हे वर्ष कुणी गाजवलं, कुणामुळे लक्षात राहिलं याची यादी मोठी आहे. पण अनेकांना व्यक्त व्हायला भाग पाडणाऱ्यांमध्ये होत्या- हिलरी क्लिंटन, जयललिता, साक्षी मलिक आणि पी.व्ही. सिंधू, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण अशा किती तरी जणी..

वर्ष संपायला आता केवळ काही तास बाकी आहेत. हे वर्ष कसं होतं, हे आठवायला लावायचं काम पूर्वी वर्तमानपत्रं करायची, वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी वार्षिकं काढली जायची. अजूनही निघतात वार्षिकं, पण आता इंटरनेटमुळे आणि त्याहीपेक्षा समाजमाध्यमांमुळे एका झटक्यात सगळं वर्ष झर्रकन डोळ्यापुढून जातं. अगदी पर्सनलाइज्ड, खासगी आयुष्यातल्या, ठेवणीत जपून ठेवायच्या आठवणींपासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींपर्यंत.. वर्षभरातील सगळ्या गोष्टींचा दाखला झटक्यात मिळतो इथे. या घडामोडींमधलं काय भावलं, काय टोचलं आणि कशाचं कौतुक वाटलं, एक स्त्री म्हणून काय खटकलं, ते ‘मनमुक्ता’च्या निमित्ताने वेचताना जाणवलं- बंद दारं किलकिली होताहेत, व्यक्त व्हायला माध्यमं सापडताहेत आणि विचार मुक्त होताहेत..

हे वर्ष कुणी गाजवलं? कुणामुळे लक्षात राहिलं याची यादी मोठी आहे. पण अनेकांना व्यक्त व्हायला भाग पाडणाऱ्यांमध्ये होत्या- हिलरी क्लिंटन आणि जयललिता, साक्षी मलिक आणि पी.व्ही. सिंधू, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण अशा किती तरी जणी.. शनिशिंगणापूर आणि हाजी अलीतील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा, पिंक आणि पाच्र्डसारखे सिनेमे अशा किती तरी विषयांनी २०१६ हे वर्ष गाजवलं. वर्षांची सुरुवातच झाली होती स्त्रियांच्या मंदिर- दर्गाबंदीच्या चर्चेने. वर्षभरात त्यावर बराच खल झाला आणि स्रीच्या तथाकथित पवित्र असण्याचे दाखले दिले गेले. शेवटी एकदाचा प्रार्थनास्थळांवर प्रवेश मिळालादेखील! पण यानिमित्ताने धार्मिकतेतील भेदाभेद चव्हाटय़ावर आले. चर्चिले गेले. पावित्र्याचा आणि ती सिद्ध करण्याचा स्त्रियांनी घेतलेला मक्ता पुन्हा एकदा समोर आला. या सगळ्यावर चर्चा होऊ शकली आणि उलटसुलट का होईना, पण प्रतिक्रिया उमटू शकल्या याचं क्रेडिट समाजमाध्यमांना द्यायलाच हवं. व्यक्तव्हायला माध्यमं अर्थातच इंटरनेटमुळे खुली झाली आहेत. पारंपरिक माध्यमांचं एकतर्फी ‘देणं’ त्यामुळे कधीच बंद पडलंय. अर्थात यामुळे छुपा अजेंडा पेरला जाणं थांबणार नाही, हे नक्की. पण तो छुपा आहे हे सांगायला आपल्याही हाती माध्यम असेल हे खरं. २०१६ च्या वर्षांत स्त्रियांचं जगणं बदललं का.. तर ते असं एका वर्षांत बदलणारं नसतंच कधी. पण स्त्रियांना विचार करायला लावणाऱ्या, स्त्रियांचा विचार करणाऱ्या आणि व्यक्ती म्हणून स्त्रियांना समान वागणूक द्यायला लावणाऱ्या काही घटनांना, काही वक्तव्यांना आणि मोहिमांना या वर्षांत मोठी प्रसिद्धी मिळाली. यात सोशल मीडियाचा मोठा हात होता. सोशल मीडियाने जन्म दिलेल्या दोन नव्या संकल्पना या बाबतीत खूप महत्त्वाच्या ठरल्या- ट्रेण्डिंग आणि ट्रोलिंग.

लिंगभेद असा एका वर्षांत मिटणारा नाहीच, कारण याचे अनेक आयाम आहेत. पण एक व्यक्ती म्हणून मला समान अधिकार मिळायला हवेत, असं वाटणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत गेल्या वर्षभरात वाढ झाली असेल तर हेसुद्धा मोठं यशच म्हणायला हवं. हे काम केलं या नवमाध्यमातील हॅशटॅग तंत्राने. यामुळे ‘ट्रेण्डिंग’ला महत्त्व आलं. सोशल मीडियाच्या जगात एखादी नवी कल्पना, नवी मोहीम, संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवायची असेल किंवा त्यावर व्यक्त व्हायचं तर हॅशटॅग वापरला जातो. स्त्रीवादाचा पुरस्कार करणारे असे किती तरी हॅशटॅग वर्षभरात प्रसिद्ध झाले. या हॅशटॅगमधून काही नवीन संकल्पनांचा जन्म झाला तर काही जुन्या बुरसटलेल्या संकल्पनांवरची बुरशी झटकली गेली. या हॅशटॅग मोहिमांनी स्त्रीवाद्यांसाठी एक मोठं काम सोपं केलं- ते म्हणजे आम्ही स्त्रीवादी आहोत असा डंका न पिटता तरुण पिढीशी जोडून घेण्याचं. स्त्रियांचं स्टीरिओटाइपिंग कमी करण्यासाठी, स्त्रीकडे व्यक्ती म्हणून बघण्यासाठी दृष्टी साफ करण्याचं हे काम हॅशटॅगमुळे सोपं झालं. ट्विंकल खन्नानं प्रसिद्ध केलेला ‘मॅरिड नॉट ब्रॅण्डेड’ हा हॅशटॅग हे त्याचं उत्तम उदाहरण. ट्विंकल ही एके काळची अभिनेत्री आता लेखिका, सोशल मीडिया पर्सनॅलिटी म्हणून प्रसिद्ध होतेय. अक्षयकुमारशी लग्न करूनदेखील ती आजही खन्ना आडनाव का लावते, याबाबत तिला सोशल मीडियावर छेडलं गेलं. प्रश्नकर्त्यांला उत्तर देताना तिनं ‘मॅरिड नॉट ब्रॅण्डेड’ हा हॅशटॅग वापरला. एका प्रथेला विचारपूर्वक नाकारण्याची तिची पद्धत अनेकांना भावली आणि हा हॅशटॅग प्रसिद्ध झाला. अनेक जणी त्यावर व्यक्त झाल्या.

‘व्हाय लॉयटर’ हा एक हॅशटॅग आणि त्यानिमित्ताने एक जुनी मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आणली ती सोशल मीडियामुळे. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांतील महिला या ‘व्हाय लॉयटर’ मोहिमेत हिरिरीने सामील झाल्या. ‘सातच्या आत घरात’च्या संकल्पनेला सुरुंग लावण्याचं काम तर त्यांनी केलंच. पण एक व्यक्ती म्हणून मलादेखील कुठल्याही वेळी कुठल्याही कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी भटकण्याचं स्वातंत्र्य आहे आणि हे असं वागणं म्हणजे गुन्हा नाही, हे सांगणं त्यामागचा उद्देश. रात्री रस्त्यांवर दिसणाऱ्या मुलींची संख्या वाढली तर बघणाऱ्या समाजाला त्याची सवय होईल आणि आपोआप दृष्टी साफ होईल. स्त्रियांसाठी सुरक्षित शहर निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे. या अशा भटकण्यातून अनेक मुलींना एक आत्मविश्वास, स्वातंत्र्याची जाणीव मिळाली ती वेगळीच. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेची या वर्षांत अनेक परदेशी माध्यमांनीही दखल घेतली ती ट्रेण्डिंग हॅशटॅगमुळे!

वर्षभरातील सगळ्यात गाजलेला हॅशटॅग होता #रिओ २०१६. यंदा भारताला ऑलिम्पिक पदकतक्त्यात स्थान मिळालं ते केवळ स्त्रियांमुळेच. पी. व्ही. सिंधू ही या वर्षीची सर्वाधिक वेळा ‘गुगलसर्च’ केली गेलेली खेळाडू ठरली. ‘इंडियन गर्ल्स अ‍ॅट रिओ’ हा हॅशटॅग मुलींनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं यश साजरं करणारा होता. पदक न मिळवताही जिंकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकर असो वा कुस्तीसारख्या पुरुषी खेळात वर्चस्व गाजवत पदत मिळवणारी साक्षी मलिक असो. अनेकांना प्रेरणादायी ठरणारं यश त्यांना मिळालं आणि स्त्रियांविषयीचा एक बुरसटलेला विचार मागे पडला.

स्त्रियांना ठरावीक साच्यात अडकवणाऱ्या ठोकताळ्यांवर इतर माध्यमांमधूनही हल्ला झाला. ‘पिंक’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘नो मीन्स नो’ हा हॅशटॅग गाजला. स्त्री नाही म्हणते तेव्हा त्याचा अर्थ फक्त नाही असाच असतो. तो तिचा अधिकार आहे, हे बिंबवणारा हा चित्रपट त्याच्या आशयामुळे गाजला. अमिताभ बच्चन हे स्टार व्हॅल्यू असलेलं नाव गाजलं तितकाच हा आशय गाजला हे महत्त्वाचं. भारतीय चित्रपट, मालिका, नाटकं यातून स्त्रियांना कित्येक र्वष साचेबद्ध भूमिका करायला लागत होत्या. या वर्षभरात अशा अनेक चित्रपटांमुळे चित्र बदलताना स्पष्ट दिसलं. नायिकेला गृहीत धरणं कमी झालं. नायिकेचा होकार मिळालाच पाहिजे हा अट्टहासदेखील हिंदी चित्रपटाच्या नायकाने सोडला (ए दिल है मुश्कील) हा मोठा बदल म्हणायला हवा. परदेशातील भारतीय सेलेब्रिटी म्हणून हे वर्ष गाजवलं ते प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांनी. भारतीय स्त्रीची जगापुढे असलेली एकच एक प्रतिमा पुसून टाकण्याचं मोठं काम त्यांनी केलंय. सौंदर्यस्पर्धामधील यशामध्येदेखील ठोकळेबाज उत्तरं देणाऱ्या स्त्रिया अशी ओळख होत असतानाच या सौंदर्यस्पर्धा गाजवलेल्या दोघी जणी जाणीवपूर्वक प्रतिमा बदलत हॉलीवूडमध्ये स्थान मिळवू पाहात आहेत.

स्त्री म्हणजे दुय्यम हा दृष्टिकोन इतका भिनलेला आहे आणि समाजात आतापर्यंत झिरपला आहे की, तो असा सहजासहजी बदलणं अशक्यच. पण त्या दृष्टीने बदल नक्कीच झाले. त्याचं स्वागत करायला हवं. स्त्रियांना समान वेतन, मानधन मिळायला हवं यासाठी बोललं गेलं. त्या दृष्टीने पुन्हा एकदा दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, विद्या बालन या अभिनेत्रींची नावं चर्चेत आली आणि त्यांना न्याय मिळालादेखील. सरत्या वर्षांनं स्त्रीला काय दिलं तर – सकारात्मक बदलांविषयी आशा नक्कीच दिली, असं म्हणता येईल. कंपनीच्या संचालक मंडळात किमान एक स्त्री आणण्याबाबतचा नियम अजून आपण पाळू शकलो नाही, उद्योगांच्या मोठय़ा पदांवर असणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढण्याऐवजी कमीच झाल्याचं एक अर्थविषयक विश्लेषण सांगतं. बलात्कार, अत्याचार, घरगुती िहसाचार यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. पण तरीही थोडे आशेचे किरण नक्कीच या वर्षांने दिलेले आहेत. या किरणांनाच अधिक ऊर्जा मिळो आणि पुढलं वर्ष आणखी प्रकाशमान होवो याच शुभेच्छा!

अरुंधती जोशी @aru001

response.lokprabha@expressindia.com

 

Story img Loader