‘स्लीपिंग ब्यूटी’ या सुप्रसिद्ध परिकथेवर आधारित ‘मॅलेफिसन्ट मिस्ट्रेस ऑफ ऑल इव्हिल’ हा हॉलीवूडपट या महिन्यात प्रदर्शित होतो आहे. लाइव्ह अ‍ॅक्शन डार्क फॅण्टसी, अ‍ॅडव्हेंचर, कॉमेडी, फॅमिली रोमान्स या प्रकारात मोडणाऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे अँजेलिना जोलीने. चित्रपट रसिक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मॅलेफिसन्ट’ हा डार्क फॅण्टसी, अ‍ॅक्शन, रोमान्स, अ‍ॅडव्हेंचर, फॅमिली प्रकारात बसणारा, २०० मिलियन यू.एस. डॉलर्सचं बजेट असलेला, वॉल्ट डिस्नेच्या क्लासिक ‘स्लीपिंग ब्यूटी’चा लाइव्ह अ‍ॅक्शन रिमेक आहे. १९५९ च्या क्लासिक स्लीपिंग ब्यूटीची सर्वात गाजलेली खलनायिका मॅलेफिसन्ट हिच्या आत्तापर्यंत न सांगितल्या गेलेल्या कथेचा या चित्रपटात शोध घेतला आहे. एक मूळची चांगली परी सूडग्रस्त का होते, फसवणुकीमुळे तिचं चांगलं हृदय दगडासारखं कसं बनलं, सूडबुद्धीने पेटून ती बाल्यावस्थेतील राजकन्येला मागे घेता येणार नाही असा शाप कसा देते, ते नवजात अर्भक, म्हणजेच राजकन्या अरोरा, जशी मोठी होते तशी ज्या जंगलातल्या साम्राज्यात ती वाढली, आणि ज्या साम्राज्यावर तिचं प्रेम आहे, त्यापेक्षा एक वेगळं मानवी साम्राज्यही तिथे आहे, आणि तिचं भविष्य त्या साम्राज्याच्या हातात आहे, ही जाणीव तिला कशी होऊ लागते, त्या दोन्ही साम्राज्यांच्या संघर्षांत ती कशी सापडते, अरोराकडे त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याची किल्ली असू शकेल हे मॅलेफिसन्टच्या कसं लक्षात येतं, आणि मग ती दोन्ही जगं कायमची बदलून टाकेल अशा काही टोकाच्या कृती करायला ती कशी बाध्य होते, ही चित्रपटाची कथावस्तू.
मूळची एक सुंदर, आकर्षक परी, पण सूडग्रस्त आणि स्वघोषित ‘मिस्ट्रेस ऑफ ऑल इव्हिल’ अशा मॅलेफिसन्टच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी हॉलीवूडच्या सुप्रसिद्ध जगातील सर्वाधिक सुंदर स्त्रियांत निवडल्या गेलेल्या अँजेलिना जोलीने तिची तयारी दर्शवली होतीच. तिची निवड निश्चित झाल्यावर तिला मॅलेफिसन्टचा ‘लूक’ देण्यासाठी तज्ज्ञ फोटोग्राफी दिग्दर्शकांनी बरीच मेहनत घेऊन शेवटी एक ग्रेसफुल पण त्याचबरोबर थरकाप उडवेल अशी मॅलेफिसन्टची छबी मूर्त स्वरूपात आणली. अँजेलिनाच्या मूळच्याच सुंदर डोळय़ांत हिरवी छटा आणली गेली. डोक्यावर शिंगं, पाठीवर पंख आणि गूढ-गंभीरतेचा बाज दाखवण्यासाठी काळय़ा-जांभळय़ा छटांचा वापर, हाताच्या लांबसडक बोटांत ती खेळवत असलेला काचेचा हिरवा गोल, पायघोळ, सैलसर काळा गाऊन.
राजकन्या अरोराच्या भूमिकेत आहे एले फॅनिंग आणि इतर भूमिकांत आहेत शार्लटो कॉपली, सॅम रायली. चित्रपटाचं दिग्दर्शन रॉबर्ट स्टॉमबर्गने केलं आहे. स्ट्रॉमबर्गला दोन वेळा अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड मिळालेलं आहे. ‘ट्रॉन’ या दुसऱ्या डिस्ने फिल्मपेक्षा या चित्रपटाचं बजेट प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या स्ट्रॉमबर्गसाठी सर्वाधिक आहे. स्ट्रॉमबर्गने ‘ऑलिस इन वंडरलँड’, ‘अवतार’ आणि ‘ओझेड द ग्रेट अ‍ॅण्ड पॉवरफुल’चं प्रॉडक्शन डिझाइन केलं होतं. चित्रपटाची पटकथा लिहिलीय लिंडा वुल्व्हर्टन, जॉन ली हॅन्कॉक यांनी.
चित्रपटातील इतर पात्रं आहेत, स्टेफान, म्हणजेच मॅलेफिसन्टचा बालपणीचा मित्र आणि अरोराचे वडील आणि त्या भूमिकेत आहे शार्लटो कॉपली- अरोराचं, त्याच्या मुलीचं रक्षण करायला तो मागेपुढे बघत नाही आणि प्रयत्नांत कसलीही कसर बाकी ठेवत नाही. सॅम रायलीने डियावलची भूमिका केली आहे. मॅलेफिसन्टच्या मर्जीतला, विश्वासातला पण स्वत:च्या मनातले विचार बोलून दाखवायला घाबरत नाही असा अरोराच्या प्रेमात पडणारा फिलिपही कथेत आहे. भिसलविट, फिलिटी, नॉटग्रास या रंगीबेरंगी फ्लॉवर पिक्सीज आहेत; अरोरा सोळा वर्षांची होईपर्यंत तिला गुप्तपणे वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
ब्रॅड पिट, टिम बर्टन यांची नावं सुरुवातीला चित्रपटाच्या निर्मितीशी जोडली गेली होती.
जून १४, २०१२ मध्ये लंडन येथे चित्रपटाची मुख्य फोटोग्राफी सुरू झाली. सात वेळा अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स मिळवणारा रिक बेकर याने चित्रपटासाठी स्पेशल मेकअप इफेक्टस् डिझाइन केले. चित्रपटाचे चित्रीकरण मुख्यत: बर्किंग हॅमशायर कंट्रीसाइडला झालं. चित्रपटाच्या पुनर्चित्रीकरणासाठी जॉन ली हॅन्कॉकने स्ट्रोमबर्गला साहाय्य करण्याचं काम केलं. रॉथ आणि हॅन्कॉकने ‘स्नोव्हाइट अ‍ॅण्ड द हंटसमन’ चित्रपटावर एकत्रित काम केलं होतं. रॉथने म्हटलंय, चित्रपट फारच देखणा झालाय आणि एकूण १ तास १५ मिनिटांच्या रनिंग टाइमपैकी शेवटची ७५ मिनिटं खरोखरच करमणूक करतात.
चित्रपटाला संगीत देण्यासाठी जेम्स न्यूटन हॉर्वर्डला ऑक्टोबर २०१२ मध्ये करारबद्ध करण्यात आलं. चित्रपटातील ‘वन्स अपॉन ए ड्रीम’ हे गाणं, ‘द ग्रेट गॅटस्बी’ चित्रपटासाठी गाणी गायलेल्या लाना डेल रे या प्रसिद्ध गायिकेने गायलं आहे. तिने हे गाणं १९५९ च्या ‘स्लीपिंग ब्यूटी’साठी गायलं होतं. तेच गाणं ‘मॅलेफिसन्ट’साठी टायटल साँग म्हणून घेण्यात आलं. डेल रेची निवड अँजेलिना जोलीने जातीने केली. गुगल प्लेच्या माध्यमातून मर्यादित कालावधीसाठी हे सिंगल विनामूल्य उपलब्ध करण्यात आलं.
पिक्सरच्या ‘द गुड डायनॉसॉर’च्या निर्मितीतल्या अडचणी आणि विलंबामुळे ‘मॅलेफिसन्ट’चं प्रदर्शन जुलै २०१४ ऐवजी मे २०१४ त ठरवण्यात आलं.
अ‍ॅनहिम कन्व्हेंशन सेंटर, कॅलिफोर्निया येथे २०१३ त भरवलेल्या डिस्ने एक्स्पोमध्ये मॅलेफिसन्टचा पहिला लुक कसा असेल ते दाखवण्यात आलं. या कार्यक्रमाला ‘अँजेलिना जोली मॅलेफिसन्टचा मेकअप आणि कॉस्च्यूूम परिधान करून जातीने उपस्थित होती. बालपणीच्या अरोराची भूमिका अँजेलिनाच्या मुलीने, व्हिव्हिएन जोली-पिटने केली आहे. तीही कार्यक्रमाला उपस्थित होती. या वेळी जोलीने उपस्थितांना सांगितलं की, अरोराच्या भूमिकेसाठी तिच्याच मुलीला, व्हिव्हिएनला निवडण्याचं कारण म्हणजे, इतर मुली अँजेलिनाला विचच्या रूपात पाहून घाबरत होत्या, पण ती व्हिव्हिएनची आईच असल्याने तिची भीती वाटण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही.
परिकथांशी लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळेच परिचित असतात, पण त्या भव्य-दिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. परिकथांवर एन्चांटेड, हा लाइव्ह-म्युझिकलं रापुनझेलच्या फेअरी टेलवर एनटँगल्ड हा अ‍ॅनिमेटेड, असे आपापल्या परीने विषयाची मांडणी आणि हाताळणी करणारे चित्रपट येऊन गेले आहेत. पण हॉलीवूडच्या आघाडीच्या, नामवंत कलाकारांना घेऊन काढलेल्या चित्रपटांत ‘ऑलिस इन वंडरलँड’ हा जॉनी डेपची ‘मॅड हॅटर’ भूमिका असलेला, लुईस कॅरोलच्या मूळ कथेवरचा अमेरिकन फॅण्टसी चित्रपट वैशिष्टय़पूर्ण होता. टिम बर्टनने दिग्दर्शित केलेल्या आणि लिंडा वुल्व्हर्टनने पटकथा लिहिलेल्या या चित्रपटात अ‍ॅलिसची भूमिका केली होती मिया वासिकोबस्काने, तर इतर भूमिकांत होत्या हेलेना बोन हॅम कार्टर आणि अ‍ॅन हॅथवे.
अँजेलिना जोलीइतकीच दुसरी प्रसिद्ध आणि सुंदर नटी ज्युलिया रॉबर्ट्स हिने ‘इव्हिल क्वीन’ची भूमिका केलेला ‘मिरर, मिरर’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. वरसेम सिंगने त्याचं दिग्दर्शन केलं होतं. ‘मिरर, मिरर’ हा चित्रपट ब्रदर्स ग्रिमने संकलित केलेल्या ‘स्नोव्हाइट’ या प्रसिद्ध परिकथेवर आधारित होता. इतर भूमिकांत लिली कॉलिन्झ, आर्मी हॅमर, नाथन लेन होते.
‘मिरर, मिरर ऑन द वॉल, हु इज द केअरेस्ट ऑफ देम ऑल?’ हा स्नोव्हाइटच्या दुष्ट सावत्र आईचा मंत्र आपल्याला माहीतच आहे. सुरुवातीला ‘आपणच, राणीसाहेब म्हणून नम्रतेने तिला सुखावणारे उत्तर देणारा आरसा, स्नोव्हाइट वयात आल्यानंतर मात्र तीच अधिक ‘फेअर’ असल्याची ग्वाही देतो आणि इव्हिल क्वीन सुडाने पेटते. चित्रपटात बंड करून उठलेले सात धैर्यवान बुटकेही आहेत. राजकुमार मिळवून देण्यासाठी ते स्नोव्हाइटला मदत करतात. एका ऑलटाइम फेव्हरिट फेअरी टेलवरचा हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी एक चांगली करमणूक ठरला होता.
मॅलेफिसन्टही लवकरच प्रदर्शित होईल. अँजेलिना जोलीच्या चाहत्यांना तर ही एक पर्वणी आहेच, स्लीपिंग ब्यूटीमधला रोमान्स, संघर्ष, उत्कंठा प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे. परिकथा हा पिढय़ान्पिढय़ा पुढे देण्यात येत राहणारा वारसा असतो. चित्रपटांच्या माध्यमांतून हा वारसा कलात्मक स्वरूपात जपण्याचे डिस्ने, पिक्सर इ. निर्मिती संस्थांनी चालवलेले कार्य उल्लेखनीयच म्हणावे लागेल.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maleficent mistress of all evil
Show comments