टीव्हीवरच्या मराठी मालिकांच्या विश्वातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे मंदार देवस्थळी. त्याने दिग्दर्शित केलेल्या मालिकांच्या भागांनी नुकताच पाच हजारांचा आकडा पार केला आहे. त्यानिमित्त त्याच्याशी केलेली बातचीत-

तुझ्या करिअरला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रवासाविषयी सांग.
– १९९० पासून माझ्या करिअरला सुरुवात झाली. ‘दिनमान’ आणि ‘सत्यवती’ या दूरदर्शनच्या मालिकांसाठी बाबा सावंत यांना साहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम करत होतो. त्यांच्यासोबतच ‘राजा राजे’, ‘मला नाही जमायचं’ अशा काही मालिका केल्या. गौतम जोगळेकरसोबत ‘सप्तर्षी’ मालिका केली. त्याच्यानंतर १९९४ हे वर्ष काहीसं त्रासदायक ठरलं. या वर्षांत मी फक्त पायलट एपिसोड करायचो;. पण त्याचेही फक्त पायलट एपिसोडच झाले. पुढे काहीच व्हायचं नाही. मग १९९५ पासून पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली. १९९७ मध्ये ‘अभिनेत्री’ नावाची टेलिफिल्म केली होती. दुर्दैवाने ती शूट झाली आणि दूरदर्शनकडून पत्र आलं की, आम्ही टेलिफिल्मचा स्लॉट बंद करतोय. ते सगळ्यात मोठं नुकसान होतं माझ्यासाठी. त्या दरम्यान माझी विनय आपटेंशी भेट झाली. त्यांनी माझं काम बघितलं होतं. माझ्या कामावर खूप खूश होते ते. त्यांनीच मला ‘बोक्या सातबंडे’, ‘मनामनाची व्यथा’, ‘वळवाचा पाऊस’, ‘सांगाती’ या मालिकांसाठी कार्यकारी एपिसोड दिग्दर्शक म्हणून काम दिलं. तिथलं काम बघून त्यांनी मला ‘आभाळमाया’ या मालिकेसाठी दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. विनय आपटेंशी झालेली ती भेट आणि ‘आभाळमाया’ हे माझ्यासाठी टर्निग पॉइंट ठरले. तिकडून माझ्या करिअरला सुरुवात झाली. मग मी मागे वळून कधीच पाहिलं नाही. त्यानंतर चांगले प्रोजेक्ट्स मिळत गेले. अनेक मालिका करत आज मी निर्मात्याच्या भूमिकेतही शिरलो आहे.
टीव्ही हे माध्यम आता बदललंय. हा बदल तू स्वत: अनुभवला आहेस. त्याविषयी काय सांगशील?
– मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, मला नव्या-जुन्या तंत्रज्ञानांसोबतही काम करता आलं. दर्जा तर खूप सुधारला. तंत्रज्ञानात विविध बदल झाले. आशय, विषयांमध्येही मोठय़ा प्रमाणावर बदल झालाय. हे सगळे बदल स्वागतार्ह आहेतच. मालिकांना नवं रूप प्राप्त झालं; पण दुसऱ्या बाजूने सांगायचं तर, मी जेव्हा इतर निर्मात्यांसाठी दिग्दर्शन करायचो तेव्हा काही गोष्टी खटकायच्या. हॉटेलमधला एखादा सीन असेल तर नेहमी ठरलेली चारच टेबल लावलेली जातात. नेहमी असंच सादरीकरण का, असं विचारल्यावर ‘मराठी मालिकांना परवडत नाही’ हे ठरलेलं उत्तर मला मिळायचं. मग ‘होणार सून..’ची निर्मिती करताना मी या गोष्टी कटाक्षाने टाळल्या. व्यवस्थित नियोजन केलं तर गोष्टी हव्या तशा घडू शकतात हे दाखवून दिलं. मालिकेत बरेच रिअल लोकेशन दिसू लागले. या मालिकेनंतर आता इतर अनेक मालिकांमध्ये रिअल लोकेशनचं प्रमाण वाढलं. एखादा बदल कोणी तरी घडवून आणावा लागतो. तो चांगला झाला की इतर अनेक त्याची री ओढतात. हा बदल कथानकाला असो किंवा मालिकेच्या विषयातला, त्या बदलासोबत जायला हवं. असंच मालिकांच्या विषयांमध्ये वैविध्य आलं. अशा वैविध्यपूर्ण मालिकांना प्रेक्षक तितकाच प्रतिसादही देतो. याचा मला प्रत्यय आला तो ‘वादळवाट’ आणि ‘अवघाचि संसार’ या दोन्ही मालिका सुरू असताना. दोन्ही मालिका एकाच वेळी सुरू होत्या. दोन्हींचं दिग्दर्शन मी करत होतो. दोन्ही मालिकांचे विषय वेगळे असूनही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे टीव्ही क्षेत्रात विशेषत: मराठी मालिकांमध्ये झालेले हे बदल स्वागतार्हच आहेत.
पण, आता स्पर्धा वाढली आहे. टीआरपीचं भूत सगळ्या चॅनलवर आहे. त्यासाठी वाट्टेल ते दाखवण्याची चॅनलची तयारीही असते. तू टीआरपीच्या मुद्दय़ाकडे कसं बघतोस?
– स्पर्धा वाढली आहे हे कबूल आहे; पण चांगला कण्टेंट दिला की मालिका चांगला टीआरपी मिळवून देतेच. टीआरपीसाठी मालिका काढली तर फसायला होतं. ‘अमुक एक मालिका पुढे गेली आता आपण काही तरी करू या म्हणजे टीआरपी मिळेल’ ही ईर्षां मला पटत नाही. त्यामुळे मी स्पर्धा वगैरे मानत नाही. मुळात मी स्वत:ला अशा कोणत्याही स्पर्धेत मोजत नाही. स्पर्धा कधी तरी संपणार. ती संपली की तुम्ही संपता आणि मला थांबायला आवडत नाही.
टीआरपीचा मुद्दा आला की चॅनल हस्तक्षेप करतं. तुझा काय अनुभव?
– चॅनलचा हस्तक्षेप असतो हे खरंय; पण माझा अनुभव जरा वेगळा आहे. निर्माता म्हणून ‘होणार सून..’ ही माझी पहिली मालिका आहे. ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘अवघाचि संसार’ या सगळ्या लोकप्रिय मालिका झी मराठीवरच्याच असल्यामुळे आमच्यातलं बाँडिंग मस्त आहे. चॅनलचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे मला नेहमीच पाठिंबा मिळत गेला. तसंच मालिकेच्या कण्टेंटवर विश्वास होता. कोणताही बदल किंवा प्रयोग करण्याआधी चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून विचारांची देवाणघेवाण होते; एवढाच काय तो चॅनलचा मुद्दा असतो. आमच्यात सतत चर्चा होत असतात; पण चॅनल कधीही हस्तक्षेप करत नाही.
‘होणार सून मी या घरची’ मालिका इतकी लोकप्रिय होईल असं वाटलं होतं का?
– मालिकेला यश मिळेल याची खात्री नक्कीच होती. पण, इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं. दोन वर्षांत वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटली. त्यांनी मालिकेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचं प्रेम बघून भारावून जायला होतं. अशा प्रतिक्रियांची गणती इतर कशातही होऊ शकत नाही.
पण, काही वेळा मालिकेबाबत नाराजीचा सूरही येत असतो.
– हो. हे खरंय. प्रेक्षकांचं कौतुक जसं आमच्यापर्यंत पोहोचतं तशीच त्यांची नाराजीही पोहोचते. प्रेक्षकांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. कारण मालिका सुरू झाली तेव्हापासून गोखले घरातलं सकारात्मक वातावरण प्रेक्षकांना सुखावून गेलं. मालिकेत दु:खं, काळजी, व्यथा असं दिसलं की प्रेक्षकांना त्रास होणार हे सहाजिक आहे. पण, खऱ्या आयुष्यात असा एकही माणूस नाही ज्याला दु:ख नाही. आम्ही जर मालिका वास्तवदर्शी दाखवतोय तर सगळ्याच गोष्टींमध्ये ते वास्तव आणायला हवं. त्यामुळे श्री-जान्हवीमध्येही भांडणं होतात, त्यांच्यातही मतभेद होतात हे दाखवणं गरजेचं आहे.
जान्हवीच्या स्मृतिभ्रंशाच्या ट्रॅॅकवरही टीका झाली होती. सहा महिने तो ट्रॅक लांबल्याने प्रेक्षक कंटाळले होते.
– हो. जान्हवीच्या स्मृतिभ्रंशाच्या ट्रॅकदरम्यान अनेक प्रकारच्या टीकांना सामोरे गेलोय आम्ही. ‘असं कधी होतं का’ अशी टीका तर अनेकांनी केली. पण, शशांक आणि माझ्या ओळखीत अशी स्मृतिभ्रंश झालेली माणसं आम्ही बघितली होती. आणि एखाद्या गोष्टीची जशी सुरुवात होते तसंच तिचा योग्य प्रकारे शेवट होणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळे ट्रॅक बराच काळ तसाच राहिला. नंतर त्या ट्रॅकमध्ये ‘मला एकाच मुलीवर दोन वेळा प्रेम करता येतंय’ या श्रीच्या बोलण्याने प्रेक्षकांचाही त्या संपूर्ण घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि प्रेक्षक पुन्हा मालिकेत गुंतले.
मालिकेचा सध्याचा ट्रॅक बघता ‘मालिका ताणली जातेय, भरकटतेय, कंटाळवाणी झालीये’ अशा प्रतिक्रिया उमटतायत. प्रेक्षकांना दिलासा कधी मिळणार?
– काही गोष्टी कथेच्या गरजेनुसार केल्या जातात. मघाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची विशिष्ट सुरुवात आणि शेवट असतो. तो त्या त्या वेळी करणंच महत्त्वाचं असतं. श्री-जान्हवी सतत एकमेकांशी गोड वागले तर ते खूप नाटकी वाटेल. तसंच अशा गुडी-गुडी वागण्यावरही टीका होतेच. म्हणून आता त्यांच्यात दुरावा आणला आहे. या दुराव्यामुळेच त्यांच्यातलं प्रेम नव्याने बहरेल. प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जावी आणि मालिकेत येणाऱ्या काही नवीन गोष्टींमुळे त्यांचं मनोरंजन व्हावं हाच त्यामागचा हेतू आहे. यामध्ये प्रेक्षकांना वेठीस धरलंय असं वाटत असेल तर थोडा संयम ठेवा. हा ट्रॅक लवकरच संपणार आहे.
तुझ्या लेखी एखाद्या मालिकेचं आयुष्य किती असावं?
– या प्रश्नाचं उत्तर मी दोन भूमिकांमधून देईन. दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून. दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं, मालिकेच्या कथेत जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ती सुरू राहावी. विनाकारण ती ताणू नये किंवा भरकटवूही नये. तर निर्माता म्हणून मी असं म्हणेन, की मालिका जोवर लोकप्रिय आहे, प्रेक्षक तुफान प्रतिसाद देतायत तोवर सुरुरू राहावी. याचं कारणही सांगतो. एक मालिका बंद झाली की त्यासोबत असलेलं शे-दोनशे जणांचं संपूर्ण युनिट बेरोजगार होण्याची शक्यता असते. त्यांचा आर्थिकदृष्टय़ाही विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे दुसरी एखादी मालिका सुरू होईपर्यंत आधीची संपू नये असं माझं प्रामाणिक मत आहे.
‘कुछ तो लोग कहेंगे’ ही तुझी पहिली हिंदी मालिका. साधारणपणे हिंदीत गेल्यानंतर पुन्हा मराठीकडे वळायला वेळ लागतो. तू मात्र हिंदीत एक मालिका करून लगेच मराठीकडे वळलास. असं का?
– खरं सांगू तर मला हिंदीत काम अजिबातच करायचं नव्हतं. कारण तिकडच्या कामाची पद्धत मी ऐकून होतो. पण, राजन शाही? यांच्या प्रॉडक्शन हाउसमधून बोलवलं आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मालिकेसाठी विचारलं. त्यांनी ‘वादळवाट’ ही मालिका बघितली होती. तसंच ते हिंदी मालिकेसाठी विचारताना म्हणाले की, माझ्या बाजासारखी ती मालिका आहे. हिंदीतल्या एखाद्या व्यक्तीने असं सांगणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. कमलेश पांडे यांच्यासारखे वजनदार लेखक त्या मालिकेचं लेखन करतात हे कळल्यावर मी त्या मालिकेबाबत विचार करू लागलो. मग मला मालिकेची कथा सांगितली. ती मालिका सोनी चॅनलवर सुरू होणार होती ही आणखी एक गोष्ट मला भावली. कारण मला नेहमीच सोनीच्या मालिकांबाबत कौतुक वाटत आलं आहे. वेगवेगळे विषय मांडण्याचं धाडस ते चॅनल नेहमी करतं. या सगळ्या कारणांमुळे मी ‘कुछ तो.’ मालिका केली. हिंदीत काम करत असूनही कधीच चॅनल किंवा निर्मात्याने हस्तक्षेप केला नाही. काम करताना त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. पण, ही मालिका झाल्यानंतर मी माझं स्वत:चं प्रॉडक्शन हाउस सुरू केलं. त्यामुळे त्यानंतर मराठीतच आलो.
मंदार देवस्थळी हे नाव मालिकांमध्ये सुपरहिट आहेच, पण सिनेमांच्या संदर्भात हे नाव फारसं बघायला मिळत नाही. याचं नेमकं कारण तुला काय वाटतं?
– खरं सांगू तर मला खरंच याचं नेमकं कारण माहीत नाही. प्रेमकथा असलेला सुबोध भावे, प्रसाद ओक आणि दीपा परब यांचा ‘क्षण’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, पण तो चालला का नाही हे अजूनही कोडंच आहे. तो सिनेमा चुकीच्या वेळी आला, हे त्यामागचं एक कारण असू शकतं; पण या जर-तरच्या गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे त्याबाबत विचार करण्यापेक्षा वर्तमान आणि भविष्यातल्या कामांवर अधिक लक्ष देणं मला महत्त्वाचं वाटतं. ‘क्षण’ या सिनेमानंतर माझ्याकडे चांगली कथा आलीच नाही किंवा कोणीही सिनेमा करण्याबाबत विचारलंही नाही. त्यामुळे सिनेमा केला नाही; पण सिनेमा करायचाच नाही असं ठरवलं नाही. मी स्वत: आता निर्मात्याच्या खुर्चीत बसलोय. त्यामुळे माझ्याच प्रॉडक्शन हाऊसचा एखादा सिनेमा असावा असं वाटतंय. एक-दोन कथांवर काम सुरू आहे. कदाचित वर्षभरात त्याबाबत घडामोडी घडतील.
‘होणार सून.’मधले सगळेच कलाकार नाटक करताहेत. मध्यवर्ती कलाकारांना इतकी सवलत देण्याची रिस्क वाटत नाही का?
– अजिबात नाही. आम्ही कला क्षेत्रात आहोत. प्रत्येक जण इथे क्रिएटिव्ह गोष्टींचा विचार करत असतो. मीही क्रिएटिव्ह माणूस म्हणूनच इथे विचार करतो. एखाद्या कलाकाराला चांगलं आणि वैविध्यपूर्ण काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आमच्या मालिकांमधल्या कलाकारांनी नाटकात काम करू नये, अशी आडमुठी भूमिका मी घेऊ शकत नाही. मालिकेला प्राधान्य द्या, शूटिंगच्या शिफ्ट्स सांभाळून नाटकांमध्ये काम करा, एवढंच माझं म्हणणं असतं. कलाकारही त्यासाठी सहकार्य करतात. लोकप्रिय कलाकार नाटक करत असेल तर नाटक करणाऱ्या निर्मात्याचाही फायदाच होतो. एकमेकांना समजून घेऊन अनेक गोष्टी साध्य होतात.

मराठीत वळलो, पण निर्माता म्हणून
मराठीमध्ये बजेटचा मुद्दा नेहमी येतो. ‘एवढय़ा बजेटमध्ये परवडत नाही’, ‘कमी पैशांमध्ये इतकंच होतं’, असं मी दिग्दर्शक असताना अनेकदा ऐकायचो. मला ते खटकायचं. कमी पैशांमध्येही नियोजन केलं तर खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण आणि मांडणी होऊ शकते, हा माझा मुद्दा असायचा; पण तेव्हा मी दिग्दर्शकाच्या भूमिकेत होतो त्यामुळे प्रत्यक्षात गोष्टी घडवून आणणं तितकंसं शक्य नसायचं. स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस असावं असं माझं आणि माझ्या बायकोचं स्वप्न होतं. ‘कुछ तो लोग कहेंगे’ संपल्यानंतर आणखी काही हिंदी मालिकांच्या ऑफर्सही आल्या होत्या. तेव्हाच प्रॉडक्शन हाऊसचे विचार डोक्यात सुरू होते. तसंच मराठीतला ‘परवडत नाही’ हा विचारच मला बदलायचा होता. त्यामुळे हिंदीत स्थिरावलो नाही. मराठीकडे पुन्हा वळलो, पण निर्मात्याच्या भूमिकेतून.

असेही अमराठीही चाहते
कोहिनूर हॉलमध्ये आम्ही श्री-जान्हवीच्या लग्नाचं शूटिंग करत होतो. तिथे एक काका आले. त्यांनी मला ‘इथे काय सुरू आहे, तुम्ही कोण’ वगैरे अशी विचारपूस केली. मी त्यांना सगळी माहिती दिली. नंतर ते मला म्हणाले की, ‘‘माझा आइस्क्रीमचा व्यवसाय आहे. या हॉलमध्ये लग्न असलं, की आइस्क्रीमची ऑर्डर माझ्याकडे असते. आज इथे बरेच कॅमेरे बघितले म्हणून विचारपूस केली. मी गुजराती आहे; पण आम्ही तुमची मालिका न चुकता बघतो. मला आणि माझ्या घरच्या सगळ्यांना तुमची मालिका खूप आवडते. गंमत म्हणजे माझी आणि माझ्या बायकोची ओळख बस स्टॉपवरच झाली होती. त्यामुळे आम्हा दोघांनाही ही मालिका खूप जवळची वाटते.’’ त्यांच्या या प्रतिक्रियेवरून मी सुखावलो.
चैताली जोशी

Story img Loader