‘आंबा उत्पादनाची बापट पद्धती’ हा लेख ‘लोकप्रभा’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यावर आलेल्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या या प्रतिक्रिया-

‘आंबा उत्पादनाची बापट पद्धती’ (‘लोकप्रभा’, ६ जून) हा वि. ज. बापट यांचा लेख वाचला. लेखकाने आंबा उत्पादनासाठी जी पद्धत सुचविलेली आहे तिला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या पद्धतीमुळे किती कलमांपासून किती वष्रे उत्पादन घेतले याचा उल्लेख नाही. इतरांना पद्धत सुचविण्याअगोदर स्वत: त्याचा किती अनुभव घेतला आहे या बाबतची माहिती लेखकाने दिल्याचे आढळत नाही. आंबा कलमांना मोहोर व अपेक्षित फलधारणा यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने होणाऱ्या नुकसानीला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याची सर्वप्रथम शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे. ‘आंब्यावर पडणारा काळपट-चिकट द्राव हे अस्मानी संकट असून याचा प्रादुर्भाव समुद्रसपाटीपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत जास्त जाणवतो’ असे लेखामध्ये नमूद केले आहे. प्रथमत: हे अस्मानी संकट नाही. असा त्रास फक्त किनारपट्टीच्या प्रदेशातच नसून संपूर्ण कोकणामध्ये दिसतो. त्यातही ज्या बागांची नियमित मशागत केली जात नाही त्या बागांमध्ये त्याचे प्रमाण जास्त असते. हा काळा चिकट पदार्थ आंब्यावर येतो तो तुडतुडय़ा या किडीमुळे व त्या किडी जो चिकट स्राव सोडतात त्यावर वाढणाऱ्या काळ्या बुरशीमुळे! कोकणा’ यालाच ‘खार’ पडणे असे म्हणतात.
गेल्या काही वर्षांमध्ये ‘कल्टार’ नावाच्या संप्रेरकाच्या वापरामुळे कलमांना जोर येऊन फळे येतात व त्यामुळे अशा गोष्टी होतात असे लेखकाचे म्हणणे आहे; परंतु ‘कल्टार’ न घातलेल्या कलमांमध्येही असे दिसते असे परस्परविरोधी मतदेखील लेखकाने व्यक्त केले आहे. यावरून लेखकाला वस्तुस्थितीची जाण तर नाहीच परंतु आंबा उत्पादन पद्धतीबाबतही विशेष माहिती नसावी असे दिसते. अशा शक्यता वर्तवून, अंदाजे उपाययोजना सुचविण्याएवढे कोकणातील आंबा उत्पादन तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आता राहिलेले नाही. कोणत्याही यशस्वी आंबा बागायतदाराबरोबर, विद्यापीठ किंवा आंबा तज्ज्ञांबरोबर चर्चा केली असती तर लेखकाला त्यातील त्रुटी सहजपणे समजल्या असत्या. असो. लेखकाने आंब्यावर येणाऱ्या कीड व रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच मोहोर येण्यासाठी आपल्या कल्पनाशक्तीवर आधारित काही उपाय सुचविले आहेत व त्यास ‘आंबा उत्पादनाची बापट पद्धत’ असे नाव दिले आहे. फवारणीमध्ये गोडय़ा तेलाचा उपयोग व कलमाच्या मुळांना कुडकुडविण्यासाठी २५ किलो बर्फाचा उपयोग या गोष्टींना शास्त्रीय आधार नाही. शिवाय बर्फाच्या लाद्या कोकणातील डोंगरांवर खर्चिक वाहतूक सोसून कशा नेणार? वास्तविक आंब्याला मोहोर येणे ही जमिनीतील आद्र्रता व वातावरणातील अनुकूल तापमान यावर अवलंबून असते व ती पूर्णत: जीवरासायनिक प्रक्रिया आहे.
आपले उपाय निरुपद्रवी, स्वस्त व कोणतेही दुष्परिणाम न करणारे आहेत असा लेखकाचा दावा आहे. फक्त निरुपद्रवी, स्वस्त व दुष्परिणाम न करणारे परंतु पुरेसे उत्पादन न देणारे किंवा उत्पादनाची शाश्वती न देणारे उपाय काय उपयोगाचे? कोकणातील हापूस आंब्याला इतिहास असून आंब्याची ही जात जगप्रसिद्ध आहे. मात्र या जातीचे असलेले एक वैगुण्य म्हणजे दर वर्षी फलधारणा न होणे. कोकणातील हापूस आंब्याची सरासरी उत्पादकता ही सुमारे दोन ते अडीच टन प्रति हेक्टरी इतकी अल्प आहे. या उत्पादनामध्ये आंबा बागायत किफायतशीर होत नाही. हापूस आंब्याला नियमित मोहोर येण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांच्या निष्कर्षांमधून पॅक्लोब्युट्रोझॉल म्हणजेच ‘कल्टार’ हे शाखीय वाढनिरोधक सवरेत्कृष्ट असल्याचे आढळले. या संशोधनाच्या निष्कर्षांनंतर कोकणातील अनेक बागायतदार या संजीवकाचा नियमितपणे सध्या वापर करीत आहेत. मात्र या संजीवकासंबंधी अनेक प्रकारचे गैरसमज जनमानसात आहेत, हे या लेखामधून दिसते.
हापूस आंबा हा बदलत्या हवामानात अत्यंत संवेदनशील आहे. विशेषत: ऑक्टोबर-नोव्हेंबरमधील हवामानात थोडा जरी बदल झाला- जसे की पावसाळा लांबला अथवा ढगाळ वातावरण दीर्घ काळपर्यंत राहिले तर हापूसला मोहोराऐवजी नवी पालवी येते. यासाठी कारणीभूत असते ते त्या झाडातील संजीवक जिबरेलिक अ‍ॅसिड. ‘कल्टार’ जिबरेलिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात तयार होऊ देत नाही. म्हणजे फळे येण्याच्या कालावधीत नवी पालवी न येण्यासाठी प्रयत्न करते. ‘कल्टार’विषयी शंका उपस्थित करताना त्यामागील शास्त्रीय कारण समजावून घेणे आवश्यक आहे. ‘कल्टार’ वापरामुळे नियमित फलधारणा होत असल्याने झाडांना त्या प्रमाणात खताची मात्रा वाढविणे गरजेचे ठरते. नाही तर ‘कल्टार’मुळे झाडावर विपरीत परिणाम होतो.
कोकणातील आंबा बागायत ही मुळातच कष्टमय बाब आहे. आंबा बागा बऱ्याच ठिकाणी डोंगरउतारावर असतात म्हणूनच आंबा बागायतीसाठी मशागतीच्या उपाययोजना सुचविताना त्यांच्या सुलभतेला प्राधान्याने महत्त्व दिले पाहिजे. कल्टारच्या उपयुक्त आहेच पण त्याच्या वापराची पद्धत अत्यंत सोपी आहे. कोकणामध्ये सध्या प्रतिवर्षी अंदाजे सुमारे ३० हजार लिटर पॅक्लोब्युट्रोझॉल वापरले जाते. पॅक्लोब्युट्रोझॉलची शिफारस ही ०.७५ मिली प्रति लिटर इतकी अल्प आहे. कोकणातील जमिनी निचऱ्याच्या असल्याने तसेच भरपूर पाऊस पडत असल्याने या संजीवकाचे अवशेष जमिनीत राहत नाहीत. कोकणामध्ये आंबा मोहोरण्याच्या व फलधारणेच्या कालावधीत म्हणजेच ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत सन २००० पासून सातत्याने काही बदल होत आहेत. पावसाळा लांबणे, थंडी दीर्घ काळापर्यंत टिकणे, थंडीमध्ये तीव्र चढ-उतार, तापमानामध्ये अचानक वाढ होणे, यामुळे कोकणामध्ये हापूस आंबा पिकावर विपरीत परिणाम झालेले आहेत. यापुढे बागायती किंवा जिराईत शेती ही विज्ञानावर आधारित केली नाही तर शेतीला तरणोपाय राहणार नाही याचे सर्वानी भान ठेवणे आवश्यक ठरेल.

Story img Loader