‘लोकप्रभा’ने यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी जाहीर केलेल्या कथा स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे परीक्षक ख्यातनाम लेखक राजन खान यांनी स्पर्धेसाठी आलेल्या कथांचे केलेले हे विश्लेषण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही काळात जाणवणारी मुख्य गोष्ट म्हणजे, कथेतील गोष्ट हरवत चालली आहे. किस्से सांगणं म्हणजे कथा, असं काहीतरी होत चाललंय.

‘लोकप्रभा’च्या या कथास्पर्धेतल्या भरपूर कथा मी वाचल्या, लिहिणाऱ्यांचा दांडगा उत्साह जाणवला.  त्यातल्या चांगल्या गोष्टी काय आहेत, हे मी सांगणार नाही, कारण त्या सगळ्यांना ज्ञात आहेत, पण वाईट गोष्टी मुद्दाम सांगतो, त्या लिहिणाऱ्यांना उपयोगी पडतील असं वाटतं.

एक आनंदाची गोष्ट म्हणजे, समकालीन विषयांच्या कथा खूप आल्या या स्पर्धेत. त्यातल्या काही कथा चांगल्याही होत्या, पण बऱ्याच कथा या कृत्रिम होत्या. गोष्ट सांगण्याचा रसाळपणा, माधुर्य, घटनाप्रधानता, संवादांची गंमत यांचा अभाव आढळला. मुख्यत: अभ्यास कमी आढळला. एखादा विषय घेतल्यावर त्याचा पूरक अभ्यास करून कथा लिहिली पाहिजे. लिहिताना भाषा विश्वासार्ह आणि आत्मविश्वासपूर्ण असली पाहिजे. वाचणाऱ्याला वाटलं पाहिजे, लेखक ही कथा स्वत: जगलेला आहे. तेवढय़ा आत्मीयतेनं – तो विषय परका असला तरी- कथा लिहिता आली पाहिजे.

काही तांत्रिक गोष्टी सांगायच्यात. उदाहरणार्थ, कथांची शीर्षकं. कथांची बरीच शीर्षकं ही जुन्या गुळगुळीत म्हणी किंवा गाण्यांच्या ओळी वापरून तयार केलेली आढळली. कथा ही जर स्वत:ची निर्मिती असेल, तर कथांची शीर्षकं कुठून तरी उसनी घेण्यापेक्षा स्वत:च निर्माण केलेली न् वाचकांचं लक्ष वेधून घेणारी असावीत असं मला वाटतं.

पुनर्लेखनाचा अभाव जाणवला. कथा लिहून झाल्यावर तिचा पहिला संपादक लेखकच असायला हवा. त्यासाठी लेखकानं कथेचं पुनर्लेखन करणं आवश्यक. पुनर्लेखन म्हणजे कागदावर काकपदं टाकून, खाडाखोड करून किंवा संगणकावर दुरुस्ती करणं नव्हे. तर सगळी कथा पुन्हा लिहून काढणं. यानं कथा आणखी बांधेसूद आणि कसदार होते. स्पर्धेतल्या खूप कथा अशा वाटल्या की, त्यांचं पुनर्लेखन झालं असतं तर त्या दमदार झाल्या असत्या.

शुद्धलेखनाची फार बोंब जाणवली. इंग्रजी शब्द अडला तर आपण फार तत्परतेनं इंग्रजी शब्दकोश घेऊन बसतो, पण मराठी शब्दांच्या बाबतीत बेपर्वा होतो. मराठी शब्दकोश, व्याकरणाचं एखादं बारकंसं पुस्तक घेऊन बसावं असं आपल्याला वाटत नाही. वेलांटय़ा, उकार, मात्रा, अनुस्वार, अवतरणचिन्हं, विरामचिन्हं यांचा घोळ चिक्कार. त्यामुळं कथा वाचतांना रसभंग होत राहिला. एक मोठा घोळ आजकाल सर्वत्र सापडतो, तो असा की, लेखक एकाच लिखाणात अनुस्वार आणि मात्रा यांची खिचडी करून टाकतात. कथा अनुस्वारांच्या तर अनुस्वारांच्याच भाषेत लिहावी किंवा मात्रांच्या तर मात्रांच्याच भाषेत. उदाहरणार्थ, ‘केलं गेलं’ किंवा ‘केले गेले,’ पण लिहिणारे ‘केले गेलं’ किंवा ‘केलं गेले’ असं काहीतरी लिहीत कथेचं वाटोळं करतात.

कथेत व्यवस्थित परिच्छेद द्यावेत, पाडावेत, त्यासाठी डाव्या बाजूला थोडी मोकळी जागा सोडावी, सगळे संवाद स्वतंत्र परिच्छेदात घ्यावेत आणि प्रत्येक संवादाला दुहेरी अवतरण द्यावं, याचंही भान खूपशा कथांमध्ये दिसलं नाही. मराठी कथा लिहिताना रोमन लिपी वापरू नये, तर त्यासाठी मराठी अक्षरं उपलब्ध असतात याचंही भान ठेवायला हवं असं वाटलं.

पण या कथांनी वाचनाचा आनंद दिलाच. समकालात काय लिहिलं जातंय, कसं लिहिलं जातंय, हे जाणून घेण्याचं मोठं समाधान दिलं.

माणसांना लिहीत राहावंसं वाटणं हीच गोष्ट मला मोठी मौलिक वाटते. (त्यातल्या चुकांची दुरुस्ती वगैरे चिकित्सेच्या बाबी नंतर पाहता येतात. पण-) खूप सारी माणसं लिहीत राहतात हे भन्नाटच असतं आणि त्यांच्या लिहिण्याला स्पर्धा आधार देतात हेपण चांगलंच आहे.

‘लोकप्रभा’चं त्यासाठी मनापासून कौतुक आणि पुरस्कार विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन.


राजन खान –