धावतपळत विमानतळावर पोहोचले. वाटले आपल्याला उशीरच झाला, पण पाहिले तर विमान अनिश्चित काळपर्यंत उशिरा सुटेल अशी सूचना लावली होती. मला धक्काच बसला. आधीच रात्रीचे ९ वाजले होते. ‘आता कधी सुटणार माझी फ्लाईट? कधी घरी पोचणार? उद्या सकाळी पुन: धावपळ आहे, ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचले पाहिजे.’ एक ना दोन. अनेक विचारांनी मनात गर्दी केली. मग राग येऊ लागला. ‘हे एअरलाइन्सवाले काय झोपा काढतात का? असा कसा अनिश्चित काळपर्यंत उशीर असू शकतो? बेजबाबदारपणाची हद्द झाली.’ तेवढय़ात एक अधिकारी माणूस आला. त्याने सर्वाची माफी मागितली. एक मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले आणि निदान तीन तास लागतील असे म्हणाला. झाले. सगळ्यांनी नुसता त्याच्यावर हल्लाच चढवला. त्याला शिव्यांची लाखोली वाहायलाही काही जण सरसावले, एक जण बाह्य सरसावतच पुढे आला. मीसुद्धा अस्वस्थ होऊन, स्वत:च्या नशिबाला दोष देत चुळबुळ करत एका खुर्चीत बसले. शेजारी पाहिले. एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन बसली होती. तिने खाऊचा डबा उघडला. गोष्ट सांगत मुलाला भरवले, लगेचच झोपवले आणि मग चक्क स्वत: खाऊन, प्रार्थना करून जमिनीवर आडवी झाली. पुढच्या पाच मिनिटांत ती गाढ झोपली होती. विमानाची घोषणा झाली तेव्हा ती चटकन उठली, मुलाला उचलले आणि निघाली. तिच्याकडे पाहूनच मला शांत वाटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा