‘‘हल्ली कुठे असतोस तू..  भेटतच नाहीस.. इतका कशात गर्क आहेस? की हरवलास कुठे?’’ लिहिता लिहिता मी अचानक थांबले. कित्येक दिवसांनी धूळ खात पडलेली माझी ती डायरी मी बाहेर काढलेली. तिची पानं उलटता पलटता एकेक आठवणी डोळ्यांसमोर तरळत होत्या. शब्दांनी साकारलेला आठवणींचा अल्बम जणू. तिच्या प्रत्येक पानानिशी मला जाणवत होतं की, हे केवळ शब्द नाहीत तर जगलेले क्षण आहेत माझ्या आयुष्यातले आणि गेले कित्येक दिवस त्या क्षणांना शब्दांत पकडणंच मी बंद केलेलं. अत्तराची कुपी कधीच उघडी ठेवत नाहीत हे आत्ता अचानक ध्यानात आलंय माझ्या. कुपीतलं अर्ध अत्तर उडून गेल्यानंतर.. िपपळपान वाऱ्यावर उडून गेल्यावर आठवण झाली जपून ठेवलेल्या िपपळजाळीची..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सहज एक पान उघडलं डायरीचं. कोरं. जणू मला ते ओरडून विचारत होतं, ‘‘कुठे होतीस इतके दिवस? माझी आठवण नाही का आली?  तुझ्या क्षणांना माझं करायचंय मला. तुझा आनंद, तुझी दु:खं माझीच आहेत, हे एवढय़ातच विसरलीस तू? दूर ढकललंस मला?’’

ते कोरं पान मला कळकळीने विनवत होतं. रितेपणातसुद्धा कित्ती काय काय साठवलेलं असतं ! खरं तर काहीच सांगायचं नव्हतं मला त्या पानाला. ते पान ज्या क्षणांची वाट बघत होतं असे काही क्षण आलेच नव्हते. एका संथ लयीत सुरू होतं आयुष्य. तीच लय, तीच तान, तेच सूर आणि तेच गाणं! व्हिडीओ गेममध्ये माहीर झाल्यावर त्या गेमचा कंटाळा येतो, मग आपण तो गेम टाळायला लागतो आणि नंतर तर पूर्णच बंद करतो. कारण त्यात नवीन, आव्हानात्मक असं काहीच उरलेलं नसतं. तसंच झालेलं आयुष्याचं रटाळ, एकसुरी आणि कंटाळवाणं. आयुष्यात येणारी सरप्रायजेसही तीच आणि समस्याही त्याच. कसं सांगू त्या डायरीच्या पानाला की तुझ्यासारखं कोरं व्हायचंय मला. पुन्हा नव्याने काहीतरी लिहायचंय पण आता असलेलं हे आयुष्याचं भूत माझ्या मानगुटीवरून उतरवता नाही येणार. त्याला घेऊनच नवी सुरुवात करावी लागणार. काहीच कळत नाहीये.

अशा वेळी तो कायम मदतीला यायचा. काहीना काही सुचवायचा. आज..आत्ता मात्र तो कुठेच दिसत नाहीये. त्याच्या विचारात नकळत त्या कोऱ्या पानावर लिहिलं गेलं आपसूकच. त्याची अशी आठवण यायची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. कारण एरवी मी त्याला गृहीत धरून चालायचे. तो असा अचानक कुठेतरी निघून जाईल असं कधी वाटलंच नव्हतं. आज त्याची निकड भासतेय पण मला नाही भेटत तो. मला आत्ताही आठवते त्याची आणि माझी पहिली भेट मी शाळेत असताना झाली. त्याही आधी तो असायचा माझ्या आसपास पण कधी जाणवलं नव्हतं त्याचं असणं. लहानपणापासून माझी चित्रकला अत्यंत वाईट. बाकीच्या विषयात पहिल्या पाचात असणारी मी चित्रकलेत मात्र काठावर पास व्हायचे. एक दिवशी बाईंनी चित्रं कशी काढू नयेत यासाठी मी काढलेलं चित्र दाखवलं. वर्गात एकच हशा पिकला. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मधल्या सुट्टीत बाथरूममध्ये जाऊन हमसून हमसून रडले. बाईंना मनातल्या मनात खूप बोल लावले. तशीच घरी गेले रडका चेहरा घेऊन. आईबाबांनी पण खूप समजावलं. रात्री झोपल्यावर अचानक मला त्याने हाक मारली. दबक्या आवाजातच तो मला म्हणाला, ‘‘झालं रडून की अजून रडायचंय? याने फार काही होणार नाही, लोकांना मात्र पटेल की तू खरंच वाईट चित्र काढतेस. म्हणा लोकांचं काय एवढं, तुलाही तर तसंच वाटेल ना!’’ मी काही बोलणार इतक्यात तो निघून गेला. तो कुठून आला कुठे गेला काही माहीत नाही.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर दोन आठवडय़ांनी चित्रकलेची स्पर्धा आहे असं कळलं. त्या दिवशी मनाशी काहीतरी ठरवूनच घरी गेले. स्पर्धा येईपर्यंत रोज नेमाने न चुकता चक्क चित्र काढण्याची प्रॅक्टिस केली. स्पध्रेच्या दिवशी तेच चित्र काढलं. नंबर नाही आला मात्र शाळेच्या चित्रकला प्रदर्शनात ते चित्र लागलं. त्याला हे सांगायला धावत घरी आले. पण तो नव्हताच. पुन्हा गायब झालेला. मी मात्र खूश होते. त्या प्रसंगापासून तो कायम माझ्यासोबत राहात आलाय. कायम. माझ्या अत्यंत बाळबोध शंकांपासून माझ्या अत्यंत कठीण प्रसंगांत तो कायम माझ्याबरोबर होता. किंबहुना असतोच. आज मात्र कुठे तरी हरवलाय तो. म्हणा असंच करतो तो कायम. उगाच विचारांचं पिल्लू सोडून जाणार. माझ्या करिअरच्या टप्प्यावर तू माझा हात घट्ट धरून होतास. केवढा आधार वाटलेला तुझा.

घरदार सोडून अनोळख्या शहरात जाऊन राहाणं म्हणजे माझ्यासारख्या बुजऱ्या मुलीसाठी धाडसच होतं ते. तू बरोबर होतास म्हणून सारं काही निभावलं. त्यानंतर आलेली आई-बाबांची आजारपणं. माझ्याबरोबर तूसुद्धा जागायचास की रात्ररात्रभर. एकदा तर चक्क भांडलेले तुझ्याशी, तू किती मूर्ख आहेस, तुला काहीच कळत नाही म्हणून किती सुनावलेलं तुला आणि तू सारं शांतपणे ऐकून घेतलंलस आणि नंतर घडलं काय? तू जे म्हटलंस तेच. तेव्हा तर स्वत:चाच इतका राग आलेला, काय आणि कसं बोलू तुझ्याशी असं झालेलं. पण त्याही वेळी तू माझ्याबरोबर होतास.

नातं काचेसारखं असतं. एकदा आघात झाला की पुन्हा सांधता येत नाही. आपलं नातं मात्र मुळीच असं नाहीये. ते तर पिठाच्या गोळ्यासारखं आहे. गुद्दे-बुक्क्यामुळेच अधिक मऊ बनलेलं, मुरलेलं आणि आकाराला येणारं. तू नको ना दूर जाऊस माझ्यापासून. तुझी खूप सवय झालीये मला. आयुष्यात तू वेळोवेळी माझ्याबरोबर होतास. तुझं हे असं मध्येच सोडून जाणं म्हणजे चीटिंग हं. म्हणा तू चीटिंग केलीस तरी काय.. पदोपदी स्वत:ला फसवण्याचाच काळ आहे म्हणा हा. आज मात्र तुझं नसणं जाणवतंय मला अगदी खोलवर. पण..पण माहीत नाही, तुझं असणंही तितक्याच तीव्रतेने जाणवतंय. तू आहेस ना इथेच कुठेतरी माझ्या जवळच? फक्त मलाच सापडत नाहीएस की मीच दडवून ठेवलंय तुला? डोळ्यासमोर क्षणात काहीतरी चमकून जावं तसं झालं.

तू इथेच होतास ना.. कायम.. फक्त मी तुझं ऐकणं बंद केलं होतं. मी  माझ्या आतल्या ‘मी’ला ऐकणंच बंद केलं होतं. तू कधीच हरवला नव्हतास, मी मात्र तुला वेडय़ासारखी शोधत होते. मी लिहिणं थांबवलं. डायरीचं ते पान आत्ता अजून एक आठवण जिवंत ठेवणार होतं, कायमचं !
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com