माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे सध्याच्या जगावर सर्वार्थाने परिणाम करणारे असे सर्वाधिक महत्त्वाचे क्षेत्र आहे. एरवी या क्षेत्रातील तज्ज्ञांची बोलण्याची आणि विचार करण्याची एक विशिष्ट पद्धती गेल्या २० वर्षांत ठरून गेली होती. पण गेल्या वर्षअखेरीपासून त्यांची अवस्था झोप उडाल्यागत झाली आहे. २०१५च्या सुरुवातीपासून तर या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही ‘‘डिसर्पटीव्ह टेक्नॉलॉजीज’’ या शब्दांचा धसका घेतला आहे. या दोन शब्दांमध्ये असे भीतीदायक आहे तरी काय?
पूर्वी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) किंवा मुख्य माहिती (तंत्रज्ञान) अधिकारी असे एक महत्त्वाचे पद असायचे. आता नव्या जमान्यात हे पद कालबाह्य़ झाले असून, यापुढे आयटी क्षेत्रातील कंपन्यांसाठी डिजिटल मुख्याधिकारी हे पद गरजेचे ठरले आहे. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगभरातील आयटी कंपन्यांना एका वेगळ्या क्रांतिकारक बदलांना सामोरे जावे लागते आहे. त्या क्रांतीमुळे जगभरात झालेले बदल आणि त्याचा आयटी कंपन्यांवर झालेला परिणाम त्यांची आजवरची कार्यपद्धती पूर्णपणे विस्कळीत करणारा आहे. आगामी काळात आयटी कंपन्यांमधील ‘डिजिटल अधिकारी’ हा किती नावीन्यपूर्ण विचार करणारा आणि दूरदृष्टी असलेला आहे, यावरच भविष्यात आयटी कंपन्यांची प्रगती कशी होणार ते ठरेल. या डिजिटल अधिकाऱ्यांना आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या भूमिका लक्षात घ्याव्या लागणार आहेत. पूर्वी एखाद्या कंपनीच्या विक्री विभागातील अधिकारी प्रत्यक्ष बाहेर जाऊन विक्रीच्या संदर्भातील ग्राहक मिळविण्याचे काम करायचा. आता त्याचेही कामच बाद झाले असून डिजिटायझेशनच्या माध्यमातून कंपनीच्या डिजिटल अधिकाऱ्यालाच थेट ग्राहकापर्यंत पोहोचता येणार आहे. भविष्यातील प्रत्येक उत्पादन कस्टमाइज्ड म्हणजेच ग्राहकाच्या वैयक्तिक पसंतीनुसार असेल, हे गृहीत धरावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या डिजिटल माध्यमांच्या वापरापासून ते ग्राहकांसाठी व कंपनीसाठी वापरावयाच्या सर्व प्रकारच्या डिजिटल माध्यमांचे भान या पदावरील व्यक्तीला असावे लागेल, त्यासाठी तयारीला लागा, असा इशारेवजा संदेश देण्याचे काम २०१५ या वर्षांने केले आहे.
ही नवीन क्रांती तर आता जनसामान्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. आजवरची यंत्रणा किंवा पद्धती विस्कळीत करणारे तंत्रज्ञान म्हणजेच ‘डिसरप्टीव्ह तंत्रज्ञान’ होय. रंगनिर्मिती आणि विक्री करणाऱ्या भारतातील प्रख्यात कंपनीने विक्री प्रतिनिधींना घरी पाठवले असून त्यांचे काम डिजिटल माध्यमाद्वारे थेट केले जाते आहे. पूर्वी आरटीओने ठरविलेल्यानुसार आपण टॅक्सीचे भाडे अदा करायचो. पण आता उबेर आणि ओला या नवीन सेवा आल्या असून त्यांनी टॅक्सीभाडय़ाची जुनी पद्धतच मोडीत काढली आहे. ग्राहक येतो त्यावेळेस किती ग्राहक आहेत हे पाहून त्यांच्या गरजेनुसार, भाडय़ाचा चक्क लिलाव होतो. उबेर आणि ओला या नफ्यातील कंपन्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक जण याच मार्गाने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॅक्सीभाडे अदा करण्याची पारंपरिक पद्धत भविष्यात मोडीत निघाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आता असे बदल नवीन आलेल्या तंत्रज्ञानामुळे सर्वत्र होत आहेत पूर्वीही ते होत होतेच. म्हणजे संगणक येऊन टाइपटायटर मोडीत निघाला तेव्हाही संगणक हे तत्कालीन यंत्रणा विस्कळीत करणारेच तंत्रज्ञान होते. पण त्याचा वेग तेवढा नव्हता. आताचे डिसरप्टीव्ह तंत्रज्ञान सारे काही वेगात मोडीत काढते आहे. पण म्हणून धसका घेण्याची गरज नाही तर भविष्यात काय घडणार हे लक्षात घेऊन त्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे.
हे डिसरप्शन किंवा व्यवस्था विस्कळीत करणे हे सध्या काही केवळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही तर आयुष्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात सुरूच आहे. एकीकडे कुटुंबव्यवस्थेला धडका बसताहेत, दुसरीकडे लग्नव्यवस्थेला. तिसरीकडे भविष्यात येणारे आयओटी म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ने तर आपले आयुष्यच मुळातून बदलण्याचा घाट घातला आहे. जीवनाच्या या सर्व क्षेत्रांमध्येच अशी वादळी अवस्था निर्माण झाली आहे. अशा वेळेस नेमके काय सुरू आहे, आपली वाटचाल कोणत्या दिशेने होते आहे, याचे भान समाजाला देण्याचे महत्त्वाचे काम हे माध्यमांचे आहे. म्हणून या वर्षीच्या ‘लोकप्रभा- दिवाळी’ अंकांतील विषयांची रचनाच आम्ही त्यानुसार केली आहे.
डॉ. उज्ज्वला दळवी यांचा ‘कल्पनेच्या पलीकडचं उद्याच वास्तवं’ हा लेख भविष्यात नेमके काय वाढून ठेवले आहे आणि कोणत्या दिशेने जायचे आहे, याचे भान देणारा आहे.
यंदाच्या ‘लोकप्रभा दिवाळी’ अंकाचा विशेष म्हणजे लग्न या विषयावर १८ ते २८ या वयोगटातील तरुणांशी संवाद साधत आमच्या ‘टीम युथफूल’ने केलेले सर्वेक्षण. हे केवळ शहरी भागापुरते मर्यादित सर्वेक्षण असले तरी ते सध्याच्या युवकांच्या लग्नाविषयीच्या आशाआकांक्षा पुरते स्पष्ट करणारे आहे. एवढेच नव्हे तर प्रसंगी अपेक्षित- अनपेक्षित, काहीसे विरोधाभासात्मक वाटावे असे आणि थोडेसे धक्कादायक वाटेल, असे विविधांगी आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्याच समाजाचा एक अविभाज्य भाग असलेला आताचे युवक- युवती नेमका काय विचार करताहेत, याचे हे प्रातिनिधिक चित्र आहे. यातून मुली त्यांच्या विचारांच्या बाबतीत ठाम, टोकदार झालेल्या दिसतात त्यांनी अनेक पारंपरिक बाबींना धडका देण्यास सुरुवात केली आहे. त्या कमावत्या झाल्याने आलेले स्वत्त्वाचे भानही अधिक टोकदार झाले आहे, त्यांना स्वतचे अवकाश हवे आहे, हा समाजातील स्वागतार्ह बदल आहे. तर अद्याप त्यांना ते अवकाश मागावे लागते आहे, हा आपल्याला विचार करायला लावणारा मुद्दाही याच सर्वेक्षणातून समोर येतो. नातेसंबंधांच्या बाबतीत आताच्या तरुण पिढीत खूप मोकळेपणा आला आहे. पूर्वीचे असलेले नातेसंबंध लपवण्याकडे आधीच्या पिढय़ांचा कल असायचा. या लपवालपवीमुळेच अनेक लग्नेही नंतर निकालात निघाल्याची त्यावेळेसची उदाहरणे अनेकांना ठावूक आहेत. त्या पाश्र्वभूमीवर नात्यात आलेला हा मोकळपणा स्वागतार्हच मानायला हवा. त्याचबरोबर लग्न ही अतिशय वैयक्तिक बाब आहे, पण सोहळ्यात सारे कुटुंबिय सहभागी होऊ शकतात, असे तरुण पिढीला वाटते, हाही महत्त्वाचाच बदल आहे. तरुणांच्या या विचारांनी एका पिढीत कोणतेही महत्त्वाचे बदल लग्नसंस्थेत थेट होणार नाहीत. पण हे सर्वेक्षण लग्नसंस्थेच्या डिसरप्शनची नांदी झालेली आहे, हे पुरते स्पष्ट करणारे आहे.
असे म्हणतात की, लोककला, लोकगीते ही समाज मनाचा आरसा असतात आणि समाजाच्या विचारांनुसार, शब्द व संगीत आकारास येते. हे खरे मानायचे तर आताची लोकप्रिय गीतेही आपल्याला हेच डिसरप्शन दाखवताहेत, हेच प्रकर्षांने लक्षात येईल. वैशाली चिटणीस यांच्या लेखातून तेच जाणवते.
मराठी मालिका आता ४० वर्षांच्या झाल्या; हे अनेकांच्या लक्षातही आले नाही. या चाळीशी निमित्ताने आजवरच्या मराठी मालिकांचे दस्तावेजीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुहास जोशी यांनी केले आहे. आता या मालिका काहीशा एकसाची, एकसुरी होऊन त्यांच्यात साचलेपण आले आहे. त्यांना खरी डिसरप्शनची गरज आहे. प्रत्येक वेळेस डिसरप्शनकडे वाईट अर्थाने पाहण्याची गरज नाही. अनेकदा त्यांनी समाजाला खूप काही चांगले देण्याचे कामही केले आहे.
दिवाळीला घरोघरी तोरण बांधण्याची एक पद्धत रूढ आहे. कुठून आली ही पद्धती आणि तिचा प्रवास कसा झाला, यावरील शेखर खांडाळेकर यांचा लेख चांगले उद्बोधन करणारा आहे. तर गौरी बोरकरांनी घडविलेली मोंगोलियाची सफरही तेवढीच रोमांचक आहे.
हे वर्ष म्हणजे चित्रसम्राट दीनानाथ दलाल यांचे जन्मशताब्दीवर्ष. त्या निमित्ताने त्यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्त्वाचा सचित्र आढावाही ‘लोकप्रभा’ने घेतला आहे.
अखेरीस प्रश्न शिल्लक राहतो, तो आपल्या समाजाच्या सर्वच थरांत, सर्वच क्षेत्रांमध्ये धडका देणाऱ्या डिसरप्शनचे काय करायचे? तर त्याचा मार्गही दिवाळीतील ती पणतीच आपल्याला दाखवते आणि सांगते ‘अंतरीचा ज्ञानदिवा तेवत राहू दे!’ सध्याचा जमाना हा ज्ञानाधारीत अर्थव्यवस्थेचा आहे. त्यात आपल्याला केवळ तगून राहायचे नाही तर प्रगतीपथावर मार्गस्थ व्हायचे आहे, त्यासाठी उपयुक्त ठरणार तो ज्ञानदिवाच! आणि प्रत्येकाने आपापला ज्ञानदिवा सतत तेवत राहील, एवढी काळजी घेतली तर मग त्या डिसरप्शनच्या अंधाराला घाबरण्याचे काहीच कारण राहणार नाही. उलटपक्षी त्याला भीडण्यासाठी आपण सज्ज असू ! कारण डिसरप्शन जाणून घेतल्यामुळे आपल्याला माहीत असेल रात्रीच्या गर्भात असे उषकाल!
यंदाचा हा प्रकाशोत्सव लोकप्रभा दिवाळी सोबत आपली जाणीव अधिक प्रगल्भ करणारा ठरो, हीच प्रार्थना!
अंतरीचा ज्ञानदिवा तेवत राहू दे!
vinayak.parab@expressindia.com
Twitter – @vinayakparab