पॅरिसमधील दहशतवाद्यांनी केलेल्या बेधुंद आणि अमानुष हल्ल्याच्या बातमीने सगळे जग हादरून गेले. मुंबईकरांना २६/११ चा मुंबईवरचा हल्ला डोळ्यासमोर जशाचा तसा उभा राहिला. त्याचबरोबर ७/११ चे बॉम्बस्फोट, १९९३ सालापासून शहरात वेगवेगळ्या वेळी झालेले बॉम्बस्फोट आठवले आणि अनेकांच्या अंगावर शहारा आला. मृत्यूचे थैमान, त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश, लोकांची पळापळ, जखमींच्या वेदना, माध्यमांमधून आलेली वर्णने, चर्चा आणि पुढचे अनेक दिवस एक अनामिक भीती या साऱ्याचा पुन्हा अनुभव घेतो आहोत असे वाटले.
निरपराध लोकांचे सहजी बळी घेणारा हा दहशतवाद समाजाच्या मनावर खूप खोलवर परिणाम करतो. किंबहुना भीती निर्माण व्हावी, समाजजीवन विस्कळीत व्हावे आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडावे असाच अशा दहशतवादी हल्ल्यामागे उद्देश असतो. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या हिंस्र हल्ल्यांमुळे होणारे मानसिक परिणाम जाणून घेणे गरजेचे बनले आहे.
दहशतवादी हल्ला हा अत्यंत नियोजनबद्ध, थंड डोक्याने, जाणूनबुजून लोकांना मारण्यासाठी केलेला असतो. अशा हल्ल्यामुळे जे मृत्युमुखी पडतात, त्यांचे नातेवाईक, जे जखमी होतात ते, जे साक्षीदार असतात ते अशा सर्वांवर प्रत्यक्ष अनुभवामुळे मानसिक परिणाम होतो. तसेच शहरातील इतर भागांमधील लोक, बातम्या वाचणारे किंवा बघणारे इतर ठिकाणचे लोक यांच्यावर अप्रत्यक्ष परिणाम होतो. उदा. आपल्याकडे ७/११ च्या रेल्वेतील बॉम्बस्फोटातील मृतांची कुटुंबे, जखमी प्रवासी, त्या ट्रेनमधील इतर प्रवासी हे सगळे प्रत्यक्ष परिणाम भोगणारे, तर लोकलने प्रवास करणारे सगळेच प्रवासी, मृतांचे सहकारी, मित्र इ. हे अप्रत्यक्ष परिणाम भोगणारे. प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी असलेल्यांना अर्थातच खूप धक्का बसतो, प्रचंड भीती निर्माण होते, एकदम असुरक्षित वाटते. झालेली हानी स्वीकारणे सुरुवातीला कठीण जाते. झोप लागेनाशी होते. छोटय़ाशा गोष्टीनेही दचकायला होते. मनात सतत भीती राहते, छातीत धडधडते, हातपाय थरथरतात, घाम फुटतो आणि गर्भगळीत व्हायला होते. पुढचे अनेक दिवस किंवा महिने ती भीती कायम राहते. अनेकांना झालेल्या घटनेची पुन:अनुभूती होत राहते. घडलेल्या घटनेचे दृश्य डोळ्यासमोर येत राहते. कधीकधी त्या प्रसंगाचे भास होतात. याउलट काही जण कोशात गेल्याप्रमाणे एकटे बनतात, जवळच्या नातेवाईकांशीसुद्धा संपर्क आणि संवाद तोडतात. भावनांचा एक बधिरपणा ते अनुभवतात. याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (post-traumatic stress disorder-PTSD) असे म्हणतात. अनेक वर्षे असा त्रास भोगणारे रुग्ण सापडतात. याचबरोबर अतिचिंता (anxiety), उदासीनता (depression) यांचाही अनेकांना सामना करावा लागतो. निराशा वाटणे, आयुष्यातील इतर तणावपूर्ण घटना, पूर्वी मनावर झालेला आघात, संकटाशी सामना करण्याची अपुरी क्षमता, संकटापासून पळ काढण्याची वृत्ती अशा गोष्टी दहशतवादी हल्ल्याचा अधिक खोलवर परिणाम करतात. आपल्या वृत्तीतील चिवटपणाची (resilience) परीक्षाच असते. जर या आपत्तीला तोंड देता आले नाही तर व्यसनांचे प्रमाण वाढते. दैनंदिन जीवनातील असुरक्षिततेची भावना आणि भविष्यातील संभाव्य हल्ल्यांची भीती यांचा खोल परिणाम होतो.
दहशतवादी हल्ल्यामध्ये शारीरिक जखमांबरोबरच मानसिक व्रणांवर उपचार करणे खूप महत्त्वाचे असते. अशा प्रसंगानंतर लगेचच ‘मानसिक प्रथमोपचार’ उपयोगी पडतात. पीडितांचे दु:ख आणि अनुभव लक्षपूर्वक ऐकून घेणे, त्यांच्या त्या वेळच्या समस्यांवर उपाय सुचवणे, त्यावेळच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे यातून मानसिक आधार मिळतो. त्यानंतरच्या काळात गटागटात मानसोपचार दूरगामी परिणाम कमी करण्यास मदत करतात (debriefing). यामध्ये एकमेकांचे अनुभव ऐकणे, आवश्यक ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे, आपल्या भावना व्यक्त करायला मदत करणे असे तंत्र वापरले जाते. PTSD, अतिचिंता, उदासीनता असलेल्यांना औषधे तसेच मानसोपचार करावे लागतात.
दहशतवादाचे समाजावर झालेले मानसिक परिणाम दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहेच, परंतु त्याचबरोबर दहशतवादच निर्माण होऊ नये यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे. याकरता दहशतवादींची मानसिकता समजून घ्यावी लागेल. बहुतेकदा किशोरावस्थेतील गोंधळलेल्या मन:स्थितीतील, स्वत:ची ओळख शोधणाऱ्या मुलांना दहशतवादाचे आकर्षण वाटते. राजकीय आणि धार्मिक प्रभाव कमी झालेले गट माणसातील भावनिकतेचा, संतापाचा, निराशेचा उपयोग करून घेतात. आपल्या धर्मविचाराचा किंवा राजकीय विचाराचा पराभव होतो आहे अशा भीतीने अनेक जण एकत्र येतात आणि हिंसक मार्गाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले पाहिजे असा विश्वास त्यांना वाटू लागतो. हे करताना विविध प्रकारची प्रलोभनेही दाखवली जातात. आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्टय़ा दुर्बळ व्यक्ती अशा विचारधारेशी पटकन जोडल्या जातात. दहशतवादाच्या प्रशिक्षणामध्ये नैतिकतेची संकल्पना आणि सहवेदना या गोष्टी नष्ट केल्या जातात. हिंसक कारवायांना प्रोत्साहन दिले जाते आणि कौतुकाची थापही दिली जाते. अशा पद्धतीने एक हिंस्र दहशतवादी तयार होतो.
शरण आलेल्या दहशतवाद्यांमध्ये काही प्रमाणात शास्त्रीय संशोधन झाले आहे. दहशतवादाकडून परतीचा प्रवास करताना अशा व्यक्तीला वास्तव आणि त्यांचे खोटे स्वप्न यातील विरोधाभास दाखवून द्यावा लागतो. अतिरेकी आणि एकांगी धर्मविचार किंवा राजकीय विचार यातून बाहेर पडण्यासाठी संतुलित विचाराशी ओळख करून द्यावी लागते. आपणा सर्वाना जोडणाऱ्या ‘माणूस’पणाची पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागते. हे सगळे करण्याची प्रक्रिया अर्थातच सोपी नाही. वैचारिक पातळीवर परिवर्तन घडवून आणणे, त्यांच्या मनातील तीव्र भावनांचा निचरा करणे आणि सामाजिक आधार निर्माण करणे अशा सर्व बाजूंनी दहशतवादी व्यक्तीच्या पुनर्वसनाचा विचार करावा लागतो. समाजातील एक गंभीर आणि वाढती समस्या म्हणून दहशतवादाकडे पाहण्याची वेळ आली आहे हे खरेच, पण त्याबरोबरच मानसिक सामथ्र्य वाढवणे आणि सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलणे महत्त्वाचे बनले आहे.
डॉ. जान्हवी केदारे – response.lokprabha@expressindia.com