काहीही बोलतात हे लोक.. दक्षिणी साधेपाणाचे संस्कार असलेले लोक अशा रितीने स्त्रियांचा सामूहिक विनयभंग करतील? शक्यच नाही. या तर उत्तरेत घडणाऱ्या गोष्टी!

नवीन वर्ष दोन आठवडे जुनं झालं, तरी नववर्ष शुभेच्छांचा ओघ काही संपत नाहीए. नवीन वर्षांच्या स्वागत कार्यक्रमांच्या बातम्यांचाही ओघ अजून सुरूच आहे. या बातम्यांवरून लक्षात आलंच असेल तुमच्या, शुभेच्छांची खरी गरज मुलींनाच जास्त आहे. नवीन वर्ष सुख-समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे तर जावोच पण मुळात सुरक्षित जावो.. बी सेफ अशी शुभेच्छा प्रत्येक मुलीला देणं गरजेचं झालंय. खरं तर या शुभेच्छेबरोबर थोडी आणखी अक्कल तरुण मुलींना मिळो अशाही शुभेच्छा द्यायला हव्यात आता. थोडी अक्कल असती मुलींना आणि मुख्य म्हणजे शिस्त आणि त्यातूनही महत्त्वाचे संस्कार.. ते असते तर बंगळुरूसारखे प्रसंग ना घडते. बंगळुरूमध्ये काय झालं ते पोचलंच असेल एव्हाना सगळ्यांपर्यंत. या शहरातल्या एम.जी. रोड आणि ब्रिगेड रोड या उच्चभ्रू – तरुणाईच्या भाषेत हॅपनिंग – अशा भागात नववर्षांच्या स्वागतासाठी – म्हणजे मौजमज्जा करण्यासाठी ही झुंबड उडाली होती. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेल्या काही टोळक्यांनी अनेक तरुण मुलींचा विनयभंग केला. सामूहिक विनयभंग असं याचं वर्णन जगजाहीर झालंय. या प्रकारामुळे या आयटी सिटीची जगभर बदनामी झालीच, शिवाय त्यावर आपल्या काही नेत्यांनी उधळलेल्या मुक्ताफळांमुळे आणखी नाचक्की झाली.

भारतातलं एक चांगलं शहर उगाच बदनाम झालं या सगळ्यात. दिल्लीशी बरोबरी करायला लागले हे लोक बंगळुरूची. उत्तर भारतीय माज कुठे आहे हो आमच्या दक्षिणेत? आणि आमचे दक्षिणी साधेपणाचे संस्कार मुळात असे बाहेरख्यालीपणाला कधीच मान्यता देणारे नाहीत. उद्यानांचं इटुकलं शहर अशी एके काळी ओळख होती या कानडी राजधानीची. लोक बंगलोरला पर्यटनाला जायचे म्हणे. आजच्या जनरेशनला तर ते आयटी सिटी म्हणूनच माहिती. भारतातलं एक कॉस्मोपॉलिटन अर्थात मिश्र संस्कृतीचं आधुनिक शहर अशी ओळख होत असताना हे काहीतरी बायकांनी रान उठवलं. म्हणे शहर सेफ नाही. कसं असणार? नको ते उद्योग केल्यावर असं कुठलंच शहर सेफ उरत नाही. आपल्या देशातलं तर नाहीच नाही. आपला देश काही पाश्चिमात्य उत्तानपणाची संस्कृती जोपासणारा नाहीये. आपल्या देशाला उच्च दर्जाची पारंपरिक अशी एक उदात्त, उत्तम संस्कृती आहे. ती पाळणाऱ्यांना आपण असे सेफ बिफ नसल्याचा प्रश्न पडतच नाही कधी. शहर सेफ नाही म्हणणाऱ्या मुली उत्तर भारतीयच असल्या पहिजेत, असा काही पिढीजात बंगळुरूवासीयांचा दावा आहे म्हणे. असेलही त्यांचं खरं. आपल्या महाराष्ट्रात नाही का परप्रांतीयांनी विशेषत: उत्तर भारतीयांनी हैदोस घातलाय! तर मुद्दा होता मुलींच्या सेफ्टीचा.

आता कशाला मुलींनी असं रात्री-अपरात्री बाहेर पडावं घराच्या? नवीन वर्षांचं स्वागत घरात बसून करता येत नाही की काय.. मुळात मुलींनी बाहेरच कशाला पडावं? त्या बाहेर पडणार मग तरुणांचं लक्ष वेधलं जाणार, खरं तर बिचाऱ्यांचं लक्ष विचलित होणार आणि मग काही थोडं इकडे तिकडे झालं की पुन्हा या बायका बोभाटा करणार. कसं आहे.. तरुण वय आहे, या अशा गोष्टी तरुणांकडून होणारच ना! साक्षात नेताजींनी म्हणून ठेवलंय असं दोन वर्षांपूर्वी – ‘बलात्कारासारख्या गुन्ह्य़ात तरुण मुलांना सुळावर लटकवायची गरज नाही. मुलं आहेत ती.. शेवटी, त्यांच्या हातून चुका होणारच!’ (हे नेताजी ते इतिहासातले नेताजी सुभाषचंद्र बोस नव्हे, हे तर समकालीन उत्तर प्रदेशीय नेताजी.) अबू आझमी म्हणतात तेही खोटं नाहीच म्हणा – पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावातून असं घडतं. मुली पाश्चात्त्य कपडे घालतात, अंगप्रदर्शन करतात आणि मुलांना आयतं निमंत्रणच देतात ना. कर्नाटकचे गृहमंत्रीदेखील हे सांगतात. मुलींनी असे उत्तान कपडे घालणं, वर अशा कपडय़ांत  बाहेर जाणं योग्य नाही. मुलींवर संस्कार आहेत की नाही? बाहेरच जायची हौस असेल तर किमान आपल्या कुटुंबासमवेत जावं. विशेषत: कुटुंबातील भाऊ-वडील अशा पुरुषांसोबतच बाहेर पडावं. म्हणजे थोडी काळजी कमी होईल, असंही आपले नेते म्हणतात.

बंगळुरूला बदनाम करण्यात परकीय शक्तींचा हात आहे. त्यांनी आक्रस्तळ्या स्त्रीवाद्यांना हाताशी धरून हे उद्योग केलेत, अशा अर्थाची एक पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती.  खरं वाटतं हे आम्हाला. अहो कारण, असं रात्री-बेरात्री बाहेर पडल्यावर.. तेही रस्त्यावर भर बेधुंद गर्दीत असे छोटे कपडे घालून गेल्यावर कुछ तो होगा ही. म्हणजे पुरुष माणसं इथे तिथे हात लावणार, मुद्दाम धक्का मारणार. शेवटी पुरुषच ना ते.. याची मुलींना एव्हाना सवय व्हायला हवी. लगेच काय मास मॉलेस्टेशन म्हणायचं की काय. थोडं सहन करायचं अन् काय.. यात खरा दोष स्त्रियांचा. हल्ली अहो स्त्रियाही दारू प्यायला लागल्यात. नाचतात काय, परपुरुषांबरोबर पार्टीला जातात काय.. अशा बायकांबरोबर दुसरं काय होणार? हे सगळं तिकडे पाश्चिमात्य देशात चालेल म्हणावं. इथे आमची संस्कृती चालणार.

गेल्या आठवडय़ात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी झाली. गुगलने खास डुडल तयार करून त्यांना आदरांजली वाहिली. आम्हाला अभिमान आहे सावित्रीबाईंच्या कामाचा. पण त्यांनी स्त्रीशिक्षणाचं लावलेलं रोपटं आता जरा जास्तच फोफावलंय. रान माजलंय आता. या शिक्षणाच्या जोरावर तर बाई बाहेर पडली, नोकरीला लागली, एकटी फिरायला लागली. मन मानेल तसे पाश्चिमात्य तंग कपडे घालायला लागली. संस्कृती, मर्यादा, परंपरा सगळं काही वेशीला टांगलं गेलं त्यामुळे. हे जे असं वाईट-साईट घडतंय ना समाजात त्यामागे हेच आहे हो सगळं! मुलगी डोईजड होईल एवढं शिक्षण देऊच नये मुलींना हे खरं!

आता आपल्या लोणावळ्याजवळच्या विसापूरजवळ काय झालं माहिती आहे का.. असंच पाश्चात्त्यांचं अंधानुकरण आणि मग अस्सा चोपलाय एकेकाला समस्त ‘दुर्गप्रेमीं’नी! गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा, आमच्या शिवरायांनी बांधलेल्या गडकोटांचा! (गर्व आणि अभिमान हे वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत का हो.. ते जाऊ दे. आम्हाला गर्वच आहे! आम्ही गर्वच म्हणणार.) या गटकोटांवर पार्टी करायला आलेल्या परप्रांतीयांना स्थानिकांपैकी काही दुर्गप्रेमींनी जाब विचारला आणि चोप दिला. आता इतर वेळी सगळ्या किल्ल्यांच्या, डोंगरांच्या ठिकाणी दारूपाटर्य़ा चालतात यालाही आमचा आक्षेप आहेच. पण मराठी माणूस असा कमी कपडय़ांतील बायकांना घेऊन पार्टी करत नाही. शेवटी आमच्यावर मराठी मातीचे संस्कार आहेत. त्या ग्रूपमधील लोक सांगत होते म्हणे की, आम्ही दारू प्यायलेली नाही, आम्ही फॅमिलीवाले आहोत. मग छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चार प्रश्न विचारले त्यांना. स्थानिक बायकांनी विचारलं लगेच त्यांच्यातल्या स्त्रियांना-कुठंय मंगळसूत्र, कुठंय कुंकू.. लग्न झाल्याचा पुरावा द्यायला नको का? या तथाकथित फॅमिलीवाल्या बायकांकडे कुठे होता हा पुरावा.. या दुर्गप्रेमी स्त्रियांनी दिला मग त्यांनाही चोप. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली भाषा माहिती नाही या श्रीमंती धेंडांना.. आले आहेत पाटर्य़ा करायला आणि कॅम्पिंग करायला म्हणे आमच्या किल्ल्यांवर. हे कसं खपवून घ्यायचं? शेवटी संस्कार महत्त्वाचे!

थोडक्यात पण महत्त्वाचं-समाजसुधारणा करायची असेल तर स्त्रीनं संस्कारी असलंच पाहिजे. घराचा उंबरठा ओलांडलेली स्त्री वाईटच. पारंपरिक कपडे घालून घरातील पुरुषाची वाट बघत रांधा वाढा, उष्टी काढा करण्यातच तिचं भलं आहे. बाहेरचं जग हे निधडय़ा छातीच्या पुरुषांचं. उगाच शिकून सवरून बाईला शिंग फुटली की, अशी आमची शहरं बरबाद होतात. स्थानिक परंपरा, भाषा याचा आदर करायला हवा आणि यातही स्त्रियांनीच पुढाकार घ्यायचा. त्यांनी मुळात आपला प्रांत, आपलं घर सोडून जाताच कामा नये. सगळा समाज सुधारेल. सगळे गुन्हे कमी होतील. इडा पीडा टळेल. आमेन!

अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader