सिनेमाच्या क्षेत्रात मेकअप महत्त्वाचा असला तरी तो करणाऱ्यांना फारसं महत्त्व नव्हतं. पण आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामातून मेकअप डिझायनपर्यंतचा प्रवास करणाऱ्या विक्रम गायकवाड यांनी या क्षेत्राची सगळी गणितंच बदलून टाकली आहेत.. मेकअपच्या माध्यमातून होणारा परकायाप्रवेश, या क्षेत्रातला त्यांचा प्रवास, या क्षेत्राचे विविध पैलू याविषयी ‘टीम लोकप्रभा’ने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रंगभूषेला सुरुवातीला फारसं वलय नव्हतं. पण, आता मात्र चित्र बदलतंय. या क्षेत्राकडे आता एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणून बघितलं जातंय. या दरम्यानचा काळ कसा होता?
– पूर्वी म्हणजे, प्रभातच्या काळात रंगभूषाकार नसायचाच. कला दिग्दर्शकच रंगभूषा करायचे. परदेशी सिनेमांचा आपल्यावर प्रचंड प्रभाव होता. ब्लॅक अँड व्हाइट कॅमेऱ्यासाठी मोठेमोठे लाइट्स लागायचे. क्लोजअप शूटसाठी पाच हजार व्ॉटचे मोठे टंगस्टन लाइट लावायचे, त्या प्रखर प्रकाशामुळे कलाकारांची त्वचा भाजून निघायची. त्यामुळे अशोक कुमार, जयराज, ललिता पवार यांच्या चेहऱ्यावर काळसर डाग आढळायचे. त्वचा अशी भाजू नये यासाठी लेप लावायचा हे त्यामागचं एक तांत्रिक कारण.
नाभिक समाजाची माणसं सिनेमासाठी दाढी, केशरचना करायची. तेच पुढे रंगभूषाकाराची कामं करू लागले. त्यापैकीच निवृत्ती दळवी हे खूप सुप्रसिद्ध रंगभूषाकार झाले. या समाजातील लोकांना त्यांच्या परंपरागत व्यवसायामुळे चेहरा हाताळायची सवय होती, त्याचा त्यांना या रंगभूषेसाठी फायदा झाला. त्या वेळी जे पेंटर होते तेदेखील या व्यवसायाकडे आले. त्यामध्ये बाबूराव पेंटरांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी खरं तर हे सारं उभं केलं. ते रंगभूषेबद्दल लोकांना शिकवायचे. सामग्री बदलत गेली. बालगंधर्वाकडे तर परदेशातून मेकअपची सामग्री यायची. बालगंधर्व स्वत:च स्वत:चा मेकअप खूप जपून करायचे.
पुढे तंत्रज्ञान बदलत गेलं. सिनेमातील लोकांनी त्या बदलत्या तंत्राच्या काळात कॅमेरामन्सना परदेशात आधुनिक तंत्र शिकायला पाठवलं. त्याचबरोबर मेकअप आर्टिस्टलाही पाठवायला हवं हे मात्र सारेच सोयीस्कररीत्या विसरले. कॅमेरा आणि मेकअप हे हातात हात घालून चालणारे घटक आहेत हे कोणी लक्षात घेतलं नाही. त्यामुळेच रंगीत सिनेमा आल्यानंतर झालं असं की कॅमेऱ्याचं तंत्र रंगीत सिनेमांचं आणि मेकअप ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाचा.. त्यावरून वाद व्हायचे. पुन्हा शूट करावं लागायचं. त्या वेळी कॅमेरामन बघायचा आणि ओके करायचा. आज मात्र कॅमेरामनच माझ्यासारख्या मेकअप डिझायनरला सांगतो, तू शॉट बघ. मगच मी टेक घेतो.
रंगीत कॅमेरा, शार्प लेन्सेस, झूम, डिजिटल तंत्र हे जसंजसं येत गेलं तसतसं मेकअपला अधिकाधिक आव्हान मिळत गेलं. जिथे जास्त आव्हान तिथे कसब जास्त. जिथे कसब जास्त तिथे सन्मान मिळणार. तसेच पैसेही मिळणार.
सुरुवातीस सारं सरधोपट होतं. नंतरच्या काळात अनेकांनी खूप चांगलं काम केलं. पंढरीदादा, लक्ष्मण दादा, गोडबोलेदादा अशांनी खूप मोठं काम केलं. पंढरीदादा त्या सर्वामध्ये खूप थोर होते. इंडस्ट्रीमधील आजचे अनेक टॉपचे मेकअप आर्टिस्ट त्यांनीच घडवले आहेत. त्या काळी काही मोजकेच कलाकार होते जे मेकअप दादांना खऱ्या अर्थाने सन्मान देत असतं. बाकी कलाकार मात्र आपापली कामं करून घ्यायचे, बाहेर वर्तणूक मात्र वेगळी मिळायची.
गेल्या तीस वर्षांत काही गोष्टी मात्र खटकल्या. मेकअपचं कौशल्य कमी असायचं असे मेकअपमन नायकाच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये रस घेऊन एकप्रकारे हांजी हांजी करत. मग नायकांनादेखील अशा लोकांची सवय लागली. मेकअपमन स्वत:च्या कमी कौशल्याची जागा अशा ठिकाणी भरून काढू लागले. इथेच मेकअपमनच्या सन्मानावर घाला घातला गेला.
आजचा जमाना हा डिजिटलचा आहे. प्रॉडक्ट आणि मेकअप करण्याची पद्धत या दोहोंची सांगड घालण्याची गरज वाढली. आपल्या मोठमोठय़ा नायिका परदेशात जातात. त्यांना नव्या सौंदर्यप्रसाधनांची बरीच माहिती असते. युरोपिअनांनी त्यांच्या त्वचेला पूरक सौंदर्यप्रसाधनं बनवली. मग आपल्या सावळ्या हिरॉइन्स या गोऱ्या रंगासाठीची सौंदर्यप्रसाधनं मागू लागल्या. त्यामुळे मेकअप चॉकी (पांढरट) दिसायला लागला. पण मेकअपमनला नायिका म्हणते तसंच करावं लागतं. आजही हे काही प्रमाणात सुरूच आहे.
हॉलीवूडमध्ये असं नसतं. तेथे स्टुडिओ सिस्टिम असते. त्यात कलाकारापासून स्पॉटबॉयपर्यंत सगळे नोकरी करतात. करार असतात. प्रत्येकाचे अधिकार, नियम आणि मर्यादा ठरलेल्या असतात. एकमेकांमध्ये ढवळाढवळ करायची नाही. कलाकारांनीही नाही. सूचना स्वागतार्ह असतात, पण प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक विभागाची जबाबदारी आणि अधिकार ठरलेले असतात. मेकअप डिझायनर, मेकअप सुपरवायझर्स, त्याखाली विभागप्रमुख आणि इतर अशी उतरंड असते.
आपल्याकडे ही व्यवस्था सुरुवातीस होती. पण नंतर बॉलीवूडमध्ये स्टारडम इतकं वाढलं, की कलाकारांच्या हातात सगळी सत्ता गेली. राजेश खन्नाला स्टारडम आलं तेव्हा सर्वात मोठा फरक पडला. त्या काळात मेकअपमन, कॅमेरामन कलाकारांशी बोलायलादेखील घाबरायचे. एक स्टार हिट झाला की त्याच्या मनाप्रमाणेच सारं व्हायचं. त्यामागं निर्मात्यांचं आर्थिक गणित असायचं. सारेच त्याचे लाड पुरवायचे. हा झाला इतिहास. या सगळ्या बरबटलेल्या परिस्थितीत मी येथे आलो.
सुरुवातीचा तुमचा अनुभव कसा होता?
– बॉलीवूड मला भयानक वाटलं. मी परत गेलो. हे मला झेपणारं नाही असंच मला वाटलं. कारण पुण्यात असताना मी अत्यंत वेगळ्या पद्धतीने काम केलं होतं. जाणता राजासारखं ४००-५०० कलाकारांच नाटक करायचो. ते वातावरण वेगळं होतं. त्यातून आल्यामुळे ह्य़ा वातावरणात काही आपण बसत नाही हे लक्षात आलं आणि पुण्याला परत गेलो. १९८३ची गोष्ट असेल ही.
पुण्यात मी बबनराव शिंदेंकडे काम करायचो. त्यांना मी बाबा म्हणायचो. त्यांचं कपडेपटाचं दुकान होतं. ते बरेच उद्योग करायचे. मेकअपदेखील करायचे. बाबांच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमधील अंजीबाबू या मेकअप विभागप्रमुख असणाऱ्या मित्रांबरोबर काम करायला मिळालं. तिथे नेहरू सिनेमा केला, पठ्ठे बापूरांवाच्या जीवनावर राम कदमांनी दिग्दर्शित केलेला एक मराठी सिनेमादेखील केला.
परत बॉलीवूडकडे कसे वळलात?
– तो एक टर्निग पॉइंट होता माझ्या आयुष्यात. शाम बेनेगल वल्लभभाई पटेलांवर सिनेमा करत होते. कलाकार हवे अशी त्यांनी जाहिरात केली होती. संजय वैद्य या माझ्या मित्रालादेखील जायचं होतं. बाबांनी (बबनराव शिंदे) त्याला खान अब्दुल गफार खानचा रोल सुचवला. आम्ही इतिहासाच्या पुस्तकात पाहिलं तर गफार खानांचं नाक मोठं होतं. मग मी इन्स्टिटय़ूटमधल्या अनुभवावर आधारावर संजयला नाक लावलं मेकअप केला.
संजयचे फोटो पाहताच बेनेगलांनी विचारलं मेकअप कोणी केलाय? बेनेगलांनी मला त्वरीत बोलावलं. त्यांनी सांगितलं, ‘सरदार पटेल’ सिनेमासाठी अनेक नामवंतांनी मेकअपच्या ट्रायल झाल्या आहेत, पण परेश रावलला नाक लावायला काही कोणालाही नीट जमलं नाही. त्यांनी मला तडक बारडोलीला लोकेशनवर जाऊन नाक लावायला सांगितले.
लोकेशनवर अनिल पेमगिरीकर हे उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट काम करत होते. परेश मला स्पॉटवर घेऊन गेला. शरद कापूसकर या माझ्या एका थोर मूíतकार मित्रानं दिलेली पेरूच्या लाकडानं बनवलेली कुरणी माझ्याकडे होती. मी माझं व्ॉक्स काढलं. मी पुरता घाबरलो होतो. परेश मला म्हणाला, या संधीचं तू सोनं केलंस तर तू जिंकलास. नाहीतर घरी जाशील परत. मी माझे सगळे प्रयोग करत नाक लावलं. ते बघून परेश रावलने मला मिठीच मारली.
पुढे सिमल्याच्या शेडय़ुल्डला बिल जॅक्सन मार्टिन आला. त्याने खूप सुंदर नाकं बनवली होती. पण तो परदेशी टच द्यायचा. ते कॅमेरामन जहांगीर चौधरीला मान्य नव्हतं. मग मी भारतीय टच असलेलं नाक लावलं. बिलनं ते पाहिलं तेव्हा त्यानं दिग्दर्शकाला सांगितलं आता माझी गरज नाही. हा करेल.
म्हणजे एका नाकानं तुमचं नाक उंचावलं!!! पण मुळात तुम्ही या व्यवसायाकडे नेमकं वळलात कसे काय?
– माझे वडील गेले होते. अभ्यासात मी यथातथाच होतो. शाळेत फारसं लक्ष नसायचंच. दहावीला असताना आईकडे तक्रार आली. आई मला शोधत आली तर मी भरत नाटय़ मंदिरला सापडलो. तेथे भास्करराव टक्के मेकअप करत होते. टिपिकल अल्युमिनिअमची पेटी, रंगाचे डाग असलेलं धोतर असा हा माणूस. मी त्यांच्या कामावर फिदा होतो. आईला म्हटलं मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं. तिला ते पचणं अवघडच होतं.
बबनराव शिंदे हे माझे गुरू. मी त्यांना बाबा म्हणतो. बाबांबद्दल सगळ्यांनाच प्रचंड आदर होता. ते स्वभावाने अतिशय कडक. ओरडायचे नाहीत, पण त्यांचा दरारा होता. निव्र्यसनी खादीधारी माणूस. त्यांनी आईला समजावलं, ‘ही कला त्याला शिकू द्या. जगात कोणत्याही शहरात गेला तरी दोन माणसांचं पोट नक्की भरेल ’ तेव्हा आई तयार झाली. मात्र त्यावेळचं तिचं एक वाक्य मला आठवतंय, ‘तू झाडू मार, साफसफाई कर. पण, मला लोकांनी येऊन असं सांगितलं पाहिजे की तुमच्या मुलासारखी साफसफाई करणारा बघितला नाही.’
त्या काळातलं रंगभूषाकाराचं ते स्वरूप पाहता तिला काळजी वाटणं साहजिक होतं. पण असं आहे की एखाद्या क्षेत्रात वैभव प्राप्त होण्यासाठी त्या त्या काळात जन्म घ्यावा लागतो. आज भास्करराव टक्के असते तर ते बॉलिवूडचे किंग असते. आपल्याकडे अशी अनेक माणसं होती. त्यांच्याकडून काम शिकणं खूप अवघड असायचं. एक ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट होते ते दाभनकाठी मिशी फर्मास काढायचे. सुट्टय़ा केसांनी ते बारीकशी झकास मिशी काढायचे. नेटवरची मिशी नव्हती त्यावेळी. त्यांच्याकडून ते काम शिकायला मला तब्बल आठ महिने लागले.
दुसरीकडे बाबांकडे शिक्षण सुरूच होतं. ते म्हणायचे, ‘मी काम करतो तेव्हा बघायचं. विचारायचं नाही.’ पहिले चारेक महिने त्यांनी फक्त त्यांचे हातच बघायला लावले. कोणते रंग उचलताहेत, कशात एकत्र करताहेत वगैरे. मेकअप चेहऱ्यावर सुरू असला तरी मी बाबांच्या हाताकडेच बघायचो. तरीही मी असं म्हणेन की आज त्यांच्या कामाच्या फक्त वीस टक्केच काम मी करतो.
पुण्यात असताना मी ‘जाणता राजा’तली सर्व मुख्य पात्रं रंगवायचो. शाळांच्या स्नेहसंमेलनासाठी जायचो. छोटय़ा मुलांच्या शाळांपासून म्हणजे अगदी बालवाडीपासून सर्वाचे मेकअप करायचो. दहा चिमण्या, दहा कावळे, पाच पोपट आणि हे दोन सरडे सजवायची ऑर्डर असायची. मग त्यात काही ना काही क्रिएटीव्हिटी करायचो. एकेका दिवसात मी चारशे-आठशे मुलांचा मेक अप करायचो. अनेक नाटय़ स्पर्धामध्ये असायचो. यातूनच अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. वेशभूषा आणि रंगभूषा ही दोन्ही कामं करत एसटीने अख्खा महाराष्ट्र फिरून झाला. या साऱ्या पाश्र्वभूमीवर मी शाम बेनेगलांच्या सरदार पटेलांना नाक लावलं होतं.
‘सरदार पटेल’नंतर तुम्ही अनेक चित्रपट केले. ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ हा आणखी एक चित्रपट तुमच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा चित्रपट..
– ‘सरदार पटेल’नंतर अनेक काम मिळत होती. अनिल पेमगिरीकरांनीदेखील इंडस्ट्रीत स्थिरस्थावर होण्यासाठी बरीच मदत केली. श्याम बेनेगल म्हणाले, ‘द मेकिंग ऑफ द महात्मा’ या सिनेमासाठी दक्षिण आफ्रिकेत मी तुला घेऊन जाणार आहे. भारतातून मेकअप करणारा तू एकटाच असशील. इतर मेकअप आर्टिस्ट तिथलेच आहेत.’
पहिलाच परदेश दौरा होता तो माझा. त्याच सिनेमासाठी अॅनी टेलर नावाची एक सीनिअर मेकअप आर्टिस्टही काम करणार होती. बॉब टेलर नावाच्या ब्रिटिश कलाकारची ती बायको. त्या सिनेमासाठी कोणाचा मेकअप कोणी करायचा आणि एचओडी कोण, यावरून काही मतभेद झाले. श्याम बेनेगल यांनी तोडगा काढला. दोघांनाही समान श्रेय देण्याचं त्यांनी कबूल केलं. खरंतर श्रेय घेणं वगैरे मला काहीच माहीत नव्हतं. काम मिळतंय, बहुमान मिळतोय हेच माझ्यासाठी खूप होतं.
त्या सेटवर वेशभूषेबाबत थोडा गोंधळ होता. धोतरं नेसवायची होती, फेटे बांधायचे होते. ‘जाणता राजा’ साठी मी रोज दोनशे लोकांना फेटे, धोतरं बांधायचो आणि मेकअपदेखील करायचो. हात भरून यायचे. ‘जाणता राजा’त कोणतेही काम करायची सवय लागली होती. त्याचा ‘मेकिंग ऑफ महात्मा’साठी खूप उपयोग झाला. शिवचरित्र कानावर सतत पडून त्यातून माणूस म्हणून मी घडलो होतो. माझ्या कामामध्ये मी चांगला माणूस असणं हे पहिलं मेरिट आहे असे मला वाटतं. बाबासाहेब पुरंदरे, श्याम बेनेगलांनी मला जे घडवलं त्यावर मी आज उभा आहे.
सिनेमा स्वीकारताना मेकअप आर्टिस्टने स्क्रिप्ट वाचणं तुमच्या लेखी किती महत्त्वाचं आहे?
– श्याम बेनेगलांनी सांगितलं होतं की, इंडस्ट्रीत तुला मान मिळवायचा असेल तर एक सगळ्यात आधी तू स्क्रिप्टची मागणी कर. स्क्रिप्टवर काम कर. तेवीस वर्षांच्या मुलीची भूमिका आहे, पण चित्रीकरणामध्ये तो शॉट आहे पंचाहत्तर ते नव्वदाव्या या क्रमांकाच्या सीन्समध्ये. मात्र सिनेमा सुरू होतो तो त्या मुलीच्या पासष्ट वयापासून. त्याची लोकेशन्स, त्याची उपलब्धता काय हे सगळं पाहून मेकअपचा ब्रेक डाऊन करणं आवश्यक असतं. ‘बदलापूर’मध्ये वरुण धवनसाठी दाढी हवी होती. शूटच्या दोन-अडीच महिने आधी आमची चर्चा झाली. मी दिग्दर्शकाला म्हटलं, सिनेमात नंतरचा भाग जो आहे तो आधी शूट करूया. कारण दोन महिन्यांत वरुण दाढी वाढवू शकेल. त्यांनी संपूर्ण शेडय़ुल फिरवलं. मला स्क्रिप्टच माहीत नसतं तर शूटिंगच्या पहिल्याच दिवशी खोटी दाढी लावावी लागली असती. मला ते नको होतं. कारण आताच्या डिजिटल जमान्यात ते दिसून येतं.
स्क्रिप्टसह टीमसोबत तुम्ही तुमच्या टीमचा वर्कशॉपही घेता असं ऐकलंय.
– मी स्क्रिप्ट वाचतो, कथा समजावून घेतो, त्याच्या नोट्स काढतो. माझ्या टीमला स्क्रिप्ट वाचून दाखवतो. त्यांना पुण्याला नेतो. पुण्याला नेण्यामागचं कारण असं की तिथे कोणालाही कुठेही जाण्याची घाई गडबड नसते. त्यामुळे प्रोजेक्टविषयी सगळ्यांना सविस्तर शांतपणे सांगता येतं. त्याविषयी चर्चाही होते. त्यानंतर कोणी कोणाचा मेकअप करायचा, काय करायचं हे समजावून सांगतो. त्यातले अवघड भाग मी स्वत: तिथे करून दाखवतो.
पीरियड सिनेमे तुम्ही खूप केलेत. याचं कारण काय?
– मला पीरियड सिनेमे करायला आवडतं. मी ते एन्जॉय करतो. त्या काळात जाऊन त्या वेळच्या गोष्टींचा अभ्यास करणं मला आवडतं. तसंच आज तो काळ रेखाटणं हेही मला आव्हानात्मक वाटतं. त्यामध्ये रिक्रिएशन असतं, जे करताना मला मजा येते.
अलीकडे रिअॅलिस्टिक सिनेमे फार येताहेत. अशा सिनेमांमध्ये मेकअपचा मोठा वाटा असतो. अशा वेळी काय करता?
– असे चित्रपट करणारे दिग्दर्शक मला मेकअप न करण्यासाठीच घेतात. कारण कलाकारांवर कंट्रोल ठेवावा लागतो. तो मीच ठेवू शकतो असं दिग्दर्शकांचं म्हणणं असतं. शाळा-कॉलेजमध्ये जाणारी साधी मुलगी कशी दिसते हे त्यांना माहीत नसते असे नाही, पण तिला मेकअपचा मारा केला नाही तर मेकअपमनला वाटतं, त्याची कला कशी कामी येणार? मग सौंदर्यप्रसाधनं आणि रंग थोपले जातात. बॉलीवूडमध्ये मेकअप आणि केशभूषेचं शिक्षण ज्या पद्धतीने झालं आहे ते याला कारणीभूत आहे. कलाकाराला आरशात अडकवलं जातं, सत्यात येऊच देत नाहीत. दुहेरी जगणं सुरू होतं. म्हणूनच आता मी एक संकल्पना आणली आहे, ‘नो मेकअप, मेकअप लुक’. हा करेक्टिव्ह मेकअप आहे. एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर इतका एक्झ्ॉक्ट टोन द्यायचा की तिला मेकअप केला आहे हे कळलंच नाही पाहिजे. पण ते करतानाच तिच्या चेहऱ्यावरचे दोष म्हणजे डार्क सर्कल, पॅची स्किन, वॉर्म नसणं, ब्लश नसणं असे दोष तेवढे काढून टाकायचे. मेकअप आर्टिस्ट एखाद्या चांगल्या डॉक्टरसारखा असायला हवा. साधा ताप असेल तर तो एकदोन गोळ्या देऊन पेशंटला बरा करतो. पण अनेक डॉक्टरांना खंडीभर औषधं दिल्याशिवाय जमत नाही. तसं आपल्याकडे मेकअपचं झालं आहे.
करिना कपूरसारखी एखादी मुलगी जन्मजात सौंदर्य घेऊन येते. तिला काय मेकअप करायचा? तिला भरपूर मेकअप केला तर ती थोराड दिसते. पण आपल्याकडे भरपूर मेकअप करणं हीच मेकअपची संकल्पना आहे. म्हणून योग्य दृष्टिकोन हवा. कलाकार स्वत:च्या प्रतिमेत अडकलेले असतात. त्यांना त्यातून बाहेर काढा. आता अनेक कलाकारांना माझं मत पटू लागलंय.
बालगंधर्वाचं उदाहरण येथे आवर्जून सांगावंसं वाटतं. ते स्वत:च स्वत:चा मेकअप खूप जपून करत. पण मुळातच स्त्री भूमिकेसाठी त्यांनी स्वत:ला आतून बदललं होतं. त्यांचं मन, शरीर त्या भूमिकेसाठी तयार होतं. तेव्हा त्या सिनेमात सुबोध भावेला अगदी हलकासा मेकअप केला आहे. अनेकांना त्याबद्दल प्रश्न पडला होता. पण सुबोधला फार मेकअप केला असता तर कदाचित ते पात्र ना पुरुष वाटलं असतं, ना स्त्री.
एकदा असाच एक प्रसंग ‘अक्स’ सिनेमाच्या वेळी अमिताभ यांच्याबाबत झाला. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द पाहता त्यांना वेगळा लूक कसा द्यायचा, हा प्रश्न होता. तेव्हा कानाजवळ हेअरकट आणि दाढी (आता दिसते तशी) हा लूक मी सुचविला, तो सर्वाना आवडला.
मग मेकअप आर्टिस्टचं नेमकं क्रेडिट काय?
– त्यासाठी माझ्या आयुष्यातील दुसरा टर्निग पॉइंट सांगावा लागेल. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा सिनेमा करायचा होता तेव्हा मामुटीला भेटायला गेलो. जब्बारांनी भरपूर कौतुक केलं होतं. मामुटीवर ट्रायल घ्यायची होती. त्याला मिशी काढायला सांगितली तर ते त्याच्या दृष्टीने दिव्यच होतं. बऱ्याच चर्चेनंतर तो तयार झाला, मेकअप केला आणि त्याला आरसा दाखवला. क्षणभर तो दचकलाच. मेकअप आर्टिटस्टच्या जीवनातलं क्रेडिट काय, तर असा मेकअप करा की संबंधित व्यक्तीने आरशात पाहिल्यावर हा कोण, असा प्रश्न तिलाच पडला पाहिजे, ती व्यक्ती स्वत:ला बघून दचकायला हवी. इतकी वर्षे तिने स्वत:चा म्हणून जो चेहरा पाहिला तो, हा नाही हे तिला जाणवलं पाहिजे. त्या भूमिकेतला परकायाप्रवेश हा असा त्या भूमिकेमधून झाला पाहिजे. हे मेकअप आर्टिस्टचं खरं क्रेडिट आहे.
बाबासाहेबांची ‘जाणता राजा’ची जी व्यवस्था होती त्यातून मी घडलो होतो. शिवचरित्र सतत कानावर पडायचं. त्यातून माणूस म्हणून घडलो होतो. माझ्या कामामध्ये माझं चांगला माणूस असणं हे पहिलं मेरिट आहे असे मला वाटतं. काही लोक आयुष्यात तुमचं कॅरक्टर बनवतात. बाबासाहेब, श्याम बेनेगलांच्या या कॅरक्टर मेकिंगवर मी आज उभा आहे.
सुबोध भावेसाठी तुम्ही ‘बालगंधर्व’ आणि ‘लोकमान्य’ अशा दोन्ही व्यक्तिरेखांचा मेकअप करण्यात यशस्वी झालात.
– बालगंधर्वसाठी सुबोध एकदम परफेक्टच होता. ‘लोकमान्य’बाबत तो स्वत:च साशंक होता. पण ओम राऊत त्याच्याबाबत ठाम होता. सुबोधचा पहिला सीन होता. तेव्हा मी म्हटलं त्याच्याशी कोणीच बोलू नका. त्याचा पहिला सीन झाल्यावर सगळ्यांनी त्याच्याशी बोला. त्यापूर्वी मी त्याला टिळकांच्या फोटोकडे पाहत राहायला सांगितले. त्याने सीन उत्तम दिला. त्यानंतर तो स्वत:ही भारावून गेला होता.
मेकअप डिझायनर ही संकल्पना नेमकी काय आहे?
– मी जेव्हा श्याम बेनेगलांबरोबर अनेक कामं केली तेव्हा माझ्या नावाची चर्चा होत गेली. परेश रावलने बरीच प्रसिद्धी केली. तेव्हा अनेकजण मेकअपसाठी बोलवू लागले. सगळीकडेच जाणं शक्य नव्हतं. तेव्हा लोक सांगायचे लूक सेट करून जा. हे मला आवडलं. एकदा क्रिएटिव्हिटी बाहेर पडली की त्यानुसार इतरांना काम करणं सोपं असतं. अगदीच एखाद्या ठिकाणी अवघड असेल तर चार-पाच दिवस जायचं. मेंटेन करणं, फॉलोअप करणं सोपं असतं. अवघड असेल तेव्हा चार-पाच दिवस जायचो. मेकअपमन हा फक्त मेकअप करतो, पण डिझायनर हा भूमिकेचा अभ्यास करतो, पात्राचं अवलोकन करतो. त्याच्या मेकअपला संहिता जोडलेली असते. म्हणजे एखाद्या वृद्धाचं पात्र उभं करायचं तर त्याचं वय केवळ विचारात न घेता त्याची जीवनशैली, नोकरी-व्यवसाय, त्याचे आजार अशा अनेक घटकांचा अभ्यास त्यात येतो.
म्हणजे एखादी व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी मेकअप आर्टिस्टकडे निरीक्षण क्षमता हवीच.
– हो, नक्कीच हवी. केवळ निरीक्षण क्षमताच नाही. तर अँथ्रोपॉलॉजी, फेशिअल स्ट्रक्चर, अंगलक्षणं या सगळ्यांचं मिश्रण एका मेकअप आर्टिस्टकडे असायला हवं. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचं निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं. समाजातल्या व्यक्तींचं निरीक्षण कसं करायचं, स्वभाववैशिष्टय़ांबाबत काय ठोकताळे बांधायचे या सगळ्याचं विश्लेषण माझ्या प्रबंधात असेल.
पण यासाठी काही विशेष अभ्यास करता?
– अभ्यास तर सतत सुरू ठेवावाच लागतो. भरपूर सिनेमे बघणं, त्यातलं कास्टिंग बघणं हा महत्त्वाचा अभ्यास आहे. कास्टिंग हे कोणत्याही क्षेत्रातलं असलं तरी ते महत्त्वाचंच. संगीतात देखील आहे. शंकर जयकिशनने संगीत दिलेल्या गाण्यात रफीच गायक म्हणून का असायचा? श्रोतेही आता त्या जागी दुसऱ्या गायकाचा विचार करू शकत नाही.
तर कास्टिंग करताना दिग्दर्शक तुम्हाला कितपत विचारात घेतात?
– चरित्रपटांमध्ये तर कास्टिंग महत्त्वाचं आहे. मी केलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक मला कास्टिंगबाबत नेहमी विचारात घेतात. एखाद्या व्यक्तिरेखेसाठी ठरवलेल्या चार कलाकारांपैकी कोणता कलाकार जवळ पोहोचणारा वाटतो, याबाबतही विचारलं जातं. त्यानंतर मी कोणत्या कलाकाराला निश्चित करायचं हे ठरवतो. पण, यात फक्त ‘दिसून’ चालत नाही, तर तो अभिनेता म्हणूनही पात्र असावा लागतो. कारण असे ‘दिसणारे’ लोक आपल्या आजूबाजूला अनेक असतात. रस्त्यावर तर मला गांधी, टिळक, नेहरू भरपूर दिसत असतात. पण मग अभिनयदेखील लागतो. अर्थात कायमच दोन्ही गोष्टी जुळतीलच असं नाही. शाम बेनेगलांच्या ‘संविधान’ या मालिकेसाठी अशीच माणसं शोधायला लागली. पण सारं जुळण्यासाठी कास्टिंगची टीम खूप मोठी लागते. वर्षभर आधी कास्टिंगसाठी माणसांना काम सुरू करावे लागते. शामबाबू करतात हे सगळं.
प्रॉस्थेटिक मेकअपची नेमकी आवश्यकता कुठे असते?
– मुद्दाम ठरवून वेगळं काही करायचं म्हणून प्रॉस्थेटिक मेकअप केला तर ती बळजबरी वाटते. एखाद्या व्यक्तीला वयस्कर दाखवायचं असेल तर पीसेस अॅड करू शकतो. इथे प्रॉस्थेटिक मेकअपचा उपयोग होतो. वरुण धवनचाही आगामी ‘बदलापूर’ या सिनेमासाठी मी प्रॉस्थेटिक मेकअप केलाय. पण, यामध्ये त्याचं वय हे कारण नाही. आयुष्याला कंटाळलेल्या, गांजलेल्या, अल्कोहोलिक व्यक्तीचं गांजणं दाखवायचं होतं. रणबीरला ‘बर्फी’मध्ये वयस्कर केलं होतं पण त्यातदेखील चेहऱ्यावरचा बालिशपणा टिकवायचा होता. मणिरत्नमच्या ‘इरुवर’ सिनेमात एम. जी. रामचंद्रन हे थकलेलं वयस्कर पात्र आहे. पण ते डाय करायचे त्यामुळे त्याचे केस पांढरे नसून काळे आहेत. अशावेळी केवळ डाय केलेले केस असणारा म्हातारा माणूस दाखवायचा तर मग ते केस विरळ करणं गरजेचं होतं. वाढत्या वयात केस कमी होतात. तेच दाखवलं, केसाखालची त्वचा दाखवली.
मेकअप क्षेत्रातल्या मानधन, सन्मानाबाबतही बोललं जातं. त्याबाबत काय सांगाल?
– मी आणि मिकी काँट्रॅक्टरने भारतीय सिनेमांमधल्या मेकअप क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला. या क्षेत्रातलं अर्थशास्त्र आश्चर्य वाटण्याइतपत बदलून टाकलं. एखाद्या गोष्टीचं मूल्य हजार रुपये असताना तिला किंमत मात्र एक रुपया एवढीच दिली जायची. आम्ही तिला योग्य मूल्य मिळवून दिलं. माझा मेकअप आर्टिस्टना एकच सल्ला आहे, की तुम्ही तुमचं मूल्य वाढवा, किंमत आपोआप वाढणारच आहे. हे क्षेत्र नवनवीन संकल्पना अजमावण्याचं क्षेत्र आहे. इथे भ्रष्टाचाराला प्रवेश घेण्याची संधीच देऊ नका. कितीही मोठा कलाकार असला तरी त्याची हांजी-हांजी करू नका. त्यापेक्षा नवनवीन गोष्टी शिका. तुमचं कामच तुम्हाला तारून नेईल. तुमच्या कामाचं नाणं खणखणीत असायला हवं. माणूस म्हटलं की चुका होणारच. त्यामुळे चूक झाली तर ती कबूल करा.
काही सिनेमांसाठी तुम्ही मानधन घेतलेलं नाही..
– हो, हे खरंय. कोणाकडून मानधन घ्यायचं आणि कोणाकडून नाही, हे मलाही समजतं. दोन-तीन बंगाली सिनेमांसाठी, काही मराठी सिनेमांसाठी मी मानधन घेतलेलं नाही. त्यापैकी काही चित्रपटांना पुढे राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. मला सरस्वतीने भरभरून कला, यश, कीर्ती दिली आहे. जे चांगलं आहे ते लोकांना देत जावं.
प्रत्यक्षात तसं होत नाही. आपल्याकडे मोठमोठय़ा कलांमध्ये खंड पडला, कारण त्या कला पुढे जाऊच दिल्या नाहीत. मोठमोठे आर्टिस्ट हिरोइनला आय लॅशेस लावताना आपल्या असिस्टंटला मलमल धुऊन आणायला पाठवायचे, चहा आणायला पाठवायचे. आपली कला सहकारीदेखील शिकेल या भीतीने ते असं करत. मीही हा अनुभव घेतलाय. मी पुण्याहून मुंबईला येऊन इतकी कामं करायचो आणि त्यामुळे इथल्या मंडळींचा तिळपापड व्हायचा. कारण ते या क्षेत्रावर राज्य करत होते. मला मेकअप आर्टिस्ट युनियननं अठरा र्वष त्यांच्या सभासदत्वाचं कार्ड दिलं नाही. या युनियनमध्ये सगळे ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट होते. मी सभासद नसतानाही मला काम मिळतं म्हणून ते मला अडवण्यासाठी ते सेटवर धाड टाकायचे. याला काम देऊ नका, काढून टाका असं दिग्दर्शकांना सांगायचे. तेव्हा माझे दिग्दर्शक त्यांना सांगायचे, ठीक आहे, मी त्याला काढून टाकतो. पण मग तो करतो तसं काम करणारा माणूस तुम्ही मला द्या. यावर ते सगळे निरुत्तर व्हायचे. अखेरीस त्यांनीच बोलवून मला सन्मानाने कार्ड दिलं. पण या सगळ्या अनुभवांचा माझ्यावर नकारात्मक परिणाम झाला नाही कारण मी नामस्मरण करतो आणि त्यातून आपली उर्जा कशी टिकवून ठेवायची ते मला समजत होतं.
हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये खूप गटबाजी आहे. ती मराठीकडेही वळतेय. याचा काही परिणाम होतोय का?
– या गटबाजीला कशा प्रकारे हाताळायचं हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे. मुळात तुमचा तुमच्या कामावर विश्वास असायला हवा. तुमचं काम चोख करा, सत्य मार्गाने चाला, नवनवीन संकल्पनांवर काम करा. एवढं केलं तरी कसली गटबाजी आणि कसलं काय? कोणीही काहीही बोलू द्या. आपण मात्र आपलं काम करत राहायचं. काही वेळा थोडं पिछाडीवर गेल्यासारखं वाटतं हे खरंय. मीही गेलोय यातून. पण, हरायचं नाही. लढत राहायचं.
तुम्ही अनेक आर्टिस्टना शिकवता, प्रशिक्षण संस्था काढली, त्याबद्दल थोडंसं सांगा.
– माझ्या गुरूंनी, बबन शिंदेंनी मला सांगितलं होतं, मी जसं तुला शिकवलं तसंच तू दोन लोकांना शिकव. मी दोनशे मेकअप आर्टिस्ट तयार केले. मात्र ते करताना मला अॅकेडमिक इंटरेस्ट होता. प्रशिक्षण संस्था काढायची होती. त्यासाठी जेव्हा मी परवानगी मागायला गेलो तेव्हा मी कोणत्या ब्युटीपार्लरमध्ये कोर्स केला असा उलटा प्रश्न मला विचारला गेला. मग मी विचार केला येथील इंडस्ट्रीच्या कामाचा यांच्यासाठी उपयोग नाही. यांना गोऱ्यांचंच प्रमाणपत्र द्यावं लागेल.
मी आणि मिकी काँट्रॅक्टरने भारतीय सिनेमांमधल्या मेकअप क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला. या क्षेत्रातलं अर्थशास्त्र आश्चर्य वाटण्याइतपत बदलून टाकलं. एखाद्या गोष्टीचं मूल्य हजार रुपये असताना तिला किंमत मात्र एक रुपया एवढीच दिली जायची. आम्ही तिला योग्य मूल्य मिळवून दिलं. माझा मेकअप आर्टिस्टना एकच सल्ला आहे, की तुम्ही तुमचं मूल्य वाढवा, किंमत आपोआप वाढणारच आहे.
‘आंबेडकर’ सिनेमाच्या वेळी मी अमेरिकेत होतो. तेथे स्पेशल इफेक्ट्स वर्कशॉप नावाची इन्स्टिटय़ूट होती. स्कॉट स्लायगर हे ज्येष्ठ मेकअप आर्टिस्ट होते. ‘नटी प्रोफेसर’ या सिनेमाचा मेकअप केलेले जगातले उत्कृष्ट प्रॉस्थेटिक रेकी बेकर होते. त्यांनी माझं काम पाहिलं आणि मला सांगितलं की तुला हा कोर्स करण्याची गरज नाही. ‘आंबेडकर’ सिनेमासाठी आंबेडकरांचा मेकअप करताना मी आंबेडकरांना पीसेस लावले नव्हते, मास्क नव्हता, स्किनची लिबर्टी दिली होती. ते म्हणाले या मेकअपला आम्ही मानतो. थेट परीक्षेची तयारी कर आणि परीक्षा दे. पंधराशे डॉलर्स ही त्यांची फी देणं मला शक्य नव्हतं. तेव्हा त्याच इन्स्टिटय़ूटमध्ये मी शिकवणी केली. त्याची फी आणि मामुटी व त्रिलोक मलिकने केलेली राहण्याखाण्याची व्यवस्था त्यामुळे ते मार्गी लागलं. मॉडेल म्हणून मामुटी, त्रिलोक आले. सर्वानी मदत केली.
नंतर पुण्यात इन्स्टिटय़ूट सुरू केली. आत्तापर्यंत मी जवळपास साडेआठ हजार ब्युटिशिअन्सना मेकअप शिकवलाय. माझ्या इन्स्टिटय़ूटमध्ये ६० टक्केमहिला खेडय़ातून, ३०-४० टक्के शहरातून येतात. खेडय़ांमधल्या स्त्रियांसाठी आमच्याकडे जागा राखीव असते.
या प्रशिक्षणातली एक गोष्ट मात्र आजही माझ्या लक्षात आहे. सातपुडय़ातील गावातून एक महिला शिकायला आली होती. तिच्याकडे फी देण्याइतके पैसेच नव्हते. जेवण रांधून, शेतात काम करून, म्हशीचं सारं करून तिचे हात रापलेले होते. पण तिची इच्छाशक्ती चेहऱ्यावरच जाणवत होती. मी तिला प्रवेश दिला. आश्चर्य वाटेल, पण जगातले जे दहा मेकअप आर्टिस्ट पाहिले तिला त्यात धरावं लागेल. तिला कोणताही चेहरा द्या, रंग द्या, ती बेस काढायची. दैवी देणगीच होती तिला.
मेकअप या क्षेत्रावर सिनेमा काढणार असल्याचं तुम्ही म्हटलं होतं. ते काम कुठवर आलंय?
– सध्या मी खूप वेगळ्या प्रवाहात वाहतोय. माझ्या शरीरावर मी लक्ष केंद्रित केलंय. आता तरी चित्रपटाबाबत काही विचार केलेला नाही. या क्षेत्रात शरीराची सर्वात जास्त हानी होते. यशाची पायरी चढताना अनेक सुविधा सहज मिळत असतात. त्या वेळी आनंद होतो. पण, शरीर चांगलं असेल तरच या सुविधांचा लाभ घेता येईल. ‘पीके’ या सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी माझी तब्येत बरी नव्हती. पण मला विचारून आमिरची तारीख घेतली होती. म्हणून मी सेटवर गेलो. पण, शूट संपल्यावर किडनी स्टोनवर उपचारासाठी तडक हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. तिथून बाहेर पडल्यावर काही चांगल्या सवयी लागल्या. तेव्हा या चांगल्या सवयी टिकवायच्या आहेत. त्यामुळे आता माझ्या पद्धतीनुसार काम होणार असेल तरच मी सिनेमा स्वीकारतो.
या क्षेत्रात मुलींची संख्या कमी आहे, असं वाटतं का?
– हो. मुलींनाही मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करता आलं पाहिजे हा मुद्दा मी युनिअनमध्ये अनेकदा मांडला आहे. मुलींनी हेअर करायचं आणि मुलांनी मेकअप करायचा, हे वर्गीकरण मला पटत नव्हतं. आज जगात मुली चंद्रावर, मंगळावर जातात, मोठमोठय़ा पदांवर आहेत. असं असताना मेकअपच्या क्षेत्रात त्यांनी का मागे रहावं? परदेशात सगळ्या मेकअप आर्टिस्ट मुली आहेत. प्रॉस्थेटिक मेकअप आर्टिस्ट मुलं आहेत.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मेकअप क्षेत्राचं चित्र कसं आहे?
– टीव्हीमुळे मेकअप क्षेत्रातलं काम निश्चितपणे वाढलं आहे. खेडय़ापाडय़ातले लोक आले. उत्तरेतली माणसं इथे आली आहेत. युनिअनचं कार्ड मिळवण्यासाठी हे लोक रांगेत उभे राहतात. त्यांना ते कार्ड सहज मिळतंही. हीच मंडळी ५०० आणि हजार रुपयांमध्ये टीव्ही इंडस्ट्रीत काम करतात. यामुळे खऱ्या अर्थाने चांगलं काम करणारे आर्टिस्ट कामाशिवाय आहेत. यात मुख्य बाब म्हणजे मालिकांचे निर्माते या सगळ्या प्रकाराबाबत अनभिज्ञ असतात. कमी पैशांमध्ये काम होत असल्याची सवय निर्मात्यांना लागते. मग ते चांगल्या आर्टिस्टना तुम्हीच का इतके जास्त पैसे घेता असं विचारतात. खरंतर वडापावचं बजेट घेऊन तुम्ही फाइव्ह स्टार हॉटेलच्या दारात उभं राहून जेवण मागू शकत नाही. वडापावही चांगलाच आहे. पण, वडापाव आणि फाइव्ह स्टार हॉटेल यात गल्लत करू नका. बडय़ा कलाकारांना त्यांचं मानधन कमी करण्याबाबत कधीच विनंती केली जात नाही. मग, स्पॉटबॉय, इतर तंत्रज्ञ आणि मेकअप आर्टिस्ट यांना का सांगता?
आताच्या तरुण कलाकारांचं मेकअप आर्टिस्टसोबतचं नातं कसं आहे?
– इंडस्ट्रीत तुम्ही एक काम जरी चांगलं केलं तरी तुमची चर्चा होते, त्याची दखल घेतली जाते. आजच्या तरुण पिढीतले काही कलाकार बऱ्यापैकी सुसंस्कृत आहेत. मेकअप हा एक व्यवसाय असून तो करणाऱ्यांशी व्यावसायिकतेनेच वागलं पाहिजे हे ते जाणून आहेत. काही तरुण कलाकार बिनधास्त मित्रासारखी मस्ती करतात. खेळीमेळीचं वातावरण ठेवतात. सगळेच कलाकार माझं आदराने स्वागत करतात. काही कलाकार माझ्यावर सगळ्या गोष्टी सोपवून देतात. अशा वेळी मलाही माझ्या मनासारखं चांगलं काम करता येतं.
काळाबरोबर या क्षेत्रातले जे लोक नवनवीन तंत्रज्ञान शिकतील, या क्षेत्रासंबंधित आधुनिक गोष्टी आत्मसात करतील ते टिकतील. म्हणजे असं की रंग बदलणं, सुरकुती घालवणं हे संगणकावर करता येईल, पण त्यासाठी रंगांचं, चेहऱ्याचं, मेकअपच्या तंत्राचं ज्ञान असेल तरच नेमका अचूक बदल करता येईल. अन्यथा ते केवळ संगणकीय गिमिक होईल.
डिजिटल तंत्रामुळे एडिटिंगमध्ये ज्या करामती करता येतात हे मेकअप आर्टिस्टसाठी सगळ्यात मोठं आव्हान वाटतं का?
– आव्हानात्मक आहे, पण तेवढेच त्याचे फायदेही आहेत. सुरुवातीस संगणक आणि मेकअपचा फारसा संबंधच नव्हता. त्यावेळी मी फोटोशॉपचा प्रयोग केला. ट्रायलसाठी कलाकाराकडे वेळ नसेल तर फोटोशॉपच्या माध्यमातून आम्ही ट्रायल करायचो. माझ्या पत्नीने, ज्योत्स्नाने त्यासाठी खास प्रशिक्षण घेतलं. तीच हे सारं करायची.
आज थेट एडिटिंगमध्येच काही करामती केल्या जातात. वेळ वाचावा म्हणून त्याचा वापर करता येतो. पण, ते खर्चीकही आहे. हॉलीवूडमधला हिरो मॅच्युअर्ड होईल तितका तो सुपरस्टार होतो. पण, तो त्याच्या सुरकुत्यांसह वावरतो. आपल्याकडचं हिरोइझम वेगळं आहे. त्यांना चॉकलेट हिरो फेसच हवा असतो. त्यांना नेहमी तरुणच दिसायचं असतं. अशा वेळी एडिटिंगमध्ये डिजिटलसाठी खास बजेट ठेवावं लागतं. त्याला स्किन ड्राफ्टिंग म्हणतात. हा खर्च पन्नास लाखांपासून दोन कोटींपर्यंत असतो.
मग मेकअप आर्टिस्टचं भवितव्य काय?
– काळाबरोबर या क्षेत्रातले जे लोक नवनवीन तंत्रज्ञान शिकतील, या क्षेत्रासंबंधित आधुनिक गोष्टी आत्मसात करतील ते टिकतील. म्हणजे असं की संगणकावर रंग बदलणं, सुरकुती घालवणं करता येईल, पण त्यासाठी रंगांचं, चेहऱ्याचं, मेकअपच्या तंत्राचं ज्ञान असेल तरच नेमका अचूक बदल करता येईल. अन्यथा तो केवळ संगणकीय गिमिक होईल. आधुनिक काळात कदाचित काहींना मेकअप आर्टिस्टच लागेल. पण, त्यात ‘मसाज हाताने करू की मशीनने’ असा प्रश्न विचारण्याइतपत फरक असेल.
परदेशी आणि भारतीय मेकअप यात फरक आहे का?
– ‘सरदार पटेल’ या सिनेमाच्या वेळी मला ते प्रकर्षांनं जाणवलं. बिल जॅक्सन मार्टिनने तयार केलेली सारी नाकं उत्तम होती. पण ती परदेशी त्वचेसाठी होती. आपल्यासारखं त्यांच्याकडे वैविध्य नाही. पांढरा, काळा आणि मंगोलियन हे तीनच टोन आहेत. तेच चेहरेपट्टीतदेखील आहे. आपल्याकडे ओठ वेगळे, डोळे वेगळे, नाक वेगळं. त्यामुळेच भारतीय टोनवर काम करणारे इंडियन मेकअप आर्टिस्ट ग्रेट का हे येथे लक्षात येतं.
बॉलीवूडमध्ये परदेशी मेकअप आर्टिस्ट घेण्याच्या पद्धतीबद्दल तुमचं काय मत आहे?
– भारतीय नट आणि निर्माते परकीय गुलामगिरीत आहेत; असं मला वाटतं. जगात जे चांगलं आहे ते घेत राहावंच. पण, तुम्ही ज्या देशात राहता तिथल्या लोकांना त्यांची कला दाखवण्यासाठी किमान एक संधी द्यावी. याविषयीचं दिग्दर्शक मणिरत्नमचं मत सांगतो. तो म्हणतो, ‘माझा माझ्या देशातल्या लोकांच्या ज्ञानावर विश्वास आहे. आणि जर मी ते पारखू शकलो नाही तर तो माझा प्रश्न आहे. आणि असं असेल तर सिनेमा करण्याचा मला अधिकार नाही.’ एखाद्या सिनेमातल्या मेक अपसाठी परदेशातून साहित्य येतं. ते येईपर्यंत थांबून राहणं मला अजिबात पटत नाही. कोणतीही कला कशावरही अवलंबून राहात नाही. ती तशी अवलंबून राहूही नये. त्यामुळे परिणाम थोडे कमी दिसतील, पण ती वस्तू आमची असेल, याचा आनंद वेगळा असतो.
असा कोणता सिनेमा आहे जो तुम्ही करायला हवा होता असं तुम्हाला वाटतं?
– नटी प्रोफेसर, लिटिल बिग मॅन आणि पा हे सिनेमे मला करायला आवडले असते.
असे कोणते कलाकार आहेत, ज्यांचा मेकअप तुम्ही केलेला नाही आणि तो करायला तुम्हाला आवडेल?
– मला अमुक एका कलाकाराचा मेकअप करायचाय, असं ध्येय मी कधीच ठेवत नाही. माझ्यासाठी नाटक, एकांकिका, सिनेमा या सगळ्याचा कलाकार एकच आहे. मी स्वत:साठी काम करतो. ठरावीक बडय़ा कलाकारांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न नाही, हा गर्व नाही. ही माझी जीवनप्रणाली आहे. मी अमिताभ बच्चन किंवा आमिर खानचा किंवा अशा कोणत्याही सुपरस्टारचा मेकअप केला म्हणून मला आनंद मिळत नाही; तर मी मेकअप केला याचा आनंद मला मिळतो.
शब्दांकन : सुहास जोशी, चैताली जोशी