चित्रसम्राट दीनानाथ दलालांच्या सुपरडुपर यशस्वी कारकीर्दीच्या पाश्र्वभूमीवर अभिजात सौंदर्याशी जोडली गेलेली नाळ पाहिली की अतिमहत्त्वाचा प्रश्न पडतो.. दलालांनी पूर्णवेळ ललित कलेलाच वाहून घेतले असते तर?

गोव्यातील एका शाळेत मुख्याध्यापकांनी त्यांच्या वर्गावर तास सुरू असताना, एका विद्यार्थ्यांला काहीतरी रेखाटन करताना पाहिले. कुतूहल म्हणून ते चित्र पाहिले तेव्हा त्यांना लक्षात आले की, पठ्ठय़ाने आपलेच चित्र रेखाटले आहे. त्यांनी विचारणा केली तेव्हा त्या मुलाने
प्रामाणिकपणे सांगितले, ‘‘हो, तुमचेच चित्र रेखाटले आहे’’

दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी त्याच्या वडिलांना पाचारण केले आणि या मुलाच्या हाती ब्रश असला पाहिजे असे सांगून त्याला मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये घालण्याची विनंती केली. तो मुलगा नंतर मुंबईत आला केतकर आर्ट स्टुडिओमध्ये त्याने प्रवेश परीक्षेचा सराव केला.  जेजेत प्रवेश घेऊन १९३७ साली तिथून जीडी आर्टची परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेरही पडला, त्यानंतरची तब्बल ४४ वर्षे त्याने आपल्या
चित्रांच्या बळावर रसिकांच्या मनावर अनभिषिक्त सम्राटासारखे राज्य केले. या चित्रसम्राटाचे नाव दीनानाथ दामोदर दलाल!

दीनानाथ दलाल यांच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे म्हणूनच संयुक्तिक ठरावे. सुरुवातीस त्यांनी पी. बी. सामंत अ‍ॅण्ड कंपनी या जाहिरात एजन्सीमध्ये काम केले आणि नंतर १९४४ मध्ये दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना केली. त्यांनी केलेली व्यावसायिक कामे मग ते कॅलेंडर आर्ट असो किंवा मग विविध पुस्तके आणि मासिकांची मुखपृष्ठे, त्यांच्या आतील रंगीत चित्रे किंवा रेखांकने या साऱ्यांनी प्रकाशन व्यवसायाचाच चेहरामोहरा बदलून टाकला. १९४५ साली दलालांनी ‘दीपावली’ या वार्षिकाच्या प्रकाशनास सुरुवात केली. ‘दीपावली’तील चित्रे आजही अनेक रसिकांच्या स्मरणात आहेत. दीपावलीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त त्यांनी एक सोहळाही आयोजित केला होता. त्या सोहळ्यानंतर अगदी पंधरवडय़ाभरातच दलालांनी अखेरचा श्वास घेतला. पण, तोपर्यंत ते त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून रसिकांवर राज्य करत अजरामर झाले होते. हेच ‘दीपावली’ नंतर केशवराव कोठावळे यांनी सुरू ठेवले. आजही ‘दीपावली’ची गणना दर्जेदार दिवाळी अंकांमध्ये केली जाते.

प्रत्येक कालखंडामध्ये त्या कालखंडात निर्माण झालेली व पोसली गेलेली, लोकप्रिय ठरलेली अशी एक शैली असते. त्या कालखंडातील रंगांची एक वेगळी छाप असते. काही कलावंत असे असतात की, ते संपूर्ण कालखंडावर स्वतचा एक वेगळा ठसा उमटवून जातात. नंतरच्या अनेक पिढय़ांसाठी प्रेरणादायी ठरतात, अशांमध्ये दलालांचा समावेश होता. शिवाय प्रत्येक कलावंताचीही स्वत:ची शैली असते. दलालांनी केलेले काम हे प्रामुख्याने व्यावसायिक किंवा व्यावहारिक या पठडीत मोडणारे होते. त्यांची विशिष्ट अशी कामाची चौकट नव्हतीच कधी, उलट ते करताना त्यांनी तोवरच्या अनेक चौकटी यशस्वीपणे भेदण्याचेच काम केले.

रंग, रेषा, त्यातील रूपाकार, अवकाश, चित्रचौकट हे चित्रसमीक्षणातील काही ढोबळ निकष. हे सारे दलालांच्या चित्र, रेखांकनामध्ये व्यवस्थित उतरलेले असायचे. यातील प्रत्येक गोष्टीचा विचार दलालांनी केला आहे, हे त्यांची चित्रे पाहताना जाणवते. त्यातही व्यावसायिक चित्रांमध्ये तर हा निकषांचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो. पण त्यातही त्यांनी व्यावसायिक चित्रांमध्येही अभिजात सौंदर्यालाच अधिक महत्त्व दिलेले दिसते. व्यावसायिक कामांमध्ये अभिजात सौंदर्य जोपासणे हे तसे सोपे काम नाही. कारण तिथे ग्राहक असलेल्या कंपन्यांच्या मागण्यांसमोर नेहमीच मान तुकवावी लागते. अशी मर्यादा असतानाही अभिजातता जोपासणे हे खूप महत्त्वाचे योगदान ठरते.

रेषा ही तर त्यांचे बलस्थान होते. ती हवी तशी, हवी तेवढय़ा कमी-अधिक जाडीची आणि आवश्यक तो परिणाम साधणारी नेमकी असायची. ती कितीही कमी-अधिक जाडीची असली तरी  के. के. हेब्बरांच्या रेषेप्रमाणे ती लयदार असायची. ही रेषा त्यांच्या रंगचित्रांमध्ये अनेकदा बेमालूम मिसळून जायची तेव्हा त्यांचे चित्र एका वेगळ्याच उंचीवर जायचे. ‘स्नान करणाऱ्या स्त्रिया’ या रंगचित्राने ती उंची गाठली. अशी अनेक चित्रे वानगीदाखल देता येतील. दलालांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांच्या मनुष्याकृतिप्रधान चित्रांमधील शरीररचनाशास्त्र पक्के असायचे व त्यातही एक लय अंतर्भूत असायची. या लयीला जोड मिळायची ती दलाल यांच्या चित्रांतील भाववृत्तींची. दलालांच्या चित्रातील वातावरण नेहमीच जिवंत असायचे. आणि ते जिवंत वातावरण कोणत्या ना कोणत्या भाववृत्तीशी जोडलेले असायचे. ती लय, ती भाववृत्ती रसिकांना जाणवल्याशिवाय राहायची नाही. दलाल रसिकांना आवडण्याचे ते महत्त्वाचे कारण असावे.

दीनानाथ दलालांच्या चित्रांतील रंगांचा ताजेपणा आजही तेवढाच मोहक आहे. त्यातील काही उजळ छटांची तुलना तर हेन्री मातिझच्या चित्रातील रंगांशी करण्याचा मोह व्हावा. पारदर्शक, अपारदर्शकअसे रंगगुण त्यांनी अतिशय नजाकतीने त्यांच्या चित्रांमध्ये वापरले, यातून त्यांची रंगांविषयीची जाण किती जबरदस्त होती, याचा प्रत्यय तर येतोच पण त्याचबरोबर त्यांची समृद्ध रंगसंवेदनाही पाहणाऱ्यास जाणवते.

चित्ररचना किंवा आकृतिबंध या बाबतीत बोलायचे तर चित्रकाराला समोरचे दृश्य पाहिल्यानंतर त्यातील कोणता तपशील घ्यायचा आणि कोणता गाळायचा हे नेमके कळावे लागते. हुबेहूबपणा म्हणजे चित्र नसतेच कधी. तर चित्रामध्ये वातावरण- एक भाववृत्ती असावी लागते आणि ती जिवंत भासावीही लागते. त्यासाठी काय गाळायचे हे  ज्याला कळते, तो चांगला चित्रकार. हे ज्याला नेमके कळले त्या चित्रकारांमध्ये दीनानाथ दलाल यांचा समावेश होतो.

दलालांच्या क्रमिक पुस्तकातील चित्रांनी महाराष्ट्रातील किमान चार पिढय़ांचे दृश्यभान जागविण्याचे काम केले. त्यांनी केलेले काम बव्हंशी व्यावसायिक असले तरी त्या निव्वळ व्यावहारिक कामालाही अभिजात उंचीवर नेऊ न ठेवण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यामुळे त्यांची क्रमिक पुस्तकांतील चित्रे आजही अनेकांच्या चांगलीच लक्षात आहेत.

राजा रविवर्मा याला भारतीय जनमानसात तुफान लोकप्रियता लाभली. त्याच्यानंतर त्याच्याशी तुलना होऊ  शकेल असे झाले ते दलालच. तेवढीच तुफान लोकप्रियता दलालांनाही लाभली. पण, त्यांच्या मनात सतत खंत होती ती पूर्णपणे अभिजात असे काम करता आले नाही याची. म्हणजेच आपण करतो, ते व्यावसायिक काम आहे, याचे भान त्यांना होते. ‘‘आपण करतो तेच अभिजात काम, असे सांगण्याचा मध्यमवर्गीय दांभिकपणा दलालांनी कधी केला नाही’’, या शब्दांत प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांनी दलालांची स्तुतीच केली आहे. प्रभाकर कोलते तर आणखी एक पाऊल पुढे जातात आणि म्हणतात, की, दलाल पूर्णपणे ललित कलेकडेच वळले असते तर ‘मॉडर्न आर्ट’चा कणा बदलला असता.. एरवी कोणतेही साधे विधान करताना सजग असणारे कोलते सर असे विधान करतात, यातच दलाल यांची उंची आणि कर्तृत्व सिद्ध व्हावे!

दलालांची व्यक्तिचित्रे

दीनानाथ दलाल यांनी हाती आलेले प्रत्येक काम मन लावूनच केले. आपण त्यांच्या व्यक्तिचित्रांपर्यंत पोहोचतो तेव्हा असे लक्षात येते की, यातही त्यांचा हातखंडा तर होताच पण या कलाप्रकारावर अंमळ अधिक प्रेम असावे. कदाचित ज्या अभिजात मार्गाने जाण्याची प्रबळ इच्छा त्यांच्या मनात तीव्र होती, त्या मार्गाच्या जवळ जाणारा असा हा कलाप्रकार त्यांना वाटला असावा. मग ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे पेन्सिलने वेगळे तंत्र वापरून केलेले व्यक्तिचित्रण असो किंवा मग जलरंगामध्ये साकारलेले गांधीजी असोत. या सर्व व्यक्तिचित्रांचा आणखी एक विशेष म्हणजे यात केवळ हुबेहूब चित्रण नाही. दलालांना ते तसे अपेक्षितही नाही. म्हणूनच व्यक्तिचित्रांची हाताळणीही अभिजात वळणाने जाताना दिसते. म्हणजे विनोबा भावेंच्या चित्रात विनोबा तर दिसतातच. पण व्यक्तिचित्रणाच्या प्रसंगीचे वातावरण जिवंत भासते.

व्यक्तिचित्रणातील दलालांचा तिसरा विशेष म्हणजे ते कमीत कमी रंग, रेषा यांच्या वापरातून ती व्यक्ती, तिच्या विशेषासह उभी करतात. यात शारीरिक गुणविशेष तर जाणवतातच पण त्यांचा स्वभावविशेषही सहज लक्षात यावा. याचाच अर्थ ज्यांचे व्यक्तिचित्रण दलालांनी केले त्यांना त्यांनी व्यवस्थित जाणूनही घेतले होते. इथेच कसबी व्यक्तिचित्रकाराचे कौशल्य पणाला लागत असते. म्हणजे गांधीजींच्या किंवा विनोबांच्या चित्रामध्ये त्यांचे ‘असणे’ हे आपल्याला पुरेपूर जाणवते. शिवाय प्रत्येक व्यक्तिचित्रणासाठी त्यांनी वेगवेगळ्या शैलींचा वापर केला आहे.

ना. सी. फडकेंच्या आणि गाडगेबाबांच्या जलरंगातील व्यक्तिचित्रांत त्यांचे डोळे प्रभावीपणे रसिकाचा ठाव घेतात. माणूस अनेकदा त्याच्या डोळ्यांतून नेमका जाणवतो, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय या दोन्ही व्यक्तिचित्रांमधून येतो. गाडगेबाबा हे प्रसंगी चार शब्द समाजाला सुनावायलाही मागेपुढे पाहात नसत. त्यासाठी स्वत ठाम असावे लागते आणि चार लोकांना सुनावण्याचे धैर्य असावे लागते. त्या दोन्ही गोष्टी गाडगेबाबांकडे होत्या. हे त्यांच्या डोळ्यांतून जाणवायचे हे त्यांना पाहिलेल्या अनेक व्यक्तींनी आजवर सांगितले आहे. पण त्याचा प्रत्यय आताची पिढी कशी घेणार? त्यासाठी दीनानाथ दलाल यांनी चितारलेले गाडगेबाबांचे हे व्यक्तिचित्र पाहायलाच हवे. गाडगेबाबांचे चित्र हे जमिनीवर बसलेले असतानाचे आहे. त्याबाबत अधिक माहिती देताना दलाल यांच्या कन्या व प्रसिद्ध चित्रकार प्रतिमा वैद्य म्हणाल्या की, गाडगेबाबा स्टुडिओमध्ये आले होते. पण त्यांनी खुर्चीवर बसण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, मी जमिनीवरच बसणार आणि मग जमिनीवर बसलेल्या गाडगेबाबांचे व्यक्तिचित्र दलाल यांनी साकारले.

साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या व्यक्तिचित्रातही रंगांचा कमीत कमी वापर करत  दलाल यांनी केळकर नेमके उभे केले आहेत. रेखांकन हा तर त्यांचा हातखंडा असलेला विषय. त्यांचे ‘अमिता’ हे चित्र त्यांच्या अभिजाततेची पूर्णपणे साक्ष देते, असे समीक्षकांना वाटते. त्यांच्या या चित्राचीही अनेक विचारवंत चित्रकारांनी स्तुती केली आहे. ड्राय ब्रशमध्ये जाडसर रेषेचा वापर करून साकारलेले पु. भा. भावे तर मनावर कोरल्याप्रमाणे लक्षात राहतात. ही दलालांच्या रेषेची कमाल आहे. रेषा हा दलालांच्या चित्रांचा प्राण होता.

रेखाटने किंवा रेखांकने हा तर दलाल यांचा हातखंडा आणि आवडीचा विषय. कुठेही बसले तरी हाती पेन, पेन्सिल असेल तर त्यांचा हात कधीच स्वस्थ नसायचा. त्या रियाझानेच दलालांना उभे केले. त्यांची रेषेवरची पकड जबरदस्त होती. त्यांच्या रंगचित्रांच्या मुळाशीही ही रेषेची ताकदच होती, असे त्यांची चित्रे पाहतानाही जाणवते. ही रेषा चित्रानुरूप कमी अधिक जाडीची, कधी ठाशीव तर कधी संगीतातील लयकारीप्रमाणे अतिशय लवचीकही होते. या रेषेतच मुळात एक लय आहे. त्यामुळे ही लय त्यांची चित्रे- रेखाटने पाहताना रसिकांनाही जाणवल्याशिवाय राहात नाही. रेखाटनांमध्येही त्यांनी नानाविध प्रयोग केले. जाडसर रेषेतून साकारलेल्या दाढीवाल्याच्या रेखाटनात आणि पु. भा. भावेंच्या व्यक्तिचित्रणातही ती लय दिसते.

अनेक ठिकाणी रेखाटनांमध्ये त्यांनी व्यावहारिकतेचा बराच विचार केलेला दिसतो. बहुतांश रेखाटने ही पुस्तकांसाठी किंवा मग मासिकांसाठी केली होती. त्यामुळे त्यात ठिपक्यांच्या स्क्रीनचा वापरही केलेला दिसतो. हे त्यावेळचे प्रगत तंत्र होते व सर्वानाच जमणारे नव्हते. केवळ तेवढेच नव्हे तर चित्राच्या आकृतिबंधाचा किंवा चित्रचौकटीचाही शास्त्रोक्त (अ‍ॅकेडमिक) पद्धतीने विचार करत, असे लक्षात येते. मग विचारपूर्वक केलेल्या चित्रणामध्ये त्यांनी कल्पकता पणाला लावलेलीही दिसते. पुलावरून पडताना वरती कुणीतरी हात पकडून सावरतानाचे एक रेखांकन आहे. यात पुलाचा अगदी बारीकसा भाग, वरून पकडणारा केवळ हाताचा भाग आणि खाली लटकणारा इसम एरिअल अंगाने म्हणजे वरच्या बाजूने दाखविण्याची कल्पकता दलाल दाखवतात. त्यांच्या प्रत्येक रेखांकनामध्ये असे काही तरी नावीन्य पाहायला मिळतेच मिळते. ते त्यांच्या त्या व्यावहारिक चित्रणातून किंवा त्याच्याशी संबंधित गरजेतूनही आले असावे. पण अशी कल्पकता किंवा नावीन्य त्या काळात काम करणाऱ्या फार कमी चित्रकारांनी दाखविले.

अनेक प्रभाव, तरीही मोकळेपणा

दलालांचे बालपण निसर्गरम्य गोव्यात गेले. त्यामुळे तिथले किनारे, मासेमारी, कोळी, कोळ्यांचे जीवन या संदर्भात त्यांची अनेकानेक चित्रे पाहायला मिळतात. ही दोन विविध शैलींमध्ये आहेत. त्यातील काही चित्रे ही निव्वळ रेखांकने आहेत. काही चित्रे ही रसरशीत रंगांचा वापर केलेली रचनाचित्रे आहेत. (यात दोर खेचणाऱ्या कोळी दाम्पत्याचे चित्र आहे) तर दोन-चार चित्रे ही अभिजाततेच्या जवळ जाणारी आहेत. दलालांच्या या चित्रांमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्यावर समकालीन अभिजात चित्रकारांचा असलेला प्रभावही पाहायला मिळतो. त्यात बंगाली चित्रकारांचा व त्यांच्या शैलींचा प्रभाव खूप मोठा दिसतो. तीन जणींच्या एका चित्रातील त्यांचे डोळे पाहून म्हणूनच जेमिनी रॉय यांची लगेचच आठवण येते. तर त्यांच्या दोन-तीन चित्रांमध्ये टिपिकल बंगाल स्कूलच्या शैलीचा प्रभाव पाहायला मिळतो. अंतर्गृहातून सखीला बाहेर पाठविणाऱ्या मैत्रिणी
किंवा तिच्या दासींच्या चित्रामध्ये हा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. महिलांशी संबंधित काही चित्रांमध्ये अमृता शेरगिल यांचाही प्रभाव पाहायला मिळतो. पण जिथे चित्रे ही कोणत्याही व्यावहारिक गोष्टीसाठी चितारलेली नाहीत, काम व्यावसायिक नाही, तिथे दलालांचा ब्रश खूप वेगळ्या पद्धतीने काम करताना दिसतो. त्यात त्यांनी कोणतीही व्यावहारिक बंधने न पाळता स्वतला मोकळे सोडले आहे. बॉम्बे आर्ट सोसायटी आणि आर्ट सोसायटी ऑफ इंडिया किंवा फाइन आर्ट सोसायटीच्या स्पर्धासाठी त्यांनी पाठविलेल्या चित्रांमध्ये ती अभिजातता किंवा मोकळेपणा पाहायला मिळतो आणि मग प्रश्न पडतो की, हा कलावंत व्यावसायिक चित्रणामध्ये अडकला नसता तर? तर कदाचित आपल्याला अभिजात चित्रकलेतील एक नवे शिखर या कलावंताने पार केलेले पाहायला मिळाले असते. इथे आपल्याला प्रभाकर कोलते यांचे ‘तर ‘मॉडर्न आर्ट’चा कणाच बदलला असता’ हे विधान पटलेले असते.

अवकाशाचे विभाजन

चित्रचौकटीबाबत, त्यातील अवकाशाच्या विभाजनाबाबत दलाल अतिशय सजग होते. शिवाय चित्राचा कोन हाही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वापरलेला दिसतो. झाडाखाली असलेल्या मेंढय़ांच्या चित्रामध्ये तो पाहायला मिळतो. वरच्या बाजूस केवळ फुलांचे घोस व शेंगा व त्याखाली असलेल्या मेंढय़ा हा कोन दलालांचे खास वेगळेपण सांगून जातो.

शैलींची गुंफण

त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये अनेक शैलींची चांगली गुंफणही करून पाहिली. बांधणी पद्धतीच्या कापडावर करावे तसे चित्रण असलेली त्यांची काही चित्रे आहेत. यातील एकामध्ये हाती वरमाला असलेला तरुण पाहायला मिळतो तर दुसऱ्यामध्ये प्रियकराला बिलगलेली प्रेयसी पाहायला मिळते. या दोन्ही चित्रांतील अवकाश विभाजन केवळ पाहण्यासारखे आहे. शिवाय त्या बांधणी शैलीमध्ये त्यांनी चित्राला प्राप्त करून दिलेला पोत तर केवळ लाजवाबच म्हणायला हवा. पण यातील बिलगलेल्या प्रेयसीचे चित्र हे खास अवकाश विभाजनाच्या दलाल यांच्या ताकदीसाठी आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देण्यासाठी पाहायलाच हवे, असे आहे.

टू कलर्स तंत्रातील हातोटी

व्यावसायिक कामांमध्ये दलाल अतिशय वाक्बगार होते. त्यांनी छपाईतंत्र अतिशय उत्तमपणे आत्मसात केले होते आणि त्याचा वापर करून आपले अंतिम चित्र कसे असेल याची कल्पना करून ते चित्रण करत. म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचे तर ते उत्तम व्हिज्युअलायझर होते. त्यांच्या चित्रणात अंतिम छपाईतील नेमकेपणा असायचा. याचा प्रत्यय त्यांच्या ‘टू कलर्स’ म्हणजे केवळ दोनच रंगांचा वापर केलेल्या चित्रांमध्ये प्रकर्षांने येतो. (दलालांचे निधन झाले त्याच वर्षी ‘फोर- कलर’ तंत्र छपाईला भारतात सुरुवात झाली. तोपर्यंत प्रामुख्याने ‘टू- कलर्स’ तंत्राचाच वापर केला जात होता) या छपाईसाठी चित्रामध्ये पाश्र्वभूमीसाठी मातकट रंग किंवा निळा, पोपटी आदी रंगांचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो. प्रसंगी भडक लाल रंगाचा वापरही करण्यात आला आहे. या तंत्रात कोणते दोन रंग प्रभावी दिसतील, असा विचार करून चित्रकाराने रंग- संयोजन करणे अभिप्रेत असते. मात्र त्यातही दलाल स्वतच्या कल्पकनेने दोन पावले इतरांपेक्षा पुढेच जातात. दोन रंगांच्या विरोधाभासात्मक परिणामाचा विचार करून दलालांनी केलेले ‘टू कलर्स’
तंत्रातील चित्रण केवळ थक्क करायला लावणारे आहे. दोन सखींच्या मातकट रंगाच्या चित्रामध्ये पांढऱ्याशुभ्र रंगाचा केलेला नेमका व प्रभावी वापर पाहायला मिळतो. पाश्र्वभूमीला धबधब्यासारखा दिलेला परिणाम त्यामुळे त्या दोघी आणि मागे असलेली पाश्र्वभूमी यांना एक मिती व खोली प्राप्त होते. फुलांचा शुभ्र पांढरा रंग आणि सखीपैकी एकीच्या ब्लाऊजवर असलेली पांढरी नक्षी एवढाच माफक पण परिणामकारक आणि नेमका वापर ते करतात. इथे त्या पांढऱ्या शुभ्र रंगाकडे नजर खेचली जाते. आणि मातकट रंगापेक्षा पांढऱ्याची नजाकत अधिक लक्षात राहते. ‘टू कलर्स’ तंत्रामध्ये त्यांची अशी अनेक चित्रे खूप गाजली होती. याला लाभलेला दलालस्पर्श केवळ वाखाणण्याजोगा आहे. (पांढऱ्याची नजाकत जाणवणारे त्यांचे दुसरे एक महत्त्वाचे चित्र म्हणजे ‘टोडा स्त्रिया- उटी’ पण हे ‘टू कलर्स’ तंत्रातील नाही तर ते रंगचित्रच आहे. या चित्रातही त्यातील महिलांच्या अंगावरील शुभ्र पांढरे वस्त्रच अधिक प्रभावी ठरते आणि परिणाम करून जाते. पांढरा रंग स्वतच्या खास वेगळ्या शैलीने, नजाकतीने हाताळण्याची दलाल यांची हातोटी इथे प्रतीत होते)

पुस्तकांची मुखपृष्ठे

व्यावसायिक कामांमध्ये दलालांचा हात पकडू शकेल, असे त्या काळी कुणीही नव्हते. त्यांच्या व्यावसायिक कामांनाही लाभलेला अभिजात स्पर्श सर्वानाच भावायचा. म्हणूनच तर विचारवंतांच्या मांदियाळीतील अनेक लेखक मंडळी त्यांच्या जवळची होती. दलालांच्या चित्रांकडे दुर्लक्ष करणे, कुणालाही शक्य नव्हते. त्यामुळेच पुस्तकांच्या मुखपृष्ठांसाठी दलालांची निवड तेवढीच साहजिक होती. पुलंच्या खोगीरभरती, अपूर्वाई, पूर्वरंग आदी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे ही दलालांचीच आहेत. वि. स. खांडेकर, रणजित देसाई, विश्राम बेडेकरांचे गाजलेले ‘रणांगण’, व्यंकटेश माडगुळकरांचे गाजलेले ‘बनगरवाडी’ अशी अनेक मुखपृष्ठे त्यांनी केली. त्यातील रेखाचित्रांसाठीही अनेक लेखक दलालांनाच पसंती द्यायचे. या रेखाटनांमध्येही दलालांनी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसतात. काही ठिकाणी वेगात केलेले रेखाटन, त्याच्यातील वेगाचा जाणवणारा परिणाम असे हे प्रयोग होते.

तरुणाईचे भान

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि व्यावसायिक चित्रकार असल्याने लोकांची आवडनिवड याचे एक वेगळे भान दलालांनी राखले होते. किंबहुना त्यांना लाभलेल्या लोकप्रियतेचे एक मोठे गमक त्यातच होते. तत्कालीन तरुणांच्या भावनांना दलालांनी नेमके व्यक्त केले होते. म्हणून तर ओव्हरकोट घातलेला तरुण प्रेयसीशी संवाद साधताना किंवा प्रियकराची वाट पाहणारी ती अशी अनेक चित्रे त्यावेळेस विशेष गाजली. प्रत्येक कालखंडातील तारुण्याची स्वतची अशी एक बोली असते. या बोलीत देहबोलीबरोबरच त्या त्या कालखंडातील स्टाइल स्टेटमेंटचाही समावेश होतो. तत्कालीन तरुणाईचे ते स्टाईल स्टेटमेंट चित्रात नेमके पकडण्यात दलालांना यश आले होते. तरुणाईजिंकली की, मग त्यानंतरच्या किमान चार पिढय़ांवर सहज राज्य करता येते, असे अनेक क्षेत्रांतला इतिहास सांगतो.

मोहक स्त्री प्रतिमा

मोहक स्त्री प्रतिमा हे दलालांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़. सत्यकथा, दीपावली आदी अंकांसाठी त्यांनी केलेले चित्रण विशेष गाजले. प्रेमी युगुलांची त्यांची चित्रे त्या काळी तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारी होती. प्रत्येक जण त्यातील एकात आपल्याला पाहात असे आणि
पलीकडच्या व्यक्तीप्रति तशीच अपेक्षाही ठेवत असे. त्या काळातील आणखी एक गाजलेले चित्रकार म्हणजे रघुवीर मुळगावकर. त्यांच्या चित्रांतील स्त्री प्रतिमा या काहीशा पुष्ट, अंगािपडाने सुदृढ असायच्या. त्या वेळच्या समाजातील सौंदर्याच्या कल्पना या सुदृढतेकडे झुकणाऱ्या होत्या. त्याचेच प्रतिबिंब हे मुळगावकरांच्या चित्रांमध्ये पाहता येते. तर शरीराची प्रमाणबद्धता हा दलालांच्या चित्रांचा गुणविशेष होता. काही चित्रांमध्ये असलेल्या प्रमाणबद्धतेमुळे किंवा छातीवरच्या दिसणाऱ्या घळीमुळे काहींनी त्यांच्यावर अश्लीलतेचा आरोपही केला. पण ही चित्रे व्यवस्थित पाहिली तर त्यात स्त्री प्रतिमेच्या विविध भाववृत्ती याच अधिक प्रभावी असल्याचे लक्षात येते. त्यात अश्लीलतेचा मागमूसही नाही. यातील स्त्री- पुरुष प्रसंगी मीलनोत्सुक वाटतीलही. त्यात उत्कटताही आहे, पण ते कामोत्सुक नाहीत. त्यांच्या चित्रातील महिला या काव्यात्म पद्धतीने येतात.

अष्टनायिका

दलालांच्या चित्रांतील युवतीच्या चेहऱ्यावरही गोडवा आणि मार्दव दिसते. ही चित्रे मुळातच दलालांच्या स्वत:च्या अशा खास अ‍ॅकेडमिक शैलीतील आहेत. दलालांनी अश्लीलतेची सीमारेषा कधीच पार केलेली नाही. किंबहुना म्हणूनच ‘अष्टनायिका’ हा विषय दलालांकडे येणे तेवढेच साहजिक होते. खण्डिता, कलहान्तरिता, अभिसारिका, विप्रलब्धा, स्वाधिनपतिका अशी चित्रमालिका १९५४ च्या ‘दीपावली’ दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाली. ही मालिका विशेष गाजली आणि ‘शृंगारनायिका’ या नावे पुस्तकरूपातही प्रसिद्ध झाली. या चित्रांचे वैशिष्टय़ म्हणजे यातील प्रत्येक स्त्रीरूप एक विशिष्ट अशी भाववृत्ती समोर घेऊन येते. त्यांच्या भाववृत्तीनुसार त्यांचे नामकरणही करण्यात आले आहे. ही सर्व स्त्री पात्रे संस्कृत अभिजात साहित्यातील आहेत.

व्यंगचित्रे

दलालांची व्यंगचित्रे हा आणखी एक वेगळा विषय. चित्रकलेच्या क्षेत्रात सर्वच विषयांना स्पर्श करत दलालांची प्रतिभा पुढे गेली. त्यातील महत्त्वाचा विषय म्हणजे व्यंगचित्र! प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्यावर दलालांचा प्रभाव असल्याचे मान्य केले होते. खरे तर चित्रकला आणि व्यंगचित्र यात बरेच अंतर आहे. पण दलाल या दोन्ही क्षेत्रांत लीलया वावरत होते, असे त्यांची व्यंगचित्रे पाहिल्यानंतर लक्षात येते.

‘सत्ताभिलाषेचे फळ एकीचे बळ’ हे बेळगाव प्रश्नावरील त्यांचे व्यंगचित्र खूप गाजले होते. काँग्रेसच्या जाळ्यात अडकवलेल्या महाराष्ट्राची सर्व पक्षांनी (राज्यातील सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांनी) एकत्र येऊन जाळ्यातून यशस्वी सुटका केली, असे ते व्यंगचित्र होते. काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्राच्या झालेल्या वस्त्रहरणाचे व्यंगचित्र रेखाटताना दलालांची एरवी चित्रांमध्ये लयदार असणारी ती रेघ अधिक टोकदार होते. कदाचित ही टोकदार रेषाच बाळासाहेब ठाकरे यांना अधिक भावली असेल.

शाईतील रेखाटने

पेन व शाईचा वापर करून दलालांनी केलेली रेखाटने कमीत कमी शाई वापरात नेमके वातावरण उभे करणारी आहेत. शाई पुसताना उतरणारा परिणाम त्यांनी अप्रतिम पद्धतीने वापरला आहे. पुसलेली शाई चित्रविषयाला कधी खोली देते तर कधी आकारातून वातावरणनिर्मिती करते. काश्मीर-मधील वातावरण त्या पुसलेल्या शाईतून कल्पकतेने जिवंत करणे ही दलाल यांची खासियत होती. काश्मीरची पेन-शाईची रेखाटने विशेष गाजली, त्यातील निवडक रेखाटने इथे दिलीही आहेत.

प्रसिद्ध साहित्यिक अनंत काणेकरांसोबत उत्तर आणि दक्षिण भारताची सफर करून काणेकरांनी केलेले वर्णन आणि दलालांच्या रेखांकनाची मिळालेली जोड असा ‘आमची माती, आमचे आकाश’ आणि ‘निळे डोंगर, तांबडी माती’ असा दोन पुस्तकांचा नजराणाच या दोघांनी मराठी रसिकांना पेश केला होता. मराठी साहित्यातील हा अनोखा असा प्रयोग होता. ज्या ज्या क्षेत्राला दलालांचा परीसस्पर्श झाला, त्या त्या क्षेत्राचे त्यांनी सोने केले!

दलालांनी चित्रपरंपरेतील प्रत्येक कलाप्रकारात, प्रत्येक माध्यमात नानाविध प्रयोग केले एवढेच नव्हे तर ते सर्व यशस्वी ठरले, वाचकांवर- रसिकांवर परिणाम करून गेले. प्रयोग करणारी अनेक मंडळी समाजात असतात. पण सर्वानाच सर्वत्र यश नाही मिळत. हे यश केवळ नशिबाने मिळालेले नाही तर त्यामागे अभ्यासपूर्ण निरीक्षणशक्ती, माध्यमांना जोखण्यासाठी सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची अविरत शक्ती, रंग- रेषादी माध्यमांवर प्रयत्नपूर्वक मिळवलेली हुकुमत असे सारे काही होते.  म्हणूनच दलालांच्या या सुपरडुपर यशस्वी कारकीर्दीच्या पाश्र्वभूमीवर  अभिजात सौंदर्याशी जोडली गेलेली त्यांची नाळ पाहिली की तो अतिमहत्त्वाचा प्रश्न पडतो.. दलालांनी पूर्णवेळ ललित कलेलाच वाहून घेतले असते तर? तर कलेतिहास वेगळा लिहावा लागला असता!

(दीनानाथ दलाल यांची ही सर्व गाजलेली चित्रे त्यांच्या शताब्दीनिमित्त वरळी येथील नेहरू सेंटरच्या कलादालनातर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये १७ डिसेंबर २०१५ ते ३ जानेवारी २०१६ या दरम्यान पाहता येतील)

संदर्भ : १) दीनानाथ दलाल, ज्योत्स्ना प्रकाशन, २) डी.डी. दलाल अ ब्रश विथ ब्युटी

ऋणनिर्देश : दीनानाथ दलाल स्मृती समिती.

विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
Twitter – @vinayakparab

Story img Loader