सप्रेम नमस्कार…
समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’!
आनंदवनाच्या आजवरच्या या प्रवासाची गोष्ट सांगणारं डॉ. विकास आमटे यांचं ‘आनंदवन- प्रयोगवन’ हे पुस्तक प्रकाशित झालेलं असून, ते संपूर्ण महाराष्ट्रातील सजग मनांमध्ये एक नवी चेतना निर्माण करत आहे. मनामनांमध्ये तेवणारी ही ज्योत अधिकाधिक प्रकाशमान व्हावी यासाठी आनंदवन एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेत आहे. या उपक्रमाचं नाव आहे- ‘समाजभान अभियान’! या अभियानांतर्गत आम्ही पाच कलमी कार्यक्रम हाती घेत आहोत.
१. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ताज्या दमाचे जे अनेक कार्यकर्ते सामाजिक कामांमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्या पाठीशी आनंदवनाने मोठय़ा भावाच्या भूमिकेतून उभं राहावं व त्यांना समाजाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असं आम्ही ठरवलं आहे.
२. आनंदवनाने आजवरच्या प्रवासात शेती, पाणी, घरबांधणी, सामाजिक वनीकरण, दुग्धविकास, प्लास्टिक पुनर्वापर अशा विविध क्षेत्रांत नानाविध यशस्वी प्रयोग केले आहेत. या अनुभवाचा फायदा नव्याने सामाजिक कामांत उतरलेल्या मंडळींना करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
३. महाराष्ट्रातल्या गावा-शहरांमध्ये जाऊन तेथील महाविद्यालयीन तरुण, स्थानिक मंडळी आणि उत्साही कार्यकर्ते यांच्यासाठी सामाजिक जाणीव-जागृतीच्या अनुषंगाने जाहीर भाषणं, परिसंवाद, मुलाखती यांचं आयोजन करण्याचा आमचा मनोदय आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना आनंदवनात आमंत्रित करून तेथील प्रयोगांबद्दल अवगत केलं जाईल.
४. महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांत नवनव्या कल्पनांचं सर्जन करणाऱ्या ‘पब्लिक इनोव्हेटर्स’ना हुडकून त्यांचं काम सरकार, उद्योग व अन्य व्यासपीठांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
५. तरुण पिढीशी संवाद साधणं आणि त्यांना सामाजिक भान देणं याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने सामाजिक भान देणाऱ्या मराठीतील महत्त्वाच्या पुस्तकांची यादी तयार करून ती सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी असं आम्ही ठरवलं आहे. या पुस्तकांच्या अनुषंगाने काही उपक्रम आयोजित करण्याचाही विचार सुरू आहे.
हा पाच कलमी कार्यक्रम प्रत्यक्षात आणणं हे एक मोठं आव्हान असून, त्यासाठी व्यापक यंत्रणा उभी करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्यासारख्यांनी प्रत्येकी ५,२५० रुपयांची जबाबदारी उचलली, तर हा उपक्रम वेगाने कार्यान्वित होण्यास मदत होऊ शकेल. आनंदवनाच्या पुढच्या पिढीने हाती घेतलेल्या या उपक्रमाला आपण हातभार लावाल आणि हे अभियान उभं करण्यात योगदान द्याल असा विश्वास वाटतो.
आभार.
आपला-
कौस्तुभ विकास आमटे (आनंदवन)
आपला धनादेश ‘महारोगी सेवा समिती, वरोरा’ या नावाने, आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि दूरध्वनी/ भ्रमणध्वनी क्रमांकासह पोस्टाने किंवा DTDC कुरिअरने पुढील पत्त्यावर पाठवावा : सचिव, महारोगी सेवा समिती- वरोरा, मु. पो. आनंदवन, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, पिन : ४४२९०७.
ई-मेल : samajbhanabhiyan@gmail.com
आपले योगदान Core Banking/ NFET/ RTGS द्वारेही आनंदवनाच्या खालील बँक खात्यात जमा करू शकता.
SB A/c Name : MAHAROGI SEWA SAMITI, WARORA
SB A/c No : 0599104000070391
Name of Bank : IDBI BANK LTD. Branch : WARORA
IFSC : IBKL0000599
आनंदवन संपर्क : 9922550006 / 9850343299
आपल्या योगदानास आयकर कलम ८० जी नुसार करसवलत मिळेल.