मराठी माणसाच्या सांस्कृतिक विश्वात मराठी टीव्ही मालिकांना महत्त्वाचं स्थान आहे. या मालिकांनी त्याचं भावविश्व व्यापून टाकायला सुरुवात केली त्याला आता जवळजवळ चाळीस वर्षे होत आली आहेत. या प्रवासाचा एक धांडोळा..

जॉन लोगी बेअर्डने २ ऑक्टोबर १९२५ साली ‘स्टूकी बिल’ ही कृष्णधवल चित्रफीत (सेकंदाला पाच चित्रे या गतीने) प्रक्षेपित केली. दूरचित्रवाणीचं हे जगातलं पहिलंवहिलं प्रक्षेपण. या पद्धतीला मेकॅनिकल टेलिव्हिजन असं संबोधलं गेलं. त्यानंतर बरोब्बर ४७ वर्षांनी दूरचित्रवाणीवर मराठी मुद्रा अवतरली. जर्मन तंत्रज्ञांनी तांत्रिक घडी बसवून दिली आणि २ ऑक्टोबर १९७२ साली मुंबई दूरदर्शनची सुरुवात झाली. दूरदर्शनचा त्या टिपिकल टय़ूनवर गोल गोल फिरत येणाऱ्या लोगोने छोटय़ा पडद्यावर सर्वसामान्यांसाठी एक नवं विश्वच खुलं केलं. लोककला, नाटक आणि चित्रपट या मनोरंजनाच्या चढत्या पायरीवर आलेलं टेलिव्हिजन थेट तुमच्या-आमच्या दिवाणखाण्यात विसावलं.
बातम्या, माहितीपर कार्यक्रम, काही मनोरंजनाचे कार्यक्रम या चार तासांच्या प्रक्षेपणातून टीव्हीच्या छोटय़ा पडद्याने सर्वसामान्यांचं आयुष्य व्यापायला सुरुवात केली.

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
maharashtrachi hasya jatra show will start again from december prajakta mali shares video
Video : तारीख अन् वेळ ठरली! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार…; प्राजक्ता माळीने शेअर केली सेटवरच्या शूटिंगची झलक
cid aahat serials in marathi
‘सीआयडी’ आणि ‘आहट’ मालिकांचा थरार आता मराठीत; कधी आणि कुठे बघाल या मालिका, जाणून घ्या…
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

अर्थातच दूरदर्शन सरकारी माध्यम असल्यामुळे मनोरंजनातून प्रबोधन या बोधवाक्यावर सारं काही बेतू लागलं. विनायक चासकर, याकूब सईद, विजया धुमाळे-जोगळेकर, मीना वैष्णवी, अरुण काकतकर, सुहासिनी मुळगावकर, विनय धुमाळे, विश्वास मेहंदळे, आकाशानंद, मनोहर पिंगळे, अशोक डुंबरे अशा धडपडय़ा तरुण निर्मात्यांनी या छोटय़ा पडद्याला आपलंसं केलं. दूरचित्रवाणीची थेट पाश्र्वभूमी नसली तरीदेखील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, आकाशवाणी, साहित्य-संगीतातील उच्च शिक्षण अशा प्रकारची एक कलात्मक, सांस्कृतिक, पाश्र्वभूमी अनेकांना होती. दूरचित्रवाणी हे माध्यम नवीन होतं, नेमकं काय आणि कसं असावं याबाबत थेट अशी परिभाषा नव्हतीच. त्यापूर्वीच सुरू झालेल्या दिल्ली दूरदर्शनचं मार्गदर्शन होतं, पण मराठी मातीला सामावून घेणारं नवं काही तरी हवं होतं. मग स्टुडिओच्या रचनाबद्ध अवकाशात साहित्य, कला आणि संस्कृतीचा जागर सुरू झाला. दूरदर्शनच्या कार्यक्रमांनी (ज्याला प्रोग्राम म्हटलं जाई) स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. या कार्यक्रमांचा खरं तर स्वतंत्रच आढावा घ्यावा लागेल, पण आपला विषय आहे तो मराठी मालिकांचा. त्या विश्वात शिरण्यापूर्वी एका कार्यक्रमाचा उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे ‘गजरा’. वेगवेगळ्या विषयांवर आधारित नृत्य, गायन, प्रहसनं, स्किट अशा तीन-चार कार्यक्रमांचा समावेश त्यामध्ये असे. एनएसडीमधून आलेल्या विनायक चासकर यांची ही निर्मिती. दर बुधवारी सायंकाळी ८.३० वाजता सादर होणाऱ्या एक तासाच्या या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना टेलिव्हिजनने चेहरा मिळवून दिला. अर्थात ठरावीक कलाकारांचा संच आणि सुरुवात- मध्य- शेवट अशी रचना असणारी गोष्ट यात नव्हती.

पहिली मराठी सीरिज

गजरा चांगलाच फुलला असताना मालिकांच्या जन्मास कारणीभूत ठरणारी एक घटना घडली. लखनौ दूरदर्शनवर १९७६ मध्ये एक विनोदी कार्यक्रम सुरू झाला होता. मुंबई केंद्राचे निर्देशक व्ही. एच. एस. शास्त्री यांनी आपल्याकडेदेखील असं काही सुरू करता येईल का याची विचारणा केली. दूरदर्शनवरील तत्कालीन निर्मात्यांनी अनेक पर्याय चाचपून पाहिले. निर्मात्या विजया धुमाळे जोगळेकर त्यापैकीच एक. त्यांना शालेय अभ्यासक्रमातली चिं. वि. जोशी यांची चिमणरावांची कथा आठवली. चिमणराव- गुंडय़ाभाऊंच्या कथांवर आधारित काही करता येईल का यावर त्यांचा विचार सुरू होता आणि त्याच वेळी श्रीधर घैसासांनी चिंविंच्या दोन कथांचे, पटकथा संवाद लिहून याकूब सईदना दाखविले होते. हा सारा योगायोग जुळून आला नि पहिल्या मराठी मालिकेचा जन्म झाला. चिमणरावाचे स्क्रिप्ट सर्वानाच मान्य झाले. पात्रांचा शोध सुरू झाला. त्या वेळी गजरामध्ये दिलीप प्रभावळकरांनी एक स्किट सादर केलं होतं. ‘पंचवीस एक्के पंचवीस’. एका सामान्य वकुबाच्या पण मोठय़ा आविर्भावात वावरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील पंचवीस-पन्नास-पंचाहत्तर असे टप्पे त्यांनी मांडले होते. विजया धुमाळेंना प्रभावळकरांच्या सादरीकरणातला भाबडेपणा भावला, त्या व्यक्तीत चिमणराव दिसले. हेच चिमणराव हे नक्की झालं. बाळ कर्वेना पाहिल्यावर तर थेट हाती सोटा घेतलेला गुंडय़ाभाऊच विजयाबाईंसमोर उभा राहिला. नीरज माईणकर मोरू, अरुणा पुरोहित मैना, स्मिता पावसकर काऊ, सुलभा कोरान्ने चिमणरावांची आई, आणि राघूच्या भूमिकेसाठी गणेश मतकरी असं चिमणरावांचं कुटुंब तयार झालं.

मर्यादित बजेटमुळे दूरदर्शनचा स्टुडिओच शूटिंगसाठी वापरावा लागणार होता. पटकथा संवादांना अंतिम स्वरूप येऊ लागलं तसं तालमींना वेग येऊ लागला. सारेच कलाकार नोकरी करणारे आणि दैनंदिन कामकाजातून स्टुडिओ उपलब्ध नसल्यामुळे शूटिंगसाठी रविवारशिवाय पर्याय नव्हता. दूरदर्शनची मोजकी प्रॉपर्टी, मोजकाच कपडेपट (नऊवारी साडय़ा तर विजया धुमाळेंनी घरूनच आणल्या होत्या), तीन कॅमेरा सेटअप आणि दोन इंची टेपवर चित्रीकरण सुरू झालं. (तेव्हा शूटिंगला रेकॉर्डिग म्हटले जायचे.) शूटिंगच्या वेळेस भरपूर धम्माल होत असे. अमराठी कॅमेरामननादेखील कधी कधी हसू आवरायचे नाही. (एकदा तर असे हसणे रेकॉर्डदेखील झाले होते). आणि १९७७ साली चिमणराव-गुंडय़ाभाऊ छोटय़ा पडद्यावर अवतरले.

मुळात तेव्हा टीव्ही असणं, तो पाहणं हेच अप्रूप होतं. अशा वेळी निखळ करमणूक करणारी, सर्वाना आपलीशी वाटणारी कथा, छोटय़ा पडद्यावर अनेकांच्या घरातच अवतरल्यामुळे साहजिकच तुफान प्रतिसाद मिळाला. महिन्यातून एका रविवारी सकाळी (दिल्ली दूरदर्शनच्या सोयीनुसार) भेटणारे चिमणराव गुंडय़ाभाऊ सर्वानाच भावले. लोक त्या प्रतिमांमध्ये अडकले. चार वर्षांत जवळपास ३६ भाग प्रक्षेपित झाले. नंतर दूरदर्शनने त्याचे पुनप्र्रक्षेपणदेखील केलं. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे अनेक अमराठी प्रेक्षकांनीदेखील या मालिकेची प्रशंसा केली होती. चिमणराव म्हणजे प्रभावळकर आणि प्रभावळकर म्हणजे चिमणराव हे समीकरण सर्वसामान्यांमध्ये अगदी फिट्ट बसले, अगदी आजदेखील प्रभावळकरांना अनेक कार्यक्रमांत चिमणरावाचे संवाद त्या टिपिकल आवाजात म्हणून दाखवायची मागणी केली जाते. मालिकेच्या लोकप्रियतेनंतर चिमणराव गुंडय़ाभाऊ हा चित्रपटदेखील झाला.

ठरावीक कलाकारांचा एक संच (कथानकानुसार नवीन कलाकारांचा समावेश) आणि त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रीकरण अशी सर्वसाधारण चिमणराव गुंडय़ाभाऊची रचना होती. प्रत्येक एपिसोडची कथा निराळी. एकच एक गोष्ट सर्व भागात विभागलेली नसायची. टीव्हीच्या परिभाषेत यालाच सीरिज म्हणावे लागेल. तोपर्यंत दूरदर्शनवर कथांचे माध्यमांतर होत असे, पण एक ठरावीक कलाकारांचा संच, तोदेखील सर्वच भागांमध्ये अशी रचना नव्हती. अर्थातच चिमणरावला पहिल्या मराठी सीरिजचा मान मिळाला.

पहिली मराठी मालिका

पुढे एशियाड खेळांच्या निमित्ताने १९८२ साली रंगीत दूरचित्रवाणीचा उदय झाला. खेळ संपल्यानंतर त्यातील रंगीत चित्रीकरणाची काही सामग्री मुंबई दूरदर्शनकडे आली. त्यापैकीच एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक न्यूज गॅदरिंग कॅमेरा (ईएनजी कॅमेरा). दूरदर्शनवर कार्यरत असणाऱ्या निर्मात्या मीना वैष्णवी (पूर्वाश्रमीच्या वालावलकर) यांनी हा कॅमेरा वापरून रंगीत मालिका करण्याचा प्रस्ताव मांडला. ‘वुमन इन व्हाइट’ ही इंग्रजी कथा हा यासाठी आधार होता. ईएनजी कॅमेरा मालिकेसाठी वापरायचा की नाही इथपासून ते वैष्णवी या मराठी नाहीत त्या मराठी मालिका कशी करू शकतील? असे अनेक प्रश्न उभे केले गेले. (मीना वैष्णवी या नावामुळे त्या अमराठी आहेत असे अनेकांना वाटत असे.) इंग्रजी कथानक मराठी प्रेक्षकांना कसं काय रुचेल हीदेखील शंका होतीच. पण अखेरीस तत्कालीन निर्देशक ए. एस. तातारी यांनी त्यासाठी योग्य ती परवानगी दिली.

तेरा भागांत मालिकेची आखणी करण्यात आली. मीना वैष्णवी या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थिनी. दूरदर्शनच्या नोकरीत श्रीनगरला असताना त्यांनी अनेक शॉर्ट फिल्मदेखील केल्या होत्या आणि आता हा पहिल्या वाहिल्या मालिकेचा घाट घातला होता. विक्रम गोखले, मोहन गोखले, श्वेता जोगळेकर, रघुवीर नेवरेकर (मुख्य खलनायक), बी विठ्ठल, प्रतिभा मतकरी, मीना नाईक, चंद्रकांत गोखले, यांच्या अभिनयातून साकारली गेली. ‘श्वेतांबरा’कडे मालिकेकडे पहिलेपणाचे अनेक मान जातात. ही भारतातील तशीच दूरदर्शनवरची पहिलीच मालिका म्हणावे लागेल. तसेच पूर्णपणे बाह्य़ चित्रीकरण असणारी पहिली मालिका होती. अर्थात मराठीतील पहिलीच रंगीत मालिका हे सांगायला नकोच.

काही ठरावीक भागांमध्ये एक कथा सुरू होते, तिला मध्य आहे आणि शेवट ठरलेला आहे ही मालिकेची परिभाषा यात वापरली गेली. बहुतांश चित्रीकरण आऊटडोअर होत. त्या वेळी मालिका हा प्रकार सर्वासाठीच नवीन होतं. शिकण्याचा भाग होता. सहाव्या भागापासून मालिकेने पकड घेतली. या मालिकेचं आणखी एक वैशिष्टय़ येथे आवर्जून नमूद करावे लागेल. या मालिकेविषयी सर्वांनाचा औत्सुक्य वाटत होते. अनेकांना मालिकेच्या निर्मात्या मीना वैष्णवी यांना भेटायचे होते. पण वैष्णवी यांनी एकटय़ाने मुलाखत देण्याऐवजी मालिका संपल्यावर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचा एकत्रित संच अशी खुली चर्चाच सादर केली. दूरदर्शनवरून त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. केलेल्या कामाची एकप्रकारची खुली चर्चाच होती. जणू काही मालिकेचा चौदावा भागच म्हणावा लागेल. मीना वैष्णवी आजदेखील या मालिकेचं सारं श्रेय संपूर्ण टीमला देतात.

पहिली प्रायोजित मालिका

‘श्वेतांबरा’ येण्याआधी दिल्ली दूरदर्शनवर ‘हमलोग’, ‘बुनियाद’, ‘ये जो है जिंदगी’ सारख्या सीरिज मालिका सुरू झाल्या होत्या. ठरावीक कलाकारांचा संच घेऊन रोज नव्या कथा सादर होत. जो प्रकार ७६ मध्येच मुंबई दूरदर्शनने केला होता. कथेची सुरुवात-मध्य-शेवट हा प्रकार श्वेतांबरामध्ये १३ भागांत दिसून आला. ‘चिमणराव’ आणि ‘श्वेतांबरा’ हे दोन्ही प्रयोग दूरदर्शनने इनहाऊस केले होते. प्रायोजित मालिका तेव्हा यायच्या होत्या. दूरदर्शनचा येथपर्यंतचा विचार केला तर लक्षात येते की दूरदर्शनचा कल हा मालिकांकडे झुकणारा फारसा नव्हताच. मनोरंजनातून प्रबोधन हीच बेसलाइन असल्यामुळे सारा भर हा कार्यक्रमांकडेच होता. प्रायोजित मालिका हा प्रकार मुंबई दूरदर्शनवर रुजायला वेळ गेला. दिल्ली दूरदर्शनला काही प्रमाणात हा लाभ मिळत होता. लवकरच ते वारं आपल्याकडेदेखील आलं. प्रायोजकांनी ठरावीक जाहिराती देणं, त्या बदल्यात दूरदर्शनने निर्मात्यांना ठरावीक रक्कम देणं आणि मालिका प्रक्षेपित करणं ही ती संकल्पना. १९८६-८७च्या दरम्यान आलेल्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ या मालिकेपासून मुंबई दूरदर्शनवर प्रायोजित मालिका हा प्रकार सुरू झाला.

दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ, म्हणजेच दिनू आणि विनूच्या जोडीने धम्माल विनोदी फार्स यामध्ये साकारला. बबन प्रभू यांच्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे ते मालिका रूपांतर होतं. ही मालिका कमलाकर सारंगांनी दिग्दर्शित केली होती. तर देबू देवधर कॅमरामन होते. मुंबई दूरदर्शनवरची ही पहिली प्रायोजित मालिका. काही अभ्यासकांच्या मते यामध्ये पुरेसं नाटय़ नव्हते. सादरीकरणात अनेक उणिवा होत्या, पण सर्वसामान्य प्रेक्षकांना ती बरीच आवडली होती. ‘झोपी गेलेला, गेलेला, जागा झालाऽऽऽऽ जागा झाला..’ हे शीषर्कगीत आजदेखील अनेकांना आठवत असेल.

१३चा पाढा रूढ झाला..

प्रायोजित मालिका होऊ शकते हे लक्षात आल्यावर १९८७ ते ९९ या टप्प्यात मुंबई दूरदर्शनवर अनेक प्रयोग झाले. टीव्ही जगतात १३चा पाढा पाठ होण्याचा काळ असं ज्याचं वर्णन केलं जातं तो हाच काळ. सर्व मालिका तेरा भागांच्या असायच्या. जर त्यात वाढ करायची असेल तर ती १३च्या पटीतच केली जायची. प्रसिद्ध लेखकांच्या गाजलेल्या कथा, कादंबरी, नाटक, फार्सिकल्स, ऐतिहासिक कादंबऱ्या, लहान मुलांसाठीच्या कथा अशा विविध प्रकारच्या साहित्यावर आधारित मालिकांचा हा काळ होता. अनेक दिग्गजांच्या कथांना त्यामुळे छोटय़ा पडद्यावर दृश्यरूप मिळालं. सर्जनशील दिग्दर्शकांना अनेक प्रयोग करता आले. अनेक नवीन चेहऱ्यांनी छोटा पडदा प्रथमच पाहिला. आणि समाजातील सर्वच स्तरातील घटकाला घरबसल्या मनोरंजनाचे साधन मिळाले. आज चाळिशी पार केलेल्या अनेकांच्या भावविश्वाचा एक कोपरा या काळाने व्यापला आहे.

याच काळात आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. गुन्हे आधारित (गुन्हे विश्लेषणात्मक) सीरिज आणि प्रायोजित रिअ‍ॅलिटी शोज यांनी मालिकांच्या सोबतच स्वत:ची अशी एक स्वतंत्र जागा निर्माण केली. त्या काळात दूरदर्शनशिवाय अन्य कोणतीच वाहिनी नसल्यामुळे हे सर्व पहिल्यांदा दाखविण्याचं श्रेय दूरदर्शनकडे जातं.

या टप्प्यावर प्रामुख्याने भर दिसून येतो तो कथा, कादंबऱ्या आणि नाटकांवर आधारित मालिकांचा. रत्नाकर मतकरी, मधु मंगेश कर्णिक, गंगाधर गाडगीळ, ना. धों. ताम्हणकर, व. पु. काळे, दिलीप प्रभावळकर, श्री. ज. जोशी आदी लेखकांच्या लेखनाचे माध्यमांतर येथे झालं. याच काळात अनेकांनी स्वत:ची निर्मिती यंत्रणा उभारली. रत्नाकर मतकरी, जयंत धर्माधिकारी, विनय आपटे, स्मिता तळवलकर, संजय सूरकर, अधिकारी ब्रदर्स यांचा त्यामध्ये उल्लेख करावा लागेल. तंत्रज्ञांची, दिग्दर्शकांची स्वत:ची निर्मिती टीम तयार झाली. त्यापैकी अनेक जण आजही कार्यरत आहेत. या काळात अनेक प्रयोग झाले, काही सुपर-डुपर हिट ठरले तर काही आले आणि गेले. आज टीव्हीचा छोटासा पडदा संपूर्णत: व्यापून राहिलेल्या मालिकांची पायाभरणी या काळात झाली.

रत्नाकर मतकरी यांच्या ‘प्रेमकहानी’ या गाजलेल्या नाटकावर आधारित ‘बेरीज वजाबाकी’ आणि ‘अश्वमेध’ या दोन मालिका साधारण ८७च्या आसपास आल्या. स्वत: मतकरींनीच याचं दिग्दर्शन केलं होतं. दोन्ही मालिका १३ भागांच्या होत्या. ‘बेरीज वजाबाकी’बाबतचा एक विशेष उल्लेख म्हणजे या मालिकेचं शीर्षकगीताला गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी संगीत दिलं होतं आणि स्वरसाज चढवला होता. ‘बेरीज वजाबाकी’ ही मालिका ‘प्रेमकहानी’ या नाटकावर आधारित होती. दिलीप प्रभावळकर, सविता प्रभुणे, विक्रम गोखले, चंद्रकांत गोखले यांच्या भूमिका होत्या, तर ‘अश्वमेध’ या बंगाली नाटकाचा आधार होता. बंगाली नाटककार शंकर यांच्या ‘सीमाबद्ध’ नाटकावर सत्यजीत रे यांनी चित्रपट केला होता. याच नाटकाचे मतकरी यांनी मराठी नाटक केले होते. त्याचेच हे मालिका रुपांतर होते. त्यात रवींद्र मंकणी, वंदना गुप्ते, सुप्रिया मतकरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर देवदत्तांसाठी ‘कार्टी प्रेमात पडली’ या नाटकाच्या रूपांतरावर आधारित ‘काम फत्ते’ ही मालिका रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केली होती. या मालिकेचे शीषर्कगीत महेंद्र कपूर यांनी गायलं होतं.

व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ या प्रसिद्ध लघुकांदबरीवरदेखील मालिका आली होती. सुभाष भेंडे यांच्या कांदबरीवर आधारित ‘पैलतीर’ या मालिकेत माधव वाटवे  आणि फय्याज यांनी काम केलं होतं. भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणाऱ्या विषयावर ही मालिका होती. ‘आव्हान’ या मालिकेतून हुंडाबळीचा विषय मांडण्यात आला होता. निशिगंधा वाड यांनी यात प्रमुख भूमिका केली होती.

मधु मंगेश कर्णिक यांच्या कादंबरीवर आधारित ‘भाकरी आणि फूल’, ‘रानमाणूस’ आणि ‘सांगाती’ या तीन मालिकादेखील याच काळात आल्या. ‘रानमाणूस’मध्ये वडील-मुलगा संघर्ष टिपला होता. या मालिकेत सुरुवातीच्या चार भागात विक्रम गोखले, विनय आपटे, नीना कुलकर्णी यांनी केलेल्या भूमिका पुढील नऊ भागांसाठी हे कलाकार उपलब्ध नसल्यामुळे सचिन खेडेकर, अरुण नलावडे आणि सुकन्या कुलकर्णी यांनी केल्या होता. (बदली कलाकारांचं हे पहिलं उदाहरण म्हणावं लागेल). या मालिकेचे निर्माते विनय आपटे निर्माता-दिग्दर्शक होते, तर एपिसोडिक दिग्दर्शक म्हणून विवेक वैद्य यांनी काम पाहिलं होतं. तर संपत्तीच्या वाटणीवरून होणाऱ्या भांडणाचा संदर्भ ‘सांगाती’ला होता.

‘रथचक्र’ या गाजलेल्या कांदबरीवरदेखील त्याच नावाने जयंत धर्माधिकारी आणि कमलाकर सारंग यांनी संयुक्तपणे मालिका दिग्दर्शित केली होती. अमेरिकेतील भारतीयांनी त्यांच्या अनुभवांवर लिहिलेल्या कथांवर आधारित ‘कुंपणापलीकडले शेत’ ही सीरिज विनय धुमाळे यांनी १९९३च्या आसपास दिग्दर्शित केली होती.

चंदेरी दुनियेतील प्रेम त्रिकोण मांडणारी ‘रथचंदेरी’ मालिकादेखील त्या वेळी छोटय़ा पडद्यावर अवतरली. प्र. ल. मयेकर यांच्या कादंबरीवर आधारित या मालिकेचे पटकथा संवाद मयेकरांनी स्वत:च लिहिले होते. तर विनायक देशपांडे यांनी दिग्दर्शन केलं होतं. मालिका साकारताना गुरुदत्त वहिदा यांचा संदर्भ डोळ्यासमोर होता. विनय आपटे, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे हे कसलेले कलाकार तर होतेच, पण अशोक शिंदे यांचीही छोटय़ा पडद्यावरील पहिलीच भूमिका होती. त्यांनी खलनायक केला होता. त्याच दरम्यान तुफान लोकप्रिय अशा ‘पार्टनर’ या व. पु. काळे यांच्या लघुकादंबरीवरील ‘पार्टनर’ ही मालिकादेखील तेव्हा बरीच गाजली. व. पुं.नीच पटकथा-संवाद लिहले होते. मालिका रूपांतर सर्वसामान्य प्रेक्षकांना रुचणारे झाले होते. विजय कदम, विक्रम गोखले, अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर विनय आपटे यांनी दिग्दर्शन केलं होतं.

मानवी भावभावना, सामाजिक विषयांवर आधारित असंच साधारणत: या मालिकांचे स्वरूप होते. तर १९९३च्या आसपास आलेल्या ‘साळसूद’ मालिकेचं कथानक काहीसं वेगळं होतं. या मालिकेत दिलीप प्रभावळकरांनी चक्क खलनायकाची भूमिका केली होती. श्री. ज. जोशी यांच्या ‘यात्रा’ या कादंबरीवर आधारित मालिकेत प्रभावळकरांसोबत दिलीप कुलकर्णी, स्मिता तळवलकर, नीना कुलकर्णी यांनी काम केलं होतं. कथेतल्या खलनायकाचा हाल हाल होऊन मृत्यू झालेला असतो. आणि त्याचा आत्मा वाडय़ात रोज येत असतो. प्रत्येक एपिसोडची सुरुवात व शेवट आरामखुर्चीवर पडणाऱ्या या आत्म्याच्या सावलीवरून होत असे. ही मालिका लोकांना आवडली की नाही माहीत नाही, पण मालिकेनंतर प्रभावळकरांना लोकांनी अशा भूमिका करू नका असं सांगितलं होतं. अर्थातच लोकांनी मालिका पाहिली होती आणि त्याला दाददेखील दिली होती. स्मिता तळवलकर या निर्मात्या होत्या, तर संजय सूरकरांनी याचं दिग्दर्शन केलं होतं.

अनेक जॉनरचं मिश्रण असणारा प्रयोग म्हणून ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’ या सीरिजचा उल्लेख करावा लागेल. मध्यमवर्गीयांना आयुष्यातल्या सुखदु:खाला थेट हात घालणारी ही सीरिज कमालीची लोकप्रिय झाली होती. नेहमीच्या आयुष्यातल्या घडामोडींना एक मस्त वळण देत, नाटय़मयता सांभाळत या सीरिजची मांडणी होती. चाळीतल्या अडचणी, अनेक टिपिकल प्रसंग अशा माध्यमातून मध्यमवर्गीय आयुष्य छोटय़ा पडद्यावर दिसलं. विनय आपटे यांनी दूरदर्शन सोडल्यानंतर लगेचच १९९० च्या आसपास स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसच्या माध्यमातून केलेली ही पहिली मालिका. उद्धव देसाई, विवेक आपटे, विक्रम भागवत आणि अरविंद औंधे यांनी चाळीचं लेखन केलं. ग्रँट रोड पोलीस स्टेशनसमोरच्या दादोबा जगन्नाथ चाळीत ३०-३५ दिवस शूटिंग सुरू होतं. चार मजल्यांची प्रशस्त चाळ. मधोमध ऐसपैस जागा. संपूर्ण चाळ नांदती असल्यामुळे मर्यादित वेळेतच चित्रीकरण उरकावे लागत असे. एका ठरावीक वेळेत सर्वच घरांतून कुकरच्या शिटय़ांचे आवाज येणं, सायंकाळी कामावरून येणाऱ्यांची लगबग अशा असंख्य आवाजांतून, गोंगाटातून शूटिंग-रेकॉर्डिग सांभाळावं लागायचं.

मल्टी स्टार सीरिज असं याचं स्वरूप होतं. दिलीप कुलकर्णी, चंदू पारखी, उषा नाडकर्णी, सुरेश भागवत, नीना कुळकर्णी, सविता प्रभुणे, सुधीर जोशी, अतुल परचुरे, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, महेश मांजरेकर असा कलाकारांचा मेळावाच जमला होता. सुलोचना दीदींनीदेखील दोन भागांत काम केलं होतं. तर अशोक सराफ यांच्यावर एक पूर्ण एपिसोडच बेतला होता. अमिता खोपकरवरदेखील एक भाग चित्रित करण्यात आला होता.

याच काळात लोक आकाशवाणीकडून टीव्हीकडे वळू लागले होते. आणि चाळीच्या शीर्षकगीतातली टय़ून प्रेक्षकांना आकाशवाणीच्या आठवणीत नेणारी होती. मालिका सुरु होताना झळकणाऱ्या चाळीच्या नावाची रचनेमुळे ‘चाळवाचाळव’ असा शब्द तयार होत असे. लोकांमध्ये हा शब्द रुढ झाला होता.

एक सलग कथा अथवा कादंबरीचा आधार येथे नव्हता. प्रत्येक भागात वेगळा प्रसंग असायचा. चंदू पारखी आणि उषा नाडकर्णी ही पात्र बरीच गाजली. एक मात्र नमूद करावे लागेल की टीव्हीसाठी ठरवून स्वतंत्र कथानक बेतण्याची ही सुरुवात होती असं म्हणावं लागेल. पण ‘बटाटय़ाची चाळ’, ‘हम लोग’ अशांचा प्रभाव काही प्रमाणात तरी होता, असं अभ्यासकांचे म्हणणे आहे.

विनोदी जॉनर हादेखील या काळात चांगलाच हाताळला गेला. ‘हसण्यासाठी जन्म आपुला’, ‘भिकाजीराव करोडपती’, ‘येथे नांदतो बाळू’ या मालिकांचा उल्लेख यामध्ये करावा लागेल.

लहान मुलांच्या मध्यवर्ती भूमिका असणारं कथानक हा हल्ली जवळपास नामशेष झालेला जॉनरदेखील या काळाने हाताळायचा चांगला प्रयत्न केला. अर्थातच गाजलेल्या कथानकाचा आधार त्याला होता. पौगंडावस्थेतील मुलांचे भावविश्व टिपणारी ना. धों. ताम्हणकर यांच्या ‘गोटय़ा’ कादंबरीवर आधारित गोटय़ा ही मालिका आज चाळिशीच्या घरात असणाऱ्या अनेकांनी हमखास आठवत असेल. कोकणच्या निसर्गरम्य पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या कथानकाने अनेकांच्या भावविश्वाचा ठाव घेतला होता. मालिकेचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अशोक पत्की आणि सुरेश कुमार यांनी संगीत दिलेलं व तुफान लोकप्रिय झालेलं ‘बीज अंकुरे अंकुरे’ हे मधुकर आरकडे यांचं शीर्षकगीत. अर्थपूर्ण शीर्षकगीतातून मालिकेचा भावार्थ उलगडला जात होता. जॉय घाणेकर याने गोटय़ा साकारला होता. सुमन धर्माधिकारी, सविता मालपेकर, सुहास भालेकर यांच्या भूमिका होत्या. सुरुवातीच्या काही भागांचे पटकथा संवाद वसंत सबनीसांचे होते, तर नंतर शिरीष गोपाळ देशपांडे यांनीदेखील लिहले होते. राजदत्त यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. जनक मेहता हे निर्माते होते. या मालिकेचे २८ भाग झाले होते. मुलांमध्ये तुफान लोकप्रिय असणारा भा. रा. भागवतांचा ‘फास्टर फेणे’देखील याच काळात छोटय़ा पडद्यावर येऊन गेला. सुमित राघवनने साकारलेल्या ‘फास्टर फेणे’ने चांगलीच छाप टाकली होती. मालिका उत्तम होत्याच, पण नंतरच्या भागात त्यांचा सूर प्रबोधनात्मक अधिक होत गेला असे वाटत होते.

काहीशा उशिरा आलेल्या ‘बोक्या सातबंडेने’देखील धम्माल उडवली होती. दिलीप प्रभावळकर यांनी माधव कुलकर्णीच्या आग्रहाखातर आकाशवाणीसाठी लिहिलेल्या श्रुतिकांचे, कथा स्वरूपात पुस्तक  प्रकाशित झालं होतं. ते विनय आपटे यांनी टीव्हीसाठी रूपांतरित केलं. २६ भागांतून ‘बोक्या’ने छोटय़ा पडद्यावर धम्माल केली. विनय आपटे यांनी दिग्दर्शन केलं, तर विवेक वैद्य यांनी १५ भाग दिग्दर्शित केले होते. अमेय साळवीने ‘बोक्या’ हे काहीसं उचापती असं वात्रट पात्र चांगलंच रंगवलं होतं. सतीश पुळेकर, वंदना गुप्ते, मंगला संझगिरी, राहुल मेहंदळे यांच्या भूमिका होत्या. ‘बोक्या’ बऱ्यापैकी गाजली. नंतर ‘बोक्या’च्या कथानकावर चित्रपटदेखील झाला.

याच १२ वर्षांच्या टप्प्यात, आजच्या काळातील एका मोठय़ा टीव्ही सेगमेंटची पायाभरणी झाली असे म्हणावे लागेल. हा सेगमेंट म्हणजे क्राइम स्टोरीज. तोवर फारसा वापरला न गेलेला हा प्रकार. सनसनाटी कादंबरीप्रमाणे गुन्हेगारी जगत दाखविणं असं याचं स्वरूप न ठेवता गुन्ह्य़ांची उकल हा या सर्व सीरिजचा आधार होता. त्यामुळे थेट सामान्य माणसालादेखील त्यात रुची दिसून आली. ‘शोध’, ‘एक शून्य शून्य’, ‘मी प्रभाकर’, ‘दिनमान’, ‘परमवीर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ अशा सहा वेगवेगळ्या सीरिजनी हा जॉनर वापरला. या सर्वात ‘एक शून्य शून्य’ने चांगलीच बाजी मारली.

बी. पी. सिंग हे दूरदर्शनवरचे एक हरहुन्नरी कॅमेरामन होते. त्यांनी ८३-८४च्या आसपास दूरदर्शनसाठी एक तासाची फिल्म केली होती. राजभवनात एक धडविरहित शिर सापडलं होतं. त्या वेळी रिबेरो कमिशनर होते. पोलिसांनी चार दिवसांत या गुन्ह्य़ाची उकल केली होती. त्यावर आधारित ‘सिर्फ चार दिन’ ही एक तासाची फिल्म दूरदर्शनसाठी केली होती. गुन्ह्य़ाची उकल आणि त्याचे चित्रीकरण हे बी. पी. सिंग यांच्या डोक्यात ठसले होते. ८४ ला त्यांनी दूरदर्शनचा राजीनामा दिला आणि त्यांच्या डोक्यात हा गुन्हे उकलण्याचा प्लॉट घोळू लागला. ८६ ला त्यांनी याचा एक पायलट एपिसोड केला. पण दूरदर्शनने अशी मालिका दाखवता येणार नाही, पोलिसांची परवानगी हवी, अशी कारणं पुढं केली. राज्याच्या तत्कालीन पोलिस महासंचालकांकडे परवानगीसाठी गेल्यावर त्यांनी हसत हसत परवानगी दिली. क्राइम स्टोरी अचूक व्हावी म्हणून दक्षता मासिकाचे जुने अंक त्यांना अभ्यासायला दिले. पोलिसांना मदत करणारं कथानक अशी पोलिसांची भूमिका असल्यामुळे बी. पी. सिंग ना कसलाच अडथळा आला नाही. दूरदर्शनवर न्यूज कॅमेरामन म्हणून काम केलं असल्यामुळे कोणत्याही घटनेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. बाह्य़ चित्रीकरणाचा अनुभव होता. १९८७ च्या जानेवारीपासून ‘एक शून्य शून्य’ अशा धीरगंभीर आवाजाने दूरदर्शनचा पडदा व्यापून टाकला. शिवाजी साटम यांच्यासारखा करारी विचारी आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आणि त्याचे सहकारी दर आठवडय़ाला एकेक गुन्हा उलगडू लागले.

चित्रीकरणासाठी प्रत्यक्ष लोकेशनचा वापर, मेकअप वगैरे कसलाही तामझाम नव्हता. लोकांना ही सीरीज हळूहळू आवडू लागली. खरे तर पोलीस खात्याने त्यांना चित्रीकरणासाठी चार पोलीस स्टेशन देऊ केली होती. पण चित्रीकरणाच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी ती घेतली नाहीत. २६ भागांनंतर त्यांना पाच भागांची वाढ मिळाली आणि ३१ व्या भागानंतर ही सीरिज दूरदर्शनने बंद केली. आजच्या टीआरपीच्या भाषेतच सांगायचे तर पहिल्या भागाला २६ टीआरपी होता. आणि बंद झाली तेव्हा ‘रामायण’चा टीआरपी ८६, ‘उडान’चा टीआरपी ८२ आणि ‘एक शून्य शून्य‘चा टीआरपी ७५ होता. शिवाजी साटम खरेच पोलीस अधिकारी आहेत असंच अनेकांना वाटत होतं. आजच्या सीआयडीच्या यशाची ती पायाभरणी म्हणावी लागेल.

‘एक शून्य शून्य’च्या दरम्यान विनय धुमाळे यांनीदेखील १९८७-८८ च्या दरम्यान अशीच मालिका केली होती. निरनिराळ्या रहस्यकथांवर आधारित ‘शोध’ ही १३ भागांची सीरिज त्यांनी दिग्दर्शित केली होती. नाना पाटेकर यांनी त्यामध्ये डिटेक्टिव्हची भूमिका केली होती. त्याच वर्षी विनय आपटे यांनी शफी इनामदार आणि चंदू पारखी यांना घेऊन ‘मी प्रभाकर’ ही डिटेक्टिव्ह सीरिज केली होती. शफी इनामदार यांची ही मराठीतली पहिलीच टीव्ही भूमिका होती. दरम्यान श्रीकांत सिनकरांच्या कथांवर आधारित ‘दिनमान’ या सीरिजनेदेखील चांगलीच छाप पाडली होती. ती बाबा सावंत यांनी दिग्दर्शित केली होती, तर मंदार देवस्थळी यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. तर नंतरच्या काळात अधिकारी ब्रदर्सनी दोन वेगवेगळ्या सीरिज केल्या. ‘परमवीर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’. कुलदीप पवार आणि दिलीप कुलकर्णी हे दोघं ‘परमवीर’चे पोलीस अधिकारी होते, तर रमेश भाटकरांनी ‘हॅलो इन्स्पेक्टर’ साकारला होता. ‘हॅलो, हॅलो, हॅलो, इन्स्पेक्टर..’ हे शीर्षकगीत बरंच गाजलं होतं.

या सहाही सीरीजकडे  पाहताना तीव्रतेने जाणवणारी बाब म्हणजे लोकांना अशी कथानकं आवडतात, त्याला व्ह्य़ूवरशिप मिळते, (आजच्या भाषेत टीआरपी चांगला असतो) आणि हा एक सदैव चालणारा जॉनर असू शकतो हे या सीरिजनी स्पष्ट केलं. कथेची सुरुवात, मध्य आणि शेवट असा फॉम्र्युला नाही, प्रत्येकी एक-दोन भागांसाठी वेगळी घटना. घटनांची कमतरता नाही. कथानकात पाणी घालायची गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रियतेत उणेपणा नाही. या सर्व सीरिजच्या लोकप्रियतेमुळे याच काळात ‘पोलीस टाइम्स’सारख्या साप्ताहिक, मासिकांची मागणीदेखील वाढत गेली असं म्हणण्यासदेखील वाव आहे.

ऐतिहासिक कथानकावर आधारित मालिकादेखील प्रथमच या काळात छोटय़ा पडद्यावर आल्या. रंजक पद्धतीने कादंबरीतून केलेली इतिहासाची मांडणी सर्वानाचा आवडते हे अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यांनी दाखवून दिलं होतंच. पण त्याचं मालिका रूपांतर तुलनेनं खर्चीक असतं. पण लोकप्रियता हा घटक असल्यामुळे त्याला प्रेक्षक वर्ग हमखास असतो. ‘स्वामी’ आणि ‘राऊ’ ही त्यापैकीच दोन महत्त्वाची उदाहरणे. पेशवाईतला तो भरजरी माहोल, ऐश्वर्याचं दर्शन, ऐतिहासिक वातावरण हे सारं लोकांना आकर्षून गेलं. ‘स्वामी’द्वारे मृणाल कुलकर्णीने छोटय़ा पडद्यावर पहिली भूमिका केली. गजानन जहागीरदार यांनी ‘स्वामी’ दिग्दर्शित केली होती. स्मिता तळवलकरांनी केलेली ‘राऊ’देखील अशीच ऐतिहासिक माहोल मांडणारी होती.

कथा, कादंबरी, नाटकांमधील कथानकाद्वारे होणारं सामाजिक भाष्य मालिकांमध्येदेखील होत होतं, पण थेट एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा आधार घेत सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारी मालिका म्हणजे ‘आनंदी गोपाळ’. १९९४ साली जयंत धर्माधिकारी यांनी अजित भुरे आणि भार्गवी चिरमुले यांना घेऊन आनंदीबाई जोशींच्या आयुष्यावर आधारीत होती. भार्गवी चिरमुले या मालिकेतून प्रथमच छोटय़ा पडद्यावर आली. ही मालिका जयंत धर्माधिकारी आणि कमलाकर सारंग यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केली होती. ह. मो. मराठे यांच्या कथांचा आधार घेत विनय आपटे यांनी ‘आजची नायिका’ ही १३ भागांची सीरिजदेखील केली, तर मुख्यत: नोकरी करणाऱ्या महिलांच्या अनेक प्रश्नांचा वेध घेणारी ‘मनामनाची व्यथा’ ही मालिका विवेक वैद्य आणि मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केली होती.

१३ चा पाढा मोडला..

१९८६ ते ९९ काळाने साधारण हे सहा-सात जॉनर हाताळले. दूरदर्शनने शिकवलेला १३ चा पाढा सर्वानाच अगदी व्यवस्थित पाठ झाला होता. सुरुवात- मध्य- शेवट असलेल्या कथा असोत की मुदतवाढ मिळविणाऱ्या सीरिज असो, सर्वानाचा चांगलाच प्रतिसाद होता. मेगा सीरिजचा आणि रिअ‍ॅलिटी शोज ही संकल्पनादेखील अजून फारशी रुजली नव्हती. कांचन अधिकारी यांनी ‘दामिनी’ ही मेगा सीरिज करून तर नीना राऊत यांनी ‘ताक धिना धिन’ या रिअ‍ॅलिटी शोने या दोन्ही जॉनरची सुरुवात या १२ वर्षांच्या शेवटच्या टप्प्यात केली.

मेगा सीरिजचा प्रकार सुरू झाला तो ‘दामिनी’मुळे. कांचन अधिकारी यांनी अधिकारी ब्रदर्सच्या बॅनरखाली केलेल्या या सीरिजने मराठीत मेगा एपिसोडची सुरुवात झाली. एकच एक कथा येथे नव्हती. रोज नवी समस्या, कथा, कहाणी. प्रतीक्षा लोणकरची ‘दामिनी’ चांगलीच गाजली. आठ वर्षांत १५०० एपिसोड असा दणदणीत स्कोअर झाला. अनेक कलाकारांचा त्यामध्ये सहभाग होता.

येथे एका महत्त्वाच्या गोष्टींची नोंद घ्यावी लागेल. ‘दामिनी’ची प्रक्षेपणाची दुपारची वेळ. घरी असणारा महिलावर्ग डोळ्यासमोर ठेवूनच साकारलेली ही मालिका होती. तोच त्यांचा प्राइम टाइम होता. अर्थात तेव्हा अजून प्राइम टाइम, टीआरपी हे घटक मालिकांवर हावी झाले नव्हते. मात्र दूरदर्शन हेच एकमेव माध्यम असल्यामुळे ते दाखवेल तेच पदरी पडले पवित्र झाले हीच धारणा होती.

एकंदरीतच या १२ वर्षांत लोकांना आठवडय़ाची सवय लागली होती. या दिवशी हे पाहायचे, त्या दिवशी ते. कामाचं नियोजन त्या आवडीप्रमाणे केलं जायचं. आठवडाभर उत्सुकता टिकवायची ताकद कथेमध्ये, सादरीकरणात होती. शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट असं या काळाचं वर्णन करावं लागेल. टीव्हीला चिकटून बसण्यापेक्षा त्याचा आनंद घेण्याची वृत्ती होती. निखळ करमणुकीचा आस्वाद त्यात होता. आणि कोठे थांबायचं याच भान होतं.

अवतरल्या उपग्रह वाहिन्या

कांचन अधिकारींनी तेराचा पाढा मोडता येऊ शकतो हे दाखवले. त्याच वेळी दूरदर्शनवरील ‘ताक धिना धिन’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे आणखी एक नवा पर्याय खुला झाला. या पाश्र्वभूमीवर १९९९ मध्ये उपग्रह वाहिन्यांचा (खासगी) मराठीत प्रवेश झाला. ९९ ते २०१५ या काळात तुलनेनं दूरदर्शनचं ‘दर्शन’ ‘दूर’ होत गेलं. स्पर्धा, टीआरपीची भाषा, कॉर्पोरेट व्यवहार, तंत्रज्ञानातला बदल, प्रायोजकांचं वर्चस्व, वाहिन्यांची ढवळाढवळ अशा अनेक घटकांनी मागील १६ वर्षांत मालिकांच्या विश्वात आमूलाग्र असा बदल घडवला आहे. किंबहुना टीव्हीची भाषाच बदलून टाकणारा असा हा काळ म्हणावा लागेल.

त्यामध्ये सर्वात कळीची भूमिका बजावणाऱ्या एका घटकाची सुरुवातीसच ओळख करून घ्यावी लागेल. तो म्हणजे टीआरपी. टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. ९९ साली अल्फा मराठी (आत्ताचे झी मराठी) आणि २००० साली ईटीव्ही मराठी (आत्ताचे कलर्स मराठी) या वाहिन्यांची सुरुवात झाली. दूरदर्शन हेच एकमेव दूरचित्रवाणीचं माध्यम होतं. तोपर्यंत स्पर्धेचा प्रश्नच नव्हता. फक्त अंतर्गत स्पर्धा असायची. जाहिरातदारांना इतर पर्यायच नव्हते. पण खासगी वाहिन्या आल्यानंतर जाहिराती मिळवण्याची चढाओढ सुरू झाली. खासगी वृत्तवाहिन्या आल्यानंतर तर ही चढाओढ आणखीनच वाढली. उपग्रह वाहिन्यांमुळे प्रेक्षकवर्ग वाढला तसेच प्रेक्षकांना पर्यायदेखील वाढत गेले. या ठिकाणी टीआरपीचा वरचष्मा वाढला. सारं नियंत्रण हे या टीआरपीनामक आकडेवारीवर विसंबून राहू लागलं. टीआरपी किती आहे यावर जाहिराती आणि मालिकांची लांबी-रुंदी ठरू लागली. आपोआपच खोलीचं महत्त्व कमी झालं. सुरुवात-मध्य-शेवट हा कथेचा पर्यायाने मालिकेचा निकष असला तरी शेवट कोठे करायचा याचं गणित आता टीआरपीवर ठरू गलं.

तरीदेखील टीआरपीचा फार बागुलबुवा न बाळगता सुरुवातीच्या काळात अनेक प्रयोगदेखील झाले. पण येणाऱ्या काळात तेराच्या पाढय़ाचा कसलाही संबंध नसणार यावर ठाम शिक्कामोर्तब झालं ते अल्फा मराठीवरच्या ‘आभाळमाया’ या मेगा सीरियलने. या मालिकेचे तब्बल ५०० भाग प्रक्षेपित झाले. मेगा सीरियल अर्थात डेली सोपचा प्रयोग जमू शकतो याला पुष्टी मिळाली. आणि त्यातूनच मालिकांचं अमाप पीक यायला लागलं. या सर्वाचा दुसरा एक महत्त्वाचा परिणाम झाला, तो म्हणजे जुन्या दिग्दर्शकांना, तंत्रज्ञांना नवीन प्रयोग करण्याची संधी मिळाली, नव्यांच्या अनेक पर्यायांमध्ये वाढ झाली. अनेक नव्या कलाकारांना छोटय़ा पडद्यावर ओळख मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी टेलिव्हिजनची एक इंडस्ट्री म्हणून ओळख तयार होत गेली.

आजच्या मेगा सीरियल्सची सुरुवात झाली ती आभाळमाया या मालिकेमुळे. मालिकेची कथा ही काही फार मोठा सामाजिक बदल वगैरे दर्शविणारी नवीन अशी नव्हती. पण मांडणी, लेखन, सादरीकरण आणि मालिकेत सुसंगती असल्यामुळे प्रेक्षकांवर पकड मिळवता आली. उच्च मध्यमवर्गीय म्हणता येणार नाही अशा सुखवस्तू मराठी कुटुंबाची ही कथा. नवरा-बायको दोघेही एकाच महाविद्यालयात प्राध्यापक. दोन मुली. बायकोचंच मोठं घर. बायकोचा काहीसा करारी स्वभाव, काहीसा टिपिकलदेखील. नवऱ्याच्या मनात एक असूया, अढी, त्यातच विवाहबाह्य़ संबंध, त्यातून दुरावा. या साऱ्या घडामोडींमध्ये साथ देणारा दोघांचा सामायिक मित्र, स्वतंत्र विचाराची बहीण आणि घरातच असणारी घरकामाची आजी. महाविद्यालयातील राजकारण तर घरात धुसफुस. कथानक पुढे सरकते, मुली मोठय़ा होतात, त्यांच्याही आयुष्यात नातेसंबंधांत ताणतणाव येतात. अशा वळणाची ही कथा थेट मध्यमवर्गीय प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून मांडली होती. कपडेपट, लोकेशन, सेट बाबतीत बऱ्याच अंशी वास्तववादी वाटावं असं सादरीकरण त्यात होतं. काही काही प्रसंगात तर प्रकाशयोजना, कॅमेरा आणि दिग्दर्शनाची कमाल झाली आहे. फारसा सिनेमॅटिकपणा न आणता मांडलेली ही मालिका, प्रेक्षकांना भावली. मालिकेतील पात्रांशी लोकांची एक भावनिक जवळीक निर्माण झाली होती.

एक तर त्या वेळी दुसरं इतकं मेगा असं काही नव्हतं. जे काही आलं ते मालिकेच्या नंतरच्या टप्प्यात. कथेत पाणी घालणं हा प्रकार आजच्या तुलनेनं नव्हताच. पण रोजच्या रोज प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्याची कसरत असायची. ती चांगलीच जमली. कथेचं भान सुटलेलं नव्हतं. त्यामुळे या मालिकेला तुफान प्रतिसाद मिळत गेला.

‘आभाळमाया’ची कथा संकल्पना निर्मिती अच्युत वझे यांची होती. तर लेखन विनय आपटे, अजितेम जोशी यांचं. चंद्रकांत मेहंदळे, अनिल हर्डीकर, नंदू परदेशी हे सहलेखक होते. मंगेश कुलकर्णी यांचं मालिकेचं शीर्षकगीत थेट भावना पोहचविणारं होतं. संगीत अशोक पत्की यांचं तर दिग्दर्शन विनय आपटे यांनी केलं होतं. विनायक देशपांडे (सुरुवातीच्या ६० भागांसाठी) आणि मंदर देवस्थळी यांनी कार्यकारी दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, सुहास जोशी, मनोज जोशी, उदय सबनीस, हर्षदा खानविलकर, अशोक साठे, अशोक समेळ, शुभांगी जोशी, अंकुश चौधरी, रेश्मा मंत्री असे चांगले कलाकार होते. श्रेयस तळपदे, आविष्कार दारव्हेकर, संज्योत हर्डीकर, मनवा नाईक अशा आज प्रस्थापित कलाकारांचं हे पहिलंच काम होतं. याच मालिकेचं दुसरं पर्व मात्र तितकं गाजलं नाही, लोकप्रिय झालं नाही.

तीन-चार र्वष चालणारे असे डेली सोप यामुळे तयार होऊ लागले. अर्थात त्यांच्या धबाडग्यातदेखील इतर अनेक प्रयोग सुरूच होते. २००० साली ई टीव्हीनेदेखील मराठीत शिरकाव केला. दोन्ही वाहिन्यांची साधारण रचना ही ठरावीक वेळी बातम्या, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि नॉन फिक्शन कार्यक्रम अशीच होती. हा दूरदर्शनचाच ढाचा होता. फक्त सरकारी आणि खासगी हा फरक होता.

पण एकंदरीतच खासगी वाहिन्यांच्या आगमनानंतर मालिकांचं भरमसाट पीक आलं. त्याचबरोबर रिअ‍ॅलिटी शोजनी खूप मोठा अवकाश व्यापला. नुसती या मालिकांची यादी करायची ठरवलं तरी ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबणारी आहे. त्यामुळेच या १६ वर्षांतील मोजक्या, दर्जेदार व यशस्वी मालिकांचा आढावा घ्यावा लागेल.

ई टीव्हीने २००० साली सुरुवातीलाच एकाच वेळी १० नव्या मालिका सुरू केल्या होत्या. विशेष म्हणजे त्यात नवोदितांना खूप मोठा वाव दिला होता. संजय सूरकर (घरकुल), चारुदत्त दुखंडे (कर्नल चाणक्य) हे अनुभवी सोडले तर बाकी सारेच नव्याने आलेले होते. श्रीरंग गोडबोले, संजय पवार, हेमंत देवधर, संतोष कोल्हे यांच्या मालिकांचा उल्लेख करावा लागेल. ‘आभाळमाया’ने जरी ५००चा टप्पा गाठला असला तरी वर्षभर चालणाऱ्या साप्ताहिक मालिका, तसेच मर्यादित भाग असणाऱ्या दैनंदिन मालिकांनीदेखील या काळात आपला ठसा उमटवला आहे. त्यांची नोंद आधी घ्यावी लागेल.

प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या अल्फा मराठीवरच्या ‘प्रपंच’ आणि ‘४०५ आनंदवन’ या दोन्ही मालिकांनी ठरावीक भागांत कथानकाची आटोपशीर मांडणी करून चांगल्या प्रकारे गोष्ट सांगितली होती. ‘प्रपंच’चं कथानक मोठय़ा कुटुंबावर आधारलेलं होतं. मुंबईतलं मोठं घर, वाढतं कुटुंब, जागेची गरज, विविध नोकरी-व्यवसाय करणारी घरातली माणसं याभोवती कथानक फिरत होतं. सुधीर जोशी, बाळ कर्वे, संजय मोने, सुनील बर्वे, शर्वरी पाटणकर, सोनाली पंडित, रसिका जोशी, भरत जाधव, सुहास जोशी, अमिता खोपकर, रेखा कामत, प्रेम साखरदांडे अशी कलावंतांची एक मोठी फौजच यामध्ये होती. चांगल्या कथानकाची उत्तम मांडणी असल्यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली. उपग्रह वाहिन्यांच्या धबाडग्यातली एक उत्तम मालिका असं म्हणावं लागेल. ‘४०५ आनंदवन’ ही हलकी फुलकी आणि झटपट संपलेली एक चांगली मालिका. सुधीर जोशी, शर्वरी पाटणकर आणि अनेक नवे कलाकार यामध्ये होते. दुनियादारी सदृश कथानक असल्यामुळे तरुणांमध्येदेखील लोकप्रिय होती.

२००० साली अल्फावर आलेली ‘ॠणानुबंध’ हीदेखील अशीच केवळ २६ भागांची मालिका होती. सतीश पुळेकर आणि संजय मोने यांनी दोन व्यावसायिकांमधील संघर्ष त्यामध्ये साकारला होता. वैशिष्टय़ म्हणजे हा व्यावसायिक संघर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीशी संबंधित होता. गिरीश जोशी यांच्या कथेची मालिका निर्मिती विनय आपटे यांनी केली होती, तर दिग्दर्शन विनायक देशपांडे यांचं होतं.

अल्फाने काही नवीन जॉनरदेखील हाताळले, त्यांपैकीच एक म्हणजे गूढकथांवर आधारित मालिका. रत्नाकर मतकरी यांच्या ‘गहिरे पाणी’ या गूढकथा संग्रहावर आधारलेल्या या साप्ताहिक मालिकेचे ६२ भाग झाले. मुळात हा फॉर्म तोपर्यंत टीव्हीसाठी फारसा वापरला गेला नव्हता. (‘श्वेतांबरा’चं कथानक काहीसं गूढतेकडे झुकणारं होतं.) रत्नाकर मतकरी यांनीच ‘गहिरे पाणी’ दिग्दर्शित केली होती. गूढतेच्या वातावरणाची निर्मिती शीर्षकावरूनच जाणवत होती. एकूण २५-३० कथा या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर आल्या. कथानकानुसार वेगवेगळी लोकेशन्स, प्रकाशयोजना हा सारा प्रकार तसा खर्चीक होता. गूढकथेचा परिणाम पूर्णपणे साधण्यासाठी योग्य त्या लोकेशन्स आणि रात्री-अपरात्रीचं चित्रीकरण होत असे. मतकरींनी गूढकथेचं नेमकं मर्म जसं लिखाणातून पकडलं होत, ते टीव्हीवरदेखील साकारलं. दिलीप प्रभावळकर, सुप्रिया विनोद, समीर धर्माधिकारी, अविनाश खर्शीकर, मिलिंद गवळी यांनी अनेक भागांमध्ये काम केलं होतं. या कथा भयकथा होऊ न देता आणि लहान मुलांचा वापर न करता सादर केल्या होत्या हे आणखी एक विशेष.

क्राइम जॉनरप्रमाणेच हा जॉनरदेखील लोकप्रिय होणारा होता. तसा तो झालादेखील, पण नंतर त्याचा इतरांनी फारसा वापर केला नाही. नारायण धारपांच्या कादंबरीवर आधारित ‘अनोळखी दिशा’ या मालिकेतून महेश कोठारे यांनीदेखील प्रयत्न केला, पण ती फारशी चालली नाही. क्राइम जॉनरवर सध्या तरी हिंदूीचंच वर्चस्व आहे. गूढकथा नाही, पण अ‍ॅस्ट्रॉलॉजी आणि अ‍ॅस्ट्रॉनॉमी असा संयुक्त प्रयोग करीत पुनर्जन्माचा आधार घेत सतीश राजवाडेंनी मांडलेली कथा ‘असंभव’मध्ये होती. ‘असंभव’च्या कथेत पुनर्जन्माचा आणि तंत्र-मंत्राचा आधार असला तरी अशा कथानकाला चांगला प्रेक्षक वर्ग असतो हेदेखील लक्षात आलं. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांशी कनेक्ट असल्यामुळे सर्वच स्तरांतून त्याला प्रतिसाद मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे २००७ मध्ये कौटुंबिक नाटय़ाचा पगडा अधिक असताना ही मालिका आली होती. त्यामुळे एका वेगळ्या वाटेवरचा प्रयोग म्हणावा लागेल. ‘कालाय तस्मै नम:’ या मालिकेतूनदेखील रहस्य   जॉनर काही प्रमाणात वापरला गेला होता.

दूरदर्शनवर सहा-सहा क्राइम सीरिज झाल्या होत्या. पण नंतर हा प्रकार हिंदीकडे अधिक झुकला. पण ई-टीव्हीवर २००५ पासून सुरू झालेल्या ‘क्राइम डायरी’चे १२०० भाग सादर झाले. सुरुवातीच्या ५८० भागांचं दिग्दर्शन विनायक देशपांडे यांनी केलं होतं. या क्राइम डायरीने हा जॉनर मराठीत स्थिरावण्यास बऱ्यापैकी मदत केली.

दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात उत्तम कथांचं रूपांतर करून मालिकेप्रमाणे सादरीकरण होत असे. अल्फानेदेखील ‘पिंपळपान’ या मालिकेमधून हा प्रकार सुरू केला. अनेक उत्तम कलाकृती या काळात छोटय़ा पडद्यावर आल्या. आरती प्रभूंच्या कलाकृतीच्या वेळेस, त्यांच्यावर आधारित एखादा कार्यक्रम करावा ही संकल्पना आली आणि त्यातूनच ‘नक्षत्रांचे देणे’ हा दर्जेदार सांगीतिक कार्यक्रम साकार झाला. याचे २७ भाग झाले. अर्थात उपग्रह वाहिन्यांच्या काळातील ही तशी अपवादात्मकच घटना म्हणावी लागेल.

दूरदर्शनच्या काळात वापरला गेलेला कॉमेडी जॉनर मात्र या काळात फारसा वापरला गेला नाही. स्टॅण्डअप कॉमेडी प्रकारात मोडणाऱ्या भारंभार कार्यक्रमांनी ही जागा घेतली असं म्हणावं लागेल. पण ई-टीव्हीने ‘गंगूबाई नॉनमॅट्रिक’ ही एक धम्माल मालिका दिली होती. गंगूबाईच्या भूमिकेतल्या निर्मिती सावंत यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांच्या जोडीला पॅडीदेखील (पंढरीनाथ कांबळे) होताच..

जसा कॉमेडी जॉनर मालिका स्वरूपाकडून कार्यक्रमांकडे झुकत गेला, तसाच तरुण हा घटक  रिअ‍ॅलिटी शोजकडे अधिक झुकला. पण सुरुवातीच्या काळात ई-टीव्हीची ‘बेधुंद मनाच्या लहरी’ अनेक र्वष गाजली. थेट तरुणाईला साद घालणारा हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला. कॉलेज कट्टा असावा असंच याचं स्वरूप होतं. मकरंद अनासपुरे, संतोष जुवेकर, सोनाली खरे, श्रेयस तळपदे अशा अनेक कलाकारांच्या बेधुंद लहरीने तरुणाईला साद घातली. ही सीरिज चांगलीच गाजली. तरुणाईच्या जोशाला साजेसं असं शीषर्कगीत ही त्याची आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल. पुढे तरुणाईला आकर्षून घेणारे कार्यक्रम सर्वानीच केले. पण थेट तरुणाईवर आधारित मालिका असं भाग्य या जॉनरला लाभलं नाही. गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने पुन्हा एकदा तरुण हा घटक मालिकांच्या कथानकात आला आहे.

दूरदर्शनच्या काळात बऱ्यापैकी वापरला गेलेला, पण गेल्या पंधरा वर्षांत फारसा न वापरला गेलेला आणखी एक जॉनर म्हणजे लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या मालिका. हा घटकदेखील बराचसा रिअ‍ॅलिटी शोजकडेच वळला आहे. स्पृहा जोशी, प्रिया बापट यांची भूमिका असणारी ‘दे धम्माल’ ही मालिका आणि २००५ मध्ये आलेली ‘झिप झ्ॉप झूम’ ही लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारी सीरिज हीच काय ती या बाबतीत जमेची बाजू म्हणावी लागेल. अल्फावरील नायक आणि ई-टीव्हीवरील संवगडी या मालिकांचा उल्लेख करावा लागेल.

चांगलं कथानक असलेल्या आणि व्यवस्थित सुरु असलेल्या पण बंद पडलेल्या मालिकेत ई-टीव्हीवरच्या गुंडा पुरुष देव या मालिकेचा उल्लेख करावा लागेल.

या गेल्या १५ वर्षांत मालिकांमध्ये विषयांचे प्रयोग अनेक झाले. पण बहुतांश भर हा कौटुंबिक कथानकावरच दिसून येतो. त्यातही आधीच्या काळात स्त्रीप्रधान, स्त्रियांचं सबलीकरण, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी स्त्री असे विषय असायचे, पण गेल्या पाच-सात वर्षांत कटकारस्थान किंवा टिपिकल कौटुंबिक नाटय़ाचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं. किचन पॉलिटिक्स असा हा जॉनरच सध्या सोकॉल्ड लोकप्रिय झाला आहे. सुरुवातीच्या काळातल्या स्त्रीप्रधान मालिका, तुलनेनं अशा पठडीत न बसणाऱ्या होत्या. किचन पॉलिटिक्स कमी होतं. त्यामध्ये ‘नूपुर’, ‘ऊनपाऊस’ आणि ‘अवंतिका’ या मालिकांचा उल्लेख करावा लागेल. संजय सूरकर आणि स्मिता तळवलकर यांनी या तिन्ही मालिका अल्फासाठी केल्या होत्या.

आपल्याच मस्तीत आणि ‘स्वान्त सुखाय’ आयुष्य जगणाऱ्या मुलीच्या आयुष्यातील बदल, भेटणारी अजब माणसं आणि संघर्ष ‘नूपुर’मध्ये चांगल्या प्रकारे टिपला होता. मानसी साळवी, समीर धर्माधिकारी, रीमा लागू हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसून आले. ही मालिका लक्षात राहण्यासारखीच म्हणावी लागेल. ‘ऊनपाऊस’मध्ये आणखीनच वेगळी वाट चोखाळली होती. स्नेहलता दशमकरांच्या गोष्टीवर ही मालिका आधारित होती. एका मुलीवर झालेला बलात्कार, त्याचं परिमार्जन म्हणून तिच्याशी लग्न करणं असं कथानक होतं. सतीश राजवाडे यांनी ३५० भागांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून याचं काम पाहिलं होतं. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. मुंबईऐवजी पुण्यातलं कथानक वापरलेली आणि प्रदीर्घ काळ सुरू असणारी मालिका म्हणजे ‘अवंतिका’. मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबाची कहाणी. श्रीमंत कुटुंबातील मुलीच्या फसवणुकीच्या पाश्र्वभूमीवर ‘अवंतिका’नं दिलेला लढा प्रेक्षकांना भावला. गिरीश ओक, स्मिता तळवलकर, मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, संदीप कुलकर्णी, श्रेयस तळपदे, दीपा श्रीराम, रवींद्र मंकणी, तुषार दळवी, पुष्कर श्रोत्री, शर्वाणी पिल्ले प्रमुख भूमिकेत होते, तर उपकथानकातून अनेक कलाकार चमकून गेले.

‘वहिनीसाहेब’ ही अशीच एक स्त्रीपात्र केंद्रस्थानी असणारी मालिका. वाहिन्यांनी समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयोग केले त्याचाच एक भाग म्हणावी अशी ही मालिका. आशयामध्ये फार काही दम नव्हता, पण गाजावाजा बराच व्हायचा. वीरेन प्रधान यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. याच वीरेन प्रधान यांनी त्यानंतर दिग्दर्शित केलेली वेगळी मालिका म्हणजे ‘उंच माझा झोका’. स्त्री पात्र म्हणजे केवळ शोभेची बाहुली किंवा कटकारस्थानी असते, ह्य़ा टिपिकल रचनेत ही मालिका बसणारी नव्हती. ऐतिहासिक व्यक्तीच्या आयुष्यातून त्यांनी समाजाचा आरसाच दाखविला होता. इतिहासाचा अपलाप होऊ न देता उत्तम सादरीकरणातून साकारलेल्या मालिकेनं एक जाणीव निर्माण केली. स्पृहा जोशी, विक्रम गायकवाड, ॠग्वेदी वीरेन, शर्मिष्ठा चौधरी, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

२००३  मध्ये मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शित केलेली केलेली ‘वादळवाट’ ही मालिका बरीच गाजली. अरुण नलावडे, अदिती शारंगधर, यांची कामं गाजली. उमेश कामत, प्रसाद ओक, पूजा नायक, विघ्नेश जोशी, क्षिती जोग, उदय सबनीस, सुबोध भावे, लोकेश गुप्ते, चिन्मय मांडलेकर, नीलम शिर्के, संतोष जुवेकर, आनंद अभ्यंकर यांच्या भूमिका होत्या. पत्रकारिता, वकील, कॉर्पोरेट, पोलीस क्षेत्र अशी विविधांगी उपकथांची जोड असल्यामुळे या मालिकेचे तब्बल ९३९ भाग झाले होते.

निव्वळ कौटुंबिक नाटय़ किंवा किचन पॉलिटिक्स असणाऱ्या अनेक मालिका गेल्या काही वर्षांत आल्या. टीआरपीच्या बळावर तरल्यादेखील. ‘जगावेगळी’ या अल्फा टीव्हीवरच्या मालिकेत कर्ती स्त्री आणि तिच्या कुटुंबाची कहाणी होती. कांगावाखोर महिलावर्ग यात दिसला. तीन र्वष ही मालिका सुरू होती.

ई-टीव्हीवरील ‘चार दिवस सासूचे’ ही कविता लाड आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका असणारी मालिका प्रदीर्घ काळ म्हणजेच ११ र्वष सुरू होती. प्रदीर्घ काळ सुरू असणारी मालिका म्हणून तिचा उल्लेख केला जात असला तरी कथानकात फारसा दम नव्हता. एकतर ती प्रदीर्घ काळ सुरू असल्यामुळे एक प्रकारचा रटाळपणा त्यात आला होता. कौटुंबिक मालिकांमध्ये ई-टीव्हीवरच्याच ‘गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून कुटुंबातील संघर्ष टिपला होता.

२००७ मध्ये स्टार प्रवाहदेखील मालिकांच्या स्पर्धेत आलं. एकंदरीतच त्या काळातल्या ट्रेंडनुसार कौटुंबिक नाटय़ असणाऱ्या मालिकांचा जोर येथेदेखील सुरू झाला. २३४ भागांच्या ‘जिवलगा’ या मालिकेचे मंदार देवस्थळी यांनी दिग्दर्शन केलं होतं, तर शशांक सोळंकी निर्माता होते.

हलकंफुलकं आणि तुमच्या आयुष्यातल्या घटनांना सामावून घेणारं कथानक लोकप्रिय होतं हे पुन्हा एकदा दाखवून दिलं ते ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ यांनी. दिलीप प्रभावळकरांच्या ‘लोकसत्ता’मधील ‘अनुदिनी’ या सदरावर आधारित पुस्तकामुळे केदार शिंदे यांना सुचलेली ही मालिका. आई-वडील, मुलगा-मुलगी आणि आजोबा अशा आटोपशीर कुटुंबातील प्रत्येकाच्या नजरेतून, त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून टिपलेला भवताल या सदरामध्ये प्रभावळकरांनी रेखाटला होता. हे सदर आधीच खूप गाजलं होतं. केदार शिंदे यांनी त्याचं मालिका पटकथा रूपांतर केलं. कथानक वाढविण्यात आलं. संवाद गुरू ठाकूर यांनी लिहिले. अगदी रोजच्या आयुष्यातील घटनांचा प्रत्यय लोकांना येत असल्यामुळे ही मालिका लोकांना थेट आपली वाटणारी ठरली. (तुम्ही काय आमच्या घराबाहेर बसूनच लिहिता का हे प्रसंग, असा प्रश्नच एका प्रेक्षकाने केदार शिंदे यांना एकदा विचारला होता.) मालिकेतील पात्रांशी प्रत्येक जण स्वत:ला कोठे ना कोठे तरी जोडू शकत होता. दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले, रेश्मा नाईक, विकास कदम यांनी अगदी समरसून काम केलं. विकास कदम यांची हा छोटय़ा पडद्यावरील पहिलीच भूमिका होती. मालिका यशस्वी होण्यातला आणखी एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे १६५ भागांनंतर ही मालिका संपली. लोकांनी ‘बंद करा आता’ असे सांगण्याऐवजी ‘लवकर का बंद केली’ असं विचारणं यातून लेखक-दिग्दर्शकाचा हेतू सफल झाला.

ई-टीव्हीवरची अशीच एक हलकीफुलकी मालिका म्हणजे ‘सोनियाचा उंबरा’. वाडा-संस्कृतीचं सुरेख चित्रण यात आलं होतं. हेमंत देवधर यांची ही मालिका होती. मुख्य म्हणजे ठरावीक भागांत ती संपली. ई-टीव्हीवरची आणखी एक उत्तम मालिका म्हणजे ‘झोका’. सुनील बर्वे आणि अमृता सुभाष प्रमुख भूमिकेत असणारी मालिका प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केली होती. ही मालिकादेखील बरीच लोकप्रिय झाली होती.

हलकाफुलका, काहीसा खटय़ाळ आणि सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या लग्न या जॉनरवर आधारित ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ आणि ‘मधु इथे तर चंद्र तिथे’ यांचा उल्लेख करावा लागेल. सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच, पण दर्जेदार कलाकार आणि दिग्दर्शकांमुळे या मालिका सरस ठरल्या. दोन्ही मालिका एका ठरावीक कालमर्यादेतच सुरू राहिल्या. तिसरी गोष्ट काहीशी लांबू पाहत होती, पण वेळीच आवरली. मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांच्या जोडीने दुसऱ्या गोष्टीत, तर स्पृहा जोशी आणि उमेश कामत जोडीने तिसऱ्या गोष्टीत प्रमुख भूमिका केल्या होत्या. दुसऱ्या गोष्टीचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं, तर तिसऱ्या गोष्टीचं विनोद लव्हेकर यांनी. कौटुंबिक  टच असलेल्या मालिका असं याला म्हणता येईल.

‘मधु इथे तर चंद्र तिथे’ या मालिकेने तर धम्मालच केली. शनिवार आणि रविवार एक एक तासात एकेका जोडप्याच्या मधुचंद्राची कथा यात असायची. द्वारकानाथ संझगिरी आणि केदार शिंदे यांनी या सीरिजमध्ये ५२ लग्नं लावली आणि त्यांच्या मधुचंद्राची धम्माल मांडली. मधुचंद्रासारख्या अत्यंत वैयक्तिक विषयाला घेऊन, सेक्स कॉमेडी होऊ न देता केलेली मांडणी हा त्यातील महत्त्वाचा घटक. अनेक प्रसिद्ध सिनेकलाकारांनी यात काम केलं होतं.

वाहिन्यांच्या स्पर्धेत मधल्या काळात तारा वाहिनीदेखील आली, पण ही वाहिनी अगदीच अल्पायुषी ठरली. त्यामुळे अर्थातच बहुतांश काळ झी आणि ई-टीव्ही हीच स्पर्धा होती. २००७ मध्ये स्टार प्रवाह आल्यानंतर ही स्पर्धा वाढली. तोपर्यंत मेगा सीरियल्स हा भाग बऱ्यापैकी स्थिरावला होता. तसेच केवळ शहरी वर्गापुरता कथानकाचा फोकस न राहता तो सर्वव्यापी करण्याकडे बहुतांश वाहिन्यांचा कल दिसून येतो. त्यामुळे जाणीवपूर्वक काही मालिकादेखील केल्या गेल्या. त्यामुळेच गेल्या सात-आठ वर्षांत मेगा सीरियल्सचं प्रस्थ खूपच वाढलं आहे.

स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र’ ही सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेली अशीच एक मेगा सीरियल. मराठीतील यच्चयावत कलाकारांनी यात काम केलं होतं. पाळंमुळं शोधणाऱ्या मुलाची ही कथा प्रेक्षकांना भावली. श्रीरंग गोडबोले यांची कथा आणि पटकथा-संवाद अभय परांजपे यांचे होते. स्टार प्रवाहने सुरुवातीपासूनच मेगा सीरियल्सवर भर दिला असे जाणवते. ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘पुढचं पाऊल’ या चार-पाच र्वष चालणाऱ्या मालिका बऱ्या होत्या.

एकंदरीतच गेल्या पाच वर्षांत मेगा सीरियलचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. किंबहुना सीरियल ही मेगाच असायला हवी असा एकंदरीतच ठाम गृहीतक झालं आहे. याचाच प्रभाव म्हणजे लवकरच मुंबई दूरदर्शनदेखील तब्बल नऊ मेगा सीरियल सुरू करीत आहे.

टीआरपी मिळतोय म्हटल्यावर मालिकेचं दळण सुरूच ठेवायचं हीच पद्धत सध्या रूढ झाली आहे. कारण टीआरपी आहे म्हटल्यावर जाहिराती आहेत, मग त्या जाहिराती टिकवून ठेवण्यासाठी अशा मारुतीच्या शेपटाप्रमाणे अंतहीन मालिकांची निर्मिती वाढताना दिसून येत आहे. ‘पुढचं पाऊल’, ‘होणार सून मी’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या अलीकडच्या काळातल्या मालिकांचं उदाहरण म्हणता येईल. मग एखाद्या मालिकेवर वृत्तपत्रांतून अथवा समाज माध्यामांतून कितीही टीका का होईना, कधी कधी ही टीका खालच्या पातळीपर्यंतदेखील जाते, तरीदेखील जोपर्यंत वाहिनीला जाहिराती मिळतात तोपर्यंत कथानक लांबवलं जातं. तेराच्या पाढय़ातून सुरू झालेल्या या मालिकांचा प्रवास आज अशा मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबणाऱ्या टप्प्यावर आला आहे.

श्रीशिल्लक

मराठी मालिका चाळिशीच्या उंबरठय़ावर असतानाचा हा एकंदरीत धांडोळा. एकमेव सरकारी माध्यम ते खासगी वाहिन्यांची तीव्र स्पर्धा असा हा प्रवास आहे. पूर्वीचं सर्वच चांगलं आणि नंतरचं सारंच वाईट असं सरसकट विधान करता येणार नाही, असा अनेक नवनव्या प्रयोगांचा हा प्रवास म्हणावा लागेल. त्याच अनुषंगानं काही मूलभूत घटकांचा विचार या दृष्टीनं करणं गरजेचं ठरेल.

सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध लेखकांचं गाजलेलं साहित्य हाच मालिकांचा आधार होता. आज केवळ मालिकेसाठी म्हणूनच वेगळी कथा आणि त्या कथेचा विस्तार हा प्रकार रुजला आहे. मालिकेसाठी म्हणून वेगळं लेखनदेखील सध्या होताना दिसतं. हा बदल चांगलाच म्हणावा लागेल. पण हे होत असताना आलेल्या मेगा सीरियल या प्रकारामुळे  छोटा जीव असणारी गोष्ट मेगा मालिकेच्या प्रवाहात हरवून जाताना दिसत आहे. मग ओढून-ताणून एखादा सण-समारंभ साजरा करण्याचा प्रसंग असो की एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन. वास्तवापासून दूर जाणं अगदी स्पष्टपणे जाणवतं. हे वास्तवापासून दूर जाणं आजच्या प्रेक्षकांनादेखील एका आभासी जगात पाठवताना दिसतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे टेलिव्हिजननं प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांनी टेलिव्हिजनला गृहीत धरलं आहे. त्यातूनच केवळ हिंदी मालिकांकडे वळणारा मराठी प्रेक्षक आपल्याकडे यावा म्हणून तसंच प्रयोग करणं किंवा एका वाहिनीनं एखादा प्रयोग केला तसंच सर्वानी करणं ही नक्कल ठरते. त्यात सर्जनशीलतेला वाव मिळत नाही. त्यातच वाहिन्यांचा वाढता हस्तक्षेप सध्या खूपच चर्चेत आहे. तुलनेनं दूरदर्शनच्या काळात इतर सरकारी जाच असला तरी कथानकातील हस्तक्षेप कमी असल्याचे दिसते.

मुळात मालिकांसाठी म्हणून अशी एखादी ठरावीक रचना असावी, असं आपल्याकडे फारसं कधी झालं नाही. मालिकांच्या भागांच्या संख्येपासून ते विषयापर्यंतचे अनेक प्रयोग आपल्याकडे सर्वच टप्प्यांवर झाले आहेत. सुधारित तंत्रज्ञानामुळं चित्रीकरणात आणि संकलनात अनेक प्रयोग करता आले. पण गेल्या काही वर्षांत येथे साचलेपणा आला आहे. त्याचं कारण म्हणजे सार्वत्रिक सपाटीकरण. मनोरंजनाच्या आणि टीआरपीच्या नावाखाली सारं काही झाकण्याची वृत्ती वाढली आहे आणि हे सपाटीकरण आपणच आपल्या पद्धतीनं केलं आहे. अमेरिका अथवा युरोपच्या मालिकांचा प्रभाव वगैरे म्हणण्यात काहीच अर्थ नाही.

चित्रपटांबाबत जसा एक मसालापटाचा फॉम्र्युला असतो तोच प्रकार हल्ली मालिकांमध्येदेखील दिसून येतो. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चित्रपटांचे जसे सर्वागाने सर्वच प्रकारच्या प्रसार माध्यमातून र्सवकष परिक्षण केले जाते, तसे मालिकांबाबत फारसे होताना दिसत नाही. जे काही दिसते ते केवळ चकचकीत वर्णनात्मकच.

दुसरा मुद्दा आहे तो टीआरपीचा. एक व्यवसाय म्हणून अशी मापकं हवीतच. पण ती व्यवस्था निर्दोष असावी लागते. गेली १५ र्वष वापरलेली टीआरपी मोजण्याची यंत्रणाच सदोष असल्याचं मध्यंतरी सिद्ध झालं होतं आणि त्यातूनच नवी यंत्रणा सुरू करण्यात आली, पण मुळात सदोष यंत्रणेनं आपल्या डोक्यावर आजवर अनेक गोष्टी मारल्या आहेत हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या यंत्रणा सुधारणं हेदेखील यापुढील काळातलं महत्त्वाचं उद्दिष्ट असावं लागेल.

एक व्यवसाय म्हणून याकडे पाहताना मात्र काही महत्त्वाच्या गोष्टी प्रकर्षांने नोंदवाव्या लागतात. दूरदर्शनवरील प्रायोजित मालिका या टप्प्यावर अनेक जण निर्मिती व्यवसायात उतरले. त्यात बहुतांश मराठी नावंदेखील आहेत. उपग्रह वाहिन्यांच्या आगमनानंतर व्यवसायाच्या असंख्य संधी निर्माण झाल्या. अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ अशांना संधी मिळाली. उपग्रह वाहिन्यांमध्ये अनेक अमराठी उद्योजक असले त्या वाहिन्यांना दिशा देण्याचे काम मुख्यत: मराठी माणसांनीच केलं आहे. सुरुवातीलाच नितीन वैद्य यांच्या कल्पकतेतून या क्षेत्राला एक दिशा मिळाली. निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, श्रावणी देवधर, जयेश पाटील आणि अनुज पोद्दार यांनी हीच व्यवस्था काळानुरूप पुढे नेली आहे.

एक व्यवसाय म्हणून आज मालिकांनी स्वत:चं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. मुळात आज मनोरंजनातून प्रबोधन असा प्रकार राहिला नाही. ‘जनरल एन्टरटेन्मेंट चॅनल’ म्हणून आजच्या वाहिन्यांची बाजारपेठीय ओळख आहे. एका अंदाजानुसार मराठी टेलिव्हिजनची उलाढाल सुमारे दोनशे कोटीच्या आसपास आहे. एक इंडस्ट्री म्हणून मराठी मालिकांकडे पाहिलं जातं. अर्थात इंडस्ट्री म्हटल्यावर ती टिकवण्याची आणि वाढवण्याची धडपड ही सुरूच असते. व्यवसायाची गणितं सांभाळत झालेले बदल म्हणूनदेखील यातील अनेक बाबींकडे पाहता येईल.

मुळात त्या त्या काळानुसार बदल होतच असतात. पण आज एक प्रकारचं साचलेपण आलं आहे, हे मात्र मान्य करावंच लागेल. प्रत्येक व्यवसायाचं एक चक्र असतं. आणि कोणत्याही व्यवसायात साचलेपणा टिकून राहत नाही आणि अन्यथा त्या इंडस्ट्रीला अर्थव्यवस्थेत टिकून राहणं शक्य होत नाही.

या साचलेपणाची जाणीव सध्या इंडस्ट्रीतल्या अनेक धुरीणांना आहे. त्यामुळे गेले ते दिवस असा गळा काढायची गरज नाही. त्यामुळे आजचं साचलेपण नक्कीच दूर होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. ते केव्हा होईल, कोण करील, कसं करील हे येणारा काळच सांगेल.

महिला राज गेलं कुठे?

दूरदर्शनच्या नियमांच्या चौकटीत राहूनदेखील मराठी मालिकांच्या बाबतीतल्या सर्व पहिल्यावहिल्या घटना सुरुवातीच्या २८ वर्षांत घडल्या. त्या त्या काळानुसार त्यांना यशदेखील लाभलं. यात नोंद घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे पहिली मराठी सीरिज विजया धुमाळे जोगळेकर यांनी केली, पहिली मालिका मीना वैष्णवी यांनी आणि पहिली मेगा सीरिज कांचन अधिकारी यांनी, तर पहिला प्रायोजित रिअ‍ॅलिटी शो नीना राऊत यांनी केला. थोडक्यात, एक नवी सुरुवात करण्याचं काम या महिलांनी केलं. आजवरच्या मालिकांच्या प्रवासाकडे पाहिलं तर या महिला दिग्दर्शकां व्यतिरिक्त स्मिता तळवलकर हे नाव सोडलं तर निर्मिती अथवा दिग्दर्शनात महिलांचं नाव फारसं दिसत नाही. बहुतांश सर्वच वाहिन्यांवर कार्यकारी निर्माता (एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ूसर) या महिला आहेत. पटकथा लेखन, संवाद अशा काही ठिकाणी अनेक महिला आहेत. पण थेट नव्याने काही मांडून पुढे नेणाऱ्या दिग्दर्शक, निर्मात्यांमध्ये त्यांची उणीव जाणवते. आणि दुसरीकडे आज झाडून सर्वच वाहिन्यांवर महिला प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवून मालिकांची रचना केली जात आहे. आणि त्यामध्ये आलेला एकसाचलेपणा आणि बटबटीतपणा तोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी महिला दिग्दर्शक, निर्माते प्रयत्न करणार का?

‘गजरा’ ते ‘ताक धिना धिन..’

दूरदर्शन हे सरकारी माध्यम. अर्थातच नियमांची कडेकोट बंदिस्ती आणि लाल फितीची दिरंगाई हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्याचबरोबर समाजाला काही तरी दिलं पाहिजे हेदेखील अधोरेखित व्हायला हवं. त्यामुळे सुरुवातीच्या १५ वर्षांत तर सीरिज अथवा मालिकांचे दोनच प्रयोग झाले. फिक्शन आधारित कार्यक्रम अनेक झाले, पण सीरिज अथवा मालिकांमध्ये त्यांचा समावेश करता येणार नाही. नॉनफिक्शन कार्यक्रमांनीदेखील आपली दमदार छाप उमटवली. त्यानंतर उपग्रह वाहिन्या अवतरेपर्यंतच्या काळात प्रायोजित मालिकांची चलती असतानादेखील दूरदर्शनने प्रोग्रामची कास सोडली नाही. अर्थातच या दोन्ही प्रकारांत साहित्य, संस्कृती, कला या विषयांवरील अनेक कार्यक्रमांनी दूरदर्शनचा अवकाश व्यापला होता. संगीत, नृत्य, गायन, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी येथे हजेरी लावली. महिला, लहान मुलं, आरोग्य, कृषी, कामगारविषयक आणि सामाजिक भान जोपासणाऱ्या कार्यक्रमांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळेच त्यावर एक धावता कटाक्ष.

‘गजरा’चा उल्लेख आधीच केला आहे. ‘गजरा’ साकारण्यात चासकरांच्या बरोबर अनेक जण असायचे. रत्नाकर मतकरी यांनी सुरुवातीची दोन र्वष महत्त्वाचं काम केलं होतं. विनायक चासकरांनी सुरू केलेला नवा प्रयोग म्हणजे उत्तमोत्तम कथांचं माध्यमांतर.  त्याच जोडीने त्यांनी दूरदर्शन नाटक ही संकल्पना आणली. विश्वास मेहंदळे यांनीदेखील अशी नाटकं बसवली.

शंकर वैद्यांचं निवेदन आणि लता मंगेशकरांच्या गायनातून संत-परंपरेचा वेध घेणारा ‘अमृताचा घनु’ आणि पुलंच्या बहुतांश कार्यक्रमांच्या निर्मात्या विजया धुमाळे-जोगळेकर होत्या. वसंतराव देशपांडे यांचं राग संगीत, अनेक गायकांची उपस्थिती लाभलेला ‘आरोही’ हे कार्यक्रम लोकप्रिय होते. तर अरुण काकतकर निर्मित सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा गझलांवर आधारित कार्यक्रम गाजला होता. सुहासिनी मुळगावकर यांनी फक्त गंधर्वावर सादर केलेला गंधर्व गौरवचा विशेष उल्लेख करावा लागेल. ‘प्रतिभा आणि प्रतिमा’मुळे अनेक प्रेक्षकांची साहित्यिक भूक भागवली. प्रिया तेंडुलकरांचा ‘माझ्या आजोळची गाणी’, आशाबाईंचा ‘ॠतु बरवा’, सावरकरांवरचा ‘शतजन्म शोधताना’ अशा काही सांगीतिक कार्यक्रमांची नोंद घ्यावी लागेल.

सामाजिक भान जोपासणाऱ्या कार्यक्रमांमध्ये मनोहर पिंगळे यांचे ‘आरोग्य संपदा’ आणि ‘कामगार विश्व’, अशोक डुंबरे यांचे ‘आमची माती आमची माणसं’ हे विशेष लोकप्रिय होते. ‘आमची माती आमची माणसं’मध्ये नंतर शिवाजी मुजुमदार यांनी गप्पा-गोष्टीची जोड देऊन एक चांगला प्रयोग केला. यामुळे या गावकडच्या कार्यक्रमाला शहरी प्रेक्षक मिळाला. त्याच वेळी तेंडुलकरांनी निळू दामले यांच्याबरोबर १६ भागांत सादर केलेला ‘दिंडी’ हा काहीसा वेगळ्या पठडीतला कार्यक्रम. महाराष्ट्रातील गावांमध्ये जाऊन तेथील वास्तवाचे चित्रीण करून ते यातून मांडले होते. अवधूत परळकर त्याचा तांत्रिक भाग सांभाळायचे.

सुहासिनी मुळगावकर यांचा ‘सुंदर माझं घर’, नीना राऊत यांचा ‘स्त्रीविविधा’, ‘युवादर्शन’, लहान मुलांचे ‘किलबिल’, माधव वाटवेचे ‘शाळाशिक्षण’ हे सारं काही दूरदर्शनच्या बोधवाक्याला अनुसरूनच होतं. साक्षरता वर्षांनिमित्ताने मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन चित्रित केलेला ‘अक्षरधारा’ कार्यक्रम वर्षभर सुरू होता. ‘मी शिकलो, मी शिकवतो’ या मजकुरांच्या पत्रांचा दूरदर्शनमध्ये ढीगच जमा झाला होता.

दूरदर्शनच्या बातम्या ही एक त्या वेळची खासियत होती आणि आजही आहे. खासगी वृत्तवाहिन्यांच्या आक्रस्ताळी प्रदर्शनामुळे आजही दूरदर्शनच्या बातम्या आवर्जून पाहणारा वर्ग बराच मोठा आहे.

यातील बहुतांश कार्यक्रम १९९९ नंतर आलेल्या उपग्रह वाहिन्यांनी वेगळ्या पद्धतीने सादर केले आहेत. वृत्तवाहिन्या आल्यानंतर फिक्शन आणि नॉनफिक्शन अशी सरळ विभागणीच झाली. पण या बदलात दोन कार्यक्रम मात्र तमाम वाहिन्यांनी थेट सोडूनच दिले, ते म्हणजे ‘साप्ताहिकी’ आणि ‘सप्रेम नमस्कार’. आठवडय़ातील सर्वच कार्यक्रमांचा वेध घेणारा हा कार्यक्रम तेव्हा आवर्जून पाहिला जायचा. अरविंद र्मचट आणि रविराज गंधे काही काळ याचे संयोजन करत होते. दुसरा कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांच्या थेट प्रतिसादाला स्वतंत्र जागा देणारा ‘सप्रेम नमस्कार’. पत्रांचा ढीग समोर मांडून किरण चित्रे, विजया धुमाळे आणि विनय आपटे हा कार्यक्रम सादर करायचे. प्रेक्षक प्रतिसादाची जागा आज टीआरपीने घेतली आहे आणि साप्ताहिकी तर जणू कालबाह्य़च करण्यात आली आहे.

रिअ‍ॅलिटी शोजचं आज जणू काही पेवच फुटलं आहे. पण दूरदर्शनच्या काळात नियमांच्या जंजाळातून त्या वेळी असा शो करणं खूपच अवघड होतं. मुळात एकच अँकर रोज दिसणं नियमात बसत नव्हतं. तीन महिन्यांत एकाच व्यक्तीला परत कार्यक्रम देता यायचं नाही. आणखी बऱ्याच अडचणी होत्या. या बंदिस्त चौकटी न सांभाळणारा रिअ‍ॅलिटी शो सादर करण्याचा प्रस्ताव नीना राऊत यांनी दिला. मुंबई दूरदर्शनच्या तत्कालीन निर्देशक सरोज चंडोला यांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला. दिल्लीवरून विशेष बाब म्हणून परवानगी मिळाली आणि ‘ताक धिना धिन’च्या माध्यमातून पहिला मराठी रिअ‍ॅलिटी शो छोटय़ा पडद्यावर आणला. कार्यक्रमासाठी लोकांकडून ध्वनिमुद्रित कॅसेट मागविल्या होत्या. प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या कॅसेट पाहून तेथे उपस्थित ‘लोकसत्ता’ वार्ताहराने त्याची बातमी केली. ती एका इंग्रजी वृत्तपत्रानेदेखील प्रसिद्ध केली.

ती वाचून क्लोज-अप आपणहून प्रायोजकत्व घेऊन पुढे आले. आणि मराठीतल्या पहिल्या प्रायोजित रिअ‍ॅलिटी शोची १९९६ साली सुरुवात झाली. दर आठवडय़ाला सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे जवळपास चारशेच्या आसपास भाग झाले. त्यातून अनेक नवे अँकर्स तयार झाले, नवे कलाकार पडद्यावर आले.

दिग्दर्शक, निर्माते, लेखक, अभ्यासक – विनायक चासकर, विजया धुमाळे-जोगळेकर, राजदत्त, दिलीप प्रभावळकर, मीना वैष्णवी, रत्नाकर मतकरी, रविराज गंधे, नीना राऊत, निखिल साने, अवधूत परळकर,

बी. पी. सिंग, कांचन अधिकारी, केदार शिंदे, सतीश राजवाडे, विनायक देशपांडे, विवेक वैद्य, मंदार देवस्थळी, गणेश मतकरी, पराग फाटक यांच्याशी वेळोवेळी झालेली चर्चा या लेखासाठी उपयुक्त ठरली.

response.lokprabha@expressindia.com
Twitter – @joshisuhas2