lp66सिनेमातली भूमिका छोटी असली तरी काही कलाकार आवर्जून ती करतात. कारण त्या प्रसिद्धीच्या बळावर पुढे मिळणाऱ्या वेगवेगळय़ा ‘सुपाऱ्या’ त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या अर्थसंकल्पाचा आलेख एकदम उंचावर नेतात.

जेमतेम नावारूपास आलेल्या एका ‘मराठी तारके’ ने आपला रोजचा हट्ट सोडला नाही. लागोपाठ दोन ‘तरुण मराठी चित्रपटा’चे सुख व्यक्तिमत्त्वात भिनलेल्या दिग्दर्शकाला तिने सकाळी उठल्याबरोबरच ‘कसे आहात? शुभ सकाळ. मला तुमच्या नवीन चित्रपटातून भूमिका साकारायला नक्कीच आवडेल. भूमिका छोटी असली तरी चालेल’ असा भ्रमणध्वनीवर शुभसंदेश पाठवला. हा दिग्दर्शक मुंबईपासून दुबईपर्यंत कुठेही/कधीही/केव्हाही असतो. त्याच्या सिनेमात काम मिळणे हे अनेकींना महत्त्वाचे वाटते. नायिकेचे नसले म्हणून काय झाले? दुसऱ्या वा तिसऱ्या नायिकेची भूमिका गटवता/ पटवता येऊ शकते. त्या प्रबळ इच्छेवरच तर आता कुठे चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या अनेकजणी आटापिटा करतात. म्हणूनच तर एखादी म्हणते की, माझ्या कामाचे मानधन दिले नाही तरी चालेल, इतकेच नव्हे तर मी माझी नवीन युगाची वस्त्रे घेऊन सेटवर येईन, मला तुमच्या चित्रपटातून काम करून नाव कमवायचे आहे. ते मला चढत्या दराची ‘सुपारी’ सातत्याने देण्यात उपयोगी पडेल.. सध्या हा विनोद मराठी चित्रपटसृष्टीत खूप उत्साहाने पसरतो आहे.
याच्या नेमकी उलटी चाल असणाराही एक विनोद आहे. एक झटपट चित्रपट निर्मिती करणारा दिग्दर्शक कोठेही, कोणताही कलाकार भेटला रे भेटला की त्याला म्हणतो, माझ्या पुढच्या चित्रपटात तुला साजेशी भूमिका आहे, फक्त चार दिवस दे मला. माझा चित्रपट जगातील दोन-चार महोत्सवांतून दाखवला जाईल. तुलाही काही पुरस्कार मिळतील, प्रसिद्धीही खूप खूप मिळेल आणि या बेरजेच्या गणितामुळे तुला मोठय़ा प्रमाणावर ‘सुपारी’ देखील मिळेल. वाढत्या ‘सुपारी’मुळे तू मुंबईत भले मोठे घर, एक चकाचक गाडी, तीन मोबाइल असे सगळे वर्षभरात मिळवशील. तेव्हा एक चांगली गुंतवणूक म्हणून माझ्या चित्रपटातून भूमिका कर.
सिनेमाच्या जगात कुचाळक्या सुरू झाल्या की, त्यातून नेमके काय जन्माला येईल, कशा/कोणत्या कथा-दंतकथा अफवा-किस्से जन्माला येतील हे काहीही सांगता येत नाही.
ते काहीही असो, सध्या अभिनयाच्या मानधनापेक्षा ‘लोकप्रियतेची सुपारी’ भरपूर आर्थिक सुख देत आहे. त्यासह थोडीशी मानसिक/ शारीरिक/ भावनिक दमछाक होते हो, पण एकदा का स्वत:ची लोकप्रियता विकायची सवय (व आवडही) लागली की कशाचे काहीही वाटत नाही. आणि आर्थिक बळ हे जगण्याचे साधन झाले असेल तर, नाव कमवा, नाव विका, हे साध्य करावेच लागते. कसदार भूमिका, मानाचे पुरस्कार हे आपल्या वाटेने जातच असतात. बरं, अख्ख्या कारकीर्दीत आपल्या वाटेला मोजून दोन-तीन आव्हानात्मक भूमिका येतात (अथवा याव्यात. ऐवीतेवी तशा गंभीर अभिनयासाठी मुक्ता बर्वे, वीणा जामकर, सोनाली कुलकर्णी- सीनियर, काही प्रमाणात तेजस्वीनी पंडित आहेतच की) आणि पारितोषिकांचे म्हणाल तर वर्षभर त्याचा खेळ मांडला जातो. कुठे तरी एखादी पारितोषिकाची बाहुली मिळाली न मिळाली तरी त्यात आनंद आहे. नामांकन तर हमखास मिळते.
पण त्यातून पैसा मिळतो का? मानाचा पुरस्कार मिळाल्याने नवीन चित्रपट मिळतात का? उलट, काही चाणाक्ष दिग्दर्शक म्हणतात, माझ्या चित्रपटाला असणारे कलात्मक मूल्य तुला भरपूर मानसिक सुख देईल. तुझ्यातील गुणवत्तेला न्याय तो कधी मिळणार? हो म्हण.. अशा भावनिक ब्लॅकमेलला बळी पडण्यापेक्षा ‘सुपारीची बाग’ फुलवावी. कमी मानधनात आव्हानात्मक भूमिका का बरे साकारायची? अशा रसदार भूमिकांसाठी काही वेळा भरपूर वाचन करावे लागते, काही वेळा आठ-दहा दिवसांची कार्यशाळाही असते, भूमिका सापडावी लागते, भूमिकेत राहावे लागते (विक्रम गोखले, नाना पाटेकर यांना हे सहज जमते, ती त्यांची अनेक वर्षांनंतरची खासियत झाली) अरे बाप रे, पुन्हा दररोज चित्रीकरण संपल्यावर दिग्दर्शकाशी चर्चा करा, त्याची चांगली किंमत नको का मिळायला? फार फार वर्षांपूर्वीच्या मान्यवर कलाकाराला आपल्या गुणवत्तेचे चांगले मूल्य वसूल करता आले नाही, त्याला आजच्या युवा पिढीचे कलाकार दोषी नाहीत. तेव्हा अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीची प्रतिमाच गरीब अशी होती, काही काही निर्माते चांगला चित्रपट पूर्ण करता करताही हतबल होत, समाजाला मनोरंजनासह प्रबोधन द्यावे असा त्यांचा या माध्यम व व्यवसायामध्ये lp67येण्यामागे हेतू असे. त्या काळातील बरेचसे कलाकारही आपल्या मानधनातील शेवटचा हप्ता पूर्णपणे बुडणार हे गृहीत धरूनच तोंडाला रंग लावत.

बुडीत खात्याबाबत निळू फुले खूप रुचकर किस्से सांगत. अशोक सराफला बोलतं केले तर त्याने बेहिशेबी काम किती केले याच्या गंमती जंमती ऐकायला मिळतील. पूर्वीच्या मराठी तारकाही खासगीत निर्मात्याच्या नावासह आपण कसे फसलो हे सांगतात. पण ते सांगताना त्यांना चित्रपटाचे नाव आठवत नाही, त्यात त्यांचा दोष तो काय?
आज ‘सुपारी’ तेजीत येण्यास बरीच कारणे आहेत. एक तर मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत. असे सकारात्मक वातावरण कलाकारांच्या जास्तच पथ्यावर पडले. कलाकारापेक्षा चित्रपट मोठा, मराठीत आशयपूर्ण कथासंपन्नता मोठी हे सत्य उपग्रह वाहिन्यांवरील चर्चामध्ये एक तासाचा वेळ सार्थकी लावायला चांगले व पौष्टिक खाद्य ठीक आहे. व्यवहारी जगात त्याचा उपयोग तो काय? महत्त्वाचे म्हणजे, जग भावनांवर जगत नाही, हे पूर्ण सत्य एकदा मेंदूत भिनल्यावर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरण्याची/ मिरवण्याची चांगली किंमत हवीच. बरं, देणारे दूरदूरवर आहेत म्हटल्यावर घेणाऱ्यांनी हात आखडता का बरे घ्यायचा? तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण जगात जेथे जेथे मराठी भाषा बोलली जाते, मराठीचा प्रचंड अभिमान वगैरे आहे, महाराष्ट्र मंडळ आहे अशा कोणत्याही ‘माती’त ‘सुपारी’ आहे. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडण्यात सुपारी यशस्वी ठरली आहे. याला खरी प्रगती म्हणतात. आखाती देश, युरोप, अमेरिका, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड असा सुपारीचा प्रवास होताना रुपये/ पौंड/ डॉलर/ दिनार अशा चलनात मानधन मिळू लागले. फार वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकासाठी मी लक्ष्मीकांत बेर्डे, तुषार दळवी यांची मध्यमवर्गातून आल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा आलेला विदेश दौऱ्याचा योग यावर अत्यंत भावपूर्ण मुलाखत घेतली होती. आज, किती तरी मराठी कलाकार खूप सहजपणे दुबई, सिंगापूरच्या मॉलमध्ये खरेदीला जातात. याचा मराठी मनाला अभिमानच वाटायला हवा. ?
चित्रपट जेवढा जास्तच लोकप्रिय ठरतो, तेवढा त्यातील कलाकाराचा ‘सुपारी’तील भाव वाढतो. तात्पर्य, चित्रपटाचे यश छप्पर फाडके फायदा करून देते. म्हणूनच तर जवळपास प्रत्येक कलाकार मनोमनी म्हणत असतो, एक सिनेमा जबरदस्त लोकप्रिय ठरू देत. (फायद्याच्या केवढय़ा तरी वाटा- पळवाटा मिळतील) अर्थात, चित्रपटाच्या यशासह स्वत:ला काही ना काही कारणास्तव प्रकाशझोतात ठेवावे, हे चांगले. सई ताम्हणकरला ते कधी, कसे बरे जमून वा जूळून गेले हे खुद्द तिच्याही लक्षात आले नसावे. गुणवत्तेला मेहनतीची जोड व धाडसीपणात प्रगल्भतेची भर अशा समीकरणातून सईची जडणघडण होत गेली. त्यामुळे तिला ‘सुपारी’चीही चांगली किंमत मिळत राहिल्यास गैर ते काय?
बरं ‘सुपारी’ ही आजच्या काळाची रीतसर प्रथा आहे. पूर्वी असे काहीही नव्हते, सामाजिक बांधलकीच्या भावनेने एखाद्या समारंभाला हजर रहायचो, असा कंठ काढण्यात काहीही अर्थ नाही. तेव्हा आयोजकाकडे पैसे मागतानाच कसेसेच व्हायचे. हळूहळू पाकीट संस्कृती आली, रुजली, वाढली. तरी, घरी गेल्यावर हळूच आतल्या नोटा पाहिल्या जात. आता काही कलाकारांनी ‘सुपारीची बोलणी’ करण्यासाठीही एखाद्याची नेमणूक केली आहे. त्यानुसार कार्यक्रमाचे स्वरूप (दुकान/ व्यायामशाळेच्या उद्घाटनापासून लावणीच्या फक्कडबाज नृत्यापर्यंत) येण्याजाण्याची व्यवस्था (नागपूरच्या चित्रीकरणातून गोव्याला जायचे तर विमान हवेच) राहण्याची सोय (जमेल तशा उच्च तारांकित स्थानी याला राहणीमान उंचावले, असे म्हटले तरी चालेल) असे सगळे ‘पॅकेज’ आले.
एकदा नागपूरला गंमतच झाली. कपडय़ांच्या नवीन दुकानाच्या उद्घाटनासाठी मुंबईवरून ‘एक नट, एक नटी’ असे सप्रमाण आमंत्रित केले गेले. व्यवहार ठरल्याप्रमाणे ते आले, म्हणून दुकानदार अधिकच उत्साहित झाला व म्हणाला, तुम्हाला हवे ते कपडे घ्या. स्वत: मालकच म्हणतोय तर त्यात लाजायचे कशाला म्हणून lp68त्या कलाकारांनी भरभरून वस्त्रे घेतली. त्या दुकानदाराने दुसऱ्या दिवशी स्थानिक पत्रकारांना बोलावून त्यांनी आपली रडकथा ऐकवली, त्याची सुमधुर बातमी मुंबईतच्या मराठी वृत्तपत्रातून गाजली.
हलक्या आवाजात अशी कुजबूज आहे की, चित्रपटापेक्षा उपग्रह मालिकेतील कलाकारांना मोठी सुपारी मिळते. एक लाखापासून बोली लागते. चालणारी मालिका त्यातील कलाकारांना सर्व स्तरांवर चालवते. एका लोकप्रिय मालिकेतील कलाकारा जोडीने सुपारीच्या चढत्या किमतीत उच्चांक गाठला आहे असे म्हणतात. अशा कौटुंबिक मालिकेच्या प्रमुख नायिकेशी सर्व स्तरांवरचा समाज जोडला गेलेला असतो. तिच्याबाबत कौटुंबिक आकर्षण असते.
हळदीकुंकू सोहळय़ापासून सुपारीची सुरुवात होते. दिड एक वर्षांपूर्वी लोकप्रिय असलेल्या एका मालिकेतील नायिकेचे युवा वर्गाला विशेष आकर्षण होते. ती खूप मोहक व आकर्षक असल्याने तरुणमनावर तिची पटकन मोहिनी पडली. आपल्या चित्रपटांतून तिने ती कायम ठेवली.
काही कलाकारांना ग्रामपंचायत निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत प्रचारात फिरण्याची सुपारी मिळते. तेव्हा काही कलाकार सावध हुशारी दाखवतात. ते आपला पक्ष एकच, जो चांगली बिदागी देईल, असे गणित मांडतात. त्यामुळे प्रत्येक पक्षाला साथ देता येते. आपला चेहरा पाहून मतदान वाढणार असेल तर सर्व पक्षांसाठी आपण उपलब्ध आहोत अशीच भावना व भूमिका ठेवणे केव्हाही व्यावहारिक शहाणपणाचे!
चित्रपटसृष्टीत मुरत/घडत जाताना या साऱ्याचे ज्ञान येत जातेच. एखाद्या नुकतेच नाव होऊ लागलेल्या कलाकाराला आपल्या गावात/विभागात मोठय़ा हौसेने एखाद्या बक्षीस सोहळय़ाला आमंत्रित केले जाते. तो आपलेपणाने/ भाबडेपणाने जातोदेखील. पण तेथून परतल्याबरोबर त्याला काही अनुभवी कलाकार पहिला धडा देतात, आता तू स्टार झाला आहेस. असे कुठेही फुकट जायचे नसते. अगदी काका-मामाकडे गेल्यावर त्यांच्या शेजारचे-पाजारचे तुला भेटायला येतील, तुझ्याशी हात मिळवतील, तुझ्यासोबत सेल्फी काढतील, त्यांचे जास्त मनोरंजन करायचे नाही. त्यापेक्षा नातेवाइकांनाच आपल्या घरी भेटायला बोलवायचे. बिचारा ते असे काही कानावर घेतो की तो पैसे मिळवायचे किती बरे मार्ग आहेत, याचा शोध घेतो. एखाद्या व्याख्यानमालेत जाहीर मुलाखतीपासून ब्यूटीपार्लरच्या उद्घाटनाची रिबीन कापण्यापर्यंत बऱ्याच संधी आपोआप येतात. बरं, वर्षभर सणांची अखंड/प्रचंड रेलचेल सुरू असतेच. चित्रपटसृष्टीच्या होळीत हौसेने रंगल्यान पैसा मिळत नसला तरी प्रसिद्धी मिळते, अन्य कलाकारांचा सहवास लाभतो. एखाद्या गटात समावेश होतो, घाऊक सुपारीमध्ये ते पथ्यावर पडते. काही सोहळय़ांना एकदम पाच-सात कलाकार हवे असतात (त्यांची आर्थिक ताकद मोठी असते) अशा वेळी अशी कलाकार जोडणी उपयोगी पडते. तेथे गोष्टी जेवढय़ा छोटय़ा तेवढय़ा मोठय़ा.
लहानसहान सुपारीपेक्षा नाचकामाची सुपारी सर्वोत्तम! तेथे कोणत्याही नृत्यावर नाचता येते. ‘ही पोरी साजुक तुपातली’ दीपाली सय्यद झ्याक झटके-मटके देत नाचते आणि ‘पोरी जरा जपून दांडा धर’ नृत्याचा झटका मानसी नाईकही देऊ शकते. खऱ्या अर्थाने यात मोकळेपण आहे आणि नृत्यात या दोघींसह रेशम, स्मिता तांबे, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी-ज्युनिअर, ऊर्मिला कानेटकर, मनीषा केळकर एकदम ‘कडक!’ या प्रत्येकीच्या नृत्यात स्टाइल/ धग/ झिंग/ ताल असे सगळेच एकाच वेळी मौजूद! प्रत्येकीची नृत्यातील मेहनत व झपाटा उत्स्फूर्त आणि विलक्षण आहे. म्हणून तर या प्रत्येकीला सतत कुठे ना कुठे नृत्याची संधी असतेच. मानसी मोघे हे इंडस्ट्रीतलं नवं आणि तरुण नाव. तिच्या सौंदर्याची चर्चा आहेच. तिचा ‘बुगडी माझी सांडली गं’ हा अलीकडे आलेला सिनेमा. ‘बुगडी माझी..’ या चित्रपटासाठी लावणीनृत्य शिकता शिकता मानसी मोघे खूप सहजगत्या नृत्यात पारंगत झाली आहे. तिच्याही नृत्याच्या ‘सुपारी’ला मागणी वाढत राहिली तर त्यात इतके आश्चर्य ते काय? नवीन तजेलदार चेहऱ्यांना मागणी येणारच. अथवा दीर्घकाळ वय झाकता यायला हवे, जे रेशमला छानच जमलंय. व्यायाम, मन:शांती, स्वत:च्या बुद्धीला पटतील ते निर्णय, वस्त्रांची निवड करतानाही आपली दृष्टी महत्त्वाची मानणे, या गुणांवर रेशमने स्वत:ला असे काही घडवले आहे की, ती अजूनही ‘जिवलगा-भाग दुसरा’ या चित्रपटाची धाडसी प्रेयसी ठरू शकते.
lp69हिंदीपासून दक्षिणेकडच्या प्रादेशिक चित्रपटांपर्यंत सर्वत्र ‘सुपारी’ संस्कृती आहे. बँकेच्या उद्घाटन सोहळय़ापासून भूमिपूजन सोहळय़ापर्यंत एखादा कलाकार असला तर वातावरण सुगंधी, प्रसन्न वगैरे राहते. बऱ्यापैकी गर्दीही जमते. मुद्रित माध्यमे- उपग्रह वाहिन्या यांवरून नसली तरी आंतरजाल- सोशल साइटस् यावर मिळणारी प्रसिद्धी प्रचंड सुखावणारी ठरते. ‘सुपारी’तील आर्थिक व्यवहार पांढरा किती व काळा कसा याची फोडणी गरजेची नाही. एवीतेवी अभिनयाची कारागिरी करतानाही अधिकृत पैसा व अनधिकृत कमाई याची जोडणी करावी लागते. ही प्रचलित पद्धत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या ‘सुपारीची बोली’ मोजून पाच लाखांपासून सुरू होते. हिंदी मालिकेतील कलाकारही चलतीच्या काळात बरेच छापतात असे म्हणतात. (छापतात ही बोलीभाषा आहे, त्याचा अर्थ कमावतात.)
‘महाभारत’, ‘रामायण’ या मालिकांच्या काळात, म्हणजे जवळपास पंचवीस-सत्तावीस वर्षांपूर्वी तेथे ‘सुपारी’ला गती व मान्यता मिळाली. नितीश भारद्वाज कृष्णाच्या, तर दीपिका सीताच्या रूपात प्रत्यक्षात दिसणार म्हणजे भाबडय़ा प्रेक्षकांची गर्दी होणारच हो. मालिकेच्या लोकप्रियतेचा कलाकारांना असा लाभ होत आहे हे नवे सत्य लक्षात येताच काही उपग्रह वाहिन्या व निर्मात्यांनी करारात नवी अट समाविष्ट केली. त्यानुसार भूमिकेतील रूपात कुठेही बाहेरच्या जगात हजेरी लावताना पूर्वपरवानगी घ्यायला हवी आणि ‘सुपारीच्या मानधना’चा काही टक्के हिस्सादेखील द्यायला हवा. आपल्यावर हा अन्याय आहे अथवा नाही याचा कलाकार विचार करण्यापूर्वीच हा करार अमलात आलादेखील.
अहो, यामागचे कारण असे की, मालिका अथवा चित्रपटात तुम्ही असलात/ दिसलात तरच तुमचे अस्तित्व व भविष्य आहे. नुसत्या ‘सुपारी’च्या मागे लागून उपयोग नसतो.
चित्रपट माध्यम म्हणजे अनेक लहानमोठय़ा कला व विज्ञान यांचे समीकरण असले तरी एकदा का या मायानगरीत मन रमले की त्यातल्या बऱ्यावाईट प्रथा स्वीकाराव्या लागतातच. मग ती पेज थ्री पार्टीतील एखाद्याने मारलेली मिठी असो अथवा एखादी सुपारी स्वस्तात स्वीकारल्याने एखादीने मारलेली कोपरखळी असो. चेहऱ्यावर कोणतीही मुद्रा येऊ न देता येथे खेळावे लागते.
काही गुणी कलाकार सुपारीतून येणारा पैसा अत्यंत प्रामाणिकपणे काही सामाजिक संस्था व गरजूंना देतात, काहीजण त्याची अजिबात वाच्यता करीत नाहीत, तर काही कलाकार सुपारीचा पैसा उत्तम गुंतवणूक समजतात. म्हणूनच तर मुंबईत प्रशस्त घर असूनही काही कलाकारांचा लोणावळा-अलिबाग- येऊरला बंगला अथवा पिंपरी-चिंचवड-पुणे येथे मस्त घरही आहे. त्यात काहीही गैर नाही. स्वत:च्या लोकप्रियतेचा पैसा मिळवणे चुकीचे नाहीच. एकदा का चलती ओसरली, दुय्यम वा चरित्र भूमिका कराव्या लागल्या की, काहींचा सुपारीतील दामही घसरतो. हुकमी सुपारीही दुसऱ्या कलाकाराकडे जाण्याचे दु:ख पचवावे लागते.
दिलीप ठाकूर

Story img Loader