गेले कित्येक दिवस मी बोललेच नाहीये माझ्याशी. खूप काही लिहायचं होतं, सांगायचं होतं स्वत:ला. असं होतं ना कधी कधी, आपल्याला खूप बोलायचं असतं, सांगायचं असतं पण आपण ते टाळत असतो. आज मात्र ठरवलं सगळंच लिहून काढायचं, सांगून टाकायचं जे जे काही मनात होतं.
डायरीची कोरी पानं जणू माझीच वाट पाहत होती. गेल्या काही दिवसांत तर अख्खं आयुष्य ओतलं होतं मी यात. माझ्या मनात येईल ते लिहीत गेले होते मी त्यात. डायरीचं एक बरं असतं. इतरांसारखी ती आपल्याला जज करत नाही. ना ती आपल्यावर रागावते, ना आपला द्वेष करते, ना आपल्यावर निस्सीम प्रेम करते. ती फक्त आपल्याला आपलं खरं रूप दाखवते. आरशासारखी. फक्त हा अंतरंगाचा आरसा असतो, एवढंच.
शाळेची रियुनियन झाल्यानंतर मी लांबच होते डायरीपासून.. खरंतर आमोद भेटीबद्दल किती लिहायचं होतं मला. तर.. रियुनियननंतर मी आणि आमोद अचानक बोलायला लागलो. आणि तेही खूप.. छान वाटायला लागलं मला. जे खूप घडावं असं वाटत असतं, पण ते घडेल याची मात्र अपेक्षा नसते आणि तेव्हाच ते घडतं तेव्हाचा आनंद वेगळाच असतो. तसंच काहीसं झालं माझ्याबरोबरसुद्धा.
व्हॉट्सअॅपवर तर मी इतरांशी बोलणं जवळजवळ बंदच केलं होतं. फेसबुकवर एकमेकांच्या पोस्टवरच्या कमेंट्स फक्त आम्हाला कळायच्या. फोनवर मात्र क्वचितच बोललो असू, अगदीच दोन-तीन मिनिटं तेही. माझी तर दांडीच गुल व्हायची त्याच्याशी बोलताना. मेसेजेसवर मात्र मला किती बोलू आणि किती नाही असे व्हायचे. ओठांची जागा बोटांनी घेतल्यावर काम किती सोपे होते ना. आणि असंच त्याने एकदा विचारलं, मूव्हीला येणार का.. तो मेसेज वाचल्यावर मी दोन मिनिटं हवेतच होते. रिप्लाय काय यापेक्षा तो कधी करू याचाच जास्त विचार करत होते. कारण अगदी लगेच केला तर मी डेस्परेट वाटेन याची भीती, आणि लवकर नाही केला तर त्याचा दुसरा काही प्लान असेल याची भीती. शेवटी मोबाइल दोन-तीनदा लॉक अनलॉक करू न रिप्लाय केला. रियुनियनच्या भेटीनंतर आम्ही आत्ता कुठे भेटणार होतो. ठरल्या वेळेला आम्ही भेटलो..म्हणजे मी जरा दहा मिनिटं उशिरा. ही माझी सवय मला जरा कमी करायचीये. तर सिनेमा पाहिला, छान गप्पा मारल्या आणि मी घरी आले. पण एक वेगळीच भावना घेऊन.
या भेटीकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या म्हणून असेल कदाचित, पण आम्ही एकत्र असल्याचा आनंद असा काही मला झाला नाही. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण खरंतर कितीही वेळ घालवू शकतो. पण मला मात्र ती भेट केव्हा संपतेय असं झालं. एक विचित्र अवघडलेपण होतं त्या भेटीत. कदाचित आम्ही पहिल्यांदा असे दोघेच भेटल्यामुळे असेल म्हणून मग मीही दुर्लक्ष केलं. त्यानंतर आम्ही अजून दोन-तीनदा भेटलो. पण तेव्हाही तेच. सुरुवातीला केअरफ्री वाटणारा तो आता मला केअरलेस वाटू लागला. त्याच्या छोटय़ाछोटय़ा गोष्टी मला खटकायला लागल्या. आणि कहर म्हणजे हे असं का होतंय हेसुद्धा मला कळत नव्हतं. ऋचाला विचारून फायदा नव्हता कारण ती तर आमचं लग्न लावायच्याच मार्गावर होती.
हळूहळू आमोद आणि माझं बोलणंही खुंटलं.. आपसूकच. आणि आता माझ्या मनात शंका आली, खरंच आवडायचा का तो मला.. आणि आवडत असेल तर असं काय झालं की मला तो आवडेनासा झाला.. पण मला अजूनही तो आवडतो. पण एक मात्र नक्की, मी त्याच्या प्रेमात नाहीये. युरेका.. आता सगळे धागे नीट जुळताहेत. मला तो फक्त आवडायचा.. बाह्य़रू पावरून क दाचित. प्रेम जरी ठरवून केले जात नसले तरी आपल्या मनात त्याबद्दल एक अंधुकसं का होईना चित्र असतेच. आणि याच चित्रात आमोद बसत नव्हता. क्रश आणि प्रेम यांमध्ये याच त्या अंधुकशा चित्राचा फरक असतो. प्रेमात पडल्यावर खरंतर ते चित्र सुस्पष्ट होत जातं, आमोदबाबतीत मात्र ते अजूनच विरत होतं. आपण म्हणतो ना क्लिक नाही होत आहे, तसंच काहीसं. खरंतर हे क्लिक होणं म्हणजे काय हे कोणालाच सांगता येत नाही. पण अनुभवास मात्र प्रत्येकाच्या आलेलं असतं. काही भावना कधीच शब्दात नाही मांडू शकत आपण, त्यातलीच ही एक, क्लिक होणे.
आज लिहिताना खूप मस्त वाटत होतं, आपल्याच आयुष्याला रिवाइंड करून पाहिल्यासारखं. त्या दिवशी ऋचा आलेली. प्रचंड एक्सायटेड होती माझ्या आणि आमोदबद्दल. ‘‘मग.. कुठपर्यंत पोहोचली गाडी? क्या चल रहा है तुम दोनो के बीच में?’’ तिच्याकडे पाहून मी फक्त एवढंच म्हटलं, ‘‘व्ही आर जस्ट गुड फ्रेंड्स!’’
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com