आणि नंतर घरी कळलं तर..? आणि जाताना घरी काय सांगून जायचं..?
शेवटी ती गेलीच नाही. पण सतत आतबाहेर करत राहिली, तर अध्र्या पाऊण तासानंतर तो तिच्या घरासमोर. तेवढय़ात खालून चिंगी दडदडा धावत तिच्याकडे आली आणि म्हणाली, ‘ताई, ताई हे बघ, तो खाली दादा उभा आहे ना, त्याने मला चॉकोलेट दिलंय.. आणि तुला हे पत्र दिलंय.’ चिंगीचं बोलणं म्हणजे आगीचा बंब आल्यासारखं. तिनं पटकन तिला धपाटा घालत तिच्याकडून ती चिठ्ठी घेतली आणि कुणी चिंगीचं बोलणं ऐकलं तर नाही ना, याची खातरजमा करून मग ती चिठ्ठी उघडली.
चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘तुम्ही याल असं खूप वाटलं होतं. पण तुम्ही नाही आलात. का नाही आलात? मी काही तुम्हाला खाणार नव्हतो. फक्त तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगायचं होतं की तुम्ही मला खूप आवडता. तुम्हाला बघितल्या दिवसापासून तुमच्याशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. सारखं तुम्हाला बघावंसं, भेटावंसं वाटतं. तुम्हालाही तसंच वाटतं का..? असेल तर तुमचा वेणीचा शेपटा एकदा तुमच्या नेहमीच्या पद्धतीने मागे टाका. मला काय ते समजेल.’
तिनं किती पटकन शेपटा मागे टाकला ते तिलाही समजलं नाही.
मग चिंगीला टॉफी मिळायल्या लागल्या आणि तिला चिठ्ठय़ा. आणि तिचा वेणीचा शेपटाही सारखा मागेपुढे उडय़ा मारायला लागला. डोळ्यांच्या पलीकडची भाषा तयार व्हायला लागली. ‘संध्याकाळी शंकराच्या देवळात भेटायचं का,’ अशी चिठ्ठी आली की होकार असेल तर वेणीचा शेपटा मागे टाकला जायचा. नकार असेल तर उजव्या बाजूला पुढे असलेला शेपटा खांद्यावरून मागे जाऊन डाव्या खांद्यावरून पुढे घेतला जायचा. वेणीचा शेपटा मागे टाकून होकार मिळाला तरी ती भेट म्हणजे देवळात एका टोकाला तो बसलेला असायचा आणि एका टोकाला ती. त्याच्याशी जाऊन बोलायचं धाडस तर ती स्वप्नातही करू शकत नव्हती. पण शेपटा मागेपुढे करत त्याला दिलेली सांकेतिक उत्तरं, चिंगीकडून आलेल्या चिठ्ठय़ा वाचून झाल्यावर त्या कुणाच्याही हातात पडू नयेत यासाठीची धडपड, देवळात असं एकमेकांकडे चोरटं बघत बसून राहणं हे सगळं इतकं धडधड वाढवणारं होतं.. पण तरीही हवंहवंसं.. हे काहीतरी फुलपाखरी आहे म्हणून ती रोमांचितही होत होती आणि उद्या घरातल्या नव्हे, वाडय़ातल्या किंवा वाडय़ाबाहेरच्या कुणालाही कळलं तर काय होईल म्हणून घाबरतही होती.
मी काही तुम्हाला खाणार नव्हतो. फक्त तुम्हाला प्रत्यक्ष भेटून सांगायचं होतं की तुम्ही मला खूप आवडता. तुम्हाला बघितल्या दिवसापासून तुमच्यशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. सारखं तुम्हाला बघावंसं, भेटावंसं वाटतं. तुम्हालाही तसंच वाटतं का…
शंकराचं देऊळ हे एकमेकांना बघायचं एकमेव ठिकाण. खाली उभं राहून त्यानं सहा वेळा केसातून हात फिरवला की त्याचा अर्थ सहा वाजता येशील का, हे तिला आपोआपच समजायचं. चिंगीला त्यानं काय सांगितलं होतं काय माहीत, त्याची चिठ्ठी आपोआप तिच्यापर्यंत यायची. बाबा, दादा किंवा आई कुणी असेल तर चिंगी गपचूप निघून जायची आणि नंतर ती एकटी असताना येऊन चिठ्ठी द्यायची.
पण एक दिवस व्हायचं तेच झालं. चिंगी तिला चिठ्ठी देत असताना नेमके बाबा आले. तिनं काहीतरी सारवासारव करायचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहऱ्यानं काय सांगायचं ते सांगितलं. बाबांनी ती चिठ्ठी वाचली. चिंगीला घेऊन थेट खाली उभ्या असलेल्या त्याच्याकडे गेले. काहीतरी बोलले. तो मान खाली घालून निघून गेला. तिनंही खूप बोलणी खाल्ली. तिचं बाहेर जाणंच नाही तर सज्जात फ ेऱ्या मारणंही पूर्ण बंद झालं. आई, बाबा, दादा यांच्यापैकी कुणीतरी असेल तरच तिला बाहेर जाता येईल असं फर्मान निघालं. चिंगीला घरी यायला मनाई केली गेली. आजूबाजूच्या लोकांनाही काय झालं ते कळलं. मग तेही येऊन सांगायला लागले की तो असा सारखा येऊन समोर उभा का राहतो, फेऱ्या का मारतो याचा आम्हाला कसा संशय यायचा, ती सारख्या सज्जात येरझाऱ्या का घालते, वेणीचा शेपटा सारखा मागेपुढे का करत असते हा आम्हाला प्रश्न कसा पडायचा वगैरे, वगैरे. आता हिला फार दिवस घरी कसं ठेवून घ्यायचं, लौकर उजवलं नाही तर चार लोकांत असं काहीतरी केल्याचा बभ्रा होईल आणि हिचं लग्न होणार नाही, अशा घरात चर्चा झडायला लागल्या. तिला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं.
आणि एक दिवस अचानक कुणाच्या तरी मध्यस्थीनं एक स्थळ सांगितलं गेलं. तिचे आईवडील रीतसर पत्रिका घेऊन गेले. पत्रिका जमल्या. मुलाचे आईवडील मुलीला बघून गेले. मुलगा रेशनिंग खात्यात नोकरीला होता. खात्यापित्या घरचा होता. लग्न ठरलं आणि साखरपुडय़ाच्या दिवशी त्याला बघितल्यावर तिच्या बाबांना कळलं हा मुलगा तोच. त्यांनी मध्यस्थाला चांगलंच झाडलं, अशा मवाली मुलाशी घरोबा जुळवून दिला म्हणून. मध्यस्थाने त्याच्या घरी जाऊन सांगितलं. त्याच्या आईवडिलांना कळलं की हे आपल्या मुलाचा आणि सुनेचा प्रेमविवाह आहे. मग त्यांनीही आकांडतांडव केलं. जात वगैरे सगळ्या गोष्टी जुळत असल्या तरी ही प्रेमविवाहाची थेरं त्यांना अजिबात मान्य नव्हती. शेवटी होणाऱ्या सुनेला ठणकावून सांगितलं गेलं की ती मान खाली घालूनच राहील, प्रेमविवाहाचं धाडस तिनं केलं असलं तरी ती सासरच्या लोकांच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार नाही आणि मग तो तथाकथित प्रेमविवाह झाला.
०००
आजीच्या डोळ्यासमोरून झरझर तो सगळा काळ गेला. त्या वेळी हे असे आजच्यासारखे मोबाइल असते तर?
तिला तिच्या मुलीचा काळ आठवला. आजीच्या लग्नानंतर जवळजवळ २५ वर्षांनंतरचा काळ. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं. मुलींनी कॉलेजात जाऊन शिकणं, शिक्षिकेची, बँकेतली किंवा एखादी सरकारी ऑफिसातली नोकरी करणं रूढ झालेलं. जरा बऱ्या घरात लँडलाइन फोन आलेले. अशा काळात कॉलेजात जाणारी आजीची मुलगी, म्हणजे प्रिया आणि मिताची आई प्रेमात पडली. जुने पीळ थोडे सैल झालेले होते, तरीही पूर्ण सुटले नव्हते. फोनची रिंग वाजायची, आजीनं म्हणजे मुलीच्या आईनं किंवा बाबांनी फोन घेतला की फोन कट व्हायचा. मुलीनं घेतला की पलीकडून कुणीतरी बोलायचं. कोण आहे विचारलं की लेक सांगायची की मैत्रिण. तिला आठवलं, एकदा लेक मैत्रिणीबरोबर बाहेर जायचंय म्हणून आवरून बसलेली होती. फोनची रिंग दोनदा वाजून कट झाली. तशी आता माझा मूड गेला, फिरायला जायचा प्लॅन कॅन्सल असं म्हणून ती घरीच बसून राहिली. कधीकधी फोन यायचा, तिची मैत्रिण बोलतेय असं सांगितलं जायचं. नाव विचारलं की पलीकडची मुलगी माहीत नसलेल्या भलत्याच मैत्रिणीचं नाव सांगायची, आणि लेकीनं फोन घेतला की पटकन कसली तरी निरोपानिरोपी होऊन फोन संपायचा. काहीतरी चाललंय ते समजायचं, पण उमगायचं नाही. नंतर रीतसर लेकीनं घरी सांगितलं आणि ते लग्न झालंही. पण मधल्या काळातला एक किस्साही लेकीनंच नंतर सांगितला. दोघांचं कुठेतरी भेटायचं ठरलं. बहुधा प्रभात टॉकिजजवळ.. ती जाऊन थांबली प्रभात टॉकिजच्या या गेटला आणि तो थांबला त्या गेटला. दोघंही किती उशीर असं म्हणत चडफडत एकाच ठिकाणी तासभर थांबून निघून आले. पण पाच मिनिटांच्या अंतरावर असूनही त्यांना कळलंच नाही की एकमेकांना आपण कुठे आहोत ते कळवताही आलं नाही. आजीच्या मनात आलं.. तेव्हा मोबाइल असते तर..?
000
प्रिया आणि मिताची अजूनही कुजबूज सुरू होती. आजीला सगळं माहीत होतं, कुणाचा मिस कॉल आल्यावर प्रिया कावरीबावरी होते.. मेसेजचा टोन वाजतो, ती मेसेज उघडून बघते आणि कशी खुदकन् स्वत:शीच हसते.. तीन पिढय़ांच्या प्रेमाची आजी साक्षीदार आहे. एक पिढी होती, तेव्हा कुठलाच फोन नव्हता.. एक पिढी होती तेव्हा लँडलाइन होता..
आणि आताची पिढी..
लव्ह इन द टाइम ऑफ मोबाइल अनुभवणारी.
दहा वेळा मिस कॉल देणारी, स्मायली पाठवणारी, दहा वेळा मिस यू म्हणणारी, ५० वेळा लव्ह यू म्हणणारी.. प्रेमाला आणि ब्रेकअपला दोन्हीलाही न घाबरणारी..
आजीच्या मनात आलं.. आमच्यावेळी मोबाइल नव्हते म्हणून काय झालं..? प्रेम तर होतंच ना!